स्त्रीशिक्षा - प्रकरण १ लें

श्री.प.प.वासुदेवानन्दसरस्वती टेंभेस्वामी यांनी स्त्रीयांना अतिशय मार्मिक उपदेश केला आहे.


कोणी एक मुलगी प्रियविरहानें दु:खित होऊन गुरूला शरण येऊन प्रश्न करिते; अशी कल्पना करून, सुखबोधाकरितां व आत्मविद्या केवळ ईश्वरस्वरूपी प्रसादानेंच मिळणारी आहे, असें कळविण्यासाठीं हा स्त्रीशिक्षा नांवाचा सुलभ ग्रंथ रचिला आहे.
मुलगी - गुरुमाउली ! मी तुमच्या चरणांला शरण आलें. पराधीनपणानें घरधंद्यांत गुंग होऊन गेल्यामुळें स्वप्नामध्यें सुद्धां सुखाची वार्ताही मिळाली नाहीं व सासुरवासाचा जाच सोसून दिवस कसेतरे लोटीत असतां प्रियवियोग झाला. ज्यापासून पुढे परमानंद होईल असा भरंवसा होता, तेंही मूळ खुंटलें. अशा दुर्दैवानें प्राप्त झालेल्या तापत्रयानें पोळून हुक्हूक् प्राण धरून राहिल्याचें आज सार्थक झालें. आतां हे पाय अपाय दूर करितीलच; असें म्हणून गुरुचरणीं लीन झाली. तेव्हां तिला आश्वासन देऊन गुरु म्हणतात - हे वत्से, तूं कोण ! व तुला परमानंद देणारा, विरहित झांलेला तुझा प्रिय कोण ! हें सांग बरें आधीं !
मुलगी - ( काळजावर हात ठेवून ) ही मी काश्यपगोत्रोत्पन्न देवदत्त ब्राह्मणाची मुलगी. । विष्णुदत्त नावांचा माझा जिवलग मला दु:खसमुद्रांत लोटून गेला. हाय ! हाय ! हे दुर्दैवा ! गुरुजी, त्यांची आठवण होण्याबरोबर कसेंसेंच होतें. काय करूं ?
गुरुजी - ऐक, उगीच त्रास करून का घेतेस ? माझ्या वचनाकडे लक्ष दे.
मुलगी - बरें.
गुरुजी - तूं तर हृदयावर हात ठेवून ही मी असें म्हणतेस तेंच आत्मप्राप्तीचें स्थान व तेंच तुझें स्वरूप तुला समजलें; पण उमजलें नाहीं.
मुलगी - तें कसें ?
गुरुजी - ही मी म्हणतेवेळीं तूं डोळ्यांवर किंवा मस्तकादिकांवर हात न धरितां आत्मप्राप्तीसनथावर ( हृदयावर ) च हात ठेविलास, तर “ सर्व भूतांच्या हृदयांमध्यें ईश्वर राहतो. ” इत्यादि प्रमाणानें तें ईश्वरस्थान होय व जो जीवात्मा तोच ईस्व्हर असें शास्त्राप्रतीतीनें, गुरुप्रतीतीनें व आत्मप्रतीतीनें तुला उमजतें, तर मग शोक व मोह कसा राहता ? राहिला नसता. तेव्हां तुला जडाचा व चेतनाचा विवेक नाहीं म्हणून ज्या जडावर नाम, रूप, कुल, गोत्र, जाति व लिंग अशी कल्पना केली, त्या देहाला मी व माझा म्हणून बसलीस. आत्मा तर नाम - रूप - कुल - गोत्र - वर्णाश्रम - जाति - संबंधरहित असून एकच निर्विकार आहे.
मुलगी - जडाचें व चेतनाचें स्वरूप काय ?
गुरुजी - जें आपणांस व परास जाणत नाहीं तेंच जड व आपणांस आनि इतरांस जाणतें तें स्वयंप्रकाश चेतन होय. हेंच निर्विकारकूटस्थसाक्षिचैतन्यप्रत्यगात्म्याचें स्वरूप अज व अजरामर होय.
मुलगी - गुरुजी मग मी खोटसाळ काय सांगितलें ! पहा -
उद्वेजयति सूक्ष्मोsपि चरणं कंटकांकुर:
जरा कांटा पायांस टोंचला, तर मस्तकापर्यंत तिडक मारते ते नाकावर बसलेली माशी सुद्धां ज्याला खपत नाहीं तो देह जड कसा ?
गुरुजी - हाच तुझा व्यामोह - विपरीत ज्ञान - होय. पहा ! जय देह चेतन असता तर पाहिजे तिकडून पाहता व ऐकता; मग कान, डोळे इत्यादि इंद्रियसामुग्रीची गरज लागलीच नसती, परंतु तसें होत नाहीं. अहंकाराचा आत्म्याशीं तादात्म्याध्यास ( एकाकार ) झाल्यानंतर अहंकार आपाद - तलमस्तक व्यापून राहतो, तेव्हां जागृदवस्था होते. त्यावेळीं देह जड असतांही अजडासारखा भासतो व अर्धा अहंकार विकास झाल्यावर स्वप्नावस्था होते व सगळा अहंकार लीन झाला म्हणजे निद्रावस्था होते. तेव्हां सर्व लोकव्यवहार नाहींसे होतात.
यात्यस्तं तत्र लोकव्यवहृतिरखिला पुण्यपापानुबंध:
शोको मोहो भयं वा समविषममिदं न स्मरत्येव किंचित् ॥
असें आहे तेव्हां देह चेतन कसा ? दुसरें हें कीं, चेतनास जन्ममरण नाहीं. देहावर तर जन्ममरणादि सहा विकारांची उघड धाड पडली आहे. हा पांचभौतिक ( पंचीकृतपंचभूतांचा ) पिंड अन्नमय कोश होय. ह्याच्या द्वारा बरीं वाईट कर्में घडतात. जीवात्म्याला पूर्वीं असाच देह होता, म्हणून बरें वाईट कर्म घडलें, त्यात्म्याला पूर्वीं असाच देह होता, म्हणून बरें वाईट कर्म घडलें, त्यामुळेंच हा देह घ्यावा लागला. आतांही ह्याच डोळ्यांनीं मुक्तीचा सोहळा पाहण्यास न मिळाला तर जुनें वस्त्र टाकून नवें वस्त्र घेतात, त्या न्यायानें तत्त्वज्ञानानें मोक्ष होई पावेतों पुन: पुन: असेंच घडेल. हें न पत्करलें तर अकृताभ्यागम, व कृतप्रणाश या दोषांचा प्रसंग येईल. तेव्हां आईबापांनीं खाल्लेल्या अन्नाच्या रक्तरेतोरूपी परिणामानें हा भौतिक अन्नमय देह कर्मयोगानें बनून पुढें अन्नानेंच वाढला. अतएव हा जड विकारी असून दृश्य आहे. जो ज्याला पाहतो, तो त्याहून निराळाच असतो; ह्या न्यायानें देह आपणांस दिसतो तेव्हां तो आपल्याहून निराळाच जाणावा व जें दृश्य तें जड असा वेदांतसिद्धांत आहे.
मुलगी - केवळ वेदांतसिद्धांत ऐकून उगी रहावें काय ?
गुरुजी - असें पहा ! हा आपला व दुसर्‍याचा देह आईबापांच्या रक्तरेतानें उत्पन्न झाला. जसें पाण्याचे आधण ठेवून वर दांथर घालून मोदक उकडतात, त्याप्रमाणें आईच्या मुताचें आधण, विष्ठा दांथर व वारीचें वेष्टणरूप पात्रांत मोदकाप्रमाणें रेतरक्त कढून हा देह होतो. हाडें, स्नायु व मज्जा हीं पित्याच्या रेतानें होतात; व त्वजा, मांस, रक्त आईच्या रक्तानें होतात. असा हा कफवातपित्तधातुबद्ध, मळमूत्रश्लेष्मपूर्ण देह नऊ महिन्यांनीं अनुक्रमें करून रजस्वलेच्या विटाळांत बनतो. सहा महिन्यांच्या आंत जर पडला, तर केवळ मांसाच्या गोळ्यासारखा असतो; हालचाल नसते. सातव्या महिन्यांत टाळु भेदून ईश्वरानुग्रहरूपी अनुप्रवेश होतो, तेव्हां हालचाल समजते. उपजल्यावरही कांहीं काळपर्यंत पहिल्यापेक्षां नवीन जन्मलेली टाळू खोल असून मऊ असते. हा गर्भात अनुप्रवेश झाल्यावर मागचीं सर्व कर्में आठवून दु:खी होत्साता प्रार्थना करितो हे ईश्वरा, दत्तात्रेया, माझ्या कर्मयोगानें मला नरकवासापेक्षांही घोर गर्भवासरूपी नरकवास दाखविलास. पुरे ! पुरे ! आतां मी तुला शरण येतों. एकदां येथून सुटका कर म्हणजे मग मी सोsहं असें तुझें अभेदानें भजन करून मुक्ती घेईन. अशी नित्य प्रार्थना करून बेंबीच्या नाळ्याच्या द्वारानें आईनें खाल्लेल्या अन्नरसाचा द्रव मिळतो तेवढ्यावर वांचून पिंचर्‍यांतल्या पक्ष्याप्रमाणें आंतल्याआंत घुसमटतो. नंतर दहावे मासीं आईला मरणप्रय दु:ख देऊन व्रणांतून किडा पडल्याप्रमाणें योनिद्वारा सूतिवायूच्या वेगानें काढण्याचाही प्रसंग येतो, असल्या जन्माचा कायसा उत्सव ! पुढें बाहेर पडतांच पूर्वीचें ( सोsहं ) विसरून ( कोsहं कोsहं ) करूं लागतो. जसजसा वाढेल तसतसा पूर्वींच्या भजनाचा करार एकीकडे ठेवून बालपण खेळांत घालवितो. ज्या खाण्यापिण्याचें मलमूत्र होतें, त्यावर तात्पर्य ठेवून त्या खाण्याकरितां मरीं मरून सदोदित खाऊनपिऊन विषय कर्दमांत लोळून तारुण्याचा मातेरा करून टाकितो. जरी जारकर्मानें यमयांतनानरक भोगून वारंवार श्वान, सूकर, खरादि योनी पुन: पुन: भोगाव्या लागतात असें कदाचित् कथापुराणप्रसंगानें कानावर आलें तरी अं: करून विवेक न करितां पाहिजे तसे भोग भोगून जीव - देहतादात्म्यानें यौवनसरिता आटवून टाकितो. मग सरल्यावर साचूं, पडल्यावर वेंचूं म्हणण्यासारिखी वृद्धावस्था आल्यावर शेंबडांत माशी अडकल्याप्रमाणें पोरांबाळांच्यां चिंतनेनें व्यापून डोळ्यांनीं दिसत नाहीं, कानांनी ऐकूं येत नाहीं, पायांनीं चालतां येत नाहीं अशी अवस्था प्राप्त झाली तरी व ज्यांच्याकरितां देह झिजविला, त्यांचकडून पदोपदीं अपमान होत असतांही माझें बरें व्हावें असें चिंतन करीत शेवटीं हजार विंचू डसल्यासारखी चिरकाल वेदना भोगून मोठ्या कष्टानें मरतो. जातेवेळीं घातपात करून मिळविलेल्या धनादिकांपैकीं एक कवडी सुद्धां बरोबर येत नाहीं. बरें वाईट केलेलें कर्म मात्र पाठीशीं लागतें. जिकडे जाईल तिकडे तेंच पाठलाग करून अवश्य फळ भोगवितें. हें जरी ब्रह्मदेवाच्या पाठीं राहिला तरी चुकणार नाहीं. याप्रमाणें जीव देहाहून निराळा आहे, जीवानें देह सोडला म्हणजे त्या देहास मरण येतें. जीव मरतच नाहीं. तो आजन्म अजरामर आहे. जो जिवलग देह पूर्वीं अत्यंत प्रीतिपात्र असतो, तोच निर्जीव झाला म्हणजे अत्यंत अमंगळ होऊन भयंकर दिसतो. पाहाणार्‍यांस सुद्धां वीट येतो व जीवदशेमध्यें छी: थु: म्हटलेलें सुद्धां खपत नाहीं, नाकावर बसलेली माशी तोलत नाहीं त्याचें तोंडाडोळ्यांत माशांचा गुंजला ( घोळका ) होऊन घोंघोंवला तरी पत्ता लागत नाहीं. जिवंतपणीं जरा आंगास विस्तव झळकल्यावर “ अरे बा - बा - बा, हाय हाय ” करितो, तोच घट्ट बांधून मसणांत नेऊन जाळला तर हाय हाय करतो काय ? नाहीं. नाहीं. मग वेदांत - सिद्धांत खोटा काय ?
मुलगी - बरें, असो. ब्रह्मदेवानें आमचे कपाळीं स्त्रीपणा घातला तर आम्हीं पुन: पुन: स्त्रीजन्म घेऊन चुलकोंबड्याच बसून असावयाचें. पुरुषांनीं मात्र पुरुषार्थ मिळवायचा असेंच ना ?
गुरुजी - छी: छी: मी त्या अभिप्रायानें नाहीं बोललों. जीवाला पुरुषत्व, स्त्रीत्व व नपुंसकत्व मुळींच नाहीं. जसें पूर्वार्जित असेल, तसा देह मिळतो; त्यायोगानें स्त्रीपुन्नपुंसकत्व येतें. अधिष्ठानभूत चैतन्य व पांच ज्ञानेंद्रियें, पांच कर्मेंद्रियें, पांच प्राण व मन, बुद्धि, चित्त, अहंकार हें अंत:करणचतुष्टय मिळून एकोणीस अवयवांचा एक लिंगदेह व त्या लिंगदेहामध्यें पडलेली चैतन्याची छाया मिळून जीव म्हटला जातो. त्याला लिंग ( स्त्रीपुन्नपुंसकादिक ) नाहीं. असें पहा ! स्त्री मेली तर तिचा जीव गेला असा पुल्लिंगीच प्रयोग होतो. तेव्हां जी स्त्री ती स्त्रीच राहील असें नाहीं. एखाद्यास भाग्यानें संन्यास घडला तर -
पुंजन्म लभते माता पत्नी च प्रैषमात्रत:
त्यानें प्रैषमात्र केल्यानें त्याच्या मातेला व पत्नीला पुढें पुंजन्म मिळतो व पुरुष असोन स्त्रीवेष घेतला तर पुढें त्याला स्त्रीजन्म मिळतो. अशीं अनेक कारणे लिंग पालटण्याचीं आहेत. तुम्हांला स्त्रीजन्माचीच आवड असते असा तुमचा मूढपणा जागोजाग वर्णन करितात. पुष्पदंतानें -
स्वलावण्याशंसाधृतधनुषमन्हाय तृणवत्पुर: प्लुष्टं दृष्ट्वा पुरमथन पुष्पायुधमपि । यदि स्त्रैणं देवी यमनिरत देहार्धघटनादवैति त्वामद्धा बत वरद मुग्धा युवतय: ॥१॥
असें पार्वतीला सुद्धां दूषण दिलेलें आहे.
अनृतं साहसं माया मूर्खत्वमतिलोभता ॥
अशुचित्वं निर्दयत्वं स्त्रीणां दोषा: स्वभावजा:
आवर्त: संशयानामविनयभवनं पत्तनं साहसानां दोषाणां सन्निधानं कपटशतमयं क्षेत्रमप्रत्ययानाम् ॥ सर्वद्वारस्य विघ्नं नरकपुरमुखं सर्वमायाकरंडं स्त्रीयंत्रं केन सृष्टं विषममृतमयं प्राणिनां मोहपाशम् ॥
इत्यादि भर्तृहरिप्रमुखांनें दोष दिलेले आहेत व वेदांत उर्वशीचें वाक्य असें आहे कीं, ‘ स्त्रिया म्हणजे जीवंत प्राण्यांस खाणार्‍या लांडग्यांचीं काळजें होत. ’ थोड्यासाठीं खोटें बोलण्यास तुम्ही मागेंपुढें पाहणार नाहीं. जरा सासू वगैरे कोणी विरुद्ध बोलूं लागलें तर कुडव्यांत पाणी घेऊन जीव देण्यासाठीं पदर खोंचतात. यापुढें साहस तें काय वाखाणायचें ? पहा ! तुमचा केवढा अधिकार आहे ! तुमच्याच योगानें पुरुषाचे धर्म, अर्थ व काम सिद्ध होणारे आहेत. पंचमहायज्ञादि गृहस्थाश्रमधर्म तुमच्याच योगानें घडतात. पुरुषानें केलेल्या धर्मापैकीं अर्धा धर्म अचूक तुमच्या पदरीं पडतो. पुरुष महाप्रयासानें शास्त्री किंवा मामलेदार झाला म्हणजे बिनखटपटीशिवाय शास्त्रीण किंवा मामलेदारीण असे किताब तुम्हांला तेव्हांच मिळतात. तुम्ही आमच्या मायबहिणी आहां, तुमचे हात आमच्या पोटांत जातात.
यथा मातरमासाद्य सर्वे जीवंति जंतव: ॥
जशीं मुलें भूक लागली म्हणजे बापुडवाणीं होऊन आईकडे जाऊन हात पसरतात, त्याप्रमाणें ब्रह्मचारी, संन्यासी वगैरे सर्वांना मायबहिणी तुम्हींच हात उचलून देणार आहांत. मग तुमची आम्ही प्रतारणा, निंदा करूं काय ? नाहीं. तर तुमचा दुर्गुण जावा या इच्छेनें अधिक उणें बोललों तरीं तें मनांत आणूं नका. तुम्हांला स्त्रीजन्माची आवड असते असें म्हटलें तें पहा ! व्रत व दान करिते वेळीं ‘ मम इह जन्मनि जन्मांतरे चाखंडसौभाग्यपुत्रपौत्रादिकल्पोक्तफलावाप्तये ’ असा संकल्प केलाच पाहिजे व ह्यांत उपाव्येबुवांनीं कमी केलें तर त्याला दोन पैसे मिळण्याची अडचण पडेल. तेव्हां ‘ इह जन्मनि जन्मांतरें च ’ ह्या जन्मांत जसा कित्येकांस कोलतांचा मार मिळतो असाच जन्मजन्मांतरीं मिळावा असेंच तुमचें मनोगत असतें ना ?
मुलगी - तर व्रतें, दानें वगैरे आम्हीं करूं नये काय ?
गुरुजी - वाहवा. बरीच बुद्धी वाहते. अग पुरुष तर व्रतें, दानें, वायनें, कार्तिकादिस्नानें ह्यांची वार्ता सुद्धां करीत नाहींत. पण तुम्ही करीत असतां तुम्हाला बहुधा अडथळा करीत नाहींत. हा एक त्यांचा तुमच्यावर मोठा आभार आहे. म्हणून तुमच्या द्वारानें व्रतोपवासादि निमित्तानें बिचार्‍या उपाध्येबुवांस दोन पैसे मिळतात ते बंद झाले म्हणजे त्या बिचार्‍याच्या तोंडास पानें पुसल्यासारखें होईल. तर तसें न घडावें एवढ्याचकरितां व्रतोपवासदानादिक करावें. यज्ञ - दान - तप हें जसें पुरुषाला ज्ञानसाधनत्वें करून सांगितलें, तशींच व्रतादिक तुम्हांला सांगितलीं. स्त्रियांला पृथक् यज्ञ करण्याचा अधिकार नाही. पतीच्या आज्ञेनें व्रत, पूजा करणें हाच तुमचा यज्ञ व कल्पोक्त दानें, आणि तप म्हणजे स्वधर्माचरण, ही तुम्हीं अवश्य करावीं. इहजन्मनि जन्मांतरे च इत्यादि लांबलचक संकल्पाची गरज नाहीं; ( ईश्वरप्रीत्यर्थ ) एवढाच संकल्प करून हें मी करतें असा अहंपणा व फलोद्देश हे टाकून करावी. जसें पुरुषाला ममोपात्तदुरितक्षयद्वारा असा संकल्प करून दिवसाचें पाप रात्रीं व रात्रीं केलेलें पाप दिवसाचे आरंभीं दूर करण्याचें संध्यावंदनादिक साधन आहे तसें तुम्हांला नाहीं. तेव्हां व्रतदानादिकच सांगितल्याप्रमाणें केलीं तर चित्तशुद्धि होऊन मोक्षही ईश्वरप्रसादानें मिळेल.
तुमचा जन्म होण्याबरोबर दोन वर्षें चंद्र उपभोग घेतो नंतर विवाह होईपर्यंत अग्नी उपभोग घेतो. हें शास्त्रप्रमाणानें व दैवी दृष्टीनेंच कळेल. देवांनीं उपभोग घेतलेल्या स्त्रिया सोमाद्युपभुक्तदोषपरिहारार्थं असा संकल्प करून वधूवस्त्रदान देऊन स्वीकार करण्यास दोष नाहीं. स्त्रियांना उपनयनस्थानीं विवाह आहे. विवाहानंतर भर्त्याबरोबर वेदमंत्रानें वैदिक कर्म करण्यास व यज्ञांगस्वकीय मंत्र म्हणण्यास अधिकार येतो. त्याशिवाय वेदमंत्र ऐकण्याचासुद्धां अधिकार नाहीं. अतएव वेदमंत्र पुरुषांचे ऐकून म्हटले तर आर्षद्रव्यचोरीचा दोष येतो. व्रतपूजादिकांकरितां ब्राह्मणांनीं पौराणिक मंत्र म्हणावे आणि स्त्रियांनीं पूजनादिक करावें. जन्मापासून आईबापांचे ताब्यांत राहावें व तेथें घरचेघरांत अक्षरओळखीपुरतें लिहिणें करावें; न केलें तरी चालेल. पण शाळाशिक्षण घेऊन पुढें आपण लिहिणें वगैरे करून बसून रहावें व नवर्‍यानें ओलीं धुवावे काय ? हा अशास्त्रीय प्रकार कुलीन स्त्रियांला नसावा. विवाह झाल्यानंतर सासुसासर्‍यांच्या ताब्यांत राहून ब्रह्मचर्य करावें; हाच गुरु - कुल - वास गर्भाधानापर्यंत सांगितला आहे. लाजाहोम करिते वेळीं ‘ सासरा, सासू, नणदा, भावेदीर यांच्या ठायीं सम्राज्ञी हो म्हणजे मर्यादा धरून सौजन्यपणानें वाग. तोंडाळ होऊं नकोस. ’ अशा अर्थाच्या वेदमंत्रानें होम होतो, करितां तसें वागावें. ( मग नवर्‍याबरोबर तेरीमेरी करण्यास हरकत नाहीं असें म्हणूं नये. कारण ‘ प्रतिवादाच्छुनी भर्तु: ’ नवर्‍याबरोबर भांडणारी कुत्री होते, भालू होऊन भुंकते, असें अनिष्ट फल आहे. ) भूमीवर दणदणून चालणें, उच्चासनीं बेमर्यादेनें बसणें इत्यादि सच्छिक्षणाकरितां सासूनें गांजलें तरी सर्व सोसून ब्रह्मचर्यानें रहावें. नंतर ऋतु आल्यावर नवर्‍याचे ताब्यांत रहावें.
इंद्रस्य ब्रह्महत्यास्ति यस्मिन् तस्मिन्दिनत्रये ॥
प्रथमेsहनि चांडाली द्वितीये ब्रह्मघातिनी ॥
तृतीये रजकी प्रोक्ता चतुर्थेsहनि शुध्यति ॥
असा रजोदोष दुष्ट आहे, तो होतांच बाहेर राहून श्वश्रूशिक्षणाप्रमाणें वागावें. जर तो चोरला तर कुत्रीचा जन्म मिळतो व सांसर्गिक लोकांना पशुयोनी प्राप्त होते. म्हणून सर्वथा विटाळ चोरूं नये. पतिव्रताधर्म स्वीकारून छायेप्रमाणें पतीशी अनुकूल वागावें. कुबुद्धीनें परपुरुषावर दृष्टी करूं नये. जर दुष्टबुद्धीनें जारकर्म घडलें तर
पुंसो यत्पारदारेषु स्त्रीणामपि तदेव हि ॥
जें पुरुषांना प्रायश्चित्त तेंच स्त्रियांना सांगितलें आहे. तें जर न केलें तर यमलोकीं तप्तलोहस्तंभालिंगन न शुनी, वाराहगार्दभादि योनि प्राप्त होईल; मग मोक्षाची वार्ताच नको. तेव्हां हुशारीनें राहून वाईट मार्गावर पाऊलसुद्धां न पडेल असें वागा. विवाहानंतर सोवळ्यानेंच जेवावें. कच्छरहित राहूं नये. विवाहसमयीं कच्छरहित संस्कार करितात तो अशास्त्रीय आहे. आतां येथें पतिव्रताधर्म चरित्रांत सांगितला आहे तो ब्राह्मणद्वारा ऐकावा. वाचतां आलें भक्षणादि नियमानें गर्भपोषण करावें. प्रसुति झाल्यानंतरसुद्धां पुत्रांना बाधा होईल असें खाणेंपिणें, वागणें करूं नये. स्त्रियांना पति, देवता होय. जशी शालिग्रामावर विष्णुबुद्धि ठेवण्याची तशी पतीचें ठायीं ‘ पतिउपाधिक ब्रह्म आहे ’ अशी दृष्टी ठेवावी. कर्मवशात् वैधव्य प्राप्त झालें तर -
पत्यौ मृते तु नारीणां विधिद्वयमुदाहृतम् ॥
वैधव्यं पालयेत्सम्यक्सहाग्निं प्रविशेत्तु वा ॥
हे दोन मार्ग सांगितले. ह्यांतून वैधव्य पालन करण्यापेक्षा सहगमन करणें उत्तम होय.
वर्तते याश्च सततं भर्तृणां प्रतिकूलत: ॥
कामाक्रोधाद्भयान्मोहात्सर्वा: पूता भवंति ता: ॥
असें सहगमन हें महाप्रायश्चित्त होत असतें. देशकालवशात सहगमन न घडलें तर आपलें सच्छील राखून वैधव्य पालावें.
विधवा पालयेच्छीलं शीलभंगात्पतत्यध: ॥
तद्वैगुणादपि स्वर्गात्पति: पतति सर्वथा ॥
तस्या: पिता च माता च भर्तृवर्गस्तथैव च ॥१॥
विधवाकबरीबंधो भर्तृबंधाय कल्प्यते ॥
शिरसो वपनं तस्मात्कार्यं विधवया स्त्रिया ॥२॥
इत्यादि वैधव्यधर्म पालन न केल्यास पुढें अनर्थ आहे. करितां हें व्रत धारण करून श्रवणादिक करावें. “ न स्त्री स्वातंत्र्यमर्हति ” असें स्त्रियांना स्वातंत्र्य नाहीं म्हणून अन्नाच्छादन देऊन धर्म चालविणारा पति ( पातीति पति: म्हणजे पालक करावा.
नष्टे मृते प्रव्रजिते क्लीबे च पतिते पतौ ॥
पंचस्वापत्सु नारीणां पतिरन्यो विधीयते ॥
पति नष्ट झाला म्हणजे जिवंत असून कुठें आहे त्याचा पत्ता लागत नसला तर, मेला तर, संन्यासी झाला तर, नपुंसक होऊन पालन करीत नसला तर, जातिभ्रष्ट झाला असेल तर, ( कोणी असेंही म्हणतात कीं, जन्मठेप कारागृहबंधन झालें असेल तर ) स्त्रियांनीं अन्य पति ( पालक ) करावा; पुनर्विवाह करावा अशी विधिक्रिया नाहीं. ब्राह्मण भ्रष्ट झाला तर पुनरुपनयन सांगितलें व त्याचा विधीही सूत्रकारांनीं सांगितला, तसा पुनर्विवाह द्विजातिवर्णस्त्रियांनीं करावा असें सांगितलें नाहीं. म्हणून अर्थात् विधीही नाही.
प्रजाप्रवृत्ती नारीणां वृत्तिरेषा प्रजापते: ॥
इत्यादि वचनांत देवरापासून पुत्रोत्पादन करावें असें युगांतर धर्मामध्यें सांगितलें तेंसुद्धां त्यावेळीं गौणच होय. आतां तर त्याची वार्ताही नको.
मृते भर्तरि या नारी ब्रह्मचर्य व्यवस्थिता ॥
स्वर्गं गच्छत्यपुत्त्राsपि यथा ते ब्रह्मचारिण: ॥
भर्ता मेल्यानंतर जी नारी -
स्मरणं कीर्तनं केलि: प्रेक्षणं गुह्यभाषणम् ॥
उत्साहोsव्यवसायश्च क्रियानिष्पत्तिरेव च ॥१॥
एतदष्टांगमिथुनं प्रवदंति मनीशिण: ॥
विपरितं ब्रह्मार्यमेतदेवाष्टलक्षणम् ॥
अशा अष्टांग ब्रह्मचर्याचा आश्रय करून रहाते, ती अपुत्रा असली तरीही स्वर्गाला जाते. जसे अपुत्र असतांही अष्टांग ब्रह्मचर्य पाळणारे ब्रह्मचारी स्वर्गास जातात त्याप्रमाणें हीहि जाईल. ‘ व जी भर्ता जिवंत असतां जारकर्मानें पुत्र उत्पन्न करिते तो पुत्र कुंड नावांचा होतो व वैधव्यपणीं पुत्र उत्पन्न केला तर गोलक नांवाचा होतो आणि पुनर्विवाह करून अशास्त्रीय पुत्र उत्पन्न केला तर कुंडगोलक नांवाचा होतो. ’ हे तिघेही धर्मबाह्य अपवित्र आहेत व ह्याच्या मातेला आकल्प नरकवास होईल. हें सर्व मनांत ठेवून दूरदृष्टीनें समजून उमजून स्वप्नामध्येंही आडमार्गीं पाऊल न पडेल असच महाप्रयत्न करावा. स्त्रियांनीं आचार स्वच्छ ठेवावा.
गंधलेपक्षयकरं शौचं कुर्यादतंद्रित: ॥
असें मलमूर्तोत्सर्गानंतर सांगितलें. शौचास जाऊन आल्यानंतर नुसत्या फरशीवर पाय ठेवून वरून पाणी टाकलें व मूत्रोत्सर्गाला मुळींच पाणी घेतलें नाहीं आणि मलमूत्रोत्सर्गशुध्यर्थ स्नानानंतर आचमन न केलें तर अशुद्धपणा राहतो व तुमच्याच हातून पंचमहायज्ञांची निष्पत्ती आहे. अतिथिसत्कार तुम्हीच करणार. जर मलिनपणा राखला तर आपणास व दुसर्‍यास बद्धता आहे. पहा ! सदाचारानें वागण्यार्‍या विष्णुदत्तपत्नीपतिव्रतेच्या हातचें अन्न खाण्याबरोबर ब्रह्मनिष्ठाचें संगभय गेलें असें दत्तमहात्म्यांत आहे. गार्गी, वाचकवी, वडवा, सुलभा, मैत्रेयी इ. इ. स्त्रिया पातिव्रत्य सदाचारानें ह्याच जन्मीं मुक्त झाल्या. अनुसूयामायीनें त्रिमूर्तीचें बाळ केलें. सतीनें सूर्याची गति बंध केली, असें तुमचें सामर्थ्य आहे. ध्रुव - प्रल्हाद -  शुकासारिखी मौक्तिकें विणार्‍या शिंप्या तुम्ही आहां. मात्र तुम्ही शास्त्रानें सांगितल्याप्रमाणें वागावें.
पद
जीवात्मा देहाहून भिन्न जया नच जनिमरणं ॥धृ०॥
निजकर्में वृष्टिद्वारा । अन्नरसाश्रय होऊन । पितृदेही येऊन तीन । मासांनीं रेत बनून
॥चाल॥
ऋतुकाळीं स्त्रीसंयोगें । मात्रुदरि येवुनि भोगे ॥ गर्भवासकष्टकुसंगें । जोडियलें जें प्राक्तन ॥१॥
आठवुनि पाहिलें अक्र्म । नमि देवा होउनि सभय । हो प्रसन्न मजला डोळां । ह्या बाळावरि करि सदया
॥चाल॥
तूं आतां सोडविं मजला ॥ माझि कीव येवो तुजला ॥ ह्यानंतर तव चरणाला ॥ नच कदापि मी विसरेन ॥२॥
मग देवा येउनि कींव ॥ मुक्त करि परि तो जीव ॥ स्त्रीपुंनपुंसक लिंग ॥ नसतांही हो स्वयमेव
॥चाल॥
तत्तदाकार अवश्य ॥ बाल्ययौवन वार्धक्य ॥ भोगुनियां सहसा जाय ॥ मृत्युमुखीं पुनरपि दीन ॥३॥
बरें वाईट कर्म करून ॥ विषयाचें सुख भोगीलें ॥ तें सर्वहि व्यर्थचि गेलें ॥ पाठीला कर्मचि खिळलें
॥चाल॥
श्रीदत्तरूपी गुरुजी ॥ ज्ञानांजन नेत्रांमाजी ॥ घालीलचि होउनि राजी ॥ तैं जीवभ्रममोचन ॥४॥
सोडुंनियां सकलहि चिंता ॥ नच आदरीं नश्वर वित्ता ॥ तूं निर्भळ करिलचि ऐसें ॥ घेतसे ती निर्वाण ॥५॥
फटका
कामाधीन होउन हीन कुलशीलाला बुडवुं नको ॥
कवटाळुनिया नश्वर काया वैर कुणाशीं करूं नको ॥ होतां लाभहि जातां प्राणहि कधीहि खोटें बोलुं नको ॥
ऋजुता धरुनि मन सावरुनि श्रीदत्ताला विसरू नको ॥चाल॥ निजधर्माला दवडुं नको ॥ सत्याला कधिं सोडुं नको ॥
उगिच कुटाळ्या करोनि टाळ्या पिटोनि काळा दवडुं नको ॥१॥
हलकट बुद्धी करुनि कुणाशी लावालावी करूं खोटा धरूनि ताठा परापमाना करूं नको ॥
सुकृत आपुलें दुष्कृत केलें दुसर्‍यानें तरि वदूं नको
॥चाल॥
लोकांवरि उगि रुसू नको ॥ लोकांत खद्खदां हंसूं नको ॥ राहें स्वजनीं सरळ वागुनी कलह कुणाशी लावु नको ॥२॥
कोण कुणाचें कसें बोलुंद्या तें कानावर धरूं नको ॥ शेजारगृहीं जाउनि तूंहि उगीच वटवट करूं नको ॥
थाप ऐकुनी वेडी होउनि दुर्जनसंगति धरूं नको ॥ स्वजना वंचुनि शिनार करुनी स्वत: व्यापार मांडुं नको
॥चाल॥
थाटमाट तूं दावुं नको ॥ तूं कुडि भुलथाप देउं नको ॥ बाळीबुगडी उत्तम लुगडीं ध्याया फुगडी घालुं नको ॥३॥
दोदिवसाची लक्ष्मी साची जाणुनि धनमद करूं नको ॥ विपत्ति येतां आवरिं चित्ता उगीच धडपड करूं नको ॥
कोणी कैसा बोलो सहसा जबाब तडफड देऊं नको ॥ दवडुनियां यश कधीहि अपयश लोकांमाजी पसरूं नको
॥चाल॥
मर्यादेला टाळुं नको ॥ आचारा कंटाळुं नको ॥ आलिया भोगा होउनि सादर बोल कुणावर ठेवुं नको ॥४॥
आव्याहि जांवया खुषी कराया कोणाचें ऋण काढुं नको ॥ चिंतुनि शर्मा करितां धर्मा मागें पुढती पाहुं नको ॥
पतिआज्ञेविण धर्माचरण स्वेच्छेनें तूं करूं नको ॥ कोणी करितां व्रतदानादिक मधींच आड तूं येउं नको
॥चाल॥
ह्या उपदेशा दवडुं नको ॥ दत्ताज्ञेनें वासुदेव हे कथि यातें उल्लंघुं नको ॥५॥
इति स्त्रीशिक्षाया: प्रथमं प्रकरणम् ॥

N/A

References : N/A
Last Updated : May 23, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP