व्याधिविनिश्चय - प्रस्तावना

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


लेखक : प्राध्यापक दत्तात्रेय अनन्त कुलकर्णी , एम् एस्सी., आयुर्वेदाचार्य प्राचार्य आयुर्वेदीय स्नातकोत्तर प्रशिक्षण केन्द्र, जामनगर. भूतपूर्व उपसंचालक-आयुर्वेद, उत्तर प्रदेश लखनौ.
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थाच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्य असतें. आणि रोग उत्पन्न झाले म्हणजे त्यांना दूर केल्याशिवाय या चतुर्विध पुरुषार्थाच्या प्राप्तीकरितां प्रयत्न करीत राहणें मनुष्याला अशक्य होऊन जाते. रोग उत्पन्न होण्याच्या मुख्य कारणामध्यें आरोग्यशास्त्रज्ञांनीं असात्म्येन्द्रियार्थसंयोग, प्रज्ञापराध आणि परिणाम (काल) अशी तीन कारणें सांगितलीं आहेत, आणि या तिन्ही पैकीं कोणतीहि एक अथवा अधिक कारणें होऊन व्याधीची उत्पत्ति होऊं शकतें. ह्या नानाविध व्याधीचें ठीक ठीक ज्ञान करुन घेणें आणि त्यानंतर त्यांची चिकित्सा करणें ह्या उद्देशानें व्याधिविनिश्चयासंबंधानें ऐतिहासिक कालापासून अनेक प्रयत्न केलें गेलें आहेत. चरक, सुश्रुत, भेल, आणि काश्यप इत्यादि संहितामध्यें निदानस्थानामध्यें विशेषकरुन आणि प्रसंगवशांत अन्य स्थानामध्यें सुद्धा व्याधिविनिश्चयासंबंधानें माहिती आढळून येते. संहिताकारांनीं सूत्ररुपानें दिलेल्या वर्णनावर नन्तरच्या अनेक टीकाकारांनीं विस्तृत व्याख्या करुन व्याधिविनिश्चयासंबंधीं आवश्यक ज्ञान करुन देण्याचा प्रयत्न केलेला आहेच. तरी पण ही सर्व माहिती एकत्रित रुपानें करुन देण्याचा प्रयत्न केलेला आहेच. तरी पण ही सर्व माहिती एकत्रित रुपानें करुन देण्याचा प्रयत्न माधवकारानें आपल्या माधवनिदान ग्रन्थामध्यें सर्व प्रथम केला आहे. माधवनिदानामध्यें व्याधिविनिश्चयासंबंधीं जें वर्णन आहे तें ज्वर, अतिसार आदि रोगाच्या अनुक्रमानें आहे आणि प्रत्येक रोगाची निदान पूर्वरुप, रुप, उपशय आणि संप्राप्ति या दृष्टीनें शक्यतो संपूर्ण माहिती सूत्ररुपानें देण्याचा प्रयत्न ह्या ग्रंथकारानें केलेला आहे. माधवनिदानंतरच्या कालामध्यें ह्या विषयावर टीका आणि व्याख्या करणें ह्या पलीकडे आयुर्वेदज्ञ वैद्यांची प्रगति झालेली दिसून येत नाहीं. अलीकडे विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून म्हणजे पाश्चात्यचिकित्साशास्त्राचा प्रसार आपल्या देशामध्यें वाढीस लागल्यापासून आयुर्वेदीय व्याधिविनिश्चयाची तुलना पाश्चात्यचिकित्साशास्त्राच्या व्याधिविनिश्चयाशी केली जाऊ लागली आणि आयुर्वेदीय विचार आधुनिक पाश्चात्यशास्त्राशी कितपत जुळते आहेत, किंवा विरोधी आहेत ह्या संबंधानें विचार होऊ लागला आणि त्याचा परिणाम म्हणून संहिताग्रंथाचें किंवा त्यानंतरच्या आयुर्वेदीय ग्रंथाच्या ज्या टीका अलीकडे प्रसिद्ध झाल्या आहेत त्यामध्यें पाश्चात्य चिकित्साशास्त्राची छाप स्पष्टतया दृष्टोत्पत्तीस येते. आयुर्वेदशास्त्राचें अध्ययन, पाश्चात्यचिकित्साशास्त्राचे ज्ञान असलेल्या विद्वानांनीं सुरु केल्यानंतर आयुर्वेदाच्या शास्त्रीयत्वाबद्दल बराच ऊहापोह सुरु झाला. आणि आयुर्वेदचें शास्त्रीयत्व पटलेल्या विद्वानांनीं अष्टांग आयुर्वेदाचें संपूर्ण शिक्षण देण्याच्या दृष्टीनें आयुर्वेदविद्यालयाची स्थापना केल्यानंतर सदर विद्यालयामध्यें आयुर्वेदांचें शिक्षण कशा प्रकारें दिलें असतां उत्तम प्रकारचे वैद्य तयार होऊ शकतील या सम्बन्धानें विचार सुरुं झाला. आयुर्वेदाचें अध्ययन आणि अध्यापन ग्रन्थप्रधान पद्धतीनें न करतां, विषयप्रधान पद्धतीनें भिन्न भिन्न विषय शिकवेलें जावेत हा विचार प्रकर्षानें पुढें आला. मुंबईचें वैद्य श्री यादवजी त्रिकमजी आचार्य यांनीं ह्या कामीं पुढाकार घेऊन अनेक विद्वानांनां विषयप्रधान ग्रंथ लिहिण्याकरितां प्रवृत्त केले. आणि पठन पाठनाच्या दृष्टीनें अत्यंत उपयुक्त व आवश्यक असें अनेक ग्रंत ही यादवजी त्रिकमजी आचार्य ह्यांनी स्वत:च्या कष्टानें आणि खर्चानें प्रसिद्ध ही केले. गेल्या पंचवीस-तीस वर्षामध्यें अशा प्रकारचें अनेक ग्रंथ भारताच्या भिन्न भिन्न प्रांतामध्यें आणि भाषेमध्यें तयार झाले आहेत. आयुर्विद्यापारंगत वैद्य श्री. अनन्त दामोदर आठवले ह्यांनी लिहिलेला व्याधिविनिश्चय हा ग्रंथ विषयप्रधान पाठग्रंथ ह्या दृष्टीनें एक अद्ययावत्  आणि उत्कृष्ट दर्जाचा ग्रंथ आहे असे विधान करण्यास प्रत्यवाय दिसत नाहीं. वैद्य आठवले यांनीं शरीरामध्यें होणार्‍या व्याधीचे वर्गीकरण स्त्रोतसांच्या दृष्टीनें केलेले आहे. त्यामुळें त्यांच्या ह्या वर्गीकरणामध्यें संपूर्ण व्याधींचा समावेश करणें शक्य झालेले आहे, शरीरांमध्ये व्याधी कसें उत्पन्न होतात ह्या सम्बन्धानें आयुर्वेदशास्त्राचा मुख्य सिद्धांन्त असा आहे.
कुपितानांहि दोषांना शरीरे परिधावताम् ।
यत्र संग: खवैगुण्यात् व्याधिस्तत्रोपजायते ॥
सु.सू.२४.

अर्थात्-प्रकुपित झालेले वात, पित्त आणि कफ हे दोष शरीरांमध्यें इतस्तत: फिरत असतांना त्यांना स्त्रोतसांच्या वैगुण्यामुळें ज्या ठिकाणीं अडथळा उत्पन्न होतो त्याच ठिकाणीं व्याधीची उत्पत्ति होते. आणि त्यां पुढें जाऊन स्त्रोतसांच्या दुष्टीचे लक्षण म्हणून त्यांनीं स्पष्टपणें सांगितले आहे.

अर्थात् - स्त्रोतसांची दुष्टी झाली म्हणजे तद्गत धातूचीं अतिप्रवृत्ति किंवा अवरोध किंवा त्यांचे विपरीत मार्गानें गमन होणें ह्या गोष्टी दृष्टोत्पत्तीस येतात. अर्थात् अतिप्रवृत्ति होत असतांना तो ताबडतोब थांबविणें आणि संग किंवा अवरोध असेल तर दूर करणें आणि विपरीत मार्गानें गमन होत असल्यास तें प्राकृत मार्गावर आणून ठेवणें हें स्त्रोतोदुष्टीस दूर करण्याचे मुख्य उपाय आहेत हे उघड आहे. चरकाचार्यांनी तर स्पष्ट म्हटले आहे की -
तदेतत स्त्रोतसां प्रकृतिभूतत्वात् न विकारैरुपसृज्यते शरीरम् ॥
च.वि.९
अर्थात् - शरीरातील ही स्त्रोतसें जो पर्यंत प्राकृत अवस्थेंत आहेत तोपर्यंत कसलाही विकार किंवा रोग उत्पन्न होऊं शकत नाही. स्त्रोतसांचे प्रकार किंवा स्वरुप या सम्बन्धाने ``यावन्त: पुरुषे मूर्तिमन्तो भावविशेषास्तावन्त एवास्मिन् स्त्रोतसां प्रकारविशेषा:, सर्वे भाव हि पुरुषे नान्तरेण स्त्रोतांस्यभिनिर्वर्तन्ते, क्षयं वाप्यभिगच्छन्ति । स्त्रोतांसि खलु परिणाममापद्यमानानां धातूनामभिवाहीनि भवन्त्ययनार्थेन.'' (च.वि.९) असें स्पष्ट म्हटले आहे अर्थात् शरीरांमध्यें जे कांहीं मूर्तिमंत भावविशेष आहेत तितक्यांच प्रकारची स्त्रोतसें ही आहेत, शरीरांतील कोणत्याही वस्तूची वृद्धि किंवा क्षय स्त्रोतसांना सोडून होऊं शकत नाहीं. म्हणजे या क्रिया स्त्रोतसांच्या मार्फतच होतात असें स्पष्टपणें म्हटलें आहे. चरकाचार्यांच्या मतानें शरीरांतील सर्व प्रधान भावांचा म्हणजे घटकांचा समावेश १३ प्रकारच्या स्त्रोतसामध्यें केलेला आहे. आणि वैद्य श्री. आठवले यांनीं चरकाचार्याचें हें मत प्रमाण मानून आपल्या व्याधिविनिश्चय ग्रन्थाची उभारणी सर्वरोगांचे वर्गीकरण या १३ स्त्रोतसांमध्यें करुन केलेली आहे. स्त्रोतसांचे वरी महत्व लक्षांत घेतां व्याधीचे वर्गीकरण स्त्रोतसानुरुप करणें ही वर्गीकरणाची उत्तम पद्धति आहे असेंच म्हटले पाहिजे.

या ग्रन्थाची वैशिष्टये खाली नमूद केल्याप्रमाणें दिसून येतात.
(१) ह्या ग्रन्थामध्यें संपूर्ण रोगांचा समावेश भिन्न भिन्न स्त्रोतसामध्यें केलेला आहे. आणि तसें करतांना बृहत्रयी आणि अन्य आयुर्वेदीय ग्रन्थांतून आढळून येणारी त्यां त्याम स्त्रोतसा सम्बन्धीची सम्पूर्ण वचनें एकत्रित दिलेली आहेत, त्यांमुळें स्त्रोतसांचे स्वरुप, कार्य आणि दुष्टी ह्या सम्बन्धानें माहिती एके ठिकाणीं उपलब्ध झालेली आहे. तसेंच एका स्त्रोतसाचे रोग एके ठिकाणी वर्णन केले गेले असल्याने त्यांच्या संप्राप्ति मधील आणि स्त्रोतोवैगुण्यामुळें लक्षणांमध्यें होणारा फेरबदल लक्षांत येणें सुलभ झालें आहे.
(२) स्त्रोतसांना प्राधान्य देऊन रोगवर्णन केले असल्यामुळें स्त्रोतसाच्या चिकित्सेची सामान्यता तितक्या सर्व रोगांना सामान्य असूं शकतें ही गोष्ट स्पष्टपणें नजरेस येऊं शकतें.
(३) स्त्रोतसांची माहिती देतांना त्याच्या कार्यक्षेत्रांतील शारीरिक अवयवांच्या विकृतिगत अवस्थेकडेहि लक्ष पुरवून त्या अवयवांचे रोगपरत्वे परीक्षण कसे केलें जावें हेहि स्पष्ट केलेले आहे. त्यामुळें व्याधिविनिश्चयाच्या उपक्रमामध्यें अवयवदुष्टीला विशिष्ट स्थान दिलेले असून येते.
(४) प्रत्येक रोगामध्यें त्याची व्याख्या, स्वभाव व मार्ग हेतु संप्राप्ति हे स्पष्टपणें देण्याचा कटाक्ष पाळला गेला असल्यामुळें अमुक रोग म्हणजे काय, त्यांचा स्वभाव कसा, त्याचा प्रसार बाह्य, मध्य किंवा आभ्यन्तर कोणत्या मार्गानें होऊं शकतो हेहि स्पष्ट झालेले आहे.
(५) प्रत्येक रोगाच्या वर्णनामध्यें ``चिकित्सासंदर्भानें लक्षणें'' असें एक प्रकरण दिले आहे. त्यामध्यें त्या रोगाच्या चिकित्सेकरितां सांगितलेल्या औषधी कल्पाच्या फलश्रुतीवरुन ही लक्षणें घेतलेली आहेत. व त्या त्या रोगांत ती लक्षणें उत्पन्न होऊ शकतात व म्हणूनच कल्पाच्या फलश्रुतीमध्यें त्या त्या रोगांत ती लक्षणें उत्पन्न होऊ शकतात व म्हणूनच कल्पाच्या फलश्रुतिमध्यें त्या त्या लक्षणांचा समावेश केला गेला आहे असें प्रतिपादन ग्रन्थकारानें केले गेले आहे. ही माहिती चिकित्सकांना उपयुक्त ठरेल असे वाटते.
(६) तत्द्रोगांच्या वर्णनानन्तर त्यांच्या चिकित्सेची सूत्रेंहि संक्षेपानें दिलेली असल्यामुळें चिकित्साकरणाच्या दृष्टीनें मार्गदर्शन सुलभ झालेलें आहे.
(७) ग्रन्थकर्त्यानें रोगविनिश्चयासंबंधानें संपूर्ण वचनांचा संग्रह तर केलाच आहे, परंतु त्या संबंधानें स्वमतप्रतिपादनकरतांना पाश्चात्य चिकित्साशास्त्रांतील त्यां त्यां रोगाचे वर्णन करण्याचा मोह टाळून विशुद्ध आयुर्वेदीय भूमिकेवरुनच संपूर्ण रोगांचे यथातथ्य आणि सुस्पष्ट वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला असल्यामुळें वाचकांची श्रद्धा आयुर्वेदशास्त्रावर दृधमूल होण्यास विशेष मदत होईल. एकंदरित पहातां, हा ग्रंथ प्रारंभापासून अखेरपर्यंत मौलिक विचारांनीं भरलेला असून तें विचार केवळ तात्विक नसून त्यांचे प्रायोगिक चिकित्साक्षेत्रामध्यें असाधारण महत्व आहे. आतांपर्यंत आयुर्वेदीय क्षेत्रांमध्यें जे कांहीं इतर ग्रंथ लिहिले गेलेले आहेत त्यामध्यें बहुतांशीं अनुवादात्मक आणि समन्वयात्मक विचारच मांडलेले दिसून येतात. कोणतीहि विचारधारा किंवा समस्या असो तिच्या बदल आधुनिकशास्त्रज्ञ काय म्हणतात ह्या गोष्टींचेच स्पष्टीकरण करण्याचा विशेष प्रयत्न केलेला दिसून येतो आणि सदर आधुनिक विचार हें आयुर्वेदीय विचाराशी कितपत ढळतात, किंवा ओढून तांणून कां होईना त्यांचा बादरायणसंबंध आधुनिक पाश्चात्य चिकित्साशास्त्राशीं कशा रीतीनें जोडला जाऊ शकतो ह्या गोष्टीवर विशेष भर दिलेला दिसून येतो. कित्येक ग्रंथ तर आयुर्वेदाच्या नांवाखालीं केवळ पाश्चात्य ग्रंथांचे अनुवादरुपानेंच पुढें आलेले आहेत आणि त्यांमुळें आयुर्वेदशास्त्रासंबंधानें वैद्यांची निष्ठा आणि श्रद्धा ढासळून जाण्यास मदत झाली आहे. वास्तविक पहातां आयुर्वेदीय विद्यालयामध्यें पाठयग्रंथ म्हणून जे ग्रंथ शिकविले जावेत, त्यांचा मुख्य निकष असा असायास पाहिजे कीं त्यांच्या अध्ययन व अध्यापनानें आयुर्वेदावरील निष्ठा आणि श्रद्धा वृद्धिंगत होतील, आणि त्यां शास्त्रांतील आवश्यक अशा सिद्धांताचे आणि ग्रंथांचे नीट आकलनहि वाचकांना होऊ शकेल. ह्या सर्व दृष्टीनीं पहातां वैद्य श्री. आठवले आणि त्यांचे सहकारी ह्यांचा व्याधिविनिश्चय हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठदर्जाचा आणि नवीन विचारांना चालना देणारा झालेला आहे असे स्पष्ट दिसून येते. हा ग्रंथ आयुर्वेदाचें विद्यार्थी, अध्यापक आणि सर्वसाधारण वैद्य अशा सर्वांना अत्यंत उपयुक्त असा झालेला आहे. आणि त्याच्या प्रकाशनानें आयुर्वेदाच्या वाड्मयामध्यें महत्त्वाची भर पडलेली आहे. आयुर्वेदाच्या आठ अंगापैकीं काय-चिकित्सा हा विषय संपूर्णपणें ठीक ठीक व्याधिविनिश्चय होणें ह्यावरच अवलंबून आहे. अशा ह्या महत्वाच्या विषयाची पूर्ति वैद्य श्री आठवले ह्यांनीं परिश्रमपूर्वक केलेली आहे व त्याबद्दल ते धन्यवादास पात्र आहेत. श्रीमत् आत्रेप्रकाशन या संस्थेनें उपयुक्त आयुर्वेदीय ग्रंथाचीं निर्मिती करण्याचा उपक्रम सुरु करुन आयुर्वेदासंबंधीं पाठयग्रंथ आणि इतर उपयुक्त साहित्य प्रकाशित करण्याचा जो प्रयास केला आहे त्यामुळें आयुर्वेदवाड्मय समृद्ध होऊन आयुर्वेदाच्या अध्यनाध्यापनाची उत्तम सोय होईल हे उघड आहे. असा हा उपयुक्त उपक्रम सुरु केल्यांबद्दल श्रीमत् आत्रेयप्रकाशन ही संस्था ह्या ग्रंथाच्या प्रकाशनानें अत्यधिक आदरास पात्र होईल अशी खात्री वाटते.

द.अ. कुलकर्णी
प्राचार्य, आयुर्वेदीय स्नातकोत्तर
प्रशिक्षण केंद्र जामनगर.
जामनगर
दिनांक २०/३/६२

N/A

References : N/A
Last Updated : July 21, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP