रुक्मिणी स्वयंवर - प्रसंग चौदावा

रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाचे पारायण केल्याने विवाह लवकर होण्यास मदत होते आणि सुस्वरूप, अनुरूप पती मिळतो असा अनेकांचा अनुभव आहे म्हणून शक्यतो कुमारिकांनी या ग्रंथाचे पारायण करावे.

प्रसंग चौदावा

श्रीगणेशाय नम: ॥ यापरी कृष्णपत्‍नी । रामें प्रबोधिली वचनीं । रुक्मिया दिधला सोडोनी । विरूपपणीं सलज्ज ॥ १ ॥

दीन हीन गेली कळा । वीर्यशौर्य मुकला बळा । केवीं मुख दाखवूं भूपाळा । भीमकबाळा न सुटेचि ॥ २ ॥

पित्यानें म्हणीतलें नपुंसक । त्या वचनाचें थोर दु:ख । दाविता त्रूपतेचें मुख। सकळ लोक हांसती ॥ ३ ॥

प्रतिज्ञा करूनि वाहिली आण । रणीं विभांडोनि श्रीकृष्ण । भीमकी आणीन मी जाण । तोही पण सिद्धी नपवेचि ॥ ४ ॥

यालागीं न वचें कौंडिण्यपुरा । लाजां राहिला बाहिरा । उभवोनि भोजकटनगरा । वस्तीसी थारा तेणें केला ॥ ५ ॥

रुक्मिया सोडिल्यापरी । यादवांच्या दळभारी । लागलिया निशाणभेरी । जयजयकारीं गर्जती ॥ ६ ॥

यापरी रणांगणीं । जिणोनि महावीरश्रेणीं । कृष्णें आणिली रुक्मिणी । अतिविंदानी लाघवी ॥ ७ ॥

कृष्ण निघाला वेगेंसी । आला प्रभासक्षेत्रासी । तेथें पूजोनि सोमनाथासी । दुसें चोपाशीं दिधलीं ॥ ८ ॥

पाहोनि सावकाश वाडी । कटक उतरलें निरवडी । हट चोहट परवडी । घडामोडी वस्तूंची ॥ ९ ॥

राजे प्रजा देशदेशिक । नगर नागरिक लोक । उपायनें जी अनेक । येती सम्नुख घेउनी ॥ १० ॥

जिणोनि सकळिकां रायांसी । विरूप करूनि रुक्मियासी। कृष्णें नेले नोवरीसी । भीमकासी श्रुत जालें ॥ ११ ॥

ऎकोनि जालें अत्यंत सुख । जीवीं न समाये हरिख । मज तुष्टला आदिपुरुख । भाग्य चोख भीमकीचें ॥ १२ ॥

मजपासूनि दोघां जन्म । परी दोहींचें भिन्न कर्म । भीमकी पावली पुरुषोत्तम । विरूपकर्म रुक्मिया ॥ १३ ॥

रुक्मिया निंदी कृष्णासी । तेणेंचि कर्मे वैरूप्य त्यासी । भीमकीभावार्था कृष्णचरणासी । अर्धांगासी पावली ॥ १४ ॥

आपला भावर्थाचि जाण । कृष्णप्राप्तीसी कारण । यावेगळें शहाणपण । केवळ जाण दंभार्थ ॥ १५ ॥

याचिलागी निजभावेंसी । शरण जावें श्रीकृष्णासी । भीमकी अर्पूनियां त्यासी । ह्रषीकेशी भजावें ॥ १६ ॥

पाचारून शुद्धमतीसी । वृत्तांत सांगितला तियेसी । येरी म्हणे रहावा श्रीकृष्णासी । कन्यदानासी विधि करूं ॥ १७ ॥

कन्यादानाचेनि मिसें । कृष्ण पूजूं सावकाशें । पांचां पंचकाचें फिटेल पिसें । अनायासें मन निवे ॥ १८ ॥

भीमक निघाला वेगेंसी । ठाकोनि आला प्रभासासी । लोटांगण श्रीकृष्णासी । निजभावेंसीं घालित ॥ १९ ॥

त्राहि त्राहि जी दातारा । नेत्रीं अश्रुंचिया धारा । कृपा उपजली कृष्णवीरा । वेगें सामोरा धाविन्नला ॥ २० ॥

उचलोनियां वेगेसीं । ह्रदयीं घरी ह्रषीकेशी । येरें मिठी घातली कंठेसीं । भावार्थेसी मिसळला ॥ २१ ॥

जीवींच्या जीवा झाली भेटी । कांही केलिया न सुटे मिठी । बाप कृपाळू जगजेठी । पूर्णदृष्टीं पाहिला ॥ २२ ॥

सच्चिदानंदें झाला तृप्त । सबाह्य देखे कृष्णनाथ । फिटला आर्तीचा मनोरथ । कृतकृत्यार्थ पैं झाला ॥ २३ ॥

मग म्हणे जयजय चक्रपाणी । माझे भाग्य तें रुक्मिणी । विनटली तुझ्या चरणीं । कुलतारिणी चिद्गंगा ॥ २४ ॥

शुद्ध करीत दोहीं कुळां । जेवीं प्रवाह गंगाजळा । तेवीं जन्मली हे बाळा । सकळ कुळा उद्धार ॥ २५ ॥

श्रद्धा शांति निवृत्ति भक्ती । ते हे भीमकी निजमूर्ती । तुज वोपिलो श्रीपती । एक विनंती परिसावी ॥ २६ ॥

वीर्यशौर्य भीमकीहरण । करितां नलगे अर्धक्षण । आतां विधियुक्त कन्यादान । पाणिग्रहण करावें ॥ २७ ॥

हेचि विनंती गरुडध्वजा । चारी दिवस माझी पूजा । अंगिकारावी अधोक्षजा । दास मी तुझा निजभावें ॥ २८ ॥

ऎका श्रीकृष्णविंदान । भक्ताधीन होय आपण । भीमकीचे पाणीग्रहण । भावे जाण करीतसे ॥ २९ ॥

होते श्रीकृष्णाचे मनीं । जे संभ्रमें पर्णावी रुक्मिणी । देवकी सुभद्रादि आणोनी । महोत्सव करावा ॥ ३० ॥

हेंचि भीमकीच्याही चित्तीं । सोहळेनि वरावा श्रीपती । हळदी लावीन आपुलें हातीं । बोहल्याप्रती बैसोनि ॥ ३१ ॥

दोघांसीही प्रीतिकर । भीमक बोलिला नृपवर । कृष्णासी मानलें उत्तर । हर्षे निर्भर भीमकी ॥ ३२ ॥

कृष्ण म्हणे ज्येष्ठ माझा । दादोजीस विनंती करा जा । राम नमस्कारी राजा । चरण वोजा धरियेले ॥ ३३ ॥

कृष्णासी म्हणजे बळिभद्र । होसी कार्यार्थी अतिचतुर । रामे उठवूनि नृपवर । थोर सन्मान त्या केला ॥ ३४ ॥

राजा म्हणे गा श्रीहरी । माझा आश्रम पवित्र करीं । आपुल्या दासातें उद्धरीं । कौंडिण्यपुरीं त्वां यावें ॥ ३५ ॥

भीमकी म्हणे ऎक ताता । भाग्ये पावलासी कृष्णनाथा । मागें सरों नको सर्वथा । गृहममता सांडावी ॥ ३६ ॥

सर्व सामग्री जीवेंभावेंसी । आवडीं आणावीं कृष्णापाशीं । भावें पूजिल्या ह्रषीकेशी । सकळ कुळासी उद्धार ॥ ३७ ॥

वचना मानवला बळिदेवो । ऎकोनि हांसिन्नला देवाधिदेवो । पाणिग्रहण मूळमाधवो । मुळींचा ठावो लग्नासी ॥ ३८ ॥

भीमक म्हणे कळलें बीज । कृष्णपूजनें आमुचें काज । धन्य धन्य माझी आत्मज । श्रीकृष्ण निजबीज पावली ॥ ३९ ॥

इच्या वचनाचें महिमान । पाहतां बुडोनि ठेलें मन । वचनें पळविला अभिमान । मीतूंपण उडविलें ॥ ४० ॥

बाप माझें भाग्य थोर । कृष्ण परब्रह्म साचार । भीमकीयोगें चराचर । ब्रह्माकार पै जाले ॥ ४१ ॥

अवचटें श्रीकृष्णचरणी । वंशींचें विनटलिया कोणी । तोचि सकळ कुळातें तारुनी । परब्रह्मभुवनी नांदवी ॥ ४२ ॥

ऎशा सुखाचेनि हरिखे । राजा बोलिला निजमुखें । वचन भीमकीचें कौतुक । अवश्यक मानिलें ॥ ४३ ॥

सेवक पाठविले नगरासी । वैभवसामग्री वेगेसीं । नगर नागरिकवासी । मूळमाधवासी आणावें ॥ ४४ ॥

सवेंचि विनवी श्रीकृष्णासी । मूळ पाठवा जी द्वारकेसी । देवकी आणी वसुदेवासी । सोहळ्यासी आणावें ॥ ४५ ॥

भाव जाणोनि मानसीं । संतोषला ह्रषीकेशी । मूळ पाठविलें द्वारकेसी । सकळिकांसी सोहळिया ॥ ४६ ॥

पाचारूनी विश्वकर्म्यासी । आज्ञा दिधली मंडपासी । मूळमाधवीं अतिविशेषीं । शोभा चौपाशीं आणावी ॥ ४७ ॥

मूळमाधवी अद्यापवरी । वृक्षमात्र मंडपाकरीं । कृष्णआज्ञा पै तरुवरीं । अजूनिवरी पाळिजे ॥ ४८ ॥

मूळमाधवा आला परी । शोभा देखोनि साजिरी । संतोषला श्रीहरी । निजपरिवारीं उतरला ॥ ४९ ॥

तीर्थस्नान केलें सहजीं । मूळमाधवा माधव पूजी । पूजाविधी सांगिजे द्विजीं । पुण्यपूजीं ऋषीश्वरीं ॥ ५० ॥

भीमकी दिधली भीमकापाशीं । थोर उल्हास झाला त्यासी । कन्या नेली निजमंडपासी । ह्रषीकेशी केळवला ॥ ५१ ॥

कौंडिण्यपुरींची आइती । सकळ सामग्री संपत्ती । घेऊन आली शुद्धमती । भावें श्रीपती पूजावया ॥ ५२ ॥

कृष्णरुक्मिणींचे देख । पाहावया विवाहसुख । नगरनागरिक लोक । आले सकळिक उल्हासें ॥ ५३ ॥

थोर उल्हास श्रीकृष्णासी । मूळें पाठविलीं रायासीं । कुरु- सृंजय - कैकयासी । सोयरियांसी निजलग्ना ॥ ५४ ॥

कृष्णविवाह मनोहर । पाहों आले जी सुरवर । शिव शांभव यक्ष किन्नर । नारदादि वैष्णव ॥ ५५ ॥

वर्‍हाड निघालें द्वारकेबाहेरी । गणेश चढिन्नला उंदरावरी । अग्रपूजेचा अधिकारी । निर्विघ्न करी लग्नासी ॥ ५६ ॥

सिंहें पसरिलें जाभाडें । दुर्गा येऊनि त्यावरी चढे । मुक्तकेश खांडे उघडें । तेही पुढें निघाली ॥ ५७ ॥

वेगें आल्या अष्टमातृका । एकी चढिन्नली वृश्चिका । बाराही ते सूकरमुखा । वर्‍हाड देखा निघालें ॥ ५८ ॥

नेणति वर्‍हाडिणी चरबटा । स्थूल उदर दांत थोटा । उंदिरी चढोनि लुटलुटा । ढेरपोटां का आला ॥ ५९ ॥

विक्राळ सिंहाचे जाभाडें । बाइले हातीं खांडें उघडें । कोण बोलाविलीं वर्‍हाडॆं । अवघ्यापुढे निघाली ॥ ६० ॥

रोडके आंग चढे वृश्चिका । कोणें बोलाविली हे चंडिका । फजितीचे वर्‍हाड देखा । सूकरमुखा कां आली ॥ ६१ ॥

ऎसियासी नेतां वर्‍हाडें । व्याही हांसती रोकडे । यांसी राहवा मागिलेकडे । वर्‍हाड पुढें चालो द्या ॥ ६२ ॥

मिळोनी पांचां पंचकांचा मेळा । निंदूं लागल्या त्या बरळा । कोपल गणेश मातृकांचा मेळा । तात्काळ देखा रुसलिया ॥ ६३ ॥

गणेशें केलें गाढे । ठायीं ठायीं मोडती गाढें । रथीचे पांगुळले घोडे । वर्‍हाड पुढें चालेना ॥ ६४ ॥

कोपलिया महामातृका । शीतज्वर सोडिला देखा । दुर्गा सोडी विषूचिका । हगी ओकी देखा सुटली ॥ ६५ ॥

ओकाओकी वर्‍हाडणी । एकी म्हणती पाणी । उठली माशांची गोंगाणी । साउली पोहाणी घालिती ॥ ६६ ॥

कृष्णासी लग्नाची अति गोडी । म्हणे कां न येती द्वारकेचे वर्‍हाडी । मार्गी कांही पडली आडी । दूत तांतडी पाठविले ॥ ६७ ॥

दूत सांगती श्रीहरी । वर्‍हाडणींसी लागली शारी । खटखटां वाजती दांतोरी । रथीं कुंजरीं न बैसवे ॥ ६८ ॥

बहुतां जाली विषूचिका । गाडे नि:शेष सोडले देखा । तुटी जाली रथांचे आंखां । घोडे देखा पांगुळले ॥ ६९ ॥

कृष्ण कृष्ण म्हणे अबला मूर्ख । उपहासिले विनायका । क्षोभल्या महामातृका । दुर्गा देखा कोपली ॥ ७० ॥

कृष्णें स्तविला विनायक । दिधले साखरेचे मोदक । सुखिया जाला गणनायक । विघ्नें देख निवारिली ॥ ७१ ॥

सुखसेवया कुंकुमरेखा । कृष्णें पूजिली अंबिका । सन्मानूनि महामातृका । मंडपीं देखा स्थापिल्या ॥ ७२ ॥

वर्‍हाड पातलें गजरें । वाजती नाना परीचीं तुरें । नरनारी अलंकारें । केले साजिरे रथ गज ॥ ७३ ॥

श्रीकृष्णाची जे निजजननी । देवकी बैसली सुखासनीं । करवली सुभद्रा बहिणी । गजारोहिणीं मिरवती ॥ ७४ ॥

ज्येष्ठ बंधूची जे राणी । रेवती कृष्णाची वोहिणी । यादवांच्या वर्‍हाडिणी । अनर्घ्य लेणी लेइल्या ॥ ७५ ॥

उग्रसेन वसुदेवासमान । दोघां एकसारखाचि मान । वर्‍हाड दाटलें संपूर्ण । भेरी निशाणें गर्जती ॥ ७६ ॥

दोहीं मंडपीं झाली प्रतिष्ठा । होम दिधला हव्यवाटा । द्विज पूजिले बरविया निष्ठा । वस्त्रें ज्येष्ठा अर्पिलीं ॥ ७७ ॥

आइती केली शुद्धमती । भीमकें आणिली सेवती । नोवरा अभ्यंतरीं श्रीपती । यादवपंक्ती बैसल्या ॥ ७८ ॥

समाधिसुख तेंचि आसन । मुक्तमंडित चौक जाण । बैसावया श्रीकृष्ण । भीमकें विंदान मांडिलें ॥ ७९ ॥

चार्‍ही पुरुषार्थांची चवाई । तेंचि आसन त्यावरी पाहीं । पूजावया निजजावई । भीमक ठायीं तिष्ठत ॥ ८० ॥

म्हणती आचार्य सावधान । शब्द सांडून धरा मौन । वर वरिष्ठ श्रीकृष्ण । फल संपूर्ण त्या हातीं ॥ ८१ ॥

पाहातां श्रीकृष्णाचें रूपडें । अरूपरूपें कृष्ण चहूंकडे । विस्मयें भीमक झाले वेडे । मागे पुढें कृष्ण देखें ॥ ८२ ॥

अनंत रूपें यादवपती । कैसेनि मी पूजूं श्रीपती । पूज्यपूजकतावृत्ती । हेही स्थिती नाठवें ॥ ८३ ॥

केवळ प्रपंच तें वर्‍हाड । परी भीमकाचें भाग्य वाड । परत परमार्थाचें कोड । वर्‍हाड गोड त्या झालें ॥ ८४ ॥

उदक घाली शुद्धमती । चरण प्रक्षाळी नृपती । तीर्थें चरणतीर्थ मावती । कृष्णपदप्राप्ति दुर्लक्ष ॥ ८५ ॥

कृष्णकपाळा पावे कोण । तेथेंही सप्रेम चंदन । भीमकें अर्पिलें शुद्ध सुमन । कृष्णभजन निजभावें ॥ ८६ ॥

शुद्धसत्त्वाचें विरजांबर । चिद्ररत्‍नांचे अलंकार । भीमकें अर्पूनियां अपार । कृष्ण वरावर पूजियेला ॥ ८७ ॥

भीमक गौरवी व्याहीयांसी । व्याहींरूपें देखे कृष्णासी । भूतमात्रीं ह्रषीकेशी । निजवृत्तीसी ठसावला ॥ ८८ ॥

वृद्धपरंपरा ऎसी आहे । वरचरण उटी वोहमाये । शुद्धमती येऊनि लवलाहें । वदन पाहे कृष्णाचें ॥ ८९ ॥

मुगुट कुंडलें कौस्तुभमाळा । झळकत पितांबर मेखळा । देखोनिया घनसावळा । दोहीं डोळा निवाली ॥ ९० ॥

झणीं लागेल बाह्यदृष्टी । म्हणोनि घेतली इटिमिठी । निंबलोण उठाउठी । करि गोरटी निजभावे ॥ ९१ ॥

कृष्णचरणीं लावितां हळदी । अहंभावेसीं ठकली बुद्धी । लाज विसरली त्रिशुद्धी । मीतूंउपाधी नाठवे ॥ ९२ ॥

ज्याचे चरणींचे रज:कण । शिव विरिंची आपण । वंदिताती सांडूनि गुण । ते कृष्णचरण पावली ॥ ९३ ॥

अक्षवाणें करी आरती । कृष्णप्रभा दीपदीप्ती । कृष्णीं लागलिया परमप्रीति । चित्तवृत्ती तद्रूप ॥ ९४ ॥

चिच्छक्ती न सोडी चिन्मात्रा । तेवीं कृष्णाधाकुटी सुभद्रा । मणिमौक्तिकें रत्‍नहारां । दिव्यांबरें दीधलीं ॥ ९५ ॥

शुद्धमती म्हणे देवकीसी । धन्य धन्य म्हणे तुमची कुशी । जेथें जन्मला ह्रषीकेशी । म्हणोनिया पायांसी लागली ॥ ९६ ॥

मग पूजिली यथाविधीसीं । वस्त्रें भूषणें दिधलीं तिसी । जगन्निवास जन्मला कुशी । मान्य सकळांशी यालागी ॥ ९७ ॥

एवं भीमक आणि शुद्धमती । विनीत होऊनि सर्वाप्रती । वस्त्रें भूषणें अर्पिती । सोयरा श्रीपती जोडिला ॥ ९८ ॥

सावधान आचार्य म्हणती । झाली रुखवताची आइती । संतोषली शुद्धमती । भावें श्रीपती प्रार्थिला ॥ ९९ ॥

कृष्ण परमात्मा भव्यमूर्ती । आवरणपूजा यादवपंक्ती । लाविल्या स्वप्रकाशवाती । शुद्धमती सावध ॥ १०० ॥

तळीं त्रिगुणाची आडणी । त्यावरी ताटाची मांडणी । वाढिताती नवजणी । खुतखावणी जाणोनि ॥ १ ॥

ऎका रुकवताची स्थिती । वाढीतसे शुद्धमती । जे जे धाले कृष्णपंक्ती । क्षुधा पुढती त्यां नलगे ॥ २ ॥

झळकती खावार्थाचीं ताटें । जडित चतुर्विध चोखटें । स्वानंदरसें भरिली वाटे । वोतू काठें नेणती ॥ ३ ॥

झाणिवा खुडिवा तोडिवा । त्रिगुण गुणांच्या सोलिवा । शाका वढिती स्वानुभवा । हावभावा फोडणिया ॥ ४ ॥

एकें पचली गोडपणें । एकें सप्रेम सलवणें । एकें नुसतीं अलवणें । बरवेपणें मिरविती ॥ ५ ॥

एके सबाह्य आंबटें । एकें अर्धकाची तुरटें । एके बहुबीजें कडवटें । एकं तिखटें तोंडाळें ॥ ६ ॥

एकें हिरवीं करकरितें । एकें परिपक्वें निश्चितें । एके जारसे कचकचित्तें । एकं स्नेहदेठिंहूनी सुटलीं ॥ ७ ॥

वाळल्या आनुतापकाचरिया । वैराग्यतळणें अरुवारिया ॥ राजसा वाढिला कोशिंबिरिया । नाना कुसरी राइतीं ॥ ८ ॥

मुखीं घालिता अतितिखटीं । नाकीं तोंडी धूर उठी । कुसुमुसुनी कपाळ पिती । दुसरेनि गोष्टी न करवे ॥ ९ ॥

एकें वाळोनि कोरडीं । तोंडीं घालिता कुडकुडी । त्यांची अनारिसी गोडी । बहु परवडी स्वादाची ॥ ११० ॥

वळवटाची नवलपरी । एकें पोपळें अभ्यंतरीं । एकें वर्तुळें साजिरीं । सुमनाकारीं पैं एक ॥ ११ ॥

परवडी दावी यादवराया । सूक्ष्म सेवेच्या शेवया । मोडों नेदि सगळिया । अतिसोज्वळिया सतारा ॥ १२ ॥

शेवया वळिल्या अतिकुसरी । असार केवळ सांडिलें दूरी । घोळिल्या क्षीरसाखरीं । चवी जेवणारीं जाणिजे ॥ १३ ॥

अत्यंत लाडें वळिले लाडु । विवेकतिळवियाचे जोडु । सुरस रसें रसाळ गोडू । चवीनिवाडु हरि जाणे ॥ १४ ॥

पापड भाजिले वैराग्यआगीं । तेणें ते फुगले सर्वांगी । म्हणोनिया ठेविले मागिले भागीं । नखें सवेगीं पीठ होती ॥ १५ ॥

उकलतां नुकलती । आंतल्या आंत गुंडाळती । तापल्या तेलें तळिजेती । कुडी आइती कुरवडिया ॥ १६ ॥

भीमकी प्रिय व्हावी श्रीपती । सांडया न करीच शुद्धमती । जाणे वृद्धाचाररीती । परम प्रीति बोहरांची ॥ १७ ॥

त्रिगुण त्रिकुटीं पचलीं पाहीं । भोकरें खारलीं ठायींच्या ठायीं । कृष्णरंगे रंगलीं पाहीं । आलें ठायीं ठेविलें ॥ १८ ॥

पुर्ण परिपूर्ण पुरिया ॥ सबाह्य गोड गुळवरिया । क्षीरसागरींच्या क्षीरधारिया । इडुरिया सुकुमारा ॥ १९ ॥

सफेद फेणिया पदरोपदरीं । शुद्ध शर्कारा भरली भरी । अमृतफळें ठेविली वरी । अभेद घारी वाढिल्या ॥ १२० ॥

नुसधी गोडियेची घडली । तैसी खांडवी वाढिली । गगनगर्भीची काढिली । घडी मांडिली मांडियाची ॥ १२१ ॥

स्नेहदेठींहुनि सुटलीं । अत्यंत परिपाकें उतटलीं । वनिताहातींहून निष्टलीं । फळें घातिलीं शिखरिणी ॥ २२ ॥

अत्यंत सूक्षं आणियाळें । तांदुळा वेळिलें सोज्वळें । सोहंभावाचें ओगराळें । भावबळें भरियेलें ॥ २३ ॥

खालीं न पडतां शीत । न माखतां वृत्तीचा हात । ओगराळां भरिला भात । न फुटत वाढिला ॥ २४ ॥

अन्नावरिष्ठ वरान्न । विवेकें कोंडा काढिला कांडोन । अवघ्यावरी वाढिले जण । वरी वरान्न स्वादिष्ट ॥ २५ ॥

लेह्य पेय चोष्य खाद्य । भक्ष्यभोज्य जी प्रसिद्ध । षड्रसांचे हे स्वाद । केले विविध उपचार ॥ २६ ॥

जिव्हा चाटून जें घेइजे । लेह्य त्या नांव म्हणिजे । घटघटोनि प्राशन कीजे । पेय बोलिजे तयासी ॥ २७ ॥

रस चोखून घेइजे । बाकस थुंकोनि सांडिजे । चोष्य त्या नाव बोलिजे । खूण जाणिजे रसाची॥ २८ ॥

अग्नि उदक लवणेंविण । जें खावया योग्य जाण। खाद्य म्हणती विचक्षण । केलें लक्षण सूपशास्त्रीं ॥ २९ ॥

क्षीरभात या नांव अन्न । भोज्य यातें म्हणती जाण । रोटी पोळी आणी पक्वान्न । भक्ष्य जाण यां नांव ॥ १३० ॥

ऎसी षड्रसांची गोडी । ताटें वाढिलीं परवडी । चाखों जाणती ते गोडी । निज आवडीचेनि मुखें ॥ ३१ ॥

कृष्णस्वदासी जाणतां जाण । अवघियां आणिलें गोडपण । यालागीं वाढिलें वरी लवण । अपूर्ण तें पूर्ण करावया ॥ ३२ ॥

नाहीं श्रद्धेची जया भूक । आंगीं अश्रद्धेचें असुख । गोड तेंचि म्हणति विख । थुंकोनि देख सांडिती ॥ ३३ ॥

कृष्णपंक्तीची आवडी । श्रद्धाक्षुधा जया गाढी । ग्रासोग्रासी अधिक गोडी । हे परवडी त्यालागी ॥ ३४ ॥

कृष्णपंक्ती नाहीं उणें । जेवितां जेविते जाणती खुणे । रुचलेपणें वाढिती जाणें । सावध म्हणे शुद्धमती ॥ ३५ ॥

कृष्ण देखोनियां डोळा । जीवा जीवन देती चपळा । चतुर्विध सुपरिमळा । येळा वाळा उदादि ॥ ३६ ॥

चतुर्विधा चारी मुक्ती । शुद्धमती पुढें राबती । जें जें पाहिजे जिये पंक्ती । तें तें देती ठायी ॥ ३७ ॥

पहिलें वाढिलें तवजणीं । पूर्ण करिती चौघीजणीं । एकाजनार्दन भोजनीं । अतृप्त कोणी राहो नेदी ॥ १३८॥

इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कंधे हरिवंशसंहितसंमते रुक्मिणीस्वयंवरे रुखवतवर्णननामचतुर्दश: प्रसंग: ॥ १४ ॥

॥ श्रीगोपालकृष्णार्पणमस्तु ॥

 

N/A

N/A
Last Updated : July 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP