ज्ञानेश्वरी अध्याय १

संत ज्ञानेश्वर (जन्म : १२७५) हे १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी आहेत.


॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका अध्याय १ ॥

॥ॐ श्री परमात्मने नमः ॥

अध्याय पहिला ।

अर्जुनविषादयोगः ।

ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥१॥

देवा तूंचि गणेशु । सकलार्थमतिप्रकाशु । म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥२॥

हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष । जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥३॥

स्मृति तेचि अवयव । देखा आंगीक भाव । तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥४॥

अष्टादश पुराणें । तींचि मणिभूषणें । पदपद्धति खेवणें । प्रमेयरत्नांचीं ॥५॥

पदबंध नागर । तेंचि रंगाथिले अंबर । जेथ साहित्य वाणें सपूर । उजाळाचें ॥६॥

देखा काव्य नाटका । जे निर्धारितां सकौतुका । त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनि ॥७॥

नाना प्रमेयांची परी । निपुणपणें पाहतां कुसरी । दिसती उचित पदें माझारीं । रत्नें भलीं ॥८॥

तेथ व्यासादिकांच्या मतीं । तेचि मेखळा मिरवती । चोखाळपणें झळकती । पल्लवसडका ॥९॥

देखा षड्दर्शनें म्हणिपती । तेची भुजांची आकृति । म्हणौनि विसंवादे धरिती । आयुधें हातीं ॥१०॥

तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु । वेदांतु तो महारसु । मोदकु मिरवे ॥११॥

एके हातीं दंतु । जो स्वभावता खंडितु । तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ॥१२॥

मग सहजें सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु । धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ॥१३॥

देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु । जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ॥१४॥

तरी संवादु तोचि दशनु । जो समता शुभ्रवर्णु । देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥१५॥

मज अवगमलिया दोनी । मिमांसा श्रवणस्थानीं । बोधमदामृत मुनी । अली सेविती ॥१६॥

प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ । सरिसेपणें एकवटत इभ । मस्तकावरी ॥१७॥

उपरि दशोपनिषदें । जियें उदारें ज्ञानमकरंदे । तियें कुसुमें मुगुटीं सुगंधें । शोभती भलीं ॥१८॥

अकार चरण युगल । उकार उदर विशाल । मकार महामंडल । मस्तकाकारें ॥१९॥

हे तीन्ही एकवटले । तेथ शब्दब्रह्म कवळलें । तें मियां श्रीगुरुकृपा नमिलें । आदिबीज ॥२०॥

आतां अभिनव वाग्विलासिनी । ते चातुर्यार्थकलाकामिनी । ते शारदा विश्वमोहिनी । नमिली मियां ॥२१॥

मज हृदयीं सद्गुरु । जेणें तारिलों हा संसारपूरु । म्हणौनि विशेषें अत्यादरु । विवेकावरी ॥२२॥

जैसें डोळ्यां अंजन भेटे । ते वेळीं दृष्टीसी फांटा फुटे । मग वास पाहिजे तेथ । प्रगटे महानिधी ॥२३॥

कां चिंतामणी जालियां हातीं । सदा विजयवृत्ति मनोरथीं । तैसा मी पूर्णकाम श्रीनिवृत्ति । ज्ञानदेवो म्हणे ॥२४॥

म्हणोनि जाणतेनें गुरु भजिजे । तेणें कृतकार्य होईजे । जैसें मुळसिंचनें सहजें । शाखापल्लव संतोषती ॥२५॥

कां तीर्थें जियें त्रिभुवनीं । तियें घडती समुद्रावगाहनीं । ना तरी अमृतरसास्वादनीं । रस सकळ ॥२६॥

तैसा पुढतपुढती तोचि । मियां अभिवंदिला श्रीगुरुचि । जो अभिलषित मनोरुचि । पुरविता तो ॥२७॥

आतां अवधारा कथा गहन । जे सकळां कौतुकां जन्मस्थान । कीं अभिनव उद्यान । विवेकतरूचें ॥२८॥

ना तरी सर्व सुखाचि आदि । जे प्रमेयमहानिधि । नाना नवरससुधाब्धि । परिपुर्ण हे ॥२९॥

कीं परमधाम प्रकट । सर्व विद्यांचे मूळपीठ । शास्त्रजाता वसौट । अशेषांचें ॥३०॥

ना तरी सकळ धर्मांचें माहेर । सज्जनांचे जिव्हार । लावण्यरत्नभांडार । शारदेचें ॥३१॥

नाना कथारूपें भारती । प्रकटली असे त्रिजगतीं । आविष्करोनि महामतीं । व्यासाचिये ॥३२॥

म्हणौनि हा काव्यांरावो । ग्रंथ गुरुवतीचा ठावो । एथूनि रसां झाला आवो । रसाळपणाचा ॥३३॥

तेवींचि आइका आणिक एक । एथूनि शब्दश्री सच्छास्त्रिक । आणि महाबोधीं कोंवळीक । दुणावली ॥३४॥

एथ चातुर्य शहाणें झालें । प्रमेय रुचीस आलें । आणि सौभाग्य पोखलें । सुखाचें एथ ॥३५॥

माधुर्यीं मधुरता । श्रुंगारीं सुरेखता । रूढपण उचितां । दिसे भलें ॥३६॥

एथ कळाविदपण कळा । पुण्यासि प्रतापु आगळा । म्हणौनि जनमेजयाचे अवलीळा । दोष हरले ॥३७॥

आणि पाहतां नावेक । रंगीं सुरंगतेची आगळीक । गुणां सगुणपणाचें बिक । बहुवस एथ ॥३८॥

भानुचेनि तेजें धवळलें । जैसे त्रैलोक्य दिसे उजळिलें । तैसें व्यासमति कवळिलें । मिरवे विश्व ॥३९॥

कां सुक्षेत्रीं बीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें । तैसें भारतीं सुरवाडलें । अर्थजात ॥४०॥

ना तरी नगरांतरीं वसिजे । तरी नागराचि होईजे । तैसें व्यासोक्तितेजें । धवळत सकळ ॥४१॥

कीं प्रथमवयसाकाळीं । लावण्याची नव्हाळी । प्रगटे जैसी आगळी । अंगनाअंगीं ॥४२॥

ना तरी उद्यानीं माधवी घडे । तेथ वनशोभेची खाणी उघडे । आदिलापासौनि अपाडें । जियापरी ॥४३॥

नानाघनीभूत सुवर्ण । जैसें न्याहाळितां साधारण । मग अलंकारीं बरवेपण । निवाडु दावी ॥४४॥

तैसें व्यासोक्ति अळंकारिलें । आवडे तें बरवेपण पातलें । तें जाणोनि काय आश्रयिलें । इतिहासीं ॥४५॥

नाना पुरतिये प्रतिष्ठेलागीं । सानीव धरूनि आंगीं । पुराणें आख्यानरूपें जगीं । भारता आलीं ॥४६॥

म्हणौनि महाभारतीं नाहीं । तें नोहेचि लोकीं तिहीं । येणें कारणें म्हणिपे पाहीं । व्यासोच्छिष्ट जगत्रय ॥४७॥

ऐसी जगीं सुरस कथा । जें जन्मभूमि परमार्था । मुनि सांगे नृपनाथा । जनमेजया ॥४८॥

जें अद्वितीय उत्तम । पवित्रैक निरुपम । परम मंगलधाम । अवधारिजो ॥४९॥

आतां भारतकमळपरागु । गीताख्यु प्रसंगु । जो संवादला श्रीरंगु । अर्जुनेंसीं ॥५०॥

ना तरी शदब्रह्माब्धि । मथियला व्यासबुद्धि । निवडिलें निरवधि । नवनीत हें ॥५१॥

मग ज्ञानाग्निसंपर्कें । कडसिलेंनि विवेकें । पद आलें परिपाकें । आमोदासी ॥५२॥

जें अपेक्षिजे विरक्तीं । सदा अनुभविजे संतीं । सोहंभावें पारंगतीं । रमिजे जेथ ॥५३॥

जें आकर्णिजें भक्तीं । जें आदिवंद्य त्रिजगतीं । तें भीष्मपर्वीं संगती । म्हणितली कथा ॥५४॥

जें भगवद्गीता म्हणिजे । जें ब्रह्मेशांनीं प्रशंसिजे । जें सनकादिकीं सेविजे । आदरेंसीं ॥५५॥

जैसें शारदीचिये चंद्रकळे । माजि अमृतकण कोंवळे । ते वेंचिती मनें मवाळें । चकोरतलगें ॥५६॥

तियापरी श्रोतां । अनुभवावी हे कथा । अतिहळुवारपण चित्ता । आणूनियां ॥५७॥

हें शब्देंवीण संवादिजे । इंद्रियां नेणतां भोगिजे । बोलाआधि झोंबिजे । प्रमेयासी ॥५८॥

जैसे भ्रमर परागु नेती । परी कमळदळें नेणती । तैसी परी आहे सेविती । ग्रंथीं इये ॥५९॥

कां आपुला ठावो न सांडितां । आलिंगिजे चंद्रु प्रकटतां । हा अनुरागु भोगितां । कुमुदिनी जाणे ॥६०॥

ऐसेनि गंभीरपणें । स्थिरावलोनि अंतःकरणें । आथिला तोचि जाणें । मानूं इये ॥६१॥

अहो अर्जुनाचिये पांती । जे परिसणया योग्य होती । तिहीं कृपा करूनि संतीं । अवधान द्यावें ॥६२॥

हें सलगी म्यां म्हणितलें । चरणां लागोनि विनविलें । प्रभू सखोल हृदय आपुलें । म्हणौनियां ॥६३॥

जैसा स्वभावो मायबापांचा । अपत्य बोले जरी बोबडी वाचा । तरी अधिकचि तयाचा । संतोष आथी ॥६४॥

तैसा तुम्हीं मी अंगिकारिला । सज्जनीं आपुला म्हणितला । तरी उणें सहजें उपसाहला । प्रार्थूं कायी ॥६५॥

परी अपराधु तो आणिक आहे । जे मी गीतार्थु कवळुं पाहें । तें अवधारा विनवूं लाहें । म्हणौनियां ॥६६॥

हें अनावर न विचारितां । वायांचि धिंवसा उपनला चित्ता । येऱ्हवीं भानुतेजीं काय खद्योता । शोभा आथी ॥६७॥

कीं टिटिभू चांचुवरी । माप सूये सागरीं । मी नेणतु त्यापरी । प्रवर्तें येथ ॥६८॥

आइका आकाश गिंवसावें । तरी आणीक त्याहूनि थोर होआवें । म्हणौनि अपाडू हें आघवें । निर्धारितां ॥६९॥

या गीतार्थाची थोरी । स्वयें शंभू विवरी । जेथ भवानी प्रश्नु करी । चमत्कारौनि ॥७०॥

तेथ हरु म्हणे नेणिजे । देवी जैसें कां स्वरूप तुझें । तैसें हें नित्य नूतन देखिजे । गीतातत्व ॥७१॥

हा वेदार्थ सागरु । जया निद्रिताचा घोरु । तो स्वयें सर्वेश्वरु । प्रत्यक्ष अनुवादला ॥७२ ॥

ऐसे जें अगाध । जेथ वेडावती वेद । तेथ अल्प मी मतिमंद । काई होये ॥७३॥

हें अपार कैसेनि कवळावें । महातेज कवणें धवळावें । गगन मुठीं सुवावें । मशकें केवीं ? ॥७४॥

परी एथ असे एकु आधारु । तेणेंचि बोले मी सधरु । जे सानुकूळ श्रीगुरु । ज्ञानदेवो म्हणे ॥७५॥

येऱ्हवीं तरी मी मुर्खु । जरी जाहला अविवेकु । तऱ्ही संतकृपादीपकु । सोज्वळु असे ॥७६॥

लोहाचें कनक होये । हें सामर्थ्य परिसींच आहे । कीं मृतही जीवित लाहे । अमृतसिद्धि ॥७७॥

जरी प्रकटे सिद्धसरस्वती । तरी मुकयाहि आथी भारती । एथ वस्तुसामर्थ्यशक्ति । नवल कयी ॥७८॥

जयातें कामधेनु माये । तयासी अप्राप्य कांहीं आहे । म्हणौनि मी प्रवर्तों लाहें । ग्रंथीं इये ॥७९॥

तरी न्यून ते पुरतें । अधिक तें सरतें । करूनि घेयावें हें तुमतें । विनवितु असे ॥८०॥

आतां देईजो अवधान । तुम्हीं बोलविल्या मी बोलेन । जैसे चेष्टे सूत्राधीन । दारुयंत्र ॥८१॥

तैसा मी अनुग्रहीतु । साधूंचा निरूपितु । ते आपुलियापरी अलंकारितु । भलतयापरी ॥८२॥

तंव श्रीगुरु म्हणती राहीं । हे तुज बोलावें नलगे कांहीं । आतां ग्रंथा चित्त देईं । झडकरी वेगां ॥८३॥

या बोला निवृत्तिदासु । पावूनि परम उल्हासु । म्हणे परियसा मना अवकाशु । देऊनियां ॥८४॥

धृतराष्ट्र उवाच ।

धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवः ।

मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय ॥१॥

तरी पुत्रस्नेहें मोहितु । धृतराष्ट्र असे पुसतु । म्हणे संजया सांगे मातु । कुरुक्षेत्रींची ॥८५॥

जें धर्मालय म्हणिजे । तेथ पांडव आणि माझे । गेले असती व्याजें । जुंझाचेनि ॥८६॥

तरी तेचि येतुला अवसरीं । काय किजत असे येरयेरीं । ते झडकरी कथन करी । मजप्रती ॥८७॥

संजय उवाच ।

दृष्ट्वा तु पाण्डवानीकं व्यूढं दुर्योधनस्तदा ।

आचार्यमुपसंगम्य राजा वचनमब्रवीत् ॥२॥

तिये वेळीं तो संजय बोले । म्हणे पांडव सैन्य उचललें । जैसें महाप्रळयीं पसरलें । कृतांतमुख ॥८८॥

तैसें तें घनदाट । उठावलें एकवाट । जैसें उसळलें काळकूट । धरी कवण ॥८९॥

नातरी वडवानळु सादुकला । प्रळयवातें पोखला । सागरु शोषूनि उधवला । अंबरासी ॥९०॥

तैसें दळ दुर्धर । नानाव्यूहीं परीकर । अवगमलें भयासुर । तिये काळीं ॥९१॥

तें देखोनियां दुर्योधनें । अव्हेरिलें कवणें मानें । जैसे न गणिजे पंचाननें । गजघटांतें ॥९२॥

पश्यैतां पाण्डुपुत्राणामाचार्य महतीं चमूम् ।

व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता ॥३॥

मग द्रोणापासीं आला । तयांतें म्हणे हा देखिला । कैसा दळभारू उचलला । पांडवांचा ॥९३॥

गिरिदुर्ग जैसे चालते । तैसे विविध व्यूह सभंवते । रचिले आथी बुद्धिमंतें । द्रुपदकुमरें ॥९४॥

जो हा तुम्हीं शिक्षापिला । विद्या देऊनि कुरुठा केला । तेणें हा सैन्यसिंहु पाखरिला । देख देख ॥९५॥

अत्र शूरा महेष्वासा भीमार्जुनसमा युधि ।

युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः ॥४॥

आणिकही असाधारण । जे शस्त्रास्त्रीं प्रवीण । क्षात्रधर्मीं निपुण । वीर आहाती ॥९६॥

जे बळें प्रौढी पौरुषें । भीमार्जुनांसारिखे । ते सांगेन कौतुकें । प्रसंगेची ॥९७॥

एथ युयुधानु सुभटु । आला असे विराटु । महारथी श्रेष्ठु । द्रुपद वीरु ॥९८॥

धृष्टकेतुश्चेकितानः काशिराजश्च वीर्यवान ।

पुरुजित्कुन्तिभोजश्च शैब्यश्च नरपुंगवः ॥५॥

युधामन्युश्च विक्रान्त उत्तमौजाश्च वीर्यवान ।

सौभद्रो द्रौपदेयाश्च सर्व एव महारथाः ॥६॥

चेकितान धृष्टकेतु । काशिराज वीर विक्रांतु । उत्तमौजा नृपनाथु । शैब्य देख ॥९९॥

हा कुंतिभोज पाहें । एथ युधामन्यु आला आहे । आणि पुरुजितादि राय हे । सकळ देख ॥१००॥

हा सुभद्राहृदयनंदनु । जो अपरु नवार्जुनु । तो अभिमन्यु म्हणे दुर्योधनु । देखें द्रोणा ॥१०१॥

आणीकही द्रौपदीकुमर । हे सकळही महारथी वीर । मिती नेणिजे परी अपार । मीनले असती ॥१०२॥

अस्माकं तु विशिष्टा ये तान्निबोध द्विजोत्तम ।

नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान्ब्रवीमि ते ॥७॥

भवान्भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः ।

अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च ॥८॥

आतां आमुच्या दळीं नायक । जे रूढवीर सैनिक । ते प्रसंगें आइक । सांगिजती ॥१०३॥

उद्देशें एक दोनी । जायिजती बोलोनी । तुम्ही आदिकरूनी । मुख्य जे जें ॥१०४॥

हा भीष्म गंगानंदनु । जो प्रतापतेजस्वी भानु । रिपुगजपंचाननु । कर्णवीरु ॥१०५॥

या एकेकाचेनी मनोव्यापारें । हें विश्व होय संहरे । हा कृपाचार्यु न पुरे । एकलाचि ॥१०६॥

एथ विकर्ण वीरु आहे । हा अश्वत्थामा पैल पाहें । याचा आडदरु सदां वाहे । कृतांतु मनीं ॥१०७॥

अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः ।

नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः ॥९॥

समितिंजयो सौमदत्ती । ऐसे आणीकही बहुत आहाती । जयांचिया बळा मिती । धाताही नेणें ॥१०८॥

जे शास्त्रविद्यापारंगत । मंत्रावतार मूर्त । हो कां जें अस्त्रजात । एथूनि रूढ ॥१०९॥

हे अप्रतिमल्ल जगीं । पुरता प्रतापु अंगीं । परी सर्व प्राणें मजलागीं । आरायिले असती ॥११०॥

पतिव्रतेचें हृदय जैसें । पतिवांचूनि न स्पर्शे । मी सर्वस्व या तैसें । सुभटांसी ॥१११॥

आमुचिया काजाचेनि पाडें । देखती आपुलें जीवित थोकडें । ऐसे निरवधि चोखडें । स्वामिभक्त ॥११२॥

झुंजती कुळकणी जाणती । कळे किर्तीसी जिती । हे बहु असो क्षात्रनीति । एथोनियां ॥११३॥

ऐसे सर्वांपरि पुरते । वीर दळीं आमुते । आतं काय गणूं यांतें । अपार हे ॥११४॥

अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितम् ।

पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितम् ॥१०॥

वरी क्षत्रियांमाजी श्रेष्ठु । जो जगजेठी जगीं सुभटु । तया दळवैपणाचा पाटु । भीष्मासि पैं ॥११५॥

आतां याचेनि बळें गवसलें । हे दुग जैसे पन्नासिलें । येणें पाडें थेकुलें । लोकत्रय ॥११६॥

आधींच समुद्र पाहीं । तेथ दुवाडपण कवणा नाहीं । मग वडवानळु तैसे याही । विरजा जैसा ॥११७॥

ना तरीं प्रळयवन्ही महावातु । या दोघां जैसा सांधातु । तैसा हा गंगासुतु । सेनापति ॥११८॥

आतां येणेंसि कवण भिडे । हें पांडवसैन्य कीर थोकडें । परि वरचिलेनि पाडें । दिसत असे ॥११९॥

वरी भीमसेनु बेथु । तो जाहला असे सेनानाथु । ऐसें बोलोनियां मातु । सांडिली तेणें ॥१२०॥

अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः ।

भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥११॥

मग पुनरपि काय बोले । सकळ सैनिकांतें म्हणितलें । आतां दळभार आपुलाले । सरसे करा ॥१२१॥

जया जिया अक्षौहिणी । तेणें तिया आरणी । वरगण कवणकवणी । महारथीया ॥१२२॥

तेणें तिया आवरिजे । भीष्मातळीं राहिजे । द्रोणातें म्हणे पाहिजे । तुम्ही सकळ ॥१२३॥

हाचि एकु रक्षावा । मी तैसा हा देखावा । येणें दळभारु आघवा । साचु आमुचा ॥१२४॥

तस्य संजनयन्हर्षं कुरुवृद्धः पितामहः ।

सिंहनादं विनद्योच्चैः शंखं दध्मौ प्रतापवान ॥१२॥

या राजयाचिया बोला । सेनापति संतोषला । मग तेणें केला । सिंहनादु ॥१२५॥

तो गाजत असे अद्भुतु । दोन्ही सैन्याआंतु । प्रतिध्वनि न समातु । उपजत असे ॥१२६॥

तयाचि तुलगासवें । वीरवृत्तीचेनि थावें । दिव्य शंख भीष्मदेवें । आस्फुरिला ॥१२७॥

ते दोन्ही नाद मीनले । तेथ त्रैलोक्य बधिरीभूत जाहलें । जैसें आकाश कां पडिलें । तुटोनिया ॥१२८॥

घडघडीत अंबर । उचंबळत सागर । क्षोभलें चराचर । कांपत असे ॥१२९॥

तेणें महाघोषगजरें । दुमदुमिताती गिरिकंदरें । तव दळामाजीं रणतुरें । आस्फुरिलीं ॥१३०॥

ततः शंखाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखाः ।

सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् ॥१३॥

उदंड सैंघ वाजतें । भयानखें खाखातें । महाप्रळयो जेथें । धाकडांसी ॥१३१॥

भेरी निशाण मांदळ । शंख काहळ भोंगळ । आणि भयासुर रणकोल्हाळ । सुभटांचे ॥१३२॥

आवेशें भुजा त्राहाटिती । विसणेले हांका देती । जेथ महामद भद्रजाती । आवरती ना ॥१३३॥

तेथ भेडांची कवण मातु । कांचया केर फिटतु । जेणें दचकला कृतांतु । आंग नेघे ॥१३४॥

एकां उभयाचि प्राण गेले । चांगांचे दांत बैसले । बिरुदाचे दादुले । हिंवताती ॥१३५॥

ऐसा अद्भुत तूरबंबाळु । ऐकोनि ब्रह्मा व्याकुळु । देव म्हणती प्रळयकाळु । वोढवला आजी ॥१३६॥

ततः श्वेतैहयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ ।

माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः ॥१४॥

पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः ।

पौण्ड्रं दध्मौ महाशंखं भीमकर्मा वृकोदरः ॥१५॥

अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः ।

नकुलः सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ॥१६॥

ऐसी स्वर्गीं मातु । देखोनि तो आकांतु । तव पांडवदळाआंतु । वर्तलें कायी ॥१३७॥

हो कां निजसार विजयाचें । कीं तें भांडार महातेजाचें । जेथ गरुडाचिये जावळियेचे । कांतले चाऱ्ही ॥१३८॥

कीं पाखांचा मेरु जैसा । रहंवरु मिरवतसे तैसा । तेजें कोंदाटलिया दिशा । जयाचेनि ॥१३९॥

जेथ अश्ववाहकु आपण । वैकुंठींचा राणा जाण । तया रथाचे गुण । काय वर्णूं ॥१४०॥

ध्वजस्तंभावरी वानरु । तो मुर्तिमंत शंकरु । सारथी शारङ्गधरु । अर्जुनेसीं ॥१४१॥

देखा नवल तया प्रभूचें । अद्भुत प्रेम भक्ताचें । जें सारथ्यपण पार्थाचें । करितु असे ॥१४२॥

पाइकु पाठींसी घातला । आपण पुढां राहिला । तेणें पाञ्चजन्यु आस्फुरिला । अवलीळाचि ॥१४३॥

परि तो महाघोषु थोरु । गर्जतु असे गंहिरु । जैसा उदेला लोपी दिनकरु । नक्षत्रांतें ॥१४४॥

तैसें तुरबंबाळु भंवते । कौरवदळीं गाजत होते । ते हारपोनि नेणों केउते । गेले तेथ ॥१४५॥

तैसाचि देखे येरे । निनादें अति गहिरे । देवदत्त धनुर्धरें । आस्फुरिला ॥१४६॥

ते दोन्ही शब्द अचाट । मिनले एकवट । तेथ ब्रह्मकटाह शतकूट । हों पाहत असे ॥१४७॥

तंव भीमसेनु विसणैला । जैसा महाकाळु खवळला । तेणें पौण्ड्र आस्फुरिला । महाशंखु ॥१४८॥

तो महाप्रलयजलधरु । जैसा घडघडिला गहिंरु । तंव अनंतविजयो युधिष्ठिरु । आस्फुरित असे ॥१४९॥

नकुळें सुघोषु । सहदेवें मणिपुष्पकु । जेणें नादें अंतकु । गजबजला ठाके ॥१५०॥

काश्यश्च परमेष्वासः शिखण्डी च महारथः ।

धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः ॥१७॥

द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथिवीपते ।

सौभद्रश्च महाबाहुः शंखान्दध्मुः पृथक् पृथक् ॥१८॥

स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् ।

नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन ॥१९॥

तेथ भूपति होते अनेक । द्रुपद द्रौपदेयादिक । हा काशीपति देख । महाबाहु ॥१५१॥

तेथ अर्जुनाचा सुतु । सात्यकि अपराजितु । धृष्टद्युम्नु नृपनाथु । शिखंडी हन ॥१५२॥

विराटादि नृपवर । जे सैनिक मुख्य वीर । तिहीं नानाशंख निरंतर । आस्फुरिले ॥१५३॥

तेणें महाघोषनिर्घातें । शेष कूर्म अवचितें । गजबजोनि भूभारातें । सांडूं पाहती ॥१५४॥

तेथ तीन्ही लोक डळमळित । मेरु मांदार आंदोळित । समुद्रजळ उसळत । कैलासवेरी ॥१५५॥

पृथ्वीतळ उलथों पहात । आकाश असे आसुडत । तेथ सडा होत । नक्षत्रांचा ॥१५६॥

सृष्टी गेली रे गेली । देवां मोकळवादी जाहली । ऐशी एक टाळी पिटली । सत्यलोकीं ॥१५७॥

दिहाचि दिन थोकला । जैसा प्रलयकाळ मांडला । तैसा हाहाकारु जाहला । तिन्हीं लोकीं ॥१५८॥

तें देखोनि आदिपुरुषु विस्मितु । म्हणे झणें होय पां अंतु । मग लोपिला अद्भुतु । संभ्रमु तो ॥१५९॥

म्हणौनि विश्व सांवरलें । एऱ्हवीं युगांत होतें वोडवलें । जैं महाशंख आस्फुरिले । कृष्णादिकीं ॥१६०॥

तो घोष तरी उपसंहरला । परि पडिसाद होता राहिला । तेणें दळभार विध्वंसिला । कौरवांचा ॥१६१॥

जैसा गजघटाआंतु । सिंह लीला विदारितु । तैसा हृदयातें भेदितु । कौरवांचिया ॥१६२॥

तो गाजत जंव आइकती । तंव उभेचि हिये घालिती । एकमेकांतें म्हणती । सावध रे सावध ॥१६३॥

अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान कपिध्वजः ।

प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ॥२०॥

तेथ बळें प्रौढीपुरतें । महारथी वीर होते । तिहीं पुनरपि दळातें । आवरिलें ॥१६४॥

मग सरिसेपणें उठावले । दुणवटोनि उचलले । तया दंडीं क्षोभलें । लोकत्रय ॥१६५॥

तेथ बाणवरी धर्नुधर । वर्षताती निरंतर । जैसे प्रळयांत जलधर । अनिवार कां ॥१६६॥

ते देखलिया अर्जुनें । संतोष घेऊनि मनें । मग संभ्रमें दिठी सेने । घालीतसे ॥१६७॥

तंव संग्रामीं सज्ज जाहले । सकळ कौरव देखिले । तंव लीलाधनुष्य उचललें । पंडुकुमरें ॥१६८॥

हृषीकेशं तदा वाक्यमिदमाह महीपते ।

अर्जुन उवाच ।

सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापय मेऽच्युत ॥२१॥

यावदेतान्निरिक्षेऽहं योद्धुकामानवस्थितान ।

कैर्मया सह योद्धव्यमस्मिन रणसमुद्यमे ॥२२॥

योत्स्यमानानवेक्षेऽहं य एतेऽत्र समागताः ।

धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर्युद्धे प्रियचिकीर्षवः ॥२३॥

ते वेळीं अर्जुन म्हणतसे देवा । आतां झडकरी रथु पेलावा । नेऊनि मध्यें घालावा । दोहीं दळां ॥१६९॥

जंव मी नावेक । हे सकळ वीर सैनिक । न्याहाळीन अशेख । झुंजते ते ॥१७०॥

येथ आले असती आघवें । परी कवणेंसीं म्यां झुंजावें । हे रणीं लागे पहावें । म्हणौनियां ॥१७१॥

बहुतकरूनि कौरव । हे आतुर दुःस्वभाव । वांटिवेवीण हांव । बांधिती झुंजीं ॥१७२॥

झुंजाची आवडी धरिती । परी संग्रामीं धीर नव्हती । हें सांगोनि रायाप्रती । काय संजयो म्हणे ॥१७३॥

सञ्जय उवाच ।

एवमुक्तो हृषीकेशो गुडाकेशेन भारत ।

सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् ॥२४॥

भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् ।

उवाच पार्थ पश्यैतान्समवेतान्कुरूनिति ॥२५॥

तत्रापश्यत्स्थितान्पार्थः पितृनथ पितामहान ।

आचार्यान्मातुलान्भ्रातृन्पुत्रान्पौत्रान्सखींस्तथा ॥२६॥

श्वशुरान्सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि ।

तान्समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान्बन्धूनवस्थितान ॥२७॥

कृपया परयाऽऽविष्टो विषीदमब्रवीत् ।

आइका अर्जुन इतुकें बोलिला । तंव श्रीकृष्णें रथु पेलिला । दोही सैन्यांमाजीं केला । उभा तेणें ॥७४॥

जेथ भीष्मद्रोणादिक । जवळिकेचि सन्मुख । पृथिवीपति आणिक । बहुत आहाती ॥७५॥

तेथ स्थिर करूनियां रथु । अर्जुन असे पाहातु । तो दळभार समस्तु । संभ्रमेंसीं ॥७६॥

मग देवा म्हणे देख देख । हे गुरुगोत्र अशेख । तंव कृष्णमनीं नावेक । विस्मो जाहला ॥७७॥

तो आपणयां आपण म्हणे । एथ कायी कवण जाणे । हें मनीं धरलें येणें । परि कांहीं आश्चर्य असे ॥७८॥

ऐसी पुढील से घेतु । तो सहजें जाणें हृदयस्थु । परि उगा असे निवांतु । तिये वेळीं ॥१७९॥

तंव तेथ पार्थु सकळ । पितृ पितामह केवळ । गुरु बंधु मातुळ । देखता जाहला ॥१८०॥

इष्ट मित्र आपुले । कुमरजन देखिले । हे सकळ असती आले । तयांमाजी ॥१८१॥

सुहृज्जन सासरे । आणीकही सखे सोइरे । कुमर पौत्र धर्नुर्धरें । देखिले तेथ ॥१८२॥

जयां उपकार होते केले । कीं आपदीं जे रक्षिले । हे असो वडील धाकुले । आदिकरूनि ॥१८३॥

ऐसें गोत्रचि दोहीं दळीं । उदित जालें असे कळीं । हे अर्जुनें तिये वेळीं । अवलोकिलें ॥१८४॥

तेथ मनीं गजबज जाहली । आणि आपैसी कृपा आली । तेणें अपमानें निघाली । वीरवृत्ति ॥१८५॥

जिया उत्तम कुळींचिया होती । आणि गुणलावण्य आथी । तिया आणिकीतें न साहती । सुतेजपणें ॥१८६॥

नविये आवडीचेनि भरें । कामुक निजवनिता विसरे । मग पाडेंवीण अनुसरे । भ्रमला जैसा ॥१८७॥

कीं तपोबळें ऋद्धी । पातलिया भ्रंशे बुद्धी । मग तया विरक्तता सिद्धी । आठवेना ॥१८८॥

तैसें अर्जुना तेथ जाहलें । असतें पुरुषत्व गेलें । जे अंतःकरण दिधलें । कारुण्यासी ॥१८९॥

देखा मंत्रज्ञु बरळु जाय । मग तेथ कां जैसा संचारु होय । तैसा तो धनुर्धर महामोहें । आकळिला ॥१९०॥

म्हणौनि असतां धीरु गेला । हृदया द्रावो आला । जैसा चंद्रकळीं शिवतला । सोमकांतु ॥१९१॥

तयापरी पार्थु । अतिस्नेहें मोहितु । मग सखेद असे बोलतु । श्रीअच्युतेसीं ॥१९२॥

अर्जुन उवाच ।

दृष्ट्वेमम् स्वजनं कृष्ण युयुत्सुम् समुपस्थितम् ॥२८॥

सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।

वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ॥२९॥

गाण्डीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते ।

न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः ॥३०॥

तो म्हणे अवधारी देवा । म्यां पाहिला हा मेळावा । तंव गोत्र वर्गु आघवा । देखिला एथ ॥१९३॥

हें संग्रामीं उदित । जहाले असती कीर समस्त । पण आपणपेयां उचित । केवीं होय ॥१९४॥

येणें नांवेचि नेणों कायी । मज आपणपें सर्वथा नाहीं । मन बुद्धि ठायीं । स्थिर नोहे ॥१९५॥

देखे देह कांपत । तोंड असे कोरडें होत । विकळता उपजत । गात्रांसीही ॥१९६॥

सर्वांगा कांटाळा आला । अति संतापु उपनला । तेथ बेंबळ हातु गेला । गांडिवाचा ॥१९७॥

तें न धरतचि निष्टलें । परि नेणेंचि हातोनि पडिलें । ऐसें हृदय असे व्यापिलें । मोहें येणें ॥१९८॥

जें वज्रापासोनि कठिण । दुर्धर अतिदारुण । तयाहून असाधारण । हें स्नेह नवल ॥१९९॥

जेणें संग्रामीं हरु जिंतिला । निवातकवचांचा ठावो फेडिला । तो अर्जुन मोहें कवळिला । क्षणामाजीं ॥२००॥

जैसा भ्रमर भेदी कोडें । भलतैसें काष्ठ कोरडें । परि कळिकेमाजी सांपडे । कोंवळिये ॥२०१॥

तेथ उत्तीर्ण होईल प्राणें । परि तें कमळदळ चिरूं नेणें । तैसें कठिण कोवळेपणें । स्नेह देखा ॥२०२॥

हे आदिपुरुषाची माया । ब्रह्मेयाही नयेचि आया । म्हणौनि भुलविला ऐकें राया । संजयो म्हणे ॥२०३॥

अवधारी मग तो अर्जुनु । देखोनि सकळ स्वजनु । विसरला अभिमानु । संग्रामींचा ॥२०४॥

कैसी नेणों सदयता । उपनली तेथें चित्ता । मग म्हणे कृष्णा आतां । नसिजे एथ ॥२०५॥

माझें अतिशय मन व्याकुळ । होतसे वाचा बरळ । जे वधावे हे सकळ । येणें नांवें ॥२०६॥

निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव ।

न च श्रेयोऽनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे ॥३१॥

या कौरवां जरी वधावें । तरी युधिष्ठीरादिकां कां न वधावें । हे येरयेर आघवे । गोत्रज आमुचे ॥२०७॥

म्हणोनि जळो हें झुंज । प्रत्यया न ये मज । एणें काय काज । महापापें ॥२०८॥

देवा बहुतापरी पाहतां । एथ वोखटे होईल झुंजतां । वर कांहीं चुकवितां । लाभु आथी ॥२०९॥

न कांक्षे विजयं कृष्ण न च राज्यं सुखानि च ।

किं नो राज्येन गोविन्द किं भोगैर्जीवितेन वा ॥३२॥

येषामर्थे कांक्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च ।

त इमेऽवस्थिता युद्धे प्राणांस्त्यक्त्वा धनानि च ॥३३॥

आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः ।

मातुलाः श्वशुराः पौत्राः श्यालाः सम्बन्धिनस्तथा ॥३४॥

तया विजयवृत्ती कांहीं । मज सर्वथा काज नाहीं । एथ राज्य तरी कायी । हे पाहुनियांं ॥२१०॥

या सकळांतें वधावें । मग हे भोग भोगावे । ते जळोत आघवे । पार्थु म्हणे ॥२११॥

तेणें सुखेंविण होईल । तें भलतैसें साहिजेल । वरी जीवितही वेंचिजेल । याचिलागीं ॥२१२॥

परी यांसी घातु कीजे । मग आपण राज्यसुख भोगिजे । हें स्वप्नींही मन माझें । करूं न शके ॥२१३॥

तरी आम्हीं कां जन्मावें । कवणलागीं जियावें । जरी वडिलां यां चिंतावें । विरुद्ध मनें ॥२१४॥

पुत्रातें इच्छी कुळ । तयाचें कायि हेंचि फळ । जे निर्दळिजे केवळ । गोत्र आपुलें ॥२१५॥

हें मनींचि केविं धरिजे । आपण वज्राचेया होईजे । वरी घडे तरी कीजे । भलें इयां ॥२१६॥

आम्हीं जें जें जोडावें । तें समस्तीं इहीं भोगावें । हें जीवितही उपकारावें । काजीं यांच्या ॥२१७॥

आम्ही दिगंतीचे भूपाळ । विभांडूनि सकळ । मग संतोषविजे कुळ । आपुलें जें ॥२१८॥

तेचि हे समस्त । परी कैसें कर्म विपरीत । जे जाहले असती उद्यत । झुंजावया ॥२१९॥

अंतौरिया कुमरें । सांडोनियां भांडारें । शस्त्राग्रीं जिव्हारें । आरोपुनी ॥२२०॥

ऐसियांतें कैसेनि मारूं ? । कवणावरी शस्त्र धरूं ? । निजहृदया करूं । घातु केवीं ? ॥२२१॥

हें नेणसी तूं कवण । परी पैल भीष्म द्रोण । जयांचे उपकार असाधारण । आम्हां बहुत ॥२२२॥

एथ शालक सासरे मातुळ । आणि बंधु कीं हे सकळ । पुत्र नातू केवळ । इष्टही असती ॥२२३॥

अवधारी अति जवळिकेचे । हे सकळही सोयरे आमुचे । म्हणौनि दोष आथी वाचे । बोलितांचि ॥२२४॥

एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन ।

अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु महीकृते ॥३५॥

हे वरी भलतें करितु । आतांचि येथें मारितु । परि आपण मनें घातु । न चिंतावा ॥२२५॥

त्रैलोक्यींचें अनकळित । जरी राज्य होईल प्राप्त । तरी हें अनुचित । नाचरें मी ॥२२६॥

जरी आजि एथ ऐसें कीजे । तरी कवणाच्या मनीं उरिजे ? । सांगे मुख केवीं पाहिजे । तुझें कृष्णा ? ॥२२७॥

निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन ।

पापमेवाऽऽश्रयेदस्मान्हत्वैतानाततायिनः ॥३६॥

जरी वधु करोनि गोत्रजांचा । तरी वसौटा होऊनि दोषांचा । मज जोडिलासि तुं हातींचा । दूरी होसी ॥२२८॥

कुळहरणीं पातकें । तिये आंगीं जडती अशेखें । तये वेळीं तुं कवणें कें । देखावासी ? ॥२२९॥

जैसा उद्यानामाजीं अनळु । संचारला देखोनि प्रबळु । मग क्षणभरी कोकिळु । स्थिरु नोहे ॥२३०॥

का सकर्दम सरोवरु । अवलोकूनि चकोरु । न सेवितु अव्हेरु । करूनि निघे ॥२३१॥

तयापरी तुं देवा । मज झकवूं न येसीं मावा । जरी पुण्याचा वोलावा । नाशिजैल ॥२३२॥

तस्मान्नार्हा वयं हन्तुं धार्तराष्ट्रान्स्वबान्धवान् ।

स्वजनं हि कथं हत्वा सुखिनः स्याम माधव ॥३७॥

म्हणोनि मी हें न करीं । इये संग्रामीं शस्त्र न धरीं । हें किडाळ बहुतीं परी । दिसतसे ॥२३३॥

तुजसीं अंतराय होईल । मग सांगे आमुचें काय उरेल ? । तेणें दुःखें हियें फुटेल । तुजवीण कृष्णा ॥२३४॥

म्हणौनि कौरव हे वधिजती । मग आम्ही भोग भोगिजती । हे असो मात अघडती । अर्जुन म्हणे ॥२३५॥

यद्यप्येते न पश्यन्ति लोभोपहतचेतसः ।

कुलक्षयकृतं दोषं मित्रद्रोहे च पातकम् ॥३८॥

कथं न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्निवर्तितुम् ।

कुलक्षयकृतं दोषं प्रपश्यद्भिर्जनार्दन ॥३९॥

हे अभिमानमदें भुललें । जरी पां संग्रामा आले । तऱ्ही आम्हीं हित आपुलें । जाणावें लागे ॥२३६॥

हें ऐसें कैसें करावें ? । जे आपुले आपण मारावे ? । जाणत जाणतांचि सेवावें । काळकूट ? ॥२३७॥

हां जी मार्गीं चालतां । पुढां सिंहु जाहला आवचिता । तो तंव चुकवितां । लाभु आथी ॥२३८॥

असता प्रकाशु सांडावा । मग अंधकूप आश्रावा । तरी तेथ कवणु देवा । लाभु सांगे ? ॥२३९॥

कां समोर अग्नि देखोनी । जरी न वचिजे वोसंडोनी । तरी क्षणा एका कवळूनी । जाळूं सके ॥२४०॥

तैसे दोष हे मूर्त । अंगी वाजों असती पहात । हें जाणतांही केवीं एथ । प्रवर्तावें ? ॥२४१॥

ऐसें पार्थु तिये अवसरीं । म्हणे देवा अवधारीं । या कल्मषाची थोरी । सांगेन तुज ॥२४२॥

कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः ।

धर्मे नष्टे कुलं कृत्स्नमधर्मोऽभिभवत्युत ॥४०॥

जैसें कष्ठें काष्ठ मथिजे । तेथ वन्हि एक उपजे । तेणें काष्ठजात जाळिजे । प्रज्वळलेनि ॥२४३॥

तैसा गोत्रींचीं परस्परें । जरी वधु घडे मत्सरें । तरी तेणें महादोषें घोरें । कुळचि नाशे ॥२४४॥

म्हणौनि येणें पापें । वंशजधर्मु लोपे । मग अधर्मुचि आरोपे । कुळामाजीं ॥२४५॥

अधर्माभिभवात्कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः ।

स्त्रीषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसङ्करः ॥४१॥

एथ सारासार विचारावें । कवणें काय आचारावें । आणि विधिनिषेध आघवे । पारुषती ॥२४६॥

असता दीपु दवडिजे । मग अंधकारीं राहाटिजे । तरी उजूचि कां अडळिजे । जयापरी ॥२४७॥

तैसा कुळीं कुळक्षयो होय । तये वेळीं तो आद्यधर्मु जाय । मग आन कांहीं आहे । पापावांचुनी ? ॥२४८॥

जैं यमनियम ठाकती । तेथ इंद्रिये सैरा राहाटती । म्हणौनि व्यभिचार घडती । कुळस्त्रियांसी ॥२४९॥

उत्तम अधमीं संचरती । ऐसे वर्णावर्ण मिसळती । तेथ समूळ उपडती । जातिधर्म ॥२५०॥

जैसी चोहटाचिये बळी । पाविजे सैरा काउळीं । तैसीं महापापें कुळीं । संचरती ॥२५१॥

सङ्करो नरकायैव कुलघ्नानां कुलस्य च ।

पतन्ति पितरो ह्येषां लुप्तपिण्डोदकक्रियाः ॥४२॥

मग कुळा तया अशेखा । आणि कुळघातकां । येरयेरां नरका । जाणें आथी ॥२५२॥

देखें वंशवृद्धि समस्त । यापरी होय पतित । मग वोवांडिती स्वर्गस्थ । पूर्वपुरुष ॥२५३॥

जेथ नित्यादि क्रिया ठाके । आणि नैमित्तिक क्रिया पारुखे । तेथ कवणा तिळोदकें । कवण अर्पी ? ॥२५४॥

तरी पितर काय करिती ? । कैसेनि स्वर्गीं वसती ? । म्हणौनि तेही येती । कुळापासीं ॥२५५॥

जैसा नखाग्रीं व्याळु लागे । तो शिखांत व्यापी वेगें । तेवीं आब्रह्म कुळ अवघें । आप्लविजे ॥२५६॥

दोषैरेतैः कुलघ्नानां वर्णसङ्करकारकैः ।

उत्साद्यन्ते जातिधर्माः कुलधर्माश्च शाश्वताः ॥४३॥

उत्सन्नकुलधर्माणां मनुष्याणां जनार्दन ।

नरके नियतं वासो भवतीत्यनुशुश्रुम ॥४४॥

अहो बत महत्पापं कर्तुं व्यवसिता वयम् ।

यद्राज्यसुखलोभेन हन्तुं स्वजनमुद्यताः ॥४५॥

देवा अवधारी आणीक एक । एथ घडे महापातक । जे संगदोषें हा लौकिक । भ्रंशु पावे ॥२५७॥

जैसा घरीं आपुला । वानिवसें अग्नि लागला । तो आणिकांहीं प्रज्वळिला । जाळूनि घाली ॥२५८॥

तैसिया तया कुळसंगती । जे जे लोक वर्तती । तेही बाधा पावती । निमित्तें येणें ॥२५९॥

तैसें नाना दोषें सकळ । अर्जुन म्हणे तें कुळ । मग महाघोर केवळ । निरय भोगी ॥२६०॥

पडिलिया तिये ठायीं । मग कल्पांतींही उकलु नाहीं । येसणें पतन कुळक्षयीं । अर्जुन म्हणे ॥२६१॥

देवा हें विविध कानीं ऐकिजे । परी अझुनिवरी त्रासु नुपजे । हृदय वज्राचें हें काय कीजे । अवधारीं पां ॥२६२॥

अपेक्षिजे राज्यसुख । जयालागीं तें तंव क्षणिक । ऐसे जाणतांही दोख । अव्हेरू ना ? ॥२६३॥

जे हे वडिल सकळ आपुले । वधावया दिठी सूदले । सांग पां काय थेंकुलें । घडलें आम्हां ? ॥२६४॥

यदि मामप्रतीकारमशस्त्रं शस्त्रपाणयः ।

धार्तराष्ट्रा रणे हन्युस्तन्मे क्षेमतरं भवेत् ॥४६॥

आतां यावरी जें जियावें । तयापासूनि हें बरवें । जे शस्त्र सांडुनि साहावे । बाण यांचे ॥२६५॥

तयावरी होय जितुकें । तें मरणही वरी निकें । परी येणें कल्मषें । चाड नाहीं ॥२६६॥

ऐसें देखून सकळ । अर्जुनें आपुलें कुळ । मग म्हणे राज्य तें केवळ । निरयभोगु ॥२६७॥

सञ्जय उवाच ।

एवमुक्त्वाऽर्जुनः संख्ये रथोपस्थ उपाविशत् ।

विसृज्य सशरं चापं शोकसंविग्नमानसः ॥४७॥

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे

श्रीकृष्णार्जुनसंवादे अर्जुनविषादयोगोनाम प्रथमोऽध्यायः ॥१॥

ऐसे तिये अवसरी । अर्जुन बोलिला समरीं । संजयो म्हणे अवधारीं । धृतराष्ट्रातें ॥२६८॥

मग अत्यंत उद्वेगला । न धरत गहींवरु आला । तेथ उडी घातली खालां । रथौनियां ॥२६९॥

जैसा राजकुमरु पदच्युतु । सर्वथा होय उपहतु । कां रवि राहुग्रस्तु । प्रभाहीनु ॥२७०॥

नातरी महासिद्धिसंभ्रमें । जिंतिला तापसु भ्रमें । मग आकळूनि कामें । दीनु कीजे ॥२७१॥

तैसा तो धर्नुधरु । अत्यंत दुःखें जर्जरु । दिसे जेथ रहंवरु । त्यजिला तेणें ॥२७२॥

मग धनुष्य बाण सांडिले । न धरत अश्रुपात आले । ऐसें ऐक राया वर्तलें । संजयो म्हणे ॥२७३॥

आतां यापरी तो वैकुंठनाथु । देखोनि सखेद पार्थु । कवणेपरी परमार्थु । निरूपील ॥२७४॥

ते सविस्तर पुढारी कथा । अति सकौतुक ऐकतां । ज्ञानदेव म्हणे आतां । निवृत्तिदासु ॥२७५॥

इति श्रीज्ञानदेवविरचितायां भावार्थदीपिकायां प्रथमोऽध्यायः ॥

N/A

References : N/A
Last Updated : June 30, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP