माधवाख्यान - द्वितीयोध्याय

अनंत फंदीने लावणीइतकाच आख्यान प्रकारही तितक्याच प्रभावीपणे लिहीला.


श्रीगणेशाय नमः ।

गादी ज्यास प्राप्त असे । तो प्रभु विष्णूचाच अंश । श्रीमाधवराव सद्‌वंश । निःसंशय जाणपां ॥१॥
गोब्राम्हणप्रतिपाळक । पुण्यश्लोकी वय बाळक । शत्रु वधूनि जयसी बाळक । धर्में राज्य चालविलें ॥२॥
गेलें सर्वत्रांचें जीवन । काय जाहलें जाणें कवण । कैसें दुग्धांत पडिलें लवण । तो मन पवन गेला हो ॥३॥
असो प्रथमोध्यायीं कथा । बाजी व चिमणाजी रघुनाथा । भाऊंनीं आणुनि उभयतां । पुलाजवळी ठेविलें ॥४॥
नानांच्या व श्रीमंतांच्या । भेटी जाहल्या उभयतांच्या । पुलाजवळी खडकीच्या । एकमेकां भेटले ॥५॥
त्या पुलाजवळी ठेविलीं मुलें । मग नाना पुण्यांत प्रवेशले । पुढें कवतुक काय केलें । नाना फडणीसें तेधवां ॥६॥
म्हणे दोचौ रोजामाजीं । वाडयांत आणावे आपा व बाजी । पर्वतीस न्यावें दर्शनाकाजी । तेथें तर्‍हा दुसरी योजावी ॥७॥
दर्शनास न्यावे पर्वतीकडे । बाजीरायास चालवावें पुढें । आपासाहेब मागें सडे । येऊं द्यावें मुकाटया ॥८॥
सिंहगडास न्यावे रावबाजी । मागें वाडयांत आणावे चिमणाजी । ही मसलत उभयतांमाजी । बाजी व आपातें समजली ॥९॥
मग दोघे बंधु चिंताक्रांत । आतां कैसी करावी मसलत । शिंद्यास कळवावा वृत्तांत । तो हें विघ्न वारील ॥१०॥
तेव्हां शिंदे पुण्यास नवते । दवलतराव जामगांवीं होते । बातमी कळविली राघवसुतें रायाजी पाटलाकडुनियां ॥११॥
कीं हाकाट केला बाळाजी जनार्दनानें । त्यास वाडयांत आमचे उभयतांचें जाणें ।
न होय ऐसी युक्ति करणें । शिंद्यास वकिलांनीं सुचविलें ॥१२॥
कीं रावबाजीस किल्ला प्राप्त । राज्यधिकारा चिमणाजीरघुनाथ । ऐसी समजतां नानांची मसलत । तप्त शिंदा जाहला ॥१३॥
ऐसे समजतां तत्क्षणीं । दवलतरायें वकिलास बोलाऊनी । कीं नानाशीं सांगावें निक्षूनी । वाडयांत मुलें न आणावीं ॥१४॥
श्रीमंतांच्या व आमुच्या । भेटी होतील सर्वत्रांच्या । मग तुमच्या आमुच्या व धन्यांच्या । विचारें घडेल तैसें करुं ॥१५॥
मध्यें एकादी गडबड कांहीं । केली तो कार्यास पडणार नाहीं । ऐसें सांगतां वकिलांही । हिरमोड झाला नानाचा ॥१६॥
ह्मणे जी जी करावी मसलत । साध्य तितुकी असाध्यची होत । नदी उतरोनियां समस्त । कांठाजवळी कां बुडावें ॥१७॥
चांगला ह्मणुनी घेतला पाच । शेवटीं तो कां निवडावा कांच । प्रवासाहुनि घरीं येतांच । वेशींत चोरें नागविलें ॥१८॥
तैसें जाहलें मजलागुनी । राज्यास योजित होतो धनी । शिंद्याच्या कां न यावें मनीं । ह्मणुनि नाना दिलगीर ॥१९॥
असो ते दिवशीं दोघांचे अरिष्‍ट । गजाननें टाळिलें स्पष्‍ट । दादाचें पुण्य उत्कृष्‍ट । म्हणुनि विघ्नें वितळलीं ॥२०॥
तशांत दो चौरामाझारी । शिंदे पुण्यास येणार झडकरी । नाना म्हणे शिंदा आल्यावरी । अबरु कैसी थांबेल ॥२१॥
मग बाजीरघुनाथा लवलाह्या । नाना गेले भेटावया । मिठी घालोनियां पायां । श्रीमंताशीं बोलतसे ॥२२॥
शिंद्यांची मर्जी बुडवावें आम्हां । म्हणुनि प्रार्थना करितों तुम्हां । आतां स्वामींनीं करावी क्षमा । अपराधी जरी असलों मी ॥२३॥
आपुला सेवक अपराधी । तो आपणचि वधावा आधीं । स्वामीचा अपराधी दुसरा वधी । ऐसें सहसा न करावें ॥२४॥
ऐकूनि नानाची विज्ञापना । द्रव आला बाजीरघुनंदना । पूर्वींचे तुमचे उपकार नाना । तुम्हांस कैसे नाठवती ॥२५॥
दादासाहेबास तुम्ही जाणा । पीडा केली बहुतेक नाना । सुरतेहुति आणिलें गंगास्नाना । नंतर दादा वारले ॥२६॥
दादा गेले कैलासांतरीं । दहनाची रक्षा तैसीच गंगेवरी । तों कैद केलें लवकरीं । तुम्हीं आम्हां तिघांतें ॥२७॥
तोफखाना आणि वगैरे । लुटूनी घेतलें खटलें सारें । चौक्या जामदारखान्यावरे । नाना तुम्ही बसविल्या ॥२८॥
पुढें काळें करुनी पाहीं । शांत जाहली आनंदीबाई । माधवराव मरते सम नाना तुम्हासी बोलिले ॥२९॥
कीं बाजीराव भेटवा मातें । पण तुम्हीं धिक्कारिलें त्यातें । भेट न केली उभयतांतें । ऐसे तुमचे कृतोपकार ॥३०॥
श्रीमाधवराव मेल्यावर । दत्तची घ्यावा हिया थोर । परंतु या वंशाशीं नमस्कार । करावयाचा नाहीं मला ॥३१॥
मग नानाशीं म्हणे राघवकुमर । चिरंजीव मी थोराचा थोर । शरण आल्यास वांचविणार । मम शत्रू तरी असेना कां ॥३२॥
म्हणे दादासाहेबाशीं याशीं । हाडवैर होतें अहर्निशीं । आतां तें दुःख न आणोनी मानसीं । आधीं नानास वांचवावें ॥३३॥
मग नानाशीं म्हणे बाजीराव । शिंद्यांचें बाळगूं नका भय । मी असतां करणार काय । तुम्हांस धक्का लागों न दे ॥३४॥
लोह जरी परिसावरी । आदळूनियां ताडिला जरी । तरी तो लोहाचें सुवर्णची करी । स्वभाव गुण न टाकी ॥३५॥
कुठार घातली मैलागिरीवरी । राय राय तुकडे केले जरी । तरी त्याचा सुवास दिगंतरीं । स्वभाव गुण न टाकी ॥३६॥
सज्जनास भेटला दुर्जन । तो कसेंही करी त्याचें छळण । परी दुर्जनाचेंच इच्छी कल्याण । स्वभावगुण न टाकी ॥३७॥
कागदीं बांधूनि कस्तुरीचे पुडे । फेंकूनि दिधले एकीकडे । तरी त्यांचा सुवास लोपे ऐसें न घडे । स्वभावगुण न टाकी ॥३८॥
तैसे तुम्हीं मला साहेबदादा । मी तुमचें वाईट न करी कदां । मजपुढें काय करितो शिंदा । तीनदां किती सांगावें ॥३९॥
ऐसीं ऐकुनी प्रभूचें मृदुवचन । नानास वाटलें समाधान । म्हणे स्वामींनीं माझे अवगुण । उदाराब्धींत सांठविले ॥४०॥
म्हणें म्यां बहुतेक दिधलीं दुःखें । त्या विठ्‌ठलसुंदरांतकें । परंतु त्या प्रभूनें सोसूनि तितुकें । दादासमान मज लेखिलें ॥४१॥
पुढें कथा याहून सुरस । सातार्‍यास जातील नाना फडणीस । धोंडीबा बाळोबा पागनीस । श्रीमंताशीं एकांत करतील ॥४२॥
हें कथानक राघवपुत्रें । आपुल्या स्वहस्तें लिहिलीं पत्रें । त्या पत्रावरुनि हीं चरित्रें । कवीनें कविता केली असे ॥४३॥
यांत पदरचें नाहीं यर्त्किचित । बाजी रघुनाय साक्षभूत । टीका केली प्राकृत । लहान थोरांस समजावया ॥४४॥
पूर्वीं पांडवांच्या ख्याती । राजा रजवाडयांच्या किताबती । दामाजीपंताच्या बखरा वाचिती । ह्या पुढें तैशाच होतील ॥४५॥
ज्या ज्या कथा जाहल्या जितुक्या । त्या त्या कवीनें वर्णिल्या त्तितुक्या ।
पुढें आणीक होतील तितुक्या । अनंतफंदी मुखें ऐकाव्या ॥४६॥
स्वस्ति श्रीमाधवकवन सुंदर । संमत बाजी रघुनाथपत्राधार । श्रोते परिसोत पंडित चतुर । द्वितीयोध्याय गोड हा ॥४७॥

N/A

References : N/A
Last Updated : December 24, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP