श्रावण व. अष्टमी

Shravana vadya Ashtami

* उमामहेश्‍वर व्रत

हे व्रत श्रावण व. अष्टमी दिवशी करतात. या दिवशी सायंकाळी उमामहेश्‍वराची पूजा करून एकभुक्‍त राहावे.

* कालाष्टमी

जर श्रावण व. अष्टमी दिवशी मृगशीर्ष नक्षत्र असेल तर शिवपूजन करून हे व्रत करावे.

* कृष्णजनाष्टमी

हे व्रत श्रावण व. अष्टमीला करतात. भगवान श्रीकृष्णांचा जन्म श्रावण व. अष्टमीला बुधवारी रोहिणी नक्षत्रावर मध्यरात्री चंद्र वृषभ राशीला असताना झाला म्हणून उपासक आपल्या हितासाठी हे व्रत करतात.

हे व्रत सर्वमान्य असून बाल, कुमार, तरुण, वृद्ध सर्व लोकांना, स्त्री-पुरुषांना करण्यास योग्य आहे. यामुळे पापनाश होऊन सुखाची वाढ होते. यासाठी अष्टमीचा उपवास व नवमीचे पारणे सोडल्यावर व्रत पूर्ण होते. व्रत करणार्‍याने उपवास करण्याच्या आदल्या दिवशी अंशमात्र जेवावे. रात्री व्रतस्थ असावे. उपवासादिवशी प्रात:स्नानादी नित्यकर्मे झाल्यावर सूर्य, सोम, यम, काल, संधी, भूत, पवन, दिक्पती, भूमी, आकाश, खेचर, अमर व ब्रह्म वगैरेंना नमस्कार करून पूर्व किंवा उत्तराभिमुख बसावे, हातात पाणी, फुले, गंध, फळे घेऊन

'ममाखिल पापपरशमनपुर्वक सर्वाभीष्टसिद्धये श्रीकृष्नजन्माष्टमीव्रतमहं करिश्ये'

असा संकल्प सोडावा. मध्याह् नीला स्नान करावे. घरात देवकीसाठी 'सूतिकागृह' ठरवावे. बाळंतपणासाठी जरूर त्या सर्व गोष्टी उपलब्ध करून ठेवाव्यात. शक्य असेल तर गाण्याबजावण्याचा कार्यक्रम ठेवावा. त्यातीलच एक सुखरूप ठिकाणी चांगला मऊ बिछाना घालून त्यावर अक्षतांनी मंडळ करून कलश स्थापावा व त्यावर सोने, चांदी, तांबा, पितळ, लाकूड अथवा माती याची मूर्ती अगर चित्र ठेवावे. चित्र वा मूर्ती जन्मलेल्या कृष्णाला स्तनपान करीत आहे व लक्ष्मी त्याच्या पायाला स्पर्श करीत आहे, असे असावे. यानंतर भगवान श्रीकृष्ण जन्माला आले, असे मानून आपल्या संप्रदायपद्धतीने अथवा वेदोक्‍त, पुराणोक्‍त विधीने यथोपचार प्रेमाने पूजा करावी. पूजेमध्ये देवकी, वसुदेव, वासुदेव, बलदेव, नंद, यशोदा व लक्ष्मी या सर्वांचा नामनिर्देश करावा. शेवटी '

प्रणमे देवजननीं त्वया जातस्तु वामन: । वसुदेवात्तथा कृष्णो नमस्तुभ्यं नमो नम: ॥ सपुत्रार्घ्यं प्रदत्तं मे गृहाणेनं नमोऽस्तुते ।'

या मंत्राने देवकीला अर्घ्य द्यावेत.

'धर्माय धर्मेश्‍वराय धर्मपतये धर्मसंभवाय गोविंदाय नमो नम: ।'

या मंत्राने श्रीकृष्णाला पुष्पांजली अर्पण करावी.

रात्रौ कथाकीर्तन, पुराण इ. कार्यक्रमांनी जागरण करतात. देवास फराळाचा नैवेद्य दाखवतात. आणि, नवमी दिवशी पंचोपचारे पूजा करून महानैवेद्य अर्पण करतात. मृत्तिकेच्या मूर्ती असल्यास त्या जलाशयात विसर्जन करतात. धातूच्या मूर्ती असल्यास देव्हार्‍यात ठेवतात किंवा ब्राह्मणास दान देतात. काही ठिकाणी दहीकाला होतो. फल - संतती, संपत्ती वैकुंठलोक यांची प्राप्ती.

* जयंतीव्रत

श्रावण व. अष्टमीला रोहिणिनक्षत्र आले असता हे व्रत करतात. यशोदा व कृष्ण ह्या व्रताच्या देवता होत. पंचपल्लवयुक्‍त कलशावर कृष्णाला स्तनपान देणार्‍या यशोदाची मूर्ती स्थापून तिच्या सन्निध चंद्र, रोहिणी यांच्याही मूर्ती बसवतात. मग त्याची पूजा करतात.

N/A

N/A
Last Updated : February 10, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP