अंक दुसरा

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


[ स्थळ : आबासाहेबांचा दिवाणखाना. भिंतीना नुकताच रंग दिलेला असून, सर्व सामान नवीन घेतल्यासारखे दिसत आहे. टेबल मालतीच्या खोलीच्या दाराच्या अलीकडेच भिंतीला लागून ठेवलेले आहे. टेबलाजवळ दोन साध्या खुर्च्या आहेत, व त्याच्या अलीकडे झोके देणारी आरामखुर्ची आहे. टेबलावर पुस्तके मुळीच नसून, फक्त एक दोन वर्तमानपत्रे व लिहिण्याचे सामान ठेवलेले आहे. मागच्या मानाने कपाटांतील पुस्तकांत काही भर पडलेली दिसत नाही. खुंटीला जी सतार टांगलेली होती, ती आता कोठे ठेवलेली आहे हे समजत नाही. दिवाणखान्यात मध्यभागी सतरंजीवर गालिच्या टाकलेला असून, समोर भिंतीशी दोन तक्के ठेवलेले अहेत. त्याचप्रमाणे गालिच्यावर तक्क्याप्रमाणे. तबकामध्ये ऍग्लोमराठी शिष्टाचाराला अनुसरुन पानसुपारीचे सर्व सामान, ’ बर्डस् आय’ चा डबा, वगैरे ठेवलेले आहे.
पात्रे : आबासाहेब, भालचंद्रपंत, विश्वनाथ, मालती व प्रभाकर, आनंदराव : आय. सी. एस्. झालेले एक गृहस्थ.
आबासाहेब टेबलाजवळ असलेल्या दोन खुर्च्यापैकी अलीकडच्या खुर्चीवर, नुकताच परटाकडून आलेला अगदी खडबडीत शर्ट घालून, ’ बर्डस् आय् ची सिगारेट ओढीत व झोके देणार्‍या भालचंद्रापाशी गप्पा मारीत बसले आहेत. मात्र मागील व चालू मुलाखतीमध्ये विशेष फरक म्हणजे, आबासाहेबांनी आज सकाळीच दाढीबरोबर मिशाही काढून टाकल्या आहेत. ]

आबासाहेब : पण मी म्हणतो न पटायला झाले काय ?
भालचंद्रपंत : काय झाले आणि काय नाही. मला तरी कुठे अजून नक्की कळले आहे.
आबासाहेब : बरे यात चूक कोणाची ?
भालचंद्रपंत : तेच सांगतो ना, मला जर काहीच समजले नाही तर....
आबासाहेब : तरी पण तुमच्या मताने कसे काय वाटते ?
भालचंद्रपंत : काय बोवा, तसे काही - पण येवढे खरे ती. मुलगीच जर चमत्कारिक आहे.
आबासाहेब : ती कशी काय ?
भालचंद्रपंत : अहो हट्टी आणि निष्काळजी आहे, दुसरे काय ?
आबासाहेब : तशी आहे म्हणा थोडी फार -
भालचंद्रपंत : थोडी फार नाही ! चांगली पुष्कळच आहे ! अहो तो माणूस बरा आहे. पण.....
आबासाहेब : ( मध्येच मालतीच्या खोलीच्या दाराकडे पाहतो. )
भालचंद्रपंत : समजले की नाही ? तिचा नवरा पुष्कळच चांगला माणूस आहे. दोष असतील त्याच्यामध्ये, नाहीत असे नाही ! पण हिचे जे काही आहे ते वेगळेच ! सदा आपले हिला दागिने पाहिजेत !
आबासाहेब : येवढेच ना ? मग आहे काय त्याच्यामध्ये ? चांगला पगार मिळतो आहे तर द्यावेत करुन.
भालचंद्रपंत : तो देत नाही असे नाही. पुष्कळ करुन देतो. पण सांभाळून ठेवण्याची अक्कल पाहिजे ना ?
आबासाहेब : हो ते मात्र आहे.
भालचंद्रपंत : नुकत्या आठशे रुपयांच्या कुड्या करुन दिल्या होत्या पण परवा इकडे येताना आपल्या गाडीत हरवून टाकल्या.
आबासाहेब : काय हरवून टाकल्या ?
भालचंद्रपंत : हो, अगदी चक्क घालवून बसली बोला आता ? बरं बोलायची सोय नाही ! काकासाहेब जरा कुठे काही म्हणाले, तो लागलीच एका खोलीत गेली, आणि दार लावून तासनतास रडत बसली !
आबासाहेब : हं: काय लग्न होऊन वर्ष झाले नाही तोच भांडणे आणि कटकटी !
भालचंद्रपंत : काही विचारु नका ! काकासाहेब तर अगदी कावून गेले आहेत !
आबासाहेब : आता काय कावून उपयोग ! लग्न करायच्या आधीच ह्याचा नीट विचार -
भालचंद्रपंत : अहो काय विचार करायचा आहे आणि सवरायचा आहे ! मुली जर कोणाचे ऐकूच जर न लागल्या तर तिथे -
आबासाहेब : काय ऐकत काय नाहीत ? चांगल्या थोबाडीत द्याव्यात - ऐकत नाहीत !
मालती : ( खोलीच्या दाराशी येऊन ) आबा, तीन वाजून गेले. ( भालचंद्रपंत मालती एकमेकांकडे पाहतात. पण उभयतांची थोडीफार ओळख असेल व त्यांचे कधी बोलणेचालणे झाले असेल असे काहीच दोघांच्या चेहर्‍यावरुन दिसून येत नाही.  )
आबासाहेब : ( घड्याळाकडे पाहून ) ते खरे, पण अजून ते आनंदराव यायचे आहेत ना ?
मालती : ( काही न बोलता गालिच्याकडे पाहत उभी राहते. )
आबासाहेब : ते आपले आले म्हणजे मग मी सांगेन. समजले की नाही ?
मालती : ( आत जाते व खोलीचे दार लावून घेते. )
आबासाहेब : ( क्षणभर खोलीच्या दाराकडे पाहतो व हातातील सिगारेट पेटवून ओढू लागतो. )
भालचंद्रपंत : काय आबासाहेब, हे आनंदराव कोण ?
आबासाहेब : तुम्हाला नाही का ठाऊक ?
भालचंद्रपंत : नाही बोवा.
आबासाहेब : वा ! तुमच्या तर ते चांगले ओळखीचे आहेत. नाही कसे ?
भालचंद्रपंत : ( आठवू लागतो. ) कोण बरे - ?
आबासाहेब : अहो ते बापूसाहेबांच्याकडे उतरले आहेत ते ?
भालचंद्रपंत : हॉ, हॉ, ते होय ? आमचे ते आनंदराव कलेक्टर साहेब.
आबासाहेब : हो, तेच यायचे आहेत.
भालचंद्रपंत : वा, त्यांची आमची तर चांगलीच ओळख आहे. पण ते - तुमच्याकडे कसे ?
आबासाहेब : यायचे आहेत. परवा बापूसाहेबांच्याकडेच त्यांची माझी एक दोनदा गाठ पडली होती तेव्हा त्यांचे आमचे थोडेसे काही बोलणे झाले. पुढे सहज निघाले की बोवा एकदा आमच्याकडे -
भालचंद्रपंत : अस्से. मग आजची परत भेट आहे तर.
आबासाहेब : नाही तसेच काही नाही निव्वळ -
भालचंद्रपंत : मग काही - विशेष आहे वाटते.
आबासाहेब : हॉ ! ( मालतीच्या खोलीकडे पाहून ) तसेच म्हणायचे.
भालचंद्रपंत : हो का ? तसे असेल तर - फारच छान आहे बोवा.
आबासाहेब : हो, म्हणूनच तर -
भालचंद्रपंत : छे, छे अगदी बिलकुल मागे पुढे पाहू नका आता नक्की ठरवूनच टाका.
आबासाहेब : अहो तेवढ्याचसाठी तर आज -
भालचंद्रपंत : अगदी बेधडक ! माझी त्यांची इथलीच - जरी थोड्या दिवसांचीच ओळख आहे, तरी सुध्दा आपल्याला सांगतो ना, अगदी बेधडक ठरवून टाका.
आबासाहेब : हो, हो, तसेच करतो मी. विचार करण्यात आता वेळच -
भालचंद्रपंत : भलतेच एखादे ! विचार कसला दमडाचा करता आता ! अहो त्याच्यावर कोण उड्या पडता आहेत ! आणि विचार काय करता ? नाही तेच ! -
आबासाहेब : अहो उड्या पडता आहेत म्हणजे किती ! परवा तर त्या ह्याने - नामदार केळकरांना मध्यस्थी घातले होते. ठाऊक आहे ?
भालचंद्रपंत : म्हणूनच सांगतो ना ! काही एक विचार करु नका. आता अगदी डोळे मिटून ( चुटकी वाजवून ) हूं !
आबासाहेब : त्याच्याबद्दल आता काळजीच नको ! आजच्या आज नक्की करुनच टाकतो मी ते. समजले की नाही ?
भालचंद्रपंत : छान आता ठीक आहे हं: बाकी - आबासाहेब, सावज तर मोठं चांगलं गाठलं आहे बोवा.
आबासाहेब : अहो, पण उगीच नाही ! किती त्रास आणि यातायात पडली आहे, ती माझी मलाच ठाऊक. येरा गबाळ्याचे काम नाही ते. काही अक्कल लागते त्याला.
भालचंद्रपंत : हो ते तर आहेच. पण का हो, आमच्या आनंदरावांनी ( मालतीच्या खोलीकडे पाहत ) ह्यांना कधी पाह्यले आहे का ?
आबासाहेब : वा ! तेवढ्याच साठी तर परवा - बापूकडे मुद्दाम आइस्क्रीमचा बेत करवला होता ! त्या वेळेलाच एकमेकाने -
भालचंद्रपंत : हे कमाल आहे बुवा !
आबासाहेब : सांगितले ना ! डोके लागते त्याला ( जिन्यात पाय वाजलेले ऐकून ) अरे, आले वाटते. ( उठून जिन्याच्या दाराजवळ जातो. )
भालचंद्रपंत : मला वाटते आता आपण जावे. ( उठतो व जाऊ लागतो. )
आबासाहेब : भले शाबास ! ते आले आहेत तर आता चहा घेऊन जा अन् असे काय ! आणखी तुमच्या समक्ष - ( डोक्याला टीचभर उंचीची इटालियन टोपी घातलेले व बाकी सर्व युरोपियन तर्‍हेचा पोशाख केलेले आनंदराव आत येऊन आबासाहेबास नमस्कार करतात. भालचंद्रपंत टेबलापलीकडे खुर्चीजवळ जाऊन उभा राहतो. ) - यावे !
आनंदराव : ( गालिच्याकडे नजर गेल्याबरोबर, पायातील बुटाकडे पाहू लागतो. ) मला वाटते -
आबासाहेब : असू द्या, असू द्या, काही हरकत नाही. आपण खुर्च्यावरच बसू म्हणजे झाले.
भालचंद्रपंत : हें: हें: नमस्कार कलेक्टरसाहेब.
आनंदराव : अरे वा ! तुम्ही इथे आहात का ?
आबासाहेब : हे काय बोलणे ! भालूकाका म्हणजे - आमचे अगदी परम स्नेही. हे: हे: बसा. ( आनंदराव खुंटीला टोपी ठेवून झोके देणार्‍या खुर्चीवर बसतो. नंतर आबासाहेब व भालचंद्रपंत हे खुर्च्यावर बसतात. ( आनंदराव हातरुमालाने तोंड पुसू लागतो. )
आनंदराव : हुश्श काय विलक्षण उकडते आहे हो !
आबासाहेब : हो, हो तर ! पुष्कळच उकडते आहे. हा पंखा घ्या -
भालचंद्रपंत : तरी आता कमी आहे ! नाहीतर एप्रिलमध्ये ह्याच्यापेक्षा जास्त -
आबासाहेब : अर्थात् महाबळेश्वरच्या मानाने फारच उकडते आहे हं.
आनंदराव : छे : तिथली गोष्ट कशाला केली पाहिजे ! तिथे म्हणजे काय - विचारायलाच नको. रावसाहेबांनी आणि आम्ही फारच मजेत दिवस घालविले.
( उजव्या हाताने मिशांची टोके नीट बारीक करतो. )
आबासाहेब : रावसाहेब म्हणजे ?
आनंदराव : रावसाहेब गोपाळराव - आपल्या ओळखीचे असतीलच.
आबासाहेब : हो, हो ! ओळखीचे म्हणजे - चांगलेच ओळखीचे आहेत. निदान दोन चार वेळा तरी त्यांचे आमचे नमस्कार - ( खोलीच्या दाराकडे पाहत ) मालती, माले.
मालती : ( खोलीचे दार उघडून घाईघाईने खोलीच्या बाहेर येते, तोच आपल्या डाव्या हातात पुस्तक आहे हे तिच्या लक्षात येते. म्हणून पुस्तक ठेवण्यास ती पुन: खोलीत जाऊ लागते. )
आबासाहेब : अग असू दे. माले, आण ते इकडे. आता लाजून थोडेच चालते आहे. ( आनंदरावाकडे व नंतर मालतीकडे पाहून ) केव्हान् केव्हा तरी ते - हे : हे हिची आपली ओळख झालेलीच आहे.
मालती : ( आबासाहेबांच्या हातात पुस्तक देते, व अंमळ दूर उभी राहून आपल्या खोलीच्या दाराकडे पाहते. )
आनंदराव : ( मालतीकडे पाहून ) हो, हो - काय हो कसे काय ठीक आहे ना ?
मालती : ( मान वळवून किंचित आनंदरावाकडे पाहून पुन्हा खोलीच्या दाराकडे पाहू लागते. )
आनंदराव : काय वाचीत होता वाटते ?
आबासाहेब : हो, हे वायनरचे चाइल्ड हेरॉल्ड वाचीत होती.
आनंदराव : ( पुस्तक हातात घेऊन त्याच्याकडे पाहत ) यंदा - टेक्स्ट आहे वाटते ?
( मिशांची टोके नीट बारीक करतो. )
आबासाहेब : नाही ती टेक्स्टच वाचते असे नाही. अहो ती अवांतर इतके काही वाचते की काही विचारु नका. भारी नादिष्ट पोर. हे: हे:
भालचंद्रपंत : अहो, चाललेच आहे !
आनंदराव : ( तिच्याकडे टक लावून पाहू लागतो. ) हॅ:
आबासाहेब : पण नाद म्हणजे किती ! आई चांगले म्हणत होती की, चार दिवस लोणावळ्याला जाऊ पण नाही ! शेवटी ती आपली - हो, तिथे आमचे मेव्हणे आहेत, त्यांचा बंगलाच तिथे आहे. तेव्हा गेली आहे चार दिवस.
आनंदराव : अस्से. ( पुस्तकांची पाने चाळतो. )
आबासाहेब : कालच  येणार होती ती - कदाचित आज येईल संध्याकाळी - ( पुस्तकाकडे पाहत ) आपण हे वाचलेच असेल ना ?
आनंदराव : हो, वाचले आहे मी, पण काही विशेष -
भालचंद्रपंत : ( किंचित् मालतीकडे पाहून ) अहो असे नका म्हणू ! काही काही लोकांना ते इतके आवडते की काही पुसू नका ! आमचे प्रभाकरपंत तर नेहमी म्हणतात की, चाइल्ड हेरॉल्ड म्हणजे प्रत्येक नेभळट माणसाने - निदान हिंदूने तरी वाचायलाच पाहिजे ! हे: हे:
आनंदराव : ए: आहे काय त्यात ! हे काव्य म्हणजे - एक फर्स्ट क्लास गांजेकसाचे बरळणे आहे झाले. ( तिघेही मोठमोठ्याने हसतात. )
आबासाहेब : बरे आहे मालती, जा लवकर घेऊन ये.
( मालती कपाळाला आठ्या घालून मुकाट्याने जिन्याच्या दाराने जाते. आनंदराव ती दिसेनाशी होईपर्यंत जिन्याकडे सारखा पाहत राहतो. आबासाहेबांची दृष्टी सहज आनंदरावांच्या पायंतील बुटांकडे जाते. )
आबासाहेब : तुमचा बूट मोठा चांगला दिसतो आहे हो ?
आनंदराव : काय बूट ना ? हो, हो, चांगलाच आहे तो.
आबासाहेब : कुठे घेतला कुठे ?
आनंदराव : घेतला आहे कलकत्त्याला. पण आहे का इंग्लिश बूट.
आबासाहेब : असे का ? पाहू पाहू बरे. अगदी नवीनच तर्‍हेचा दिसतो आहे.
आनंदराव : आणि पुन: घालाय काढायला किती सोइस्कर आहे. अगदी दोन मिनिटात -
( मोठ्या चलाखीने उजव्या पायातील बूट काढतो. )
आबासाहेब : ( नाकावर चष्मा लावून ) आणा पाहू. ( बूट हातात घेऊन अत्यंत बारकाईने त्याची तपासणी करु लागतो. )
भालचंद्रपंत : खरेच की, फारच छान बूट आहे.
आबासाहेब : हे: तुम्हाला काय समजते आहे ?
भालचंद्रपंत : हे: हे: हे:
आनंदराव : बरे किमतीत किती स्वस्त आहे ! आबासाहेब : काय पडले ह्याला ?
आनंदराव : काही विशेष नाही, दहा रुपये.
आबासाहेब : पुष्कळच चीप् आहे. एकंदर कामाच्या मानाने - फारच स्वस्त आहे. ( बूट आनंदरावाजवळ देतो. ) बरे मग आमचे एक काम करावे लागेल तुम्हाला.
( पॅडमधून एक कागद काढतो व हातात पेन्सिल व कागद घेऊन खुर्चीवरून उठतो. )
आनंदराव : (बूट घालता घालता ) अगदी जरूर
आबासाहेब : ( कागदावर बुटाचा नंबर लिहून कागद आनंदरावास देतो. ) हा इथे पत्ता; आणि बुटाचा नऊ नंबर लिहिलेला आहे त्याप्रमाणे - दोन जोड आम्हालां कलकत्त्याहून पाठवून द्यायचे, समजले की नाही ?
आनंदराव : हो हो, गेल्याबरोबर अगदी ताबडतोब पाठवून देतो.
आबासाहेब : थॅंक्स्. ( खुर्चीवर बसतो. )
( विश्वनाथ व मालती चहाची किटली, पेले, बशा, एक आंब्यांच्या फोडीची भरलेली व दुसरी बिस्किटांनी भरलेली अशा दोन मोठ्या बशा वगैरे घेऊन आत येतात. )
आबासाहेब : आणलेत ? शाबास. - अरे विश्वनाथ ठेव, सर्व या टेबलावरच ठेव. (विश्वनाथ टेबलावरील वर्तमानपत्रे वगैरे काढून दुसरीकडे ठेवतो, व नंतर आणलेल्या जिनसा टेबलावर ठेवू लागतो, मालती चार पेल्यांत चहा ओतते. )
आनंदराव : ( मालतीकडे पाहत ) अरे वा ! आज काय - आमच्याकरता स्पेशल बेत केला आहे वाटते. हेः
आबासाहेब : नाही, तसे नाही ! आमचे हे असे रोजचेच आहे.
( विश्वनाथ टेबलावर तीन चहाचे पेले ठेवतो व जातो. मालती आपला चहाचा पेला घेऊन खोलीत जाऊ लागते. )
आबासाहेब : का ? इथेच घे की.
मालती : नको मी आतच घेते.
आबासाहेब : बरे तुझ्या इच्छेप्रमाणे -
आनंदराव : ( मालतीकडे पाहत ) चहा घेऊन जा खुशाल. पण दुसरे तिसरे इथले काही - हेंः हेंः ( तिघेही हसतात. मालती आत जाते. खोलीचे दार उघडेच राहते. )
आबासाहेब : हं आनंदराव, भालुकाका, करायची सुरवात आता.
( तिघेही खाऊ लागतात व मधून मधून चहा पितात, खाण्याच्या बाबतीत भालचंद्रपंत विशेष काळजी घेतात. )
आबासाहेब : काय हो, काही बोला आता नवल विशेष.
आनंदराव : छे बोवा तुमच्या त्या जोगळेकरांनी तर अगदी त्रासून सोडले आहे !
आबासाहेब : का ? काय झाले ?
आनंदराव : अहो त्याच्या त्या पोरीसंबंधाने -
आबासाहेब : छेः मुळीच करू नका तुम्ही ! दिसायला काही चांगली नाही - थोडेसे शिकलेली आहे येवढेच.
आनंदराव : झालेच तर ते - मोडक तर काय सारखे पाठीसच लागले आहेत.
आबासाहेब : केश्या मोडकाची मुलगी ना ? ठाऊक आहे. दिसायला चांगली आहे. पण तिचे डोळे बरेच घारे आहेत. आणखी म्हणण्यासारखी शिकलेलीही नाही.
आनंदराव : इतकी शिकलेली नसली तरी चालेल हो. पण दिसायला चांगली पाहिजे. रावसाहेबांच्या मार्फत मी जेव्हा इथे आलो - तेव्हा प्रथमच बापूसाहेबांना सांगितले, की बोवा मुलगी दिसायला उत्तम पाहिजे. मग पुढे -
भालचंद्रपंत : परवा भाऊसाहेब रानड्यांची बहीण पाहिलीतच ना तुम्ही ?
आनंदराव : हो त्या रानड्यांनीही एक पिच्छा पुरवला आहे ! काही विचारू नका !
भालचंद्रपंत : नाही तेच एखादे ! किती जुन्या वळणाचे घराणे. आणि तिथे कसे तुमचे जमणार ? तुम्ही म्हणजे इतके नवीन विचाराचे आहात की -
आनंदराव : आम्ही काय म्हणा ! आमच्या वडिलांनीच इतका पोहो घालून ठेवला आहे - ( तिघेही मोठमोठ्याने हसू लागतात ) की आम्हांला आता परतणेच शक्य नाही. ( भालचंद्रपंतास ठसका लागून तोंडातील बिस्किटांचे तुकडे त्यांच्या अंगावर उडतात. दोघेही हसतात. )
आबासाहेब : अरे सावकाश, सावकाश, भालुकाका, काय हे ! हें.
आनंदराव : असे काही आहे, बापूसाहेबांचे आमचे पुनः कालच बोलणे झाले.
आबासाहेब : कशाबद्दल ?
आनंदराव : हे आमच्या लग्नाबद्दल. त्यांनी सांगितले - की आता काही कोठे उगीच भानगडीत पडू नका. आबासाहेबांचे तुमचे चांगले जमून आले आहे तेव्हा आता मग मीही काही - विशेष -
आबासाहेब : अहो उगीच नाही. बापूला माझ्याविषयी माहिती आहे म्हणूनच त्याने येवढे केले. इथे - या शहरामध्ये आमच्या इकडे नवीन वळणाचे एकतरी घर आहे का दाखवा ! - अहो, मुलाची मुंज नाही. सगळ्यांनी आम्ही जानवी टाकलेली. बरे पुनर्विवाहाबद्दल म्हणाल तर तोही भावाचा केलेला आहे बोला आता. दोघेही भाऊ एम्. ए. आहेत. मुलगा पुढल्या वर्षी एम्. बी. बी. एस्. होईल. झाले, मुलीच्याबद्दल तर तुम्हांला माहीतच आहे. इतके कशाला ? माझ्या मुलीइतकी शिकलेली मुलगी एकतरी इथे आहे का दाखवून द्या. अहो माझी म्हातारी बहीण जितकी सुधारलेली आहे तितकी तुमची माणसे नाहीत ती ?
आनंदराव व भालचंद्रपंत : हें हें हें
आबासाहेब : तसेच दिसण्याच्या बाबतीत म्हणाल, तर माझी दोन्ही मुले दिसायला चांगलीच आहेत. म्हणजे अमुक एक सुधारणा आमच्या घरात व्हायची राहिली आहे, असे काही तुम्हाला दिसायचे नाही. आता आपले घराणे आमच्या इतके सुधारलेले आहे यात काही शंका नाही. आणि म्हणूनच मी इतके मनावर घेतो आहे, नाहीतर परीक्षा झाल्याशिवाय काही माझा - तूर्त लग्न करण्याचा विचार नव्हता. ( पानसुपारी वगैरे घेतात. ) हेः हेः आपले वडीलही मला - जरी कधी फारसे बोलणे झाले नाही - तरी ते चांगलेच ओळखत होते. कारण -
आनंदराव : दोघेही सक्रीय सुधारकच. ( तिघेही मोठ्याने हसतात. )
आबासाहेब : आणखी आपली ओळख किती जुनी आहे याची - दुसरी गंमत तुम्हाला ठाऊक आहे का ?
आनंदराव : नाही बोवा ! ( मनगटावरील घड्याळाकडे सहज पाहतो. )
आबासाहेब : वा ! ती फारच बहारीची आहे ! आपले आजोबा एकदा आमच्याकडे आले होते. तेव्हा आम्ही अगदी लहानच होतो. त्यांनी सहज “ बाव्या बाव्या ” म्हणत असे आम्हाला मांडीवर घेतले. झाले ! पुढे बाव्याने त्यांच्या धोतरावर असा काही सुरेख प्रसाद ठेवला - ( तिघेही मोठमोठ्याने हसतात. आनंदराव उठून टोपी घालतो. )
भालचंद्रपंत : आहे, आता कलेक्टरसाहेबांची मुले तीच परंपरा चालू ठेवतील.
आबासाहेब : काय निघालात ?
आनंदराव : हो, हो, जातो आता, बराच लेट झाला आहे. तेव्हा -
आबासाहेब : मग काय, आपले नक्की ठरले ना मग ?
आनंदराव : हो हो, अगदी शंकाच नको. मात्र लवकरच उरकून घेतले पाहिजे कारण आठ दिवसांचीच रजा काय ती आता शिल्लक -
आबासाहेब : त्याची नको काळजी. दोन दिवसात उडवून देऊ. असे करू - आज रात्रीच मी - जेवून लवकर बापूसाहेबांच्याकडे येतो. आणि मग -
आनंदराव : वा ! फारच छान, पण - मी म्हणतो लक्ष्मीबाईला येऊ दिले तर -
आबासाहेब : काही नको हो ! तिलाही विचारायची जरूर नाही. आणि मालतीला तर मुळीच विचारायला नको आहे. आहे काय त्यात !
भालचंद्रपंत : मालतीबाईचा स्वभाव फारच चांगला आहे. मला ठाऊक आहे ना.
आनंदराव : बरे आहे, चला आता.
आबासाहेब : मालती. ( मालती खोलीच्या दाराशी येते. ) - निघाले आहेत.
आनंदराव : ठीक आहे, जातो आता आम्ही. उद्या पुन: येईनच.
आबासाहेब : आता काय रोजच आहे ते. ( आनंदराव व भालचंद्रपंत जिना उतरु लागतात. ) आणखी आनंदरावजी, दुसरे लक्षात आहे का ? आपले गोत्र वगैरे सर्व काही जमते आहे. माझा विश्वास नाही म्हणा - तरी पण - ( असे म्हणत त्यांना पोहचविण्यास जातो. मालती थोडा वेळ टेबलावरील जिनसांकडे पाहते. नंतर डोळे मिटून दाराच्या चौकटीत डोके टेकून निश्चल उभी राहते. तिच्या उजव्या हातात बायरनचे चाइल्डड हॅरॉल्ड हे पुस्तक नसून दुसरेच पुस्तक दिसत आहे. चार पाच मिनिटानंतर आबासाहेब आत येतात. )
आबासाहेब : बरे झाले बोवा सुटलो एकदाचा ! मोठी काळजी होती. ( मालती दचकते. व दारातच गालिच्याकडे पाहत उभी राहते. ) कसे होईल - काय होईल - पण नाही, चांगलेच जमले, अगदी छानच जुळून आले ! मालती, का ग अशी उभी का ? ये इकडे ये. वा ! आता काय -
( मालती टेबलापलीकडील खुर्चीजवळ येऊन उभी राहते ) आय्. सी. एस्. असिस्टंट कलेक्टर, यांची बायको होणार तू. आणि असे उभे राहून कसे चालेल ? बैस . ( मालती न बसता उभीच राहते. ) काही म्हणून तुला आता कमी नाही, लागेल तितका पैसा, गाड्या, घोडे, मोटार, काय करशील तितकी चैन. हे: हे: हे: छान झाले. बाकी इतके शिकल्याचे सार्थक झाले शेवटी. आज असिस्टंट कलेक्टर आहे. उद्या कलेक्टर होईल, काय होईल अन् काय नाही, काही सांगता येत नाही आणि पुन: माणूस किती उत्तम ! दिसायला उत्तम, स्वभावानेही उत्तम - सर्व काही गोष्टी कशा छान जुळवून आणल्या आहेत मी नाही ?
मालती : ( खाली मान घालून ) आबा -
आबासाहेब : अग इतके लाजायला कशाला पाहिजे आहे ? बोल, बोल, तुला काय बोलायचे आहे ते.
मालती : ( खाली मान घालून ) त्यांच्याशी लग्न करण्याची - माझी इच्छा नाही.
आबासाहेब : काय ( थांबून ) पुन: बोल.
मालती : ( काही न सांगता नकारार्थी किंचित् मान हलविते. )
आबासाहेब : ( संतापून ) आनंदरावाशी लग्न करण्याची तुझी इच्छा नाही ? - तू कोण ?
मालती : ( पुन: नकारार्थी मान हलविते. )
आबासाहेब : मान काय हलवितेस ! बोलता नाही येत ! ( फाडकन तिच्या हातावर मारतो, तोच तिच्या हातातील पुस्तक व त्याच्याबरोबरच त्यातून एक कार्ड साइझचा फोटो, अशी चटकन खाली पडतात. ) आबासाहेब फोटो हातात घेतो व चकित होऊन तिच्याकडे अधिक संतापाने पाहतो. ) काय ग; हा फोटो कोणाचा ? ( ती काही बोलत नाही. ) आणि ही पाठीमागे सॉनेट कसली लिहिली आहेस ? ( दात खाऊन ) ब्राउनिंग अन् फ्राऊनिंग ! बोल ! फोटो कोणाचा हा ? ( इतक्यात जिन्याच्या दाराने प्रभाकर आत येतो, व आबासाहेब संतापलेले पाहून चकित दृष्टीने त्यांच्याकडे व मालतीकडे पाहत दाराशीच उभा राहतो. आबासाहेब संतापाने लाल होऊन प्रभाकरकडे पाहू लागतात, व मालती प्रभाकरास पाहताच गोंधळून जाऊन दोन्ही हातांनी तोंड झाकून रडू लागते. )

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP