प्रवेश पहिला

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


[ स्थळ : भाऊरावांच्या वाड्यातील पाच खणी माडी. माडीच्या पूर्वेस : लाकडाची वखार व १३ नंबरची मुतारी. पश्चिमेस : आपल्या पतिव्रता स्त्रीस नित्य नेमाने पण गांजाच्या तारेत झोडपणार्‍या त्रिशूळभटजीचे घर. उत्तरेस : अतिशय रहदारीबद्दल व त्यामुळे पावसाळ्यात होणार्‍या चिखलाबद्दल सर्व शहरात नावाजलेला व म्युनिसिपालिटीच्या लौकिकात उत्तरोत्तर भर टाकणारा असा बोळ. दक्षिणेस : लहानसे अंगण, व त्याच्यापलीकडे एका दुमजली घराची चांदई. तिला खिडक्या वगैरे काही नसल्यामुळे पलीकडे अखंड सुवासिनी राहतात का आणखी कोणी राहतात, हे काहीच नक्की कळत नाही. भाऊरावांच्या वाड्यात शिरण्याचे दार - नव्हे दरवाजा बोळातच आहे.
माडीला विलायती पोपटी रंग दिलेला आहे. आत शिरण्याचे दार डाव्या हाताकडील भिंतीला अलीकडच्या कोपर्‍यात आहे. समोरच पहिल्या खणात आत जाण्याचे एक दार आहे. भिंतीला लागून दुसर्‍या खणात एक मोठे टेबल आहे. त्याच्यावर लिहिण्याचे साहित्य व कागदपत्रे ठेवण्याचे उतरते खण असलेले एक लाकडी पंचपाळे, टेबलाच्या जवळच तीन बाजूला तीन खुर्च्या आहेत. जवळच खांबाला पाच पंचवीस पावसाळे पाहिलेले घड्याळ आहे. तिसर्‍या खणात झरोका,व चौथ्या खणात खिडकी आहे तिच्या खालच्या निम्म्या भागाला तांबड्या अलवणाचा पडदा लावलेला आहे. चौथ्या व पाचव्या खणाच्यामध्ये तपकिरी रंगाचा मोठा पडदा लावल्याकारणाने पाचव्या खणातले रहस्य समजत नाही. तिसर्‍या व चौथ्या खणात मोठ्या सतरंजीवर गालिच्या टाकलेला असून, त्याच्या चारी मर्यादा दोन तक्के व दोन लोड यांनी रोखल्या आहेत. मोठ्या पडद्याच्या अलीकडे एक लहानसे राऊंड टेबल असून, त्याच्यावर वर्तमानपत्रांचे दोन चार अंक पडलेले आहेत. पानतंबाखूचे तबक, सुपार्‍यांच्या बारीक बारीक खांडांनी भरलेला एक लहानसा वाटोळा डबा, विड्यांचा डबा, काड्यांची पेटी, वगैरे कष्टमय संसारयात्रेचा विसर पाडणार्‍या पण आवश्यक अशा गोष्टी इतस्तत: पडलेल्या आहेत.
समोरच लोडाशी टेकून उपनेत्रविभूषित रा. शंकरराव हे टाइम्सचा अंक वाचीत पडलेले आहेत. यांना सर्व मित्रमंडळी ’ म्हातार्‍या थेरड्या ’ या अत्यंत प्रेमळ नावांनी हाक मारीत असतात. दुसरे गृहस्थ बाळासाहेब - मधूनमधून यांनाही ’ बाळकोबा, बाळक्या ’ या नावांचा प्रसाद मिळत असतो. हे सुपारी फोडीत विडा खाण्याच्या तरतुदीत आहेत. आजच यांनी साफ गुळगुळीत गोटा करविलेला दिसतो आहे. मात्र टाळक्याच्या मध्यभागी इवलिशी शेंडी लचकत व मुरडत आहे. तिसरे गृहस्थ भाऊराव हे डाव्या हाताकडील भिंतीजवळ एका रांगेत उभ्या असलेल्या दहाबारा लहान ग्लोबच्या चिमण्यांनी ऊर्फ गार्डस ऑफ ऑनरची तपासणी करीत आहेत. मधूनमधून बक्षिसादाखल त्यांच्या तोंडात हातातील बाटलीतून सरकारस्वारी रॉकेल ओतीत आहे व फडक्याने त्यांची तोंडे पुशीत आहे. ]

भाऊराव : ( चिमणी पुशीत ) काय बाळकोबा, तुम्ही दोन दिवस होता कुठे ? दिसलाच नाहीत अगदी. ( एक चिमणी ठेवून दुसरी पुसू लागतो. )
बाळासाहेब : ( मोठ्या गंभीरपणाने ) ते काही विचारु नकोस ! आमच्या भानगडी आम्हीच करु जाणे.
भाऊराव : हो हो, ते आहेच. पण येवढे होते तरी काय ?
बाळासाहेब : अरे ते असे झाले, परवा कमिशनरकडचे बोलावणे आले होते -
भाऊराव : ते काय म्हणून ?
बाळासाहेब : आमची ती मागची भानगड तुला ठाऊकच आहे.
भाऊराव : हो, आले लक्षात. ( सर्व चिमण्या पुसून होतात. )
बाळासाहेब : तिच्याच संबंधाने साहेबांना काही समक्ष विचारायचे होते; म्हणून बोलावले होते भेटीला.
भाऊराव : ( सर्व चिमण्या आत ठेवून बाहेर येतो. ) मग तुम्ही गेलाच असाल भेटीला. कारण तुमच्या शिवाय -
बाळासाहेब : मी नकोच म्हणत होतो. पण अण्णांचाच आग्रह फार ! ते म्हणाले ’ ते काही नाही. तुला आलेच पाहिजे. तुझ्याशिवाय नाही जमायचे ते !’ तेव्हा सारा दिवस त्या गडबडीत होतो.
भाऊराव : अस्से ! पण तुम्ही तिथे जाऊन केले काय ?
शंकरराव : ( वर्तमानपत्र वाचीत ) कोणी ह्यांनी ना ? देवडीवर बसून तिथल्या पट्टेवाल्यांच्या हजामती तर केल्या !
भाऊराव : हा: हा: हा: ! ( भाऊराव व शंकरराव दोघेही मोठमोठ्याने हसतात. )
बाळासाहेब : ( रागावून ) अरे हो ! गप् बैस थेरड्या ! तू कुठला लेका झ्याडू ! - उगीच नाही ! साहेब माझ्याशी पंधरा मिनिटे बोलत होता ! ठाऊक आहे !
भाऊराव : बरे शेवटी निकाल तुमच्यासारखा झाला की नाही ?
बाळासाहेब : अरे तो व्हायचाच ! कारण साहेबाने आमचे दोघांचेही म्हणणे अर्धा - पाऊण तास ऐकून घेतले, आणि सांगितले की, बहुतेक तुमच्याच बाजूचा मी -
भाऊराव : अरे वा !
बाळासाहेब : झाले नाही काहीच ! ( कपाळाला आठ्या घालून ) पण गव्हर्मेंट हाउसमध्ये जावे लागेल ना ! तिथले बोलावणे आले होते ! त्रासून गेलो आहे अगदी. जरा कुठे हलेन म्हटले तर फुरसत नाही. ( विडी ओढू लागतात.  )
भाऊराव : ( बाळासाहेबांच्या नकळत शंकररावाकडे पाहून व डोळे मिचकावून ) हं, चाललेच आहे. कामेच तशी दगदगीची. त्याला तुम्ही तरी काय करणार. ( असे म्हणून राक् ऑईलची बाटली व फडके घेऊन आत जातो. )
बाळासाहेब : ( शंकररावांच्याजवळच पडलेले टाईम्सचे एक पान घेऊन वाचण्याचा प्रयत्न करतात. एकदोन मिनिटानंतर स्वारी उठून माडीत इकडून तिकडे फेर्‍या घालू लागते. नंतर मधेच थांबून ) काय रे म्हातार्‍या ? लेका काय वाचतो आहेस येवढे ?
शंकरराव : आजचा अग्रलेख फार चांगला आहे.
बाळासाहेब : झक् मारतो तो अग्रलेख. बातमी काय आहे बोल. ( घेतलेले पान गालिच्यावर टाकून खुर्चीवर बसतात. )
शंकरराव : काही विशेष नाही.
बाळासाहेब : तरी पण. अगदीच नाही असे कसे होईल.
शंकरराव : अहो दुसरी काय असायची ! आपल्या दोस्तसरकारकी फत्ते हाय !
बाळासाहेब : अन् जर्मनीचा बोर्‍या का ?
शंकरराव : अर्थात् !
बाळासाहेब : पण जर्मनीही काही हलके प्रकरण नाही आहे.
शंकरराव : अहो जड असेल तर बुडेल लवकर.
बाळासाहेब : बुडते आहे ! उगीच नाही ! जर्मनीही काही कमी पाताळ्यांची नाही.
शंकरराव : पण आमचे सरकार तर मृत्युयंत्री आहे !
बाळासाहेब : अस्से !  परवाची आपण बातमी वाचली नाही असे दिसते आहे !
शंकरराव : ती काय बोवा ?
बाळासाहेब : मग टाइम्स कशाला झक् मारायला वाचतोस ! लेका दिसत नसेल तर आणखी एक चष्मा लाव ! म्हणे टाइम्स वाचतो !
शंकरराव : काय बोवा काही लक्षातच येत नाही.
बाळासाहेब : येईल कशाला ! टाळक्यात तुझ्या बटाटे भरले आहेत ना !
शंकरराव : पण ही केव्हाची बातमी ?
बाळासाहेब : अरे लेका परवाची ! परवाच्याच अंकात होते नीट वाचीत नाहीस.
शंकरराव : मग सांगाना काय आहे ती ?
बाळासाहेब : ( वेडावून ) शांगा ! कशाला सांगा ! अरे धडधडीत परवाच्या अंकात होते की हिंडेनबुर्ग अफगाणिस्थानात खलबत करायला आला आहे म्हणून !
शंकरराव : अफगाणिस्थानात ?
बाळासाहेब : हो, हो, लेका अफगाणिस्थानात ! हे झाले. आणखी - अडमिरल् व्हॉंन गोल्डझ् हा फ्रान्सकडे आला आहे म्हणून अन् मॅंकिनसन तर काय इटालीकडे आहेच !
( खुर्चीवरुन उठून शंकररावाच्या समोर तक्कयाशी टेकून बसतात. )
शंकरराव : ( अत्यंत गंभीरपणे ) मग मात्र कठीण आहे !
बाळासाहेब : कठीण म्हणजे ! पुष्कळच ! ( इतक्यांत भाऊराव आत येतो. ) काय रे मशालजी, झाले का नाही तुझे दिवे पुसणे अजून ?
भाऊराव : झाले बोवा.
बाळासाहेब : नाही तर तसे सांग. म्हणजे माझ्या घरच्या चिमण्या आणून देतो -
भाऊराव : खुशाल, काही हरकत नाही. तुमच्या चिमण्या भरतो, पाहिजे तर तुमच्या नरड्यातही एक रॉकेलची बाटली ओततो. ( बाळासाहेब व शंकरराव हसतात. ) काय म्हातारबोवा, चवथा न्हावी येतो आहे की नाही एखादा ?
शंकरराव : येईल कोणी तरी आता. येवढी घाई का ?
भाऊराव : आपल्याला तर बिझिक् खेळायची फार इच्छा झाली आहे.
बाळासाहेब : चौथा म्हणजे कोण - डॉक्टर किंवा जोशी मास्तर - यांपैकीच कोणीतरी येणार. कारण तिंबूनाना कलगीवाले इथे नाहीतच. अन् लंबाट्याही वडगावला गेला आहे. राहता राहिले दोघेच.
भाऊराव : मला नाही वाटत डॉक्टर आज येईलसा.
शंकरराव : कारण ?
भाऊराव : अरे त्याची आज गटारे उपसायची मीटिंग आहे. तेव्हा तो तर नाहीच. राहिले जोशीमास्तरच. त्यांच्यामागे काय सतरा कामे.
बाळासाहेब : मग उगीच बसून तरी काय करायचे ?
भाऊराव : तिघे खेळायचे म्हणत असाल, तर आपण साफ खेळणार नाही.
शंकरराव : छे: छे: तिघांचा खेळ आपल्याला नाही पसंत. उगीच पाने येत नाहीत अन् काही नाही. अन् डाव लांबतो किती ! परवा नाही ? सहा वाजता तिघे आम्ही खेळायला बसलो. गेम संपायला साडे आठ झाले. काय आहे काय !
बाळासाहेब : अन् माझे तर बोवा कपाळच दुखायला लागते ! तिघांचे बिझिक् कसले आले आहे ! काहीतरीच !
भाऊराव : त्यापेक्षा तिघांनी काखेत धोपट्या घेऊन गावात हजामती करीत फिरलेले काय वाईट !
शंकरराव : ( विचित्र सूर काढून ) हु: हु: हु: हु: - ही ! ( हसत राहतो )
भाऊराव : हा: हा: हा: काय लेकाचा हसतो आहे !
बाळासाहेब : ( हसत ) सांगतो ना, जे तिघे बैल असतील ते खेळतील. आपण नाही खेळणार. त्यापेक्षा झक् मारते ते बिझिक् !
शंकरराव : तिघांचे बिझिक् म्हणजे बायकांचा खेळ तो ! हेट् ! आपण नाही बोवा खेळणार. ( सुपारींचा व विड्यांचा बोकणा भरतो. )
बाळासाहेब : ए थेरड्या ! येवढा थोरला विडा खाल्ला आहेस, लेका मरशील ना ! अगदीच अधाशी आहेस.
शंकरराव : मग आता काय तर ! स्वस्थ बसून अगदी कंटाळा आला बोवा.
बाळासाहेब : अरे मग कुठे बाहेर तरी चला.
भाऊराव : ( टाइम्सचे पान हातात घेऊन वाचू लागतो. ) कोणाला जायचे असेल त्याने जावे आपण नाही येणार. ( इतक्यांत जिन्यांत जोराने व गर्दीने पाय वाजतात. )
शंकरराव : आला बोवा, चौथा न्हावी तर आला ! ( जोशीमास्तर दाराशी येऊन उभे राहतात. )
भाऊराव : या ( सूर काढून ) यावे जोशीमास्तर.
बाळासाहेब : बरे झाले बोवा तुम्ही आलात. अगदी वेळेवर -
जोशीमास्तर : ( गंभीरपणे ) नाही पण मला काम आहे.
शंकरराव : चला हो ! कसले बोडक्याचे काम आले आहे ! चला !
जोशीमास्तर : नाही, नाही मला खरेच काम आहे ! जायचे आहे शाळेत !
भाऊराव : आता काय आहे शाळेच्या बापाचे पुन: ! सकाळी तर गुरे वळवली !
जोशीमास्तर : इन्सपेक्टर साहेबांचे व्याख्यान आहे आता !
बाळासाहेब : झक् मारते ते व्याख्यान ! चला या आधी !
शंकरराव : गेलेच पाहिजे असे नाही ना ? काय हो जोशीमास्तर ?
जोशीमास्तर : नाही तसे काही नाही. पण आपले तिथे असावे.
भाऊराव : किती वाजता व्याख्यान आहे ?
जोशीमास्तर : बरोबर साडेसहाला सुरवात आहे.
भाऊराव : ( घड्याळाकडे पाहून ) मग अजून पुष्कळ अवकाश आहे. आता पावणे सहा झाले आहेत, पाऊण तासात सहज एक गेम होईल ! चला !
शंकरराव : पण व्याख्यानाला इतक्या उशीरा सुरुवात ?
जोशीमास्तर : अरे बाबा, मॅजिक लॅंटर्नचे आहे, -
शंकरराव : मग तर मुळीच जायला नको.
जोशीमास्तर : ते का ?
शंकरराव : अहो अंधारात काय साहेबांना दिसायचे आहे ! कोण आले अन् कोण नाही ! चला या ! बसा !
जोशीमास्तर : पण आम्हाला काही सेन्स ऑफ ड्यूटी - कर्तव्याची चाड आहे !
भाऊराव : झक् मारते तुमचे कर्तव्य ! बसता की नाही मुकाट्याने बोला !
शंकरराव : हे पहा, पाहिजे तर तुम्हाला एक साष्टांग नमस्कार घालतो. ( असे म्हणून एक साष्टांग नमस्कार घालतो. तिघेही हसतात. )
जोशीमास्तर : नाही खरेच मला - ( जाऊ लागतो )
शंकरराव : अरे भाऊराव, ते बघ निघाले.
भाऊराव : काय बिशाद आहे जातील ! जोड्याखाली सडकून नाही काढायचा ! त्याची काय माय व्याली आहे ! म्हणे जातील ! जोशीमास्तर ! मुकाट्याने इथे बसा ! नाहीतर माझ्याशी गाठ आहे.
जोशीमास्तर : बरे बोवा, देवाला आमची करुणा. ( असे म्हणून गालिच्यावर बसतो. )
भाऊराव : झक् मारता तुम्ही अन् तुमचा देव ! देव नाही देवाचा बाप आला, तरी गेम् पुरी झाल्याशिवाय, तुमची सुटका व्हायची नाही इथून !
जोशीमास्तर : मग काय नाइलाज आहे बोवा.
शंकरराव : अस्सा ! असा खमक्या पाहिजे ! चांगले आम्ही सांगत होतो -
बाळासाहेब : थेरड्या, आता तू बसू नकोस ऊठ ! ते पत्ते अन् ते फडके घे लवकर. ( शंकरराव पडद्याच्या आत जातो व एक जस्ती डबा व एक पिवळट फडके घेऊन गालिच्यावर आणून ठेवतो. नंतर फडके पसरुन डब्यातील पत्ते त्यावर उताणे पसरतो व गलत करु लागतो. )
भाऊराव : म्हातार्‍या, गुलामगडी कर रे. ( शंकरराव व जोशीमास्तर पत्ते गोळा करुन आडवा ढीग मधोमध मांडून ठेवतात. शंकरराव थोडेसे पत्ते घेऊन ओळीने चौघांपुढे टाकू लागतो. इतक्यात भाऊरावापुढे व बाळासाहेबांपुढे गुलाम येतात. तेव्हा जोशीमास्तर व शंकरराव समोरासमोर बसतात. )
शंकरराव : जोशीमास्तर, नीट खेळा बरे का.
भाऊराव : कोण बालकोबा अन् आम्ही का ? अरे वा ! ( पत्ते हातात घेऊन ) वाटणार कोण मीच ना ?
शंकरराव : हो तूच. तुलाच पहिला गुलाम आला. ( भाऊराव प्रत्येकाला बारा बारा पाने देतो, व बदामचा एक्का हुकूम फोडतो. ) भाऊरावचा हुकूम फुटला बोवा.
बाळासाहेब : भाऊराव, तुला सिगारेट पाहिजे का ?
भाऊराव : हो सीझर असेल तर.
बाळासाहेब : ( खिशातून सिगारेटसची डबी काढतो व त्यातून एक सिगारेट काढून भाऊरावापुढे धरतो ) लीजीये हुजूर ! जनाबे अली ( नंतर जोशीमास्तराना एक सिगारेट देऊन स्वत:करता एक घेतात. तिघेही आपाआपल्या सिगारेटस् पेटवून धुराचे लोट सोडू लागतात. )
शंकरराव : काहो बाळासाहेब तुम्ही सीझर्सशिवाय कधी काही ओढीत नाही का हो ? ( एक मार्कर भाऊरावांपुढे ठेवतो व एक आपल्यापुढे ठेवतो. )
बाळासाहेब : अलबत नाही. सीझर्सशिवाय दुसरे काही ओढणे, ओ बेवकूब आदमीका काम हाय ! हम लोकका नही हाय्. बरे चल खेळ आता. ( शंकरराव बदामचा नव्व्या खेळतो. बाळासाहेब, जोशीमास्तर, व भाऊराव साधी पाने टाकतात. शंकरराव बदामचा सत्त्या टाकून बदामाचा एक्का घेतो. )
भाऊराव : ( बाळासाहेबास ) तुमच्याजवळ सत्त्या होता का ?
बाळासाहेब : होय, हा काय ! ( असे म्हणून बदाम सत्त्या दाखवतो. )
भाऊराव : मग हात घेण्यासाठी पान का नाही आपटले ?
बाळासाहेब : ( खाली मान घालून ) नाही आपटले झाले ! उगीच तुझा भारी हुकूम.
भाऊराव : ( रागावून ) माझ्यासमोर कशाला हजामती करायला बसलात ! राजा नाही दश्श्या मारुन मी हात घेतला असता ! पण तो एक्का जाऊ दिला नसता ! ( चार पाच हात खेळून होतात ) ए: ! असल्या खेळाची चीड येते मला !
शंकरराव : बरे मी हे एक एक्क्यांचे हजार लावतो. ( असे म्हणून बदामाचे तीन एक्के टाकतो. ) तुम्हाला काही - ( जोशीमास्तर नाही म्हणून मान हलवतात. )
भाऊराव : ( रागावून बाळासाहेबास ) पाहिलेत ? लागले की नाही त्यांचे हजार ! चु: चु: चु: ! तो एक्का घ्यायला पाहिजे होता !
बाळासाहेब : अरे पण सहा डाव आहेत. केव्हा तरी हजार त्यांचे -
भाऊराव : ( रागावून ) झक् मारतात ते सहा डाव ! तो एक्का घ्यायला पाहिजे होता.
जोशीमास्तर : ( भाऊरावांकडे किंचित् पाहून ) हे राजाचे आठशे लावा पाहू. ( बदामाचे चार राजे खाली टाकतो. ) हा भाऊरावांचा हुकूम आहे ! कारण बदाम हुकूम फुटायचा अवकाश ! ( हुकूमाचा डाव भाऊरावाकडे ठरलेला.
भाऊराव : असे बोलणे म्हणजे नीचपणा आहे !
जोशीमास्तर : ( गालातल्या गालात हसतात. )
शंकरराव : हे मी पाचशे लावतो. ( एक इस्पिक राणी व चौकट गुलाम टाकतो. )
जोशीमास्तर : पाचशे लावलेत. हे माझे वीस लावा. ( एक इस्पिकच्या राणीचे जोडपे टाकतो. तीन चार हात खेळून होतात. ) आणखी हे अडीचशे.
शंकरराव : ( जोशीमास्तरांस ) तुम्ही काय अडीचशे लावलेत ? हे माझे स्वतंत्र पंधराशे. म्हणजे तुमची राणी मोकळीच. ( दोन तीन हात खेळून होतात )
जोशीमास्तर : परवा म्हणे त्रिंबकरावांची आइस्क्रीम पार्टी आहे ?
शंकरराव : हो आहे खरीच. हे मी सहाशे लावतो ! ( बदामाच्या तीन राण्या टाकतो. )
जोशीमास्तर : भले रे बोके ! भाऊरावाचा हुकूम आहे.
बाळासाहेब : हे पहा, मीही आपले आजच सांगतो. रेसेसमध्ये मला जे अडीचशे रुपये मिळाले आहेत. त्यातूनच मीही एक मंडळींना आइसक्रीमची पार्टी -
शंकरराव : ठीक आहे, वा ! तिंबूनानांच्यामागून तुमचीही - ( खेळ चालूच राहतो. )
बाळासाहेब : नाही पण, त्याच्याबरोबर हेही सांगतो, की मी जी पार्टी देणार आहे, ती यंदा न देता, पुढल्या वर्षी देणार आहे.
शंकरराव : म्हणजे ! हे काय मधेच !
बाळासाहेब : यंदा न देण्याला तशीच काही कारणे आहेत.
भाऊराव : बोडक्याची आली आहेत तुमच्या कारणे ! ( खेळ चालू राहतो. )
शंकरराव : पाचश्याला काय काय कमी आहे बरे ?
जोशीमास्तर : फ़क्त गुलाम अन् दश्शा.
शंकरराव : बर तर हे लावा पाचशेसे ( बदामचा गुलाम अन् दश्शा टाकतो )
बाळासाहेब :  लेकाच्यांनी डाव चांग्ला काढला बरे का !
भाऊराव : ( रागाने ) तुम्ही बसला आहात ना दळभद्रे !
बाळासाहेब :  आता काय झाले ?
भाऊराव : ( रागाने ) अहो तुमच्यासमोर मी बसलो आहे का मेलो आहे ! मी पाने आटपली तरी हात घेत नाही ! तुम्ही मधे हात घेत नाही, सगळी पाने त्यांना चांगली जातात ! म्हणे त्यांनी डाव च्यांगला काढला ! लाज नाही वाटत ! तुम्ही काय हजामती करीत  बसलात ! ( एक दोन डाव खेळून होतात. )
जोशीमास्तर : हे एक दश्श्यांचे हजार लावा ! ( बदामचे दोन दश्शे टाकतो. )
भाऊराव : छे: ! छे: ! छे: ! खेळण्यातला माझा अगदी मूड गेला !
बाळासाहेब :  आता सारखे ते जर हुकूम खेळत आहेत -
भाऊराव : कबूल आहे, आमचीच चूक आहे ! थोबाडीत मारून घेऊ ?
जोशीमास्तर : आता बाळासाहेबांची काय चूक आहे ? पानेच जर -
भाऊराव : ( रागावून मोठ्याने ) गप बसा जोशीमास्तर ! मधे एक अक्षर बोलू नका ! ते आमचे गडी आहेत ! त्यांना मी काय वाटेल ते बोलेन - जोड्याखाली सुद्धा मारीन ! ( एक दोन डाव खेळून होतात. )
शंकरराव : हे आपले एक चारशे ( बदामचे दोन गुलाम टाकतो. ) त्यांचे किती आहेत ?
जोशीमास्तर : सारे तीनशे चाळीस आहेत.
शंकरराव : म्हणजे हजार नाहीतच ना ? ( जोशीमास्तर गालातल्या गालात हसतात. )
भाऊराव : ( शंकररावास रागाने ) काय मार पाहिजे वाटते ? ( इतक्यात खाली गलका चाललेला ऐकू येतो. भाऊराव उठून खिडकीशी जातो ) अरे राम्या, केश्या, चक्या, काय बाजार मांडला आहात रे तुम्ही ! गप बसा अगदी ! ( जागेवर येऊन बसतो. ) काय पान घेतले ?
जोशीमास्तर : ( पाने मोजून ) नाही बोवा मी नाही घेतले !
शंकरराव : ( हातातील पाने मोजून ) मीही नाही घेतले !
बाळासाहेब :  माझ्या हातात अकराच पाने.
भाऊराव : हात कोणाचा होता ?
शंकरराव : माझा काही नव्हता.
जोशीमास्तर : माझाही नव्हता.
शंकरराव : तुमचा बाळासाहेब ?
बाळासाहेब :  छे ! काय ते आठवत नाही. पण मी अगदीच भिकार पान टाकले होते.
शंकरराव : हं: ! सगळेच कसे आपण विसरलो हो !
भाऊराव : ( रागाने पानांच्या ढिगावर जोराने थप्पड मारून पान घेतो व तेच खेळतो )
( शंकरराव, बाळासाहेब, व जोशीमास्तर पाने घेतात. )
जोशीमास्तर : ( आनंदाने उडून ) वा ! भले र बोके ! पान पण आले आहे ! छान ! ( तिघांस चौकटचा गुलाम दाखवतो. )
शंकराराव : ( किंचित् कपाळाला आठ्या घालून ) बरे खेळा आता !
जोशीमास्तर : कोणाचा आपलाच हात ना ?
शंकरराव : हो आपलाच. काय दाखवता ?
जोशीमास्तर : हे आपले दोन हजार. ( चौकटचा गुलाम खाली टाकतो ) काय पान आले पण ! आता काय नुसते हुकूम झोडीत सुटायचे !
भाऊराव : ( रागाने ) मुकाट्याने नाही का हो खेळता येत ? बोलायला कशाला पाहिजे !
खबरदार एक अक्षर बोलाल तर !
( मारे हुकमांची सरबत्ती सुरू होते. मधून भाऊराव व बाळासाहेब हात घेतात पण त्यांचे ८०/६० पलीकडे काही महत्त्वाचे मार्क लागत नाहीत. शेवटचे सात आठ हात शंकरराव व जोशीमास्तर ह्यांचेच होतात. सहा वाजून दहा मिनिटांनी डाव संपतो. )
शंकरराव : आता हा शेवटचा हात आहे.
जोशीमस्तर : मग हा आपला शेवटचा ! ( बदामचा दश्शा खेळतो ) त्यांच्या जवळ आहे काय मारायला ! लाव आपले शेवटचे दहा !
शंकरराव : ( मार्करकडे पहात ) आपले झाले आहेत सात हजार तीनशे पन्नास. म्हणजे आपल्याला अजून पाचशी अन् पंधराशी पचत आहेत.
जोशीमास्तर : अन् त्यांचे ?
शंकरराव : ( भाऊरावाजवळील मार्करकडे पहात ) त्यांचे आहेत सारे पाचशेवीस.
जोशीमास्तर : पण नेम नाही ! डाव केव्हा उलटेल ते सांगता येत नाही.
शंकरराव : ( भाऊरावाकडे गंभीरपणे पहात ) हो, ते तर आहेच.
भाऊराव : अशा तर्‍हेने खेळणे म्हणजे नीचपणा आहे !
शंकरराव : आता काय झाले ?
भाऊराव : असे खेळणे म्हणजे शरम वाटायला पाहिजे !
शंकरराव : ती काय म्हणून ?
भाऊराव : ते दोन हजार लावणे म्हणजे निर्लज्जपणा आहे !
शंकरराव : पण तू पान आधी घेतलेस का ?
भाऊराव : तुम्ही काय हजामती करता ? हात कोणाचा काय - डावात लक्ष नाही तुमचे ! खेळता कशाला ? खराटे घेऊन रस्ते झाडीत फ़िरा !
शंकरराव : मग तू त्याच वेळेला सांगायचेस !
भाऊराव : काय सांगायचे !
शंकरराव : की बोवा ‘ तुम्ही हे दोन हजार लावू नका ! ’
जोशीमास्तर : अन् त्या वेळेला आम्हाला ते पान आले म्हणून ! नसते आले म्हणजे मग ?
भाऊराव : ( रागाने ) जोशीमास्तर, तुम्ही एक अक्षर बोलू नका ! मी पुन: म्हणतो की, असे खेळणे म्हणजे अगदी पाजीपणा आहे !
शंकरराव : पण हा तुझा लॉ पॉईंटच् - मुद्दाच चुकला.
बाळासाहेब : तो कसा ?
शंकरराव : म्हणजे असे. आम्ही जेव्हा दोन हजार लावले तेव्हा यांनी हरकत घेतली नाही. डाव सगळा पुरा झाल्यावर बोलून काय उपयोगी ? हो, ज्या अर्थी आपण सबंध डाव खेळलो, त्या अर्थी तुम्ही आमचे मार्क लावणे ऍक्सेप्ट् ( कबूल ) केले असे नाही का होत ?
बाळासाहेब : तरीसुद्धा भाऊरावाचाच पॉइंट बरोबर आहे ! कारण असे -
भाऊराव : ( तणतणत ) जाऊ द्या ! आपल्याला खेळायचेच नाही !
शंकरराव ( घाबरून ) पाहिजे तर नवीन गेम सुरू करू. ( गलात करू लागतो. )
भाऊराव : ( रागाने ) साफ़ खेळायचे नाही आपल्याला ! ( असे म्हणू जोराने फ़डके हिसकून पत्ते उधळून देतो. पत्ते माडीवर होतात )
जोशीमास्तर : ( गंभीरपणे ) आता बसण्यात काय अर्थ आहे ?
भाऊराव : ( रागाने ) चालते व्हा ! ( जोशीमास्तर निघून जातात. शंकरराव व बाळासाहेब माडीवर झालेले पत्ते अगदी एक अक्षर न बोलता गोळा करून आणतात व फ़डके पसरून त्यावर ठेवून देतात. )
शंकरराव : ( अगदी गरिबाने ) भाऊराव हे पत्ते मोज रे. ( पत्ते मोजू लागतो. )
भाऊराव : ( मुकाट्याने पत्ते मोजू लागतो ) तुझे किती झाले ?
शंकरराव : माझे झाले एकशे बेचाळीस.
भाऊराव : मग बरोबर आहेत. ( पत्ते फ़डक्यावर पसरतो. )
बाळासाहेब : काय म्हातार्‍या खरेच !
शंकरराव : काय झाले !
बाळासाहेब : तू खेळाचा अगदी विरस केलास.
शंकरराव : ( पानांची गलत करीत ) ऍ: ! चाललेच आहे ! आता खेळायचे असे नाही काही ! चल भाऊराव ! बसा हो बाळासाहेब. ( पाने सगळी गोळा करतो. भाऊराव व बाळासाहेब खेळायला बसतात. तिघे खेळू लागतात. भाऊराव व बाळासाहेब सिगारेटस् पेटवून आपली घाट इंजिने सुरू करतात. )


Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP