श्रीगणेशाय नमः ॥

जे जैशीं कर्मे आचरती । तदनुसार फळें भोगिती । निमित्तमात्र भूपती । त्याजकडे दोष नाहीं ॥१॥
असो पंचमाध्यायीं संपली कथा । प्रायश्चित्त चिमणाजी रघुनाथा । देऊनियां पुन्हा मागुता । बाजीराव जे स्थापिले ॥२॥
आतां येथूनियां बंडप्रकरण । श्रोते परिसा सावधान । कैसें पृथ्वीचें लुटणं । जाहलें ऐका चतुराहो ॥३॥
पूर्वीं भाकीत होते जाणत जोशी । कीं पुढें येईल रुद्रवंशी । काळ पडेल दक्षिण देशीं । बर्णसंकर होईल ॥४॥
राज्यांत माजेल धुमाळी । घरोघर आपल्या होतील बळी । बळी तोच कानपिळी । महा अनर्थ होईल ॥५॥
पाळणें लागतील डोंगरीं । मनुष्यें पळतील गिरीकंदरीं । विसा पंचविसा कोसावरी । वस्तीलागीं एक ग्राम ॥६॥
सहस्त्र घरांची वस्ती जेथें । दहा पांच घरें राहतील तेथें । खून पडावे मार्गपंथें । तें तें आलें अनुभवा ॥७॥
डोंगरावरी लागेल दिवा । गांवांत भुंकतील भालुवा । हें आवडेल महादेवा । रुद्रवंशीं लागतांची ॥८॥
बंड मनुष्यें आणील बाजा । मार देतील टाकून बाजा । दक्षिण देशीं मरेल राजा । क्षेत्रभंग होईल ॥९॥
याला जो असत्य म्हणेल कोणी । मग मी करीन त्याची पुरवणी । तरीच हा जोशी चिंतामणी । हें वाक्य माझें सत्य जाणा ॥१०॥
हीं जोशाचीं ढंग मतें । असत्य भासत होतीं आपणातें । म्हणे हे भिकारी मागते । कुणबटातें ज्ञान कैचें ॥११॥
रांजण साठवेल गाडग्यांत । धनगाढे रहातील रांगडयांत । जेवणार जे कां वाडर्‍यांत । प्राप्त त्यां ताटवाटया ॥१२॥
जें जें कथिलें वाल्मीकें । तें सत्य केलें रघुनायकें । तैशीं ह्या जोशाचीं वाक्यें । ह्या बंडलोकीं सत्य केलीं ॥१३॥
असो पुढें बंडाला आरंभ झाला । जोही ज्याच्या गृहांत गेला । घरधनीच होउनी उभा ठेला । यजमान जैसा तस्कर ॥१४॥
ज्यास जी वस्तु आवडावी । तितकी त्याणें सावडावी । मना जे न आवडावी । ते ठेवावी घरधन्यास ॥१५॥
दह्यातुपाचीं चारूळीं । भक्षुनी भरावी थारोळीं । घरधनी मारितां आरोळी । आधीं त्याजला चोपावें ॥१६॥
मग त्याची गृहस्वामिणी । करीत भोंवती शंखध्वनी । तों तिची बांधोनियां वेणी । मार देती फरमासी ॥१७॥
लावूनियां दरवाजा । यथासांग घालिती पूजा । तेथें ईश्वराखेरीज दूजा । कोण त्याला वांचवी ॥१८॥
हरतर्‍हेचे मार द्यावे । तावूनियां तप्त तवे । मोठमोठाले नरवरी नवे । उभे करावे त्यावरी ॥१९॥
एक मस्तकीं एक तळी । चाबकानीं झळाळी । उष्ण वरती तळतळी । हस्त सकळी मारावया ॥२०॥
कर्ण घ्राणीं दारु भरिती । वरुनि बत्ती लाविती । तिळमात्र दया नुपजे चित्तीं । शिवाय कुरघोडया वेगळ्या ॥२१॥
शेंदोनशांस करावे ओणवे । उडून त्यांवरी बैसावें । राख मिर्ची घालूनी द्यावे । तोबरे मुखीं घोडयांच्या ॥२२॥
अशक्ताची करावी घोडी । वर बसवावा जड गडी । स्वस्थपणें ओढीत गुरगुडी । तोंड झोडी चाबकानें ॥२३॥
चराठांची सरासरी । त्याची करावी गळसरी । मग तो डोळे वटारी । प्राण जाऊं पाहतो ॥२४॥
खटमार म्हणजे जगविख्यात । वरकड मार त्याचे आश्रित । ही टूम ईश्वरें अनुश्रुत । कोठुनि काढिली कळेना ॥२५॥
इंद्रियातें बांधोनि दोरी । उचलूनी त्याचे तराजू करी । एक येतां जातां मारी । कोठवरी सोसाव्या यातना ॥२६॥
कांकडे घेऊनियां आपुले हातीं । समग्र दाढी मिशा जाळिती । एक मोचा सुद्धां हाणिती । मुखावरी ब्राह्मणाच्या ॥२७॥
मुखावाटे बाहे रुधिर । तों पुन्हा मारिती वारंवार । आरडताती जैसे ढोर । हे उपचार शरीराचे ॥२८॥
पायांस बांधावीं चर्‍हाटें । झाडाशीं टांगिती उफराटे । मग ते ब्राह्मण अथवा मराठे । कोण तेथें निवडितो ॥२९॥
फकीर मानभाव संन्यासी । अतीत गोसावी तापसी । त्यांस हे पापी अभक्तरासी । मार मनस्वी देताती ॥३०॥
अग्निहोत्री यांच्या यज्ञकुंडीं । कोपोनि रांधिती अजामुंडीं । होमशाळेमाजी धुंडी । घरधनी कोठें धराहो ॥३१॥
कोण कोणचा प्राण वधी । याची दाद ना फिर्यादी । असंख्यात अमर्यादी । रीत स्वल्पी नाटळे ॥३२॥
घरांत बसतां उपद्रव वरी । बाहेर निघतां मलता धरी । जेऊं न घाली मातोश्री । पिता भिक्षा न मागूंदे ॥३३॥
पीक पाणी यावें रंगा । म्हणजे चारावें तुरंगा । रयव गेली भवगंगा । केवढा दंगा ओढवला ॥३४॥
घरदार लुटावें सर्वपरी । घरधनीच धरावा बिगारी । बायका मुलें लहान थोरी । बिगार अवघ्यांनीं पोंचवावी ॥३५॥
घरें लुटुनिया बिगारी न्यावे । मुक्कामीं झाडाशीं बांधावे आणिकही त्याजला पुसावें । दौलत कोठें दाखबा ॥३६॥
मग ते बोलती दीनवदन । दौलत आणिली आपण । आतां आमुचें प्राण । मस्तकें ठेविती पायांवरी ॥३७॥
तईच मस्तकें धरुनी त्यांनीं । आपटीत असावे मेदिनीं । हायहाय म्हणोनी । प्राण जाती कैकांचे ॥३८॥
तत्रापी त्याला न सोडिती । राहिले त्यांसहीं तोडिती । माकडहाडें मोडिती । कुठार जैशी काष्‍ठावरी ॥३९॥
ओलें जैसें पिरगळावे । तैसे मनुष्य धरुनी मुरळगावे । गळ्यांत बांधोनिया दावें । ओढावें जैसे मेंढूरुं ॥४०॥
एक नाशिक पिरगाळिती । एक उगेंच गालोरे घेती । एक उडूनियां बैसती । घोडयापरी माणसावरी ॥४१॥
एक म्हणती आमुचा घोडा । मोडयाचिया माकडहाडां । लुटोनी आणिला ज्याचा वाडा । त्याच्या अपेष्‍टा ह्या केल्या ॥४२॥
ऐसा बंढाचा उपद्रव । व्याघ्यास पातलें वैभव । मग ते तृणप्राय सर्व । गर्वमदें व्यापिलेती ॥४३॥
कोणी कोणातें न ओळखती । ज्यास द्यावें त्यास न देती । न द्यावें त्याचे दारीं हत्ती । बळेंच नेवोनि बांधावा ॥४४॥
समय पातला उफराटा । ज्याचे सदनीं सुवर्णसाठा । त्याला अदपाव पिठाचा तोटा । दोन प्रहराची भ्रांती त्याला ॥४५॥
लुटीचीं वस्त्रें अपरिमित । महारपोरग्यांस झालीं प्राप्त । परंतु पांघरावयाची पूत । काय त्याला ठाऊकी ॥४६॥
मस्तकीं गुंडाळिती पितांबर । लुगडेंच पांघरती वेडे पीर । बायकांचे अलंकार । गळ्यांत घालावे आपुल्या ॥४७॥
हार पुतळ्यांचे घालिती गळां । भाषेंत आपुल्या सांगे सकळां । कांहीं आहेत सुनेच्या माळा । दुसर्‍या लेइल्या दुल्लडी ॥४८॥
ऐसीं अर्भकें उत्पन्न झालीं । त्यांनींच ही पृथ्वी लुटिली । दीनवदनें मनुष्यें केलीं । घरोघर भिकारी जाहले ॥४९॥
रकटें ज्यांनीं पांघरावें । एकदांच त्यांचीं उपटली दैवें । शालजोडींत पर्ण बांधावें । मोट जैशी चवाळ्याचीं ॥५०॥
दोदो लक्षांचा एक वाडा । त्याच्या फोडोनियां कवाडा । मोकळा अवघा पिछवाडा । मंदिरांत लोळती उंदीर ॥५१॥
मोठमोठालीं देवालयें । चांगलीं राहूं देऊं नये । छिन्न भिन्न करावे हातपाय । कर्णघ्राणें फांडांवीं ॥५२॥
कोटयाधिपती संभावित । मार मारु भरावें भोत । बताव ऐसे बोलतात । तोंडांत घालिती बोकणे ॥५३॥
जरी कोटयावधी दिधलें द्रव्य । तरी बताव ऐसी राहूं नये । आणीकही दाखवा कोठें आहे । बताव कांहीं नसरेची ॥५४॥
मग बताव त्याची सरावी केव्हां । प्राण त्याचा जाईल जेव्हां । द्रव्य नाहींसें समजावें तेव्हां । असतें तरी कां मरतेहो ॥५५॥
कोलदांडे घालुनियां एकसरी । झांडांसी टांकिताति हारोहारी । जळत काष्‍ठें घालिती शिरीं । मांस तोडती सांडशानें ॥५६॥
दुधारी ठेवावी वक्षस्थळीं । एक उगाच बोटें मुरगाळीं । एक नाकपुडी पिरगाळी । एक निपसितो दाढीमिशा ॥५७॥
एकदांची धरुनिया शेंदोनशें । बळदात कोंडावीं माणसें । पुनः त्यांचें स्मरणही नसे । जीवंत किंवा मेले ते ॥५८॥
जरी भिकारी लागला हातीं । त्यास बिगारी खालीं मारिताती । जिकडे जातो तिकडे नेती । ओझें मनस्वी लादावें ॥५९॥
जी जी वस्तु सांपडावी । ती ती बिगारियापाशीं द्यावी । मनस्वी ओझ्यानें मूर्च्छना यावी । वरुनियां यानें बडवावें ॥६०॥
म्हणे दिसतोसी तरणातठा । असा तर तू नेशील चार मोटा । मग सोबत्यास म्हणे तुमच्याही गांठा । टाका आमुच्या तट्टावरी ॥६१॥
तो बिगारी कैसा वांचवा । पुनः गृहातें न यावा । मग तो गेलिया गांवा । ऐसे ही मेले लक्षावधीं ॥६२॥
कैसेही शक्तिवान्‌ असेल मनुज । तें शक्तिनुसार उचलील ओझें पहीलवान मस्तकीं सहज । गज कैसा घेईल ॥६३॥
पोहणार नेला समुद्रतीरीं । म्हणे परत जाउनि ये माघारी । लक्ष मनुष्याचें अन्न पात्रीं । बलिष्‍ठ तेथें काय करी ॥६४॥
तैसा वजन बिगारी एक मण । मस्तकीं खंडीचें सामान । तो कैसाही झाला बलसंपन्न । तरी गाडगाभर ओझें कां घेईल ॥६५॥
असो पुरुषाची जेव्हा ऐशी दशा । मग ठेविल्या असतील स्त्रिया कैशा । मनास ज्याच्या आवडेल जैशा । त्यानें तशा भोगाव्या ॥६६॥
चांगल्या अथवा ओंगळी । ज्यास जी मिळे क्षुधाकाळीं । तोच तिला कवटाळी । भ्रताराचे सन्मुख ॥६७॥
तो अविचार सांगतां यथायुक्त । दोष घडेल आणि वाढेल ग्रंथ । हे अविचाराचे पर्वत । कोठवरी सांगावे ॥६८॥
असो श्रीमाधव जातां देवभेटी । बंडें भ्रष्‍ट केली बहुधा सृष्‍टी । पुढें दुष्काळही त्याचेच पोटीं । बंडानिमित्त जाहला ॥६९॥
अन्न न मिळे मनुष्यातें । कोटयावधी पडलीं प्रेतें । जननी आपुलिया बाळकांतें । हिरवेंच लागे भक्षावया ॥७०॥
वृक्षास नराहे एकपर्ण । मग अपक्व राहतील कोठून । सोतरोठे बरबडे भक्षून । तरी वाचले नाहींत ॥७१॥
वृषभ धेनु सूकर श्‍वानें । मज्र मंडूक गणपतीवाहनें । सर्वही भक्षिले भिकार्‍यानें । शेंवटीं प्राण गेलेहो ॥७२॥
असंख्यात पर्वताचे पर्वत । बिदोबिदीं शिरें लोळत । काक घारी श्‍वान बहुत । प्रेतालागीं तुडविती ॥७३॥
असें जें भक्षूं नये तें भक्षिलें । शेवटीं ईश्वरीं उपेक्षिलें । त्यांतून चवथाई रक्षिलें । तीन हिस्से गतप्राण ॥७४॥
हातानें तोलावें सुवर्ण । धान्य मोजावें ताजव्यानें । अच्छेर दीडपाव दाणे । रुपयाचे तेही न मिळे ॥७५॥
अन्नावांचून चालले प्राण । लोक जाहले ते निर्धन । मायांच्या गळां मिठी घालून । मुलें बाळें आक्रंदती ॥७६॥
अन्नाकरितां प्राण गेले । अधम कैचे रस्त्यांत मेले । तेथें भिकारी अवतरले । त्या प्रेताला भक्षावया ॥७७॥
जैसे दाणे काढिती कणसाचे । मग काय प्रयोजन विटोरियाचें । तैसें मांस रक्त भक्षावें त्याचे । सांपळे हाडाचे लोळती ॥७८॥
तें मांस ज्यानें भक्षिलें सवेंचि त्याचे प्राण गेले । असो ऐसे लक्षानुलक्ष मेले । गणीत कोणा न करवे ॥७९॥
कोणी गृहस्थ ठेवावा चाकरी । तो आधीं चोरुनि भक्षितो भाकरी । इतकी धान्याची अखेरी । कधीं पाहिली न ऐकिली ॥८०॥
स्त्री पाहातसे भ्रताराचे मढें । तिच्याही न पाहवे पोटाकडे । तान्हे लेंकरुही न घेववे कडे । त्याचीही आस्था सोडिली ॥८१॥
कोण प्रेताला ओढितो । येथें अवघ्यांचा प्राण जातो । कोण कोणाचा समाचार घेतो । यांत वाचतो कोणता ॥८२॥
सरीं सर्वत्रलागी जाणा । एकसारख्याची वेदना । धन्याढयासि मिळे दाणा । मग धिर्नन कैसा वाचतो ॥८३॥
प्रताप असतो यत्किंचित । परंतु कवीचा लाघव बहुत । तैसा येथें अनर्थ अत्यद्बुत । कवीनें यत्किंचित वर्णिलें ॥८४॥
महाअभिमानी देखण्या नारी । त्या घरोघर लागल्या दाण्यावरी । घरधनी वरुनी काठया मारी । मग अभिमान कोठें राहिला ॥८५॥
बंड आणि महर्ग तेचा संयोग । या उभयतांचा घडतां योग । प्रळय झाला यथासांग रुसावयाला जागा न ठेविली ॥८६॥
स्वामीचा जे घात योजिती । शेवट त्याच्या ऐशा गती । सत्क्रियेशी न जागती । ते अधोगती मरताकी ॥८७॥
यांतील अर्थ जो घेईल कवी । तो पुढें कविता करील नवी । ही हकीकत नसे ठावी । अनंतफंदी वेगळी ॥८८॥
शुद्ध अशुद्ध या माधवग्रंथीं । कल्पना न घ्यावी पंडिती । हा ग्रंथ थोरथोरांप्रती । बखर केली असे ॥८९॥
यांत अवघे राज्यकारण संपूर्ण केलें निवेदन । कळो एकें वर्तमान । येथूनी झालें समाप्त ॥९०॥
आतां पुढें समग्र दुनियां । आरंभ होईल लुटावया । प्राणिमात्रास नुपजे दया कठीण । ह्रदय होतील ॥९१॥
आनंतफंदीच्या कवीवर छंदे । मर्मज्ञ डोलती परमानंदें । पुडें कंपूवयमाण वदे । उजाड पृथ्वी करतील ॥९२॥
इति श्रीमाधवग्रंथ अनुश्रुत । कैसें झालें अत्यभ्दुत । तें परिसोत श्रोते पंडित । षष्‍ठोध्याय गोड हा ॥९३॥

इति माधव ग्रंथ समाप्त.


References : N/A
Last Updated : December 24, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP