मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|सार्थ श्रीएकनाथी भागवत|अध्याय सातवा|
श्लोक ३८ वा

एकनाथी भागवत - श्लोक ३८ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


शश्वत्परार्थसर्वेहः परार्थैकान्तसम्भवः ।

साधूः शिक्षेत भूभृत्तो नगशिष्यः परात्मताम् ॥३८॥

पृथ्वीपासोनि जाले । ते पर्वतही म्यां गुरु केले ।

त्यांपासोनि जें जें शिकलें । तेंही वहिलें परियेसीं ॥७८॥

रत्नादि निकर समस्त । पर्वत परार्थचि वाहत ।

तृण जळ नाना अर्थ । तेही परार्थ धरितसे ॥७९॥

कोणासी नेमी ना निवारी । उबगोनि न घाली बाहेरी ।

याचकाचे इच्छेवरी । परोपकारीं देतसे ॥३८०॥

ग्रीष्माअंतीं सर्व सरे । परी तो देतां मागें न सरे ।

सवेंचि भगवंते कीजे पुरें । वर्षोनि जळधरें समृद्धी ॥८१॥

जंव जंव उल्हासें दाता देतु । तंव तंव पुरवी जगन्नाथु ।

विकल्प न धरितां मनाआंतू । देता अच्युतु अनिवार ॥८२॥

सत्य अच्युत दाता । हें न मनेचि तत्त्वतां ।

यालागीं दरिद्रता । विकल्पवंता लागली ॥८३॥

एवं पर्वताची जे उत्पत्ती । ते परोपकारार्थ एकांतीं ।

उपकारावांचूनि चित्तीं । दुजी वृत्ति जाणेना ॥८४॥

त्या पर्वताऐसी तत्त्वतां । असावी साधकासी उदारता ।

काया वाचा आणि चित्ता । सर्वस्व देतां उल्हासु ॥८५॥

चेष्टामात्रें परोपकारता । सर्वदा करावी समस्तां ।

कोटिलाभा हाणोनि लाता । उपकारीं तत्त्वतां उद्यतु ॥८६॥

परमार्थाचिया चाडा । स्वार्थ सांडोनि रोकडा ।

परोपकारार्थ अवघडा । रिघे सांकडा परार्थें ॥८७॥

उपकारुचि साकारला । कीं परोपकारू रूपा आला ।

तैसा जन्मोनि उपकारी झाला । उपकारला सर्वांसी ॥८८॥

ऊंसु जैसा अवधारीं । सर्वासी गोडपणें उपकारी ।

तैसाचि योगिया संसारीं । परोपकारी मधुरत्वें ॥८९॥

जैसे पर्वतीं निर्झर । तैसे उपकाराचे पाझर ।

सुकों नेणती निरंतर । कृतोपकार जग केलें ॥३९०॥

सांडोनि कृपणवृत्तीची संगती । उपकारी पर्वत एकांतीं ।

राहिलासे उपकारमूर्ती । धैर्यवृत्ति निर्धारें ॥९१॥

परोपकारालागीं निश्चित । गुरु केला म्यां पर्वत ।

आतां वृक्षापासोनि जें शिक्षित । तेंही समस्त परियेसीं ॥९२॥

सर्वांगें सर्वभावेंसी । सर्वकाळ सर्वदेशीं ।

पराधीन होआवें सर्वांसी । हें वृक्षापाशीं शिकलों ॥९३॥

वृक्ष जेणें प्रतिपाळिला । तो त्या आधीन झाला ।

कां जो छेदावया रिघाला । त्याही झाला स्वाधीनु ॥९४॥

योगिया पालखीसी घातला । तेव्हां त्याचिया आधीन झाला ।

एकीं शूळीं द्यावया चालविला । तेव्हां त्याच्याही बोला आधीनु ॥९५॥

सांडूनि देहींची अहंता । योगियासी झाली पराधीनता ।

विश्वमाझारी आत्मा सर्वथा । सर्वांच्या वर्ततो बोलात ॥९६॥

सर्वं तें मीचि आहें । यालागीं साधक बाधक न पाहे ।

त्याच्या बोलामाजीं राहे । वर्तता होये संतोषें ॥९७॥

प्राप्त जें जें सुखदूःख । तें तें अदृष्टाआधीन देख ।

आत्मा मानुनी सकळ लोक । पराधीन देख वर्तत ॥९८॥

सकळ लोकीं निजात्मता । देखता जाली पराधीनता ।

हें वृक्षापासोनि तत्त्वतां । परार्थता शिकलों ॥९९॥

आणीक एक लक्षण । वृक्षापासोनि शिकलों जाण ।

अतिथीचें पूजाविधान । तें सावधन परियेसीं ॥४००॥

अतिथि आल्या वृक्षापासीं । वंचनार्थू न करीच त्यासी ।

पत्रपुष्पफळमूळच्छायेसीं । त्वचाकाष्ठांसी देतसे ॥१॥

जो वृक्षासी प्रतिपाळी । कां जो घावो घालूनि मुळीं ।

दोंहीसीही सममेळीं । पुष्पीं फळीं संतूष्टी ॥२॥

जैसा वृक्ष समूळ सगळा । अर्थियांलागीं सार्थक जाहला ।

तैसा चित्तें वित्तें देहें बोला । साधू संतुष्टला अर्थ्यांसी ॥३॥

अतिथीसी नव्हे पराङ्‍मुख । हा साधूसी गुण अलोलिक ।

अन्न धन उदक । यथासुखें देतसे ॥४॥

अर्थी आल्या अर्थावयासी । विमुख न व्हावें सर्वस्वेंसी ।

हें शिकलों वृक्षापासीं । विवेकेंसीं निजबुद्धीं ॥५॥

एवं पृथ्वी गुरु जाली ऐसी । दूजें गुरुत्व तें वायूसी ।

आलें जें जें युक्तीसी । तें तें परियेसीं नरदेवा ॥६॥

गुरुत्व जें वायूसी । तें दों प्रकारीं परियेसीं ।

एक तें प्राण वृत्तीसीं । बाह्यवायूसी दुसरें ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP