कुशलवोपाख्यान - अध्याय सहावा

‘आर्या’ वृतातील प्रचंड काव्यरचनेबद्दल प्रसिद्ध असलेले मराठी कवी मोरोपंत हे पुराण मोठे छान सांगत.


( स्रग्धरा )
साकेतीं श्रीवसिष्ठप्रभृतिमुनिंस तो राम सन्मार्गचारी,
‘ क्षाळावा ब्रह्महत्यामळ सुकृतजळें कोणत्या ? ’ हें विचारी, ।
ते लंकेशांतकाला द्विजवर म्हणती, ‘ हे जगच्छक्र ! तूतें
नाहीं दुःसाध्य कांहीं, पण कर विधिवद्वाजिराजक्रतूतें; ॥१॥
आम्नायाच्या मतें स्त्रीरहित नर नव्हे यज्ञकर्माधिकारी; ’
जाला या हेतुसाठीं कनकजनकजाक्रांत तो ताटकारी;
दीक्षास्वीकार केला मुनिजनवचनप्रेरितें विश्वतातें,
योजूनी त्राणकर्मीं मखहयपतिच्या त्य असुमित्रासुतातें ॥२॥
‘ कौसल्या एकवीरा, तदुदरभव जो राम काकुत्स्थ वीर,
हा तन्मुक्ताश्व; यातें धरु समरबळी, ज्यासि होईल धीर. ’ ।
एवं सौवर्णपत्रीं लिहुनि रघुवरें बांधिलें वाजिभाळीं,
सोडी विध्युक्त त्यातें, निजक्रकमळें पूजुनी साधु काळीं ॥३॥

( वसंततिलका )
अक्षौहिणीत्रयपति, व्यथितारिनारी,
शत्रुघ्न सत्वर निघे तुरगानुसारी; ।
सोत्साहसैनिककराहतपीनभेरि -
ध्यान, प्रतीपनृततोषधनापहारी ॥४॥

( शार्दूलविक्रीडित )
शत्रुघ्नध्वजिनीपदाहतरजःस्तोम स्वयें अंबरीं,
त्या यात्रासमयीं उडोनि शिरला नीरात्मबिंबांतरीं; ।
झाला चिक्कणपंक घट्ट जडला स्वच्छेंदुदेहास, तो
धौतस्फाटिकभांडकज्जल तसा आजूनिही दीसतो. ॥५॥
वाजींच्या मुखफेनधर्मसलिलें दंतिव्रजाच्या मदें,
झाला पंकित मार्ग; पत्तिस पदें होतीं विलंबप्रदें.
नानावाद्यनिनाद सज्जनमनःश्रोत्रांसि झाला सुधा,
दुष्टांच्या तर चित्तमोहकरणीं व्यालास्यजन्मा सुधा. ॥६॥
रत्नस्वर्णविभूषिता, गजघटाघंटारणन्नूपुरा
वाजिस्यंदनवाहना, शुभयशोहास्या, सुवाद्यस्वरा, ।
नानाभूपशिरःकिरीटमणिदीपा ह्या रिपुघ्नाप्रती,
ओंवाळूनि, अनेकमानववरश्री घट्ट आलिंगिती. ॥७॥

( विबुधप्रिया )
संगरीं मखवाजिहारिधराधिपव्रज मर्दिला,
तच्चिताभसितें सितें बहु पूजणार कपर्दिला, ।
जो तृणानन भूप तो न दिनेशसूनुकरीं दिला;
आत्मनामगतार्थ सार्थ पराक्रमें प्रतिपादिला. ॥८॥

( शिखरिणी )
महामानी होते, परि परिभवें दास्यपर ते
पर स्वांगें जाले; मग विजयिशत्रुघ्न परते, ।
कविश्रीवाल्मीकप्रभवमुनिसंस्थानवसुधा
पथीं झाली सेनानयननिकरातें नव सुधा. ॥९॥

( गीतिवृत्त )
त्या मुनिवराश्रमाच्या नंदनवनगर्वतस्करोपवनीं ।
अवनीशवाह शिरला, स्वजवें लज्जेसि निर्मिता पवनीं. ॥१०॥
त्या गहनींच्या दूर्वा, मरकतमणिपुंजदीप्तिच्या सवती, ।
हरिच्या हरिति मनातें, तरुणनराच्या जशा विलासवती. ॥११॥
वनरक्षणार्थ तेथें करवाली विप्रपुत्रगणाशाली, ।
होता लव वीर, जसा ग्रहसंधानप्रयुक्त करमाली. ॥१२॥
तेणें वनीं अकस्माद् दूर्वांकुरसेवनानुरक्त हरी ।
अवलोकितांचि त्याची श्री तन्मानससरोरुहासि हरी. ॥१३॥
नंदनवनभ्रमागतशक्राश्वभ्रांत्यधिष्ठितस्वांतें ।
कांतें वीरश्रीच्या धरिला वाजी लवें रुषाक्रांतें. ॥१४॥
हयभालबद्धकांचनदललिखितार्थग्रहप्रदीप्तमदें ।
कदलीस बांधिला हय कुशानुजे निजकरें खळश्रमदें ॥१५॥

( स्रग्धरा )
‘ कौसल्या एकवीरा, मम जननि नव्हे वीरस ? काय वंध्या ? ’
ऐसें बोलोनि केली क्षितिदुहितृसुतें दृग्द्वयें तुच्छ संध्या, ।
तेव्हां मित्रें तयातें म्हणति, ‘ हय वृथा बांधिला सोड याला,
भूपाश्वत्राणकारी दवडतिल तुला श्रद्धादेवालयाला. ’ ॥१६॥

( गीतिवृत्त )
एवं सभयसहृज्जनलपितातें आयकोनि, धीरमणी ।
तो लव वदे कुलोचित, ठेवुनि मतिला द्विषद्बलाक्रमणीं. ॥१७॥

( स्रग्धरा )
‘ विप्रस्त्रीकुक्षिजन्मे भयविकल तुम्ही, क्षत्रियादेहभू मी,
सोडूं वाजीस धाकें, तरि मज न हंसे काय हे सर्व भूमी ? ।
मृत्युः श्रेयः कथंचित्, जरि हरिकरितां अर्पिला दुर्जनांहीं,
लोकामध्यें परंतु क्षितितनुजनिला लाज होणार नाहीं. ’ ॥१८॥

( उद्गीतिवृत्त )
जैमिनिकृतभारतगतहयमेधीं कुशलवाख्यानीं ।
सहावा अध्याय श्रवण करावा रसज्ञमुख्यांनीं. ॥१९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 17, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP