मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|श्रीसंतएकनाथ गाथा|भाग दुसरा|
अभंग २२७६ ते २३००

अद्वैत - अभंग २२७६ ते २३००

श्रीसंतएकनाथ महाराजांची गाथा म्हणजे श्रीराम व श्रीकृष्णाच्या अवताराचे मनोवेधक वर्णन.


२२७६

नोहे ब्रह्माज्ञानी लेकुंरांचा खेळ । अवघाचि कोल्हाळ आशाबद्ध ॥१॥

वाढवुनी जटा म्हणती ब्रह्माज्ञान । परी पतनालागुनी न चुकेचि ॥२॥

लावुनी विभुती बांधुनियां मठा । ब्रह्मज्ञान चेष्ठा दाविताती ॥३॥

माळा आणि मुद्रा लेवुंनियां सांग । ब्रह्माज्ञान सोंग दाविताती ॥४॥

एका जनार्दनीं संतसेवेविण । ब्रह्माज्ञानखुण न कलेचि ॥५॥

२२७७

अष्टांग साधन धूम्रपाण अटी । ब्रह्माज्ञानासाठीं करिताती ॥१॥

परि तें न लभे न लभे सर्वथा । वाउग्याची कथा बोलताती ॥२॥

शाब्दिकाचा शब्द कुंठित ते ठायीं । वाउगें कांहीं बाहीं बोलुं नये ॥३॥

एका जनार्दनीं संतकृपा होतां । ब्रह्माज्ञान तत्त्वतां घर रिघे ॥४॥

२२७८

ब्रह्माज्ञानालागीं ब्रह्मादिक पिसें । तें तुम्हां आमहं कसें आकळेल ॥१॥

प्रत्यक्ष परब्रह्मा श्रीरामचंद्र । वसिष्ठ मनींद्र गुरु त्याचा ॥२॥

कृष्णा बळीराम संदीपना शरण । तेणें गुह्मा ज्ञान कथियेलें ॥३॥

प्रत्यक्ष वामांकी असोनी पार्वती । वेळोवेळां विनंती करितसे ॥४॥

सुलभ नव्हे देवा सुलभ नव्हे जीवा । सुलभे गौरवा न कळेचि ॥५॥

एका जनार्दनीं श्रीगुरुवांचुन । ब्रह्माज्ञान खूण न कळेचि ॥६॥

२२७९

ब्रह्माज्ञानासाठीं वेदशास्त्र पुराण । करितां श्रवण नातुडेची ॥१॥

नातुडेची कदा गीताभागवतीं । वाचितां हो पोथी जन्मवरी ॥२॥

द्वरकापट्टण क्षेत्र वाराणसी । करितां तीर्थाटनासी प्राप्त नोहे ॥३॥

प्राप्त नोहे गुरु मंत्रतंत्र घेतां । शब्दज्ञानाथितां प्राप्त नोहे ॥४॥

ज्यासी पुनरावृत्ति स्थिर नोहे बोध । अखंडित भेद मनामाजीं ॥५॥

ज्याचें जन्मांतर सरूनियां जाये । तेथें स्थिर होय गुरुबोध ॥६॥

एका जनार्दनीं ऐसा जो का पुरुष । कोटीमाजीं एक ब्रह्माज्ञानीं ॥७॥

२२८०

ब्रह्माज्ञानी वाचें सांगतां नये । जैं कृपा होये श्रीगुरुची ॥१॥

लाभेल लाभेल ब्रह्माज्ञान क्षणीं । वाउगी कहाणी बोलुनी काय ॥२॥

हृदयींचा बोध ठसतां अंतरीं । कामक्रोध वैरी पळताती ॥३॥

तैसें ब्रह्माज्ञान कळलियावरी । सर्वभावें वैखरी गुण वाणी ॥४॥

एका जनार्दनीं वंदूं गुरुपाय । आणीक उपाय नाहीं नाहीं. ॥५॥

२२८१

ब्रह्माज्ञानाची कसवटी । अनुभव नाहीं पोटीं । बोला चावटी । वाउगी बापा ॥१॥

शुद्ध ब्रह्माज्ञान । एक आत्मा भूतमात्रीं प्रमाण । विनोदें छळण । कवणाचें न करीं ॥२॥

जीव शिवा नाहीं भेद । अवघा नित्य परमानंद । आनंदाचा कंद तोचि ब्रह्माज्ञानीं ॥३॥

एका जनार्दनीं वर्म । भाविकांसी सुधर्म । अभाविकासी भ्रम । जाणीवेचा ॥४॥

२२८२

ब्रह्माज्ञानासाठीं । हिंडताती पाठोपाठीं ॥१॥

नोहे नोहें बा फुकांचें । बोल बोलतां नये सांचें ॥२॥

ऐसें आहे तैसें आहे । वाउगा तो भ्रम पाहे ॥३॥

जनार्दन कृपा पुर्ण । तैंचि कळे ब्रह्माज्ञान ॥४॥

एका जनार्दनीं शरण । चालुन येईल ब्रह्माज्ञान ॥५॥

२२८३

वाउगे ते बोल बोलती चावटी । ब्रह्माज्ञान कसवटी अंगीं नाहीं ॥१॥

संसारीं असोनी अलिप्त नलिनी । तैसा ब्रह्माज्ञानीं विरक्त तो ॥२॥

आकाशमंडळीं रवि तो भ्रमला । परिरांजणीं बिंबला नाथिलाची ॥३॥

एका जनार्दनीं प्रसादावांचुनीं । ब्रह्माज्ञान मनीं न ठसे कधीं ॥४॥

२२८४

अनुतापाविण । नोहे कदा ब्रह्मज्ञान ॥१॥

हें तो मागील रहाटी । अनुताप घ्यावा पोटीं ॥२॥

अनुतापावांचुन । कवण तरलासे जाण ॥३॥

अनुताप नाहीं पोटीं । वायां बोलुं नयें गाठीं ॥४॥

अनुताप वांचुन जाण । नाहीं नाहीं ब्रह्माज्ञान ॥५॥

एका जनार्दनीं अनुताप । होतां निवारें त्रिविधताप ॥६॥

२२८५

निर्गुण निर्विकारु । तोचि जगीं पैं इश्वर ॥१॥

नित्य निर्विकल्प देख । सदा वाहे समाधीसुख ॥२॥

ऐसें ब्रह्माज्ञान जोडे । तैं गुरुकृपा तेथें घडें ॥३॥

कापुर घातलीया जळीं । स्वयें नुरेची परिमळीं ॥४॥

एकपणें तो एकला । एका जनार्दनीं देखिला ॥५॥

२२८६

वर्म जाणें तो विरळा । तयांचीं लक्षणें पैं सोळा । देहीं देव पाहे डोळां । तोचि ब्रह्माज्ञानीं ॥१॥

जन निंदो अथवा वंदो । जया नाहीं भेदाभेद । विधिनिषेधाचें शब्द । अंगीं न बाणती ॥२॥

कार्य कारण कर्तव्यता । हें पिसें नाहीं सर्वथा । उन्मनी समाधी अवस्था । न मोडे जयाची ॥३॥

कर्म अकर्मचा ताठा । न बाणेचि अंगी वोखटा । वाउग्या त्या चेष्टा । करीना कांहीं ॥४॥

शरण एका जनार्दनीं । तोचि एक ब्रह्माज्ञानी । तयाचे दरुशनीं । प्राणियासी उद्धार ॥५॥

२२८७

जप तप निष्ठा नेम । ऐसा साधिला दुर्गम ॥१॥

तरी ब्रह्माज्ञान नये हातां । क्रोध भरें अधिक चित्ता ॥२॥

ब्रह्माज्ञानाची प्रौढी । न घडेचि अर्थ घडी ॥३॥

एका जनार्दनीं शरण । कोठें नाहीं दुजेपण ॥४॥

२२८८

निरपेक्ष निर्द्वद तोचि ब्रह्माज्ञानी । नायकेचि कानीं परापवाद ॥१॥

सर्वदा सबाह्म अंतरीं शुचित्व । न देख न दावी महत्व जगीं वायां ॥२॥

एका जनार्दनीं पुर्णपणें धाला । शेजेचा मुरला रसीं उतरें ॥३॥

२२८९

येणेंचि आश्रमें साधती साधनें । तुटती बंधनें यमपाश ॥१॥

काया क्लेश न करणें व्रत तप दान । न लगे हवन तीर्थाटन ॥२॥

संतांचा सांगत गावें रामनाम । सुखें सुख विश्राम लाभे तुजसी ॥३॥

प्रपंच परमार्थ ऐक्य रुपें दोन्हीं । तोचि ब्रह्माज्ञानीं मनीं समजा ॥४॥

व्यापक तो जगीं व्यापुनीं निराळा । एका जनार्दनीं वेगळा सुखदुःखां ॥५॥

२२९०

भावना अभावना निमाली अंतरीं । वायां हावभरी नाहीं मन ॥१॥

कामक्रोध ज्याचे दमोनियां गेलें । इंद्रियें समरसलीं एकें ठायीं ॥२॥

एकपणें सर्व होऊनियां मेळा । रतलें गोपाळाचरणीं मन ॥३॥

तोचि ब्रह्माज्ञानी जगामाजीं धन्य । एका जनार्दनीं चरण वंदी ॥४॥

२२९१

भक्तीचे उदरीं जन्मलें ज्ञान । भक्तीनेंक ज्ञानासी दिधलें महिमान ॥१॥

भक्ति तें मुळ ज्ञान तें फळ । वैराग्य केवळ तेथीचें फुल ॥२॥

फुल फळ दोनी येरयेरा पाठीं । ज्ञान वैराग्य तेविं भक्तिचें पोटीं ॥३॥

भक्तिविण ज्ञान गिवसिती वेडे । मूळ नाहीं तेथें फळ केवी जोडे ॥४॥

भक्तियुक्त ज्ञान तेथें नाहीं पतन । भक्ति माता तया करितसें जतन ॥५॥

शुद्धभक्तिभाव तेथें तिष्ठे देव । ज्ञानासी तो ठाव सुख वस्तीसी ॥६॥

शुद्ध भाव तेथें भक्तियुक्त ज्ञान । तयाचेनी अंगें समाधी समाधान ॥७॥

एका जनार्दनीं शुद्ध भक्ति क्रिया । ब्रह्मज्ञान त्याच्या लागतसे पाया ॥८॥

२२९२

नित्य काळ जेथें नामाचा घोष । तेथें जगन्निवास लक्ष्मीसहित ॥१॥

ब्रह्माज्ञान तेथें लोळती अंगणीं । सेवुनी पायवणी घरी राहे ॥२॥

विष्णुदास तयाकडे न पाहाती फुका । नाम मुखीं देखा रामकृष्ण ॥३॥

एका जनार्दनीं ऐसा ज्याचा नेम । तया घरीं पुरुषोत्तम सदा वसे ॥४॥

२२९३

विष्णुदासा घरें ब्रह्माज्ञान लोळे । म्हणतसे बळें घ्या घ्या कोणी ॥१॥

आरुषे सावडे नाम मुखीं जया । ब्रह्माज्ञान तया विनवितसे ॥२॥

माझा अंगिकार करा संतजन । ऐसें ब्रह्माज्ञन कींव भाकी ॥३॥

एक जनार्दनीं संताचें चरणीं । होउनी दीन वदनीं कींव भाकी ॥४॥

२२९४

अर्थ तो विवाद ज्ञान ते उपाधी । आम्हां उघड समाधी नाममात्रें ॥१॥

हेंचि निरुपण उद्धवा श्रीकृष्ण । सांगतसे खुन जीवींची ते ॥२॥

स्तुति अथवा निंदा परस्त्री परधन । तेथें कदा मन घालुं नये ॥३॥

एका जनार्दनीं हेचि ब्रह्मज्ञान । यापरतें साधन आन नाहीं ॥४॥

२२९५

असोनि कुळींचा हीन । परी ज्यासी ब्रह्माज्ञानी । त्यासी तिन्हीं देवादि सुरगण । वंदिताती ॥१॥

त्याची मृत्युलोकीं सेवा । जयासी घडे सदैवा । मा ब्राह्मण भूदेवा । असंख्य पुण्य जोडे ॥२॥

तयासी वस्त्र अन्न । जठर करिती तृप्त जाण । त्यासी वैकुंठादि आंदण । देव देतो ॥३॥

त्यासी जो करी शीतळ । त्यासी पुण्य जोडे सकळ । एका जनार्दना केवळ । तोचि साधु ॥४॥

२२९६

बहु पुण्य होय गांठीं । तैच ऐशियाची भेटी । तयाचिये कृपादृष्टी । सहज ब्रह्मा लाभे मनुष्या ॥१॥

देही असोनि विदेहि । करुनी कर्म अकर्ते पाही । वैषम्याची नाहीं । वाटाघाटी तयांसी ॥२॥

देहीं कष्ट किंवा सुख । शीतौष्ण समान देख । वाउगाचि शोक । नाहीं जया मानसीं ॥३॥

तोचि जाणा ब्रह्माज्ञानी । वाया न बोले बोलोनि मौनी । लक्ष्मी सदा परध्यानीं । एका जनार्दनीं तो धन्य ॥४॥

२२९७

ब्रह्माज्ञानाचा क्षण । विचारी ज्याचें मन । त्याची महत्पापें जळोन । गेलीं स्वयें ॥१॥

गंगादि सप्त सागर । पुष्करादि तीर्थे अपार । व्रतादि पवित्र । पर्वकाळ जे ॥२॥

वेदशास्त्र पुराण । त्यासी घडलें श्रवण । अश्वमेधादिक यज्ञ । केलें जेणें ॥३॥

मेरुसमान सुवर्णीं । अनर्ध्य रत्‍न मेळवोनी । भरुनी दिधलीं मेदीनी । ब्रह्माणासी ॥४॥

कामधेनुच्या थाटीं । कल्पतरु कोट्यानकोटी । कौस्तुभादि सृष्टी । दिधली तेणें ॥५॥

अमृतासमान । तेणें दिधलें अन्न त्रैलोकींचे ब्राह्मण । तृप्त केलें ॥६॥

सत्य कैलास वैकुंठ । सत्य पाताळादि श्रेष्ठ । गरुडादि वरिष्ठ । दिधलीं वहनें ॥७॥

ऐसें एक क्षणें प्राप्त । ज्याचें सोहंध्यानीं चित्त । तयासी सुकृत । इतुकें जोडे ॥८॥

जो अहोरात्र मनीं । ब्रह्माज्ञानीं चिंतनीम । एका जनार्दनीं । तोचि वंदा ॥९॥

२२९८

ऐसें हें वचन ऐकोन । श्रीतीं केलासे प्रश्न । कैसें अपरोक्ष ज्ञान । सांगा मज ॥१॥

हा शब्द अलोलिक । श्रवणीं झालें सुख । मग जनार्दनाचा रंक । बोलता झाला ॥२॥

पंचभुतें तिन्हीं गुण । स्थुल सुक्ष्म कारण । हें अपरोक्ष अज्ञान । पंचीकरण ॥३॥

यासी तो जाणता साक्षित्वे देखतां । तोचि अपरोक्ष ज्ञाता । जाणावा पैं ॥४॥

सोहमाचा साक्षात्कार । एक जनार्दनीं निवडोनि साचार । वस्तुंचें घर । दाखविलें ॥५॥

२२९९

सदगुरु तोचि जाण । जो अपरोक्ष सांगे ज्ञान । देहत्रय निरसुन । परमपदीं ठेवी ॥१॥

जेणें देहत्रय निरसिलें । ज्ञान अग्नीमाजीं जाळिलें । अच्युतपद प्राप्त केलें । त्यासी वेळ नाहीं ॥२॥

निराकार निरामय । निर्भय तें अद्वय । तयामाजीं लिंगदेह । मरुनियां गेले ॥३॥

एका जनार्दनीं प्राप्ती । जैं लिंगदेहाची होय शांती । मग सायुज्यमुक्ति । पायां लागे ॥४॥

२३००

तरी सोहं नव्हे याग । सोहं नव्हे त्याग । आणि अष्टांग योग । सोहं नव्हे ॥१॥

सोहं नव्हे दान । सोहं नव्हे तीर्थ । मंत्रादि दीक्षित । सोहं नव्हें ॥२॥

सोहं नव्हे वारा । पंचभूतांचा पसारा । सोहंच्या विचारा । साधु जाणती ॥३॥

एका जनार्दनीं । आपण आपणासी जाणणें । साक्षित्व देखणें । तेंचि सोहं ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP