मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय १९ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय १९ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
श्रीजगदीश परात्पर ॥ जो चैतन्यमायेचें पैलतीर ॥ हरिहरांस न कळे पार ॥ तो सर्वेश्वर श्रीकृष्ण ॥१॥
जाहला सगुण परी निर्गुण ॥ दावी गुण गुणातीत जाण ॥ जन्मला परी अजन्मा पूर्ण ॥ गुप्त असोनि प्रगट दिसे ॥२॥
अकुळीच कुळवंत म्हणती ॥ स्वयंभास गर्भसंभूती ॥ अरुपाचें रुप वर्णिती ॥ श्याम सुंदर मनोहर ॥३॥
निर्नामासी नाम ॥ प्रगट म्हणती मेघश्याम ॥ निष्कामासी अनेक कर्म ॥ कर्ता म्हणती लौकिकीं ॥४॥
ऐसा माझा जगदीश ॥ नटला मायिक श्रीकृष्णवेष ॥ जयाचा पाहतां विलास ॥ टक पडे ब्रह्मादिकां ॥५॥
बाळपणीं राक्षसी पूतना ॥ मारुं आली जगज्जीवना ॥ तिचिया शोषून स्तना ॥ केली निर्मुक्त संसारीं ॥६॥
अनेक दैत्य अतुरबळी ॥ त्यांस वधिलें खेळतां गोकुळीं ॥ नामें सांगतां पाल्हाळी ॥ ग्रंथ जाईल विस्तारा ॥७॥
अनेक कौतुकाची चरित्रें ॥ निर्माण केलीं हो स्वतंत्रें ॥ न पाहेच पात्रापांत्रे ॥ खाय लोणी गौळियांचें ॥८॥
नाहीं यातीचा अभिमान ॥ सांडून आपुलें ईश्वरपण ॥ गाई वत्सें मेळवून ॥ चारी वनाभीतरीं ॥९॥
चिपडीं बोडकीं गुराखी मुलें ॥ त्याचे अंगावरी लोळे ॥ भाकरीचे चुरोनि गोळे ॥ ओवळ्या अंगें भक्षीत ॥१०॥
पंचपात्र कैचें तेथें ॥ होटें शोषिती पाण्यातें ॥ उदरावरील उच्छिष्ट हातें ॥ पुसोनि टाकिती टिरीसी ॥११॥
नाहीं विधिनिषेधांची चाड ॥ एकत्र खाती अवघे उघड ॥ मुखीं लाळ नासिकीं शेंबुड ॥ मणगटें घासुनी सांडिती ॥१२॥
जो कां इंद्रादिकां दुर्लभ ॥ तो गोपाळासी जाहला सुलभ ॥ ब्रह्मस्वरुपाचा निजकोंभ ॥ वळत्या करी गाईच्या ॥१३॥
थोर भाग्याचा उदय जाहला ॥ गौळ्या घरीं जगदीश प्रगटला ॥ इतर यातींत काय दुकाळ पडला ॥ ब्राह्मणादिक पवित्र ॥१४॥
चौवर्णांत श्रेष्ठ ब्राह्मण ॥ त्याचे वंशी जन्मला नाहीं नारायण ॥ अथवा पवित्र तपोधन ॥ त्यांसी कांहो त्यागिलें ॥१५॥
यातीनें शुद्र गौळी गुराखे ॥ तेथेंचि धरिला भाव हरिखें ॥ मळिण गौळणीचें घरीं सुखें ॥ लोळे त्यांचे वोसंगीं ॥१६॥
जो अमृतपानीं विटे ॥ तौ गौळणीची स्तन उच्छिष्टें ॥ चोखी झाडी गाईचे गोठे ॥ चोज वाटे शिवासी ॥१७॥
नाहीं स्नानसंध्या शास्त्र ॥ त्या गौळियांसी केलें पवित्र ॥ ऐसें देवाचें लाघव चरित्र ॥ त्याचें सूत्र तो जाणें ॥१८॥
व्यासासारिखा श्रेष्ठ ऋषी ॥ देवासारिखें सामर्थ्य ज्यासी ॥ त्यासी जन्म ढिवरीवंशी ॥ व्यभिचारें विपरीत ॥१९॥
नव्हती काय दुसरी जागा ॥ व्यास जन्मावया सांगा ॥ कीं व्यभिचारकर्मी उगा ॥ जन्म घेतला पवित्रें ॥२०॥
हें ईश्वराचें विंदान ॥ नाहीं तेंचि दावी निर्मून ॥ कोणी धरील जातीचा अभिमान ॥ त्याचा परिहार करावया ॥२१॥
अवधीं पंचभूतांचीं मडकीं ॥ निर्माण केली देवें कौतुकीं ॥ त्यांत पवित्रापवित्र निवड लटकीं ॥ अविवेकें अज्ञान ॥२२॥
सकळ जीवांची एक रास ॥ त्याचा विस्तारला हा विलास ॥ उंच नीच यातीचा भास ॥ वेदशास्त्रें लाविला ॥२३॥
ब्राह्मणांस इतरीं स्पर्शतां ॥ मानी विटाळाची बाधकता ॥ परी परिणामीं पहातां ॥ काय त्याचें विटाळलें ॥२४॥
आहार निद्रा मैथुन ॥ सर्वां भूतीं समसमान ॥ त्यांत ज्ञानमात्र भिन्न ॥ अधिक न्यून असे कीं ॥२५॥
अहो ज्ञानाचे ठायीं ॥ समसाम्यता तंव नाहीं ॥ म्हणोन देखणें तें पाहीं ॥ भिन्न पडें स्वभावें ॥२६॥
जितुकें ज्ञान जयामाजी ॥ तितुकी करी आपुली वाजी ॥ परंतु मोक्षाचें साम्राज्यीं ॥ केवीं बैसे परिणामी ॥२७॥
पाहिजे ईश्वरीं जिव्हाळा ॥ दिव्यचक्षु ज्ञानकळा ॥ तरी मोक्षाचा सोहळा ॥ प्राप्त होय निजभक्तां ॥२८॥
निजभक्त म्हणावें कवणासी ॥ मुख्य भजती परमेश्वरासी ॥ अनन्यभावें स्वरुपासी ॥ उपासिती निजनिष्ठें ॥२९॥
त्यजूनि ब्रह्मादिकांचे सन्मान ॥ लंघोनियां स्वर्गभुवन ॥ जाती मोक्षग्रामीं रिघोन ॥ तयांसी नमन पैं माझें ॥३०॥
जे मोक्षमार्गीचे अधिकारी ॥ सदैव भजती ईश्वरीं ॥ तयां भक्तांच्या चरणांवरी मस्तक ठेवी सहस्त्रदां ॥३१॥
ज्यानीं परमेश्वराकारण ॥ त्यजिला देहींचा अभिमान ॥ विषयभोग मानूनि वमन ॥ सांडिला लौकिक पदार्थ ॥३२॥
सांडोनि संसारधंदा ॥ जे रत जाहले सदा गोविंदा ॥ भोगिती देहीं थोर आपदा ॥ परमेश्वराकारणें ॥३३॥
त्या गुणउपाधीक बंड ॥ सोडून सन्मानाची चाड ॥ अंतरीं जगदीश भजन दृढ ॥ बाहेर उघड हिंडती ॥३४॥
लात मारुनि राज्यावरी ॥ मुक्तिसाठीं जाहलें भिकारी ॥ त्यांच्या निजभाग्याची थोरी ॥ ये वैखरी वदवेना ॥३५॥
दिसती संसारिक थोर ॥ परी ते मोक्षसुखापुढें किंकर ॥ प्रपंची साधु दिसे दरिद्र ॥ परंतु मोक्षपदीचे राजे ते ॥३६॥
या प्रपंची मानावें सुख ॥ तें तव नाशिवंत देख ॥ मोक्षसुखापुढें जो हरिख ॥ तो अविनाश अक्षयीं ॥३७॥
मोक्ष आणि संसारसुखासी ॥ खद्योतभानुवत् अंतर त्यांसी ॥ ऐरावत आणि म्हैशासी ॥ केवीं समता येईल ॥३८॥
वज्र आणि कोयता ॥ दोहींस शस्त्र म्हणावें तत्त्वतां ॥ परी कोयता छेदी काष्ठपदार्था ॥ वज्र भेदी ब्रह्मांडें ॥३९॥
श्रीमंतांचें दिव्य मंदीर ॥ कैकाडयाचें मसणीं छप्पर ॥ दोहींचा संसार ॥ समान कैसा होईल ॥४०॥
तोयपयांची एक मिळणी ॥ निवडी राजहंस पक्षी गुणी ॥ तेवीं संसारसुखाचें कालवणी ॥ ज्ञानी निवडिती सार जें ॥४१॥
तें तत्त्व गुरुकृपेंकरुन ॥ तरी प्राप्त होय शिष्यालागुण ॥ तरीच चुके जन्ममरण ॥ चौर्‍यासीची यातना ॥४२॥
चौर्‍यासी दु:खाचे डोंगर ॥ भोगितां प्राप्त होय मानवशरीर ॥ तेथें न भजतां परमेश्वर ॥ फिरोनि झोका चौर्‍याशी ॥४३॥
जंववरी दीपाची जोत ॥ तंव झांकापाकीं करीं घरांत ॥ दीप मालवितां चांचपत ॥ असती वस्तु दिसेना ॥४४॥
देहाचें आयुष्य जोंवरी ॥ तोंवरीच करावी वारासारी ॥ मग अंतकाळ मांडल्यावरी ॥ नसे अवकाश करावया ॥४५॥
हें समजलें अंतर्यामीं ॥ सूचना केली गुरुस्वामी ॥ नित्य सावध राहा नामी ॥ घरटीं फिरे काळाची ॥४६॥
ऐसी सूचना श्रीगुरुची ॥ सावध वृत्ति शहामुनीची ॥ पुढें रचना ग्रंथाची ॥ करावया सादर ॥४७॥
ऐक श्रोतेजन भाविक ॥ तुम्हां सांगतों ज्ञानाचा विवेक ॥ जें परमेश्वराचें महावाक्य ॥ प्राप्त झालें भट्टासी ॥४८॥
महीभट्टाचे पुण्यासी ॥ गणित न करवें सहस्त्रमुखासी ॥ जो परमेश्वरदर्शनासी ॥ प्राप्त जाहला भाग्यानें ॥४९॥
भट्टाचें भाग्याची उजरी ॥ दिसे ब्रह्मादिकांहूनी चोरी ॥ जें श्रीमुखें श्रीहरी ॥ करी संवाद सुखाचा ॥५०॥
मागील अध्यायीं जाण ॥ परिसिले देवाचें वचन ॥ ब्रह्मा विष्णु शिव आदीकरुन ॥ क्षीराब्धिपर्यंत बोलिले ॥५१॥
ऐसी ऐकोनि जगदीशवाणी ॥ ब्राह्मण बोले जोडूनि पाणी ॥ म्हणे स्वामींनीं दया करुनी ॥ उपदेशिलें निजवाक्य ॥५२॥
ब्रह्मयाच्या तीन कोटी ॥ आणि विष्णूच्या तीनकोटी ॥ पुढें शिवाच्या तीनकोटी ॥ गणित जाहलें कोटी नव ॥५३॥
ब्रह्मयाहुनि विष्णु श्रेष्ठ ॥ विष्णुपरीस शिव वरिष्ठ ॥ शिवा अधिक क्षीराब्धि स्पष्ट ॥ शतगुणें दाविला ॥५४॥
तेथें सवालक्ष कोटी ॥ सांगितली देवांची परवटी ॥ उभविली महाविष्णूची गुढी ॥ हरिहरांहूनी आगळी ॥५५॥
अविंधयातीचा प्रकार ॥ सांगितला मुळींचा विस्तार ॥ जाहले पीर पैगंबर ॥ तोही विचार श्रुत केला ॥५६॥
कर्मभूमि स्वर्ग धरुन ॥ सांगितलें बाहात्तरकोटीगणन ॥ ब्रह्मा विष्णु शिवापासोन ॥ गणित जाहले नव कोटी ॥५७॥
बाहात्तर नव एक्यासीं सवालक्ष कोटी ॥ महाविष्णूचे सवालक्ष कोटी ॥ इतुकी देवांची परवटी ॥ आजीं कळली आमुतें ॥५८॥
इतुके दिवस पाहीं ॥ हें स्वप्नींही ऐकिलें नाहीं ॥ तें आजी तुम्ही पाहीं ॥ श्रुत केलें आम्हांसी ॥५९॥
स्वामी देवांचा विस्तार ॥ उघघा दाविला प्रकार ॥ आता मुख्य जो ईश्वर ॥ तो शेषशायी होय कीं ॥६०॥
महाविष्णु नारायण ॥ तोचि होय कीं ब्रह्म पूर्ण ॥ जो ब्रह्मा विष्णु शिवांहून ॥ श्रेष्ठ तुम्हीं दाविला ॥६१॥
यासीच अल्ला म्हणती यवन ॥ ईश्वर बोलती पुराण ॥ मुळीं एकचि नारायण ॥ निश्चय केला शास्त्रांनीं ॥६२॥
शिवादिक ज्यासी ध्याती ॥ ते महाविष्णूची ब्रह्ममूर्ती ॥ ऐसी वेदाची वदंती ॥ जाहला सिध्दांत परिणामीं ॥६३॥
महाराष्ट्रयाति आणि यवन ॥ दोनी मार्ग नारायणापासोन ॥ तरी हेंचि ब्रह्म निर्गुण ॥ ऐसें दिसों येतसे ॥६४॥
जयापासोनि ब्रह्मांडें ॥ निर्माण जाहलीं कीं प्रचंडें ॥ विश्वजनाचीं विशाळ बंडें ॥ विस्तारकरित हाच कीं ॥६५॥
वेद शास्त्रें पुराण ॥ तेहि प्रगट काय येथून ॥ मायेची उत्पत्ति गहन ॥ येथोनि जाहली काय जी ॥६६॥
सर्वांठायीं व्यापक ॥ हाचि होय कीं एक ॥ उपजी पाळी संहारक ॥ याचा अधिकार हाचि कीं ॥६७॥
सायुज्यमुक्ती दाता ॥ महाविष्णुचि तत्त्वतां ॥ ऐसे आमुचिया चित्तां ॥ कळो येतें अनुभवें ॥६८॥
ऐसें बोलतां द्विज वचन ॥ परिसोन हांसिला श्रीभगवान ॥ म्हणे ब्राह्मणा तूं नेणसी ज्ञान ॥ निश्चय धरिसी येथेंची ॥६९॥
हरिहरांपरीस थोर ॥ महाविष्णु होय निर्धार ॥ परी मोक्षपदाचा अधिकार ॥ त्याजपासीं असेना ॥७०॥
क्षीराब्धींचा महाविष्णु परमेश्वर असतां आपणु ॥ तरी मोक्ष जीवांलागुनु ॥ देतां संदेह नव्हता कीं ॥७१॥
महाविष्णुहूनि सामर्थ्यवंत ॥ अष्टभैरव असती समर्थ ॥ त्यांचा पराक्रम अद्भुत ॥ विष्णुपरीस सहस्त्रगुणें ॥७२॥
त्या अष्टपुरुषांची नामचर्या ॥ तूतें सांगेन द्विजवर्या ॥ श्रवण कीजे चातुर्या ॥ यथानिगुतीं सांगेन ॥७३॥
पहिल्या भैरवाचे नाव शंभुदेव ॥ दुजयासी म्हणती महादेव ॥ तिजा विक्राळ उग्रस्वभाव ॥ चौथा विष्णु नांवाचा ॥७४॥
पांचव्याचे काळिंद्री जाणिजे ॥ साहाव्यास मणिवर्धन बोलिजे ॥ सातवा सुनाभ सहजें ॥ आठवा आलेख वोळखावा ॥७५॥
ही अष्टपुरुषांची मंडळी ॥ शंभु महादेव विक्राळी ॥ विष्णु काळिंद्री मणिवर्धनबळी ॥ सुनाभ आलेख इत्यादि ॥७६॥
हेही अष्टनाम प्रांजळ ॥ तुज सांगितले करुनि विमळ ॥ महाविष्णुहूनि बळें सबळ ॥ सहस्त्रगुणें अधिक ॥७७॥
महाविष्णु क्षीराब्धींचा ॥ तो शरणागत अष्टभैरवाचा ॥ म्हणोनि प्रताप अधिक त्यांचा ॥ विष्णुपरीस आगळा ॥७८॥
अष्टभैरवांचे ठायीं ॥ देवांचे सैन्य नसे कांहीं ॥ तें अष्टही आपुले देही ॥ स्वतंत्रची आसती ॥७९॥
नवनाथ सिध्द चौर्‍यांसी ॥ भजती अष्टभैरवांसी ॥ त्यांची प्राप्ति त्यां दासी ॥ भैरवाची जाणिजे ॥८०॥
जितुका कानफाटा जोगी ॥ भजती अष्टभैरवांलागीं ॥ उभ्दट वाजविती सिंगी ॥ आलेख शब्द उच्चारुनी ॥८१॥
मच्छींद्रगोरखी चौरंगी ॥ नैनीसिध्द जालंधर योगी ॥ अवघडनाथ मैराळ भुजंगी ॥ कानिफा भर्तृहरी इत्यादि ॥८२॥
हे अवघे सिध्द मिळोन ॥ पावती भैरवपदालागुन ॥ परी मोक्षाचें निजभुवन ॥ त्यांचे ठायीं नसे कीं ॥८३॥
अष्टभैरवांचें सामर्थ्य ॥ चाले कर्मभूमीपर्यंत ॥ महाविष्णूही शरणागत ॥ असे अष्टपुरुषांचा ॥८४॥
आणि निरुपण याचें ॥ पुढती सांगे अष्टांचें ॥ म्हणोनि असोत बोल येथींचे ॥ सांप्रत सांगतों तें ऐका ॥८५॥
या अष्टांहूनि वरिष्ठ ॥ विश्वरुप असे श्रेष्ठ ॥ शास्त्र म्हणती त्यास विराट ॥ करी खटपट सृष्टीची ॥८६॥
अष्टभैरवांहुनि लक्षगुण ॥ सामर्थ्य अधिक बळसंपन्न ॥ विशालस्वरुप अमूप गहन ॥ ब्रह्मांड त्याचें पोटांत ॥८७॥
अष्टभैरव महाविष्णु ॥ कैलास वैकुंठ चतुराननु ॥ इंद्रचंद्रसमवेत भानु ॥ त्याजपासोनि उद्भवले ॥८८॥
एकवीस स्वर्ग सप्तपाताळ ॥ विराटपुरुषाचे अंगींचा खेळ ॥ एवढा पसरला ढिसाळ ॥ ब्रह्मगोळ कुक्षींत ॥८९॥
मुख्य नाम त्याचें विश्व ॥ आणि विराटही म्हणती त्यास ॥ अष्टभैरव त्याचे दास ॥ आज्ञाधारक असती ॥९०॥
त्या विश्वरुपासी ॥ भजती अठयांयसी सहस्त्र ऋषी ॥ म्हणोनि हरिहरांसी ॥ शापावयां सामर्थ्य ॥९१॥
त्या विश्वरुपाचे भक्त ॥ ऋषीश्वर हे समस्त ॥ याला इंद्रचंद्र तृणावत ॥ त्यांच्या लेखांत असेना ॥९२॥
हरिहरांसी ऋषि भजत ॥ तरी आपल्या स्वामीस कां शापित ॥ धन्याहून सेवकाचें सामर्थ्य ॥ कोण्याग्रंथीं लिहिलेंसे ॥९३॥
ऋषि कोपतां दारुण ॥ केलें शिवाचें लिंगपतन ॥ विष्णुहृदयीं ताडिला चरण ॥ केला इंद्र भगेंद्र ॥९४॥
एवढें ऋषींचें सामर्थ्य ॥ प्रगट सांगती पुराणांत ॥ तरी ते ऋषी अंकित ॥ केवीं ब्रह्मादिकांचे ॥९५॥
महाविष्णूचे द्वारपाळ ॥ जय विजय होते प्रबळ ॥ मग ऋषींचें शापें तात्काळ ॥ मृत्युलोका पावले ॥९६॥
त्या महाविष्णूनें ॥ काय त्या ऋषींचें केलें न्यून ॥ शेखीं त्यांस प्रार्थून ॥ उ:शाप मागितला ॥९७॥
ऐसें जे ऋशीश्वर ॥ तया विश्वरुपाची प्राप्ति निरंतर ॥ परी मोक्षाचें निजमंदिर ॥ तयांठायीं असेना ॥९८॥
विश्वचि परमात्मा असता ॥ तरी मोक्ष ऋषींस देता ॥ तयावरुते माया पाहतां ॥ अपिरिमित विस्तारली ॥९९॥
ते माया महाचैतन्य ॥ तिचें स्वरुप विशाल गहन ॥ बोलतां वाचे पडे मौन ॥ वळे बोबडी वेदांची ॥१००॥
ते मायेच्या पोटीं ॥ सांठवली विश्वरुपाच्या कोटी ॥ येवढी सृष्टीची राहटी ॥ तिच्या एक्या रोमाग्रीं ॥१॥
तिचें स्वरुप असे अव्यक्त ॥ नाहीं आकाराचा प्रांत ॥ या त्रैलोकींचे स्वामित्व ॥ तिच्या ठायीं असे कीं ॥२॥
नवल ऐकें द्विजोत्तमा ॥ नेणवे मायेचा अगाध महिमा ॥ हरिहरांची उमा रमा ॥ त्यांसी म्हणती महामाया ॥३॥
लक्ष्मी सावित्री पार्वती ॥ त्या देवांच्या वनिता असती ॥ परी सृष्टिनिर्माण करुं न शकती ॥ सामर्थ्य त्यांजपासी असेना ॥४॥
एक म्हणती ब्रह्माचि आधीं होता ॥ तो सृष्टीचा स्वयें कर्ता ॥ एक म्हणती शिव निर्विकार असतां ॥ तेणेंचि अवघें निर्मिलें ॥५॥
एक म्हणती विष्णु स्वामी अवघियां ॥ त्याची वैष्णवी महामाया ॥ तिणें निर्मिलें लोकत्रया ॥ सूत्रधारी तोचि कीं ॥६॥
एक म्हणती आदिगण ॥ तेणेंचि निर्मिलें त्रिभुवन ॥ एक म्हणती अवघा नारायण ॥ नामें मात्र वेगळीं ॥७॥
येथें पडिली थोर भ्रांती ॥ नुगवे ऋषीश्वराची गुंथी ॥ तेथें मानवाची काय मती ॥ जाणावया मूळमूत्र ॥८॥
अहो महर्षीचें ज्ञान ॥ पुराणांतरीं जाहलें निरुपण ॥ परी त्यांस गुह्यार्थ गहन ॥ नाहीं फुटला येथींचा ॥९॥
वेद कांहीसंसे तर्कून बोलिले ॥ परी त्यांचे अर्थ कूटस्थ पडिले ॥ ते ब्रह्मादिकां नाहीं सांपडले ॥ मग ऋषींचा केवा तो किती ॥११०॥
जरी मुख्य अवतार जाहले ॥ गीता भागवत बोलिले ॥ परी हें भांडवल उघडिलें ॥ ऐसें घडलें नाहीं कीं ॥११॥
येथें जरी तूं ब्राह्मणा ॥ घेशी आशंका मना ॥ अवतारापासोनि हे रचना ॥ गुह्य कां हो राहिली ॥१२॥
ही आशंकेची जागा ॥ पुसावया होय कीं गा ॥ परी याचा अन्वये तुजसी गा ॥ पुढती सांगेन उगवूनी ॥१३॥
प्रस्तुत असो पुढती ॥ ऐकें निरुपण विवेकमूर्ति ॥ तुझ्या प्रेमाची विशेष जाती ॥ मातें आल्हाद बोलावया ॥१४॥
तुझिया प्रश्नाची विनंती ॥ समग्र देव किती असती ॥ त्याची उगवोन गुंती ॥ तुजप्रती सांगितली ॥१५॥
सवालक्ष एक्यांसी कोटी ॥ याचा हिशोब करुन प्रौढी ॥ क्षीराब्धिपावेतो रुढी ॥ हें उघड सांगितलें ॥१६॥
आतां मुख्य जे नायक ॥ ते तुज सांगतों ऐक ॥ मागें सांगितले सेवक ॥ मुख्य धणी धरिले नाहीं ॥१७॥
कर्मभूमीचिये क्षणीं ॥ दुजा सांव अष्टदेव कोनीं ॥ तिजा चित्रसेन अंतराळ भुवनीं ॥ चौथा इंद्र स्वर्गलोकींचा ॥१८॥
पांचवा ब्रह्मा सत्यलोकीं ॥ साहवा विष्णु वैकुंठीं विलोकीं ॥ सातवां शिव जो कीं ॥ कैलासीचा अधिकारी ॥१९॥
आठवा क्षीराब्धि नारायण ॥ नववी ते माया जाण ॥ इतुके स्वामी देवांलागुन ॥ तुजलागीं निरुपिलें ॥१२०॥
अष्टभैरव बळे आगळे ॥ कर्मभूमीवरी सत्ता चाले ॥ असे सत्रांचें गणीत जाहलें ॥ त्यांहीवरी विश्वरुप ॥२१॥
आतां कर्मभूमीचे देव ॥ त्यांस भजती भावें मानव ॥ परी त्यांचा अनुभव ॥ न विचारिती मानसीं ॥२२॥
ज्या देवालागीं भजतीं ॥ पुढें तेचि क्षोभोनि लागती ॥ आपल्या पोटासाठीं रडती ॥ मागती भक्ष्य अडवूनी ॥२३॥
जे आपुल्या पोटास रडती ॥ ते भक्तांस काय देती ॥ हेंही जाणूनि पुढती ॥ पुन्हा भजती तयांसी ॥२४॥
सुवर्ण रुपें तांबे पाषाण ॥ त्यांचे करिती देव सगुण ॥ घराचे कोणीं बैसवून ॥ करिती पूजा कुटुंबेंसी ॥२५॥
देव्हारींचा देव उठोन ॥ करुं न शके ब्रह्मांड निर्माण ॥ शेखीं घरचीं मनुष्यें क्षोभून ॥ मोडूनि खाती दुष्काळीं ॥२६॥
ऐसी देवभक्तांची गत ॥ तेथें कैंचा मोक्ष प्राप्त ॥ भ्रांतीविषयीं जाहले आसक्त ॥ ईश्वरमहिमा कळेना ॥२७॥
गोंधळ भराडी जोशी ॥ वाघे मुरळ्या वसविसी ॥ देवऋषि घुमारे गुरुवासी ॥ होय प्राप्ति यक्षिणीची ॥२८॥
रोगी भुते पिंगळे पांगुळ ॥ दिंडिगाणें शाहीर पुष्कळ ॥ साधिती नृसिंह वेताळ ॥ तयां प्राप्ति यक्षिणीची ॥२९॥
यांसही म्हणावें भक्त ॥ प्राप्त यक्षिणपद होत ॥ फिरोनि पडती नरकांत ॥ चौर्‍यांसीच्या भवचक्रीं ॥१३०॥
यालागीं कर्मभूमीचे देव होती ॥ परी परमेश्वरते न होती ॥ मग मोक्षासी विश्रांती ॥ कैंची घडे प्राणियां ॥३१॥
आतां अष्टकोनींला ॥ कोण पावती प्राप्तीला ॥ तेही निरुपण तुजला ॥ सांगतों तें आकर्णी ॥३२॥
गारुडी गांवगुंड पंचाक्षरी ॥ मुठीची ज्यासी विद्याधारी ॥ अघोर मंत्र साधिल्यावरी ॥ तयां प्राप्ति सांबाची ॥३३॥
रात्रीं जाऊन मसणखाई ॥ साधू मुंजे भैरव मेसाई ॥ अघोरकर्मी सदैव निर्दयी ॥ तयां प्राप्ति सांबाची ॥३४॥
स्तंभन मोहन उच्चाटण ॥ जारण मारण वशीकरण ॥ सांधी कालिका अशुध्द अर्पून ॥ तयां प्राप्ति सांबाची ॥३५॥
हेही आपुल्याठायीं ॥ भक्त म्हणविती पाहीं ॥ अष्टमंडळाचे ठायीं ॥ जाऊनि बैसती सांबाजवळी ॥३६॥
तेथोनि पुढें चौर्‍यांसी ॥ भोगणें लागे तयांसी ॥ परी मोक्षाच्या सुखासी ॥ प्राप्त कोणी न होती ॥३७॥
अष्टकोनींचे सकळ ॥ देव होती कीं प्रबळ ॥ परी परमेश्वर अढळ ॥ ते न होती सर्वथा ॥३८॥
अंतराळाभीतरीं कोण पावती अवधारीं ॥ जे जन्मूनि संसारीं ॥ करिती कर्मे सुकृतें ॥३९॥
भाट नटवे गायक ॥ कोल्हाटी भोरपी वेश्यादिक ॥ जळमंडपी चित्रक ॥ तयां प्राप्ति चित्रसेनाची ॥१४०॥
अंतराळीचे गणगंधर्व ॥ तेही देव होती सर्व ॥ परी मुख्यस्वरुपाचा अवयव ॥ त्यांचे ठायीं नसे कीं ॥४१॥
आतां स्वर्गाचे ठायीं ॥ विशेष इंद्राची नवाई ॥ बहुतां पुण्यें पाहीं ॥ प्राप्त अमरपुरी ॥४२॥
पुण्य सरलिया अंतीं ॥ लोटोनि अघोरपंथें देती ॥ पुन: चौर्‍यांसी भोगिती ॥ मोक्षगति मग कैंची ॥४३॥
तेहतीस कोटि सुरवर ॥ त्यांत मुख्य पुरंदर ॥ हे सामर्थ्यवंत अति थोर ॥ देव होती यथार्थ ॥४४॥
परी मुख्य जो परमात्मा ॥ हे न होती द्विजोत्तमा ॥ मग त्यांचें भक्तीचा प्रेमा ॥ काय उपयोगा येईल ॥४५॥
ब्रह्मा विष्णु महेश्वर ॥ हेही देव समर्थ थोर ॥ भक्तांसी पावती साचार ॥ अंतीं नेती आपणापासी ॥४६॥
परी प्रलयाचे अंतीं ॥ तिन्ही देव लया जाती ॥ मग भक्तांची ते गती ॥ सहज पावती विनाश ॥४७॥
यालागीं ब्रह्मा विष्णु महेश ॥ तिघेंही सामर्थ्यवान् पुरुष ॥ परी मुख्य जो जगदीश ॥ ते न होती जाणपां ॥४८॥
यांहून श्रेष्ठ शेषशाई ॥ क्षीराब्धींचा विष्णु पाहीं ॥ तो समर्थ आपुले ठायीं ॥ पराक्रमी अधिक ॥४९॥
परी जो मुख्य परमेश्वर ॥ तो महाविष्णु नव्हे साचार ॥ म्हणोनि मोक्षाचें भांडार ॥ त्याचें घरीं असेना ॥१५०॥
जेव्हां होईल प्रलयकाळ ॥ तेव्हां बुडेल क्षीराब्धिमंडळ ॥ होईल विष्णूचें वाटोळ ॥ भक्त पडती प्रवाहीं ॥५१॥
आतां अष्टभैरवांस ॥ सामर्थ्य विष्णुपरीस अधिक ॥ परी प्रलय होतां काळ ग्रास ॥ करी तत्काळ तयांचा ॥५२॥
यालागीं अष्टभैरव ॥ तेही होती निश्चयें देव ॥ परी निजस्वरुप अवयव ॥ ते न होती निर्धारें ॥५३॥
आतां विश्वरुप जो विराट ॥ तोही पराक्रमें अचाट ॥ त्यासही काळाच चपेट ॥ बैसे अफाट कल्पांतीं ॥५४॥
विराट्‍ स्वरुप देव होय ॥ आणि सामर्थ्यही विशेष आहे ॥ परी जो निर्विकल्प निरामय ॥ तो नोहे ब्राह्मणा ॥५५॥
आतां चैतन्य जे माया ॥ जे वेदास न ये तर्कावया ॥ ब्रह्मांड रचूनि मोडावया ॥ दोनी सूत्रें जी पासी ॥५६॥
ब्रह्मांड रचूनि सांठवी पोटीं ॥ पदरीं सामर्थ्याची कोटी ॥ परी तिजपासी मोक्षाची पेटी ॥ नाहीं गोष्टी करावया ॥५७॥
ऐसें वदला अव्यक्तमूर्ती ॥ परिसोनि ब्राह्मण करी विनंती ॥ म्हणे अहो जी कृपामूर्ती ॥ पुसेन एक स्वामिया ॥५८॥
कर्मभूमीपासून ॥ माया चैतन्य आदिकरुन ॥ मध्यदेवांचा विस्तार गहन ॥ मातें निरुपिला दयाळा ॥५९॥
ब्रह्मा विष्णु महेश ॥ ज्यातें म्हणों जगदीश ॥ त्यांचा पराक्रम विशेष ॥ अधिकाधिक दाविला ॥१६०॥
आतां इतुकिया देवांचेठायीं ॥ तुह्मीं निरुपिलें मोक्ष नाहीं ॥ हाचि संशय माझें हृदयीं ॥ प्रगट जाहला जगदीशा ॥६१॥
फार मोक्षाचें थोरपण ॥ तुह्मीं निरुपिलें आह्मांलागून ॥ तरी मोक्ष ऐसें अभिमान ॥ कशालागी ठेविलें ॥६२॥
मोक्ष म्हणती वारंवार ॥ याचा सांगा बडिवार ॥ तरी ते काय दयासागर ॥ करुनि कृपा मज सांगा ॥६३॥
तुजसारिखा कैवल्यदानी ॥ आम्हां जोडला भाग्येंकरुनी ॥ मग पुसावयासी वाणी ॥ कांहो करावी परेशां ॥६४॥
रंक राज्यासनीं बैसला ॥ आणि भाग्याचा उदय जाहला ॥ मग भोगावया सौख्यपदाला ॥ आळस कांहो करावा ॥६५॥
मी दूर्वांचा अंकुर ॥ सुकतयां घालोनि नीर ॥ त्यावरी कृपामृताचा पूर ॥ तुम्हीं केला दयाब्धी ॥६६॥
ब्राह्मणवाणी नागसूर ॥ विनंतिशब्द वाजला मधुर ॥ परिसोनि परमात्मा नागेंद्र ॥ कृपाफणी डोलवी ॥६७॥
महावाक्याचा उच्चार ॥ तोचि टाकिला फूत्कार ॥ ब्राह्मणें जपोनि करुणामंत्र ॥ भक्तिबळें कवळिला ॥६८॥
निजहृदयींच्या पेटारांत ॥ ठेवी जगदीश फणीची मूर्त ॥ हा तंव कवीचा दृष्टांत ॥ श्रोतीं क्षमा करावी ॥६९॥
भट्टें जो पुसिला प्रश्न ॥ त्यासी उत्तर करील भगवान ॥ तें पुढिलें अध्यायीं श्रवण ॥ करा निरुपण भाविक हो ॥१७०॥
अवघ्या देवांचा खटाटोप ॥ परमात्मा वदला करुन स्वल्प ॥ हें परिसोनि भट्टाचा कल्प ॥ मोक्ष काय पूसिला ॥७१॥
या पूच्छेचें उत्तर ॥ आपण सांगेल परमेश्वर ॥ तें शब्दस्वातीचें नीर ॥ श्रोतें शुक्तींत सांठविती ॥७२॥
निपजती मुक्तीचीं मुक्ताफळें ॥ स्वयंभ सुर अतिसुढाळें ॥ तत्वसुवर्णसुतांत जाती गुंफिलें ॥ निजकर्णी ल्यावया ॥७३॥
क्षेत्र श्रोतयांचें अंत:करण ॥ श्रवण तें चाडें कल्पून ॥ ईश्वरवचनाचें बी पेरीन ॥ धरोनि श्रध्दा मुष्टींत ॥७४॥
पडेल प्रेमाचा पाऊस ॥ पिकेल भक्तीचें थोर कणीस ॥ एकनिष्ठेची भरेल रास ॥ मोजीन नाम मापानें ॥७५॥
आतां असोत हे बोल ॥ किती सांगावें पाल्हाळ ॥ शहामुनि तुमचें बाळ ॥ सरता काय पायातें ॥७६॥
इतिश्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये एकोनविंशोध्याय: ॥ ॥ अध्याय ॥१९॥ ओव्या ॥१७६॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP