संत भानुदास हे एकनाथांचे प्रपितामह म्हणजे पणजोबा. ते दामाजींचे समकालीन होत. इ. स. १४४५ ते १५१३ हा त्यांचा काळ. त्यांनी इ. स. १४६८ ते १४७५ या काळातील दुर्गादेवीचा दुष्काळ पाहिला होता. ‘ आमुचिये कुळी पंढरीचा नेम । मुखी सदा नाम विठोबाचे ’ असे त्यांनी म्हटले आहे. यावरून पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती त्यांच्या कुळात परंपरेने चालत आलेली होती. ज्ञानेश्वरांच्या काळानंतर महाराष्ट्रावर आलेले भयानक परकीय आक्रमण धार्मिक, सांस्कृतिक दृष्ट्याही अत्यंत हानीकारक होते. राजसत्तेच्या आश्रयाने होत राहिलेल्या या धार्मिक आक्रमणामुळे हिंदू लोकांत स्वधर्माचरणाची निष्ठा ढळू लागली होती. उत्तरेकडून येणार्‍या परधर्मीयांबरोबर हजारो सूफी उत्तर - दक्षिण भारतात राजाश्रयाने धर्म प्रचाराचे कार्य करीत होते. इ. स. १३०० मध्ये निजामुद्दीन अवलिया सातशे सूफींचा तांडा घेऊन दक्षिणेत आला; हे लोंढे सतत येत राहिले. हजारो हिंदू आपणहून किंवा बलात्कारे बाटून मुसलमान झाले. देवळे - मठ उद्ध्वस्त होऊन त्या जागी पीर, दरगे, मशिदी उभ्या राहू लागल्या. हिंदू सरदारांना याचे काहीच वाटत नव्हते, कारण त्यांना आपापल्या जहागिरींचा विस्तार करायचा होता, म्हणून ते बादशहांच्या अंकित राहिले. पुणे, पुरंदर, पैठण, वैजापूर, गंगापूर, कंधार, मंगरूळ, उस्मानाबाद इत्यादी ठिकाणचे पीरांचे दर्गे सूफींचे आहेत. पैठण हे जसे महाराष्ट्राचे सांस्कृतिक केंद्र, पण या काळात सूफींनी पैठणातील गणेशाचे, एकवीरा देवीचे व महालक्ष्मीचे मंदिर उद्ध्वस्त करून त्याठिकाणी दर्गे उभे केले. ही गोष्ट इतिहासात नोंदली गेली आहे.
भानुदासांनी बालपणीच सर्व अध्ययन पूर्ण केले. ईश्वराच्या भेटीसाठी त्यांनी अनेक दिवस ध्यानधारणा केली, सूर्य नारायणाची उपासना केली. त्यांचा दृढ निश्चय पाहून सूर्यनारायणाने त्यांना ब्राह्मणाच्या रूपात दर्शन दिले असे सांगतात. काहीही असो त्यांनी आत्मसाधना केली होती, हे खरे. त्याचप्रमाणे भोवतालच्या राजकीय, सामाजिक व धार्मिक दुरवस्थेचेही निरीक्षण त्यांनी केले होते. पुढे त्यांचा विवाह झाला. मुलेबाळे झाली. नातेवाईकांनी त्यांना कापडाचा धंदा घालून दिला. त्यांनी तो अत्यंत निष्ठेने चालवला. त्यांच्या सत्यनिष्ठेची, निर्भयतेची व सरळपणाचे ख्याती सर्वत्र पसरली होती. ते थोर कीर्तनकार होते.
विजयनगरचा राजा कृष्णराय याने विठ्ठलाची मूर्ती पंढरपुराहून आपल्या राजधानीत नेली होती. ती भानुदासांनी प्रयत्नाने पंढरपुरात परत आणली. कृष्णरायाची कारकीर्द इ. स. १५०९ पासून १५३० पर्यंत झाली. या काळात केव्हातरी ही घटना घडली असावी. कृष्णरायाने या मूर्तीची प्रतिष्ठा एक भव्य देऊळ बांधून त्यात केली. हे विठ्ठलस्वामींचे मंदिर म्हणून ओळखले जाते. खोदकामाचा तो एक अद्वितीय नमुनाच होय. विजयनगरचे साम्राज्य इ. स. १५६५ मध्ये नष्ट झाले. तोवर हे काम पूर्ण झाले नव्हते. ते तसेच राहिले म्हणून विठ्ठल मूर्तीची स्थापना झाली नाही असे म्हणतात. विजयनगर स्मारक ग्रंथात इतिहास संशोधक ग. ह. खरे म्हणतात, “ मंदिरातील शिलालेखांवरून आपणाला अगदी निराळीच माहिती मिलते. हे लेख इ. स. १५३३ ते १५६४ या काळातील आहेत. या लेखांवरून मंदिरात विठ्ठलमूर्ती होती व तिची पूजा - अर्चा मोठ्या थाटाने होत असे ही गोष्ट निश्चित ठरते. मग मंदिराचे बांधकाम पुरे झाले असो वा नसो. ” काही शिलालेखांचे आधार देऊन ग. ह. खरे आपले हे मत सिद्ध करतात.
भानुदासांनी पंढरपुरात आणलेली विठ्ठलमूर्ती ही मूळची की कृष्णदेवरायाने विठ्ठलस्वामींच्या मंदिरात स्थापिलेल्या मूर्तीची ती प्रतिकृती, असा एक प्रश्न संशोधकांनी उपस्थित केला आहे.
काही वर्षापूर्वी डॉ. एन. नारायणराव ह्यांस या मंदिरातील परिसरात भग्नावस्थे पडलेली एक विठ्ठलमूर्ती आढळली. ग. ह. खरे ही विठ्ठलमूर्तीच असल्याचा निर्वाळा देतात. ( विजयनगर स्मारक ग्रंथ पुरवणी, पृ. ३५५-३५६ ). पुढे ते असे म्हणतात की, “ तथापि पंढरपुरहून विजयनगरास आणली गेली तीच ही आहे की काय, हा महत्त्वाचा प्रश्न आहे, व तो सोडविण्याचे आपणाजवळ साधन नाही. ”
परंपरा भानुदासांच्या संदर्भात जे मिथक सांगते ते महत्त्वाचे मानले जाते. भानुदासांचे काही अभंग आणि आख्यायिका परंपरेने जपून ठेवल्या आहेत. या आख्यायिकांपैकी एक तत्कालीन परिस्थितीस दुजोरा देणारी आहे. तिच्यात अद्भुतता असली तरी इतिहासाचेच ते एक पुराणीकरण म्हणून त्याला महत्त्व प्राप्त होते.

N/A

References : N/A
Last Updated : March 08, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP