मृत्यू आणि वैद्यबुवा

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


एक होता गवळवाडा. तो इतका चांगला होता की, तसा दुसरा काही कुठे नव्हता. त्या गवळवाड्यांचा जो मालक होता, त्याच्याजवळ एक मुलगा नोकरीस राहिला होता. पुढे काय झाले ? तो मुलगा एक दिवस आपली नोकरी सोडून घरी जायला निघाला. तेव्हा गवळी त्याचा झाल्या दिवसांचा पगार देऊ लागला. पण तो मुलगा काही केल्या घेईच ना ! तो म्हणाला “ मला एक दुधाची चरवी द्या, म्हणजे बस झाले. पैसे नकोत अन् काही नको. ” मग त्या गवळ्याने काय केले ? त्याला एक दुधाची चरवी दिली. झाले, ती घेतली अन् निघाला आपल्या घरी जायला. पुढे जाता जाता ती चरवी आपली हळूहळू जडच व्हायला लागली ! तो मुलगा थोडासा पुढे जाई, तो चरवी अधिकच जड ! आता काय करावे ? हाताला तर कळ लागलेली ! बरे त्याच्या मनातून फार होते की, “ कोणी जर या वेळेला भेटेल, तर किती छान होईल ! “ त्याला आपण दूध प्यायला देऊ, आणि आपणही त्याच्याबरोबर पिऊ. म्हणजे आयतीच चरवी हलकी होईळ. ” असे म्हणून सगळीकडे आसपास पाहिले, पण कोणी कोठे दिसेना. शेवटी जाता जाता एक म्हातारा आणि लांब दाढीवाला बुवा त्याला भेटला.
“ कसे काय बाळ, ठीक आहे ना ? ” असे त्या बुवाने त्या मुलाला विचारले.
मुलगा म्हणाला, “ ठीक आहे बरे बाबा. ”
“ कोणीकडे निघालास ? ”
“ अहो मघापासून मी पाहतो आहे कोणीबरोबर तरी थोडेसे दूध प्यावे म्हणून. म्हणजे चरवी तरी हलकी होईल ! ”
म्हातारा म्हणाला, “ दुसर्‍या कोणाबरोबर कशाला ? माझ्याबरोबरच पी की. इतका लांब चालून आलो आहे मी, की अगदी थकून गेलो आहे ! तहान तरी किती लागली आहे ! ”
मुलगा म्हणाला, “ बरे काही हरकत नाही. पण बाबा तुम्ही कोण आहात ? , अन् आला आहात कुठून ? ”
“ मी होय; सगळ्यांचा ईश्वर आहे, अन् आलो आहे स्वर्गातून. ”
असे तो बुवा म्हणाल्याबरोबर मुलगा काय म्हणाला ? “ असे का ? मग तुझ्याबरोबर नाही मी दूध पीत. कारण जगात तू सगळ्यांना सारखे नाही वागवीत्त. कोणाला फारच श्रीमंत करतोस ! तर कोणाला अगदी भिकारी करतोस ! छट् ! तुझ्याबरोबर नाही आपण दूध पीत ! ” असे म्हणून त्याने लागलीच आपली चरवी घेतली, आणि निघाला झपझप् !
झाले, थोडासा पुढे जातो, तो पुन्हा चरवी आणखी जड झाली ! आली पुनः पंचाईत ! हो, दूध प्यायला कोण भेटले तर बरे, नाही तर ती न्यायची कशी ? इतक्यात आला एक माणूस चवताळून आणि धावपळ करीत ! असा दिसायला घाणेरडा होता की बोलायला नको !
तो म्हणाला, “ कसे काय बाळ, खुशाल आहेस ना ? ”
मुलगा म्हणाला, “ खुशाल आहे बरे बाबा. ”
“ कोणीकडे निघालास ? ”
“ अहो काय सांगू तुम्हाला ! मघापासून सारखा मी पाहतो आहे. कोणाबरोबर तरी दूध पिईन. म्हणजे ही चरवी तरी एकदाची हलकी होईल ! ”
तो बुवा म्हणाला, ‘ अरे मग माझ्याबरोबर पितोस का ? किती लांबून चालून आलो आहे मी ! थकून गेलो आहे अगदी ! तहानेने जीव कसा कासावीस झाला आहे ! मग पितोस का माझ्याबरोबर ?
“ हो हो, तुमच्याबरोबर का नाही ? चला आपण पिऊ. पण का हो, तुम्ही आला आहात कुठून ? कोण तुम्ही ? ”
तो बुवा म्हणाला, “ मी होय, मी आहे सैतान, अन् आलो आहे नरकातून. ”
हे ऐकल्याबरोबर तो मुलगा म्हणाला, “ चल नीघ ! गरीबांना छळतोस आणि झिजवून मारतोस तू ! जरा कुठे त्रास झाला की, तुझ्या नावाने ओरड ! असला दुष्ट तू ! तुझ्याबरोबर नाही मी दूध पीत. ”
निघाला ! कशीबशी चरवी घेतली अन् चालला पुन्हा रखडत. जाता जाता खूप लांब गेला. चरवी तर आणखी जड झाली. ती तर काही नेता येईना मग कोणी येते की, काय म्हणून लागला बिचारा इकडे तिकडे पाहायला ! करतो काय ? शेवटी मग किती तरी वेलाने आला आणखी एक माणूस. किती रोड झाला होता, अन् सुकून गेला होता ! नुसती हाडे राहिली होती ! हो, ती तरी जागच्या जागी राहिली हे नवलच म्हणायचे !
नंतर विचारले त्या माणसाने, “ कसे काय, ठिक आहे ना बाळ ? ”
मुलगा म्हणाला, “ ठीक आहे बाबा. ”
“ पण तू निघालास कोठे ? ”
असे त्या माणसाने विचारल्याबरोबर तो म्हणाला, “ काय सांगू बाबा ! रडकुंडीस आलो आहे मी ! माझ्याबरोबर दूध प्यायला कोणी येत नाही, अन् ही चरवी काही हलकी होत नाही ! किती जड झाली आहे ! नेऊ तरी कशी आता ? ”
तो माणून म्हणाला, “ अरे मग मी आलो आहे. चल आपण पिऊ. काही हरकत तर नाही ? ”
“ छे छे ! हरकत हो कशाची ! पण तुम्ही आहात कोण ? ”
तो बुवा म्हणाला, “ मी आहे मृत्यू ”
हे ऐकल्याबरोबर मुलगा म्हणाला, “ वा ! मग काय छान झाले ! मला हवा तसा माणूस मिळाला ! किती आनंद झाला आहे ! चला, आपण दूध पिऊ. तूच तेवढा खरा अन् विश्वासू माणूस. श्रीमंत काय, गरीब काय सगळ्यांना सारखे वागवितोस तू. ”
असे म्हणून पेल्यात दूध ओतू लागले एकमेक प्यायला. पिता पिता मृत्यू अगदी खूश होऊन गेला; अन् म्हणाला काय ? “ दूध फार छान आहे बुवा ! असे काही कुठे प्यालो नव्हतो मी ! ” असे तो म्हणाल्यावर मुलाला मृत्यू अधिकच आवडायला लागला. मग काय ? पुन्हा दुधावर सपाटा ! चरवी अगदी हलकी व्हायला लागली.
झाले, मग शेवटी मृत्यू म्हणाला, “ किती गोड दूध हे ! असे काही कधी मी प्यालो नवह्तो. अंगात हुशारी तरी किती आली आहे माझ्या आता ! खरेच, याच्याबद्दल तुला काय बक्षीस देऊ. अन् काय नाही असे झाले आहे मला ! ” मग थोडावेळ मृत्यूने विचार केला. अन् त्या मुलाला सांगितले, “ ही तुझी चरवी आहे नाही ? ही कधी म्हणून रिकामी व्हावयाची नाही. नेहमी भरलेली, मग कोणी कितीही दूध पिवो. अन् दुसरे असे, एकादा कसाही आजारी माणूस असो, अगदी सगळ्या वैद्यांनी हात टेकले, काही केल्या तो बराच होत नाही, त्याला हे दूध पाज. की पुनः आपला तो खडखडीत. ” आणखी मृत्यूने हेही सांगितले की, “ तू जेव्हा जेव्हा आजारी माणसाच्या खोलीत येशील, तेव्हा मी आपला तिथे हजर. आजारी माणसाच्या उशाशी, नाहीतर पायथ्याशी - कुठे तरी तुला दिसायचाच. आता पायथ्याशी असलो तर लागलीचस समज की, तुझ्या दूधाचा गुण येईल, माणूस बरे होईळ. पण मी उशाशी का असलो, तर मग तू त्याला दूश पाजू नकोस. पाजलेस तरी ते जगायचे नाही. त्याला मी नेणारच. ”
इतके झाले. पुढे लवकरच त्या मुलाची जिकडे तिकडे वाहवा होऊ लागली. सगळीकडे त्याला बोलावणे. मरायला टेकलेली माणसे, पण ती सुद्धा त्याने बरी केली ! मृत्यू आजारी माणसाजवळ दिसायचा अवकाश की, ह्याने ती मरतील की, जगतील, हे नक्की आधी सांगितलेच. आता काय ? ज्योतिषीही चांगला आणि वैद्यही चांगला ! मग पैशाला काय कमी ? लोकही तो सांगेल तसे ऐकू लागले. असे होता होता, दूरच्या एका राजाची मुलगी फारच आजारी पडली. सगळ्या वैद्यांनी हात टेकले. ती बरी काही होईना. शेवटी आले याला बोलावणे. राजाने सांगितले की, “ माझ्या मुलीला बरी कर, मागशील ते तुला मी देईन. ”
ठरले. आणि मुलगा जो राजकन्येच्या खोलीत जातो तो काय ? मृत्यू तिच्या उशाशी बसलेला ! पण बसता बसता लागला होता पेंगायला. तो राजकन्येला अंमळ बरे वाटले.
मग आपले हे वैद्यराज काय म्हणाले, “ फार कठीण आहे बुवा. आशा तर काही दिसत नाही. ”
पण ती माणसे थोडेच ऐकतात, तो म्हणाला, “ वैद्यबुवा काय वाटेल ते करा. राज्य घ्या. काय लागेल ते मागा, पण हिला तुम्ही बरी केलीच पाहिजे. ” मग काय करतो ! पाह्यले त्याने मृत्यूकडे. तो बसला होता डुलक्या घेत. हळूच मुलाने चाकराला खूण केली की, “ फिरवा चटकन् असा हा बिछाना ! ” झाले ! बिछाना फिरवायचा अवकाश ! तो मृत्यू झाला पायथ्याशी ! मग काय ! चटकन् राजकन्येला दूध पाजिले, अन् लागलीच तिला बरी केली !
असा मृत्यू संतापला ! आणि म्हणाला, “ लबाडा ? मला फसवलेस तू ! आपली मैत्री तुटली आता ! ”
मुलगा म्हणाला, “ मी काय करणार ? राज्य घालवू की काय ? ” मृत्यू म्हणाला, “ ते काही चालायचे नाही ! तुझी वेळ भरली. तुला आता मी मारणार. ”
मुलगा म्हणाला, “ मारणार तर मार बाबा. मग काय करणार ! पण मरायच्या आधी देवाचे एकदा नाव तर घेऊ देशील ? ”
मृत्यू म्हणाला, “ ठीक आहे. देवाचे नाव घे म्हणजे मग मी तुला मारीन. ” पण मुलगा कसला वस्ताद ! देवाचे नाव घेतो आहे कशाला ! दुसरे काय वाटेल ते बोलला. पण नाव नाही तोंडातून देवाचे ! त्याला तर वाटले की, म्रुत्यूला आपण चांगले खासे फसवले  ! मग असे होता होता पुष्कळ दिवस होऊन गेले. मृत्यू अगदी कंटाळून गेला. वाट पाह्यची तरी किती आता ? मग त्याने एक दिवस काय केले. हळूच मुलाच्या खोलीत गेला, तो आपला निजला होता, मग मृत्यूने असे केले, मुलाच्या तोंडासमोरच भिंतीला लटकावली एक मोठी पाटी. आणि बसला लपून. मग सकाळी मुलगा जो डोळे उघडून पाहातो तो, समोरच मोठी पाटी ! पाटीवर काय बरे लिहिले आहे ? असे म्हणून जो नीट पाह्यला जातो, तो “ नाव घ्यावे रामाचे ” असे गेला चटकन बोलून ! तो मृत्यू आपला पुढे उभा ! मग काय करतो ? मृत्यूला तर आनंद झाला ! “ चला महाराज ! घेतले की नाही देवाचे नाव ! ” असे म्हणून गेला घेऊन त्या मुलाला.

‘ ज्योत्स्ना ’ दिवाकर विशेषांक ऑक्टोबर १९३७
एका नॉर्वेजियन कथेच्या आधारे

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP