मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय ६ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ६ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी वाड्मयाच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणेशायनम: ॥
नमन माझें देवाधिदेवा ॥ ज्याचे नावें मोक्ष जीवा ॥ ऐसे आणोनि अनुभवा ॥ शरण आलों तुजलागीं ॥१॥
माझा तूंचि विठ्ठल पंढरीं ॥ तूंचि रामेश्वर काशीपुरीं ॥ गंगा आणि ब्रह्मगिरी ॥ हेहि तूंचि श्रीकृष्णा ॥२॥
ज्ञान ध्यान नाम मंत्र ॥ क्रिया कर्म स्वधर्म तंत्र ॥ चारी वेद साही शास्त्रें ॥ तेही तूंचि श्रीकृष्णा ॥३॥
तूंचि इंद्र चंद्र सूर्य ॥ सगुण निर्गुण कुलस्वामिय ॥ सत्ता स्वार्थ ऐश्वर्य ॥ तेंही तूंचि श्रीकृष्णा ॥४॥
तूंचि एकादशी सोमवार ॥ योग याग जप साचार ॥ ब्रह्मा आणि हरिहर ॥ तेहि तूंचि श्रीकृष्णा ॥५॥
तूंचि सज्जन सखा सोयरा ॥ तूंचि माय बाप दातारा ॥ फार काय बोलों शार्ड्गधरा ॥ कृपा करा मज दीना ॥६॥
यापरी प्रार्थिला कुळस्वामी ॥ सर्वसाक्षी अंतर्यामी ॥ तयातें वंदूनि पादपद्मीं ॥ जाहलों कथेसी सादर ॥७॥
कृष्णें विनविलें बळरामासी ॥ तेथें समाप्ति जाहली प्रसंगासी ॥ तेचि राहिल्या निरुपणासी ॥ गुरुकृपेनें सांगेन ॥८॥
रुक्मिणीरमण म्हणे श्रीरामा ॥ सांडोनि दीजे प्रगट नामा ॥ मारुतीचा अगाध महिमा ॥ म्यां कर्णी परिसिला ॥९॥
जरी कपींद्र रागें कडाडील ॥ ब्रह्मांड अवघें तडाडील ॥ देव दानवांचें बळ ॥ सहसा न चले त्यापुढें ॥१०॥
ऐसें बोलिला रतिश्वशुर ॥ ऐकोनि संतप्त अनंतावतार ॥ मर्यादा सांडोनि शब्द कठोर ॥ बोलता जाहला कृष्णासी ॥११॥
हरीस म्हणे कळली बुध्दी ॥ तुज धाक लाविला जरासंधीं ॥ बहु भ्याड तूं त्रिशुध्दी ॥ कोठें पुरुषार्थ दाविला ॥१२॥
दंशोनि मारिली पूतना ॥ उपडिलें वृक्षां यमालार्जुनां ॥ काग बक वत्सांच्या हनना ॥ बाळचेष्टा त्वां केल्या ॥१३॥
परद्वारीं चोरीचे ठायीं ॥ वर्तलासि ते गणती नाहीं ॥ तुझा पुरुषार्थ थोर पाहीं ॥ स्त्रियां माजी मिरवत ॥१४॥
तुवां केलें गुराखीपण ॥ नाहीं युध्दाची आंगवण ॥ ऐकोनि नारदाचें वचन ॥ धैर्य तुझें पळालें ॥१५॥
मर्कटाचा निरोप आला ॥ परिसतां कंप तुज सुटला ॥ मी बळराम असतां जवळा ॥ काय भीशी श्रीकृष्णा ॥१६॥
भुजाबळें करुनि आपुलें ॥ भूगोल अवघा डळमळे ॥ तेथें कायसे मर्कटचाळे ॥ कोण आणी मनासी ॥१७॥
माझा पुरुषार्थ थोर होय ॥ करीन सृष्टीचा प्रलय ॥ सकळ पृथ्वीचे राय ॥ तृणप्राय समदृष्टा ॥१८॥
मारितां लत्ता धरेतें ॥ विरोनि जाय जळातें ॥ मेरु ऐसें या पर्वतातें ॥ पीठ करीन क्षणार्धे ॥१९॥
इंद्र चंद्र धाकती मातें ॥ सांडोनिय पुरुषार्थातें ॥ राक्षस आणि दानव दैत्यें ॥ शरण येती मज रामां ॥२०॥
ऐसा अजिंक्य त्रैलोक्यासी ॥ तुवां गांडू केलें आम्हांसी ॥ पुरुषार्थ मर्कटाचा वानिसी ॥ लज्जा कैसी वाटेना ॥२१॥
धरुनि आणूं कीं जीवें मारुं ॥ ऐसें बोलोनि रेवतीवरु ॥ सन्नध्द केला दळभारुं ॥ नगराबाहेर निघाला ।२२॥
सैन्य पाहोनि अचाट ॥ नारदाचें फुगलें पोट ॥ मग जाऊनि कपिनिकट ॥ पळा म्हणे येथूनी ॥२३॥
बळराम कोपला भारी ॥ सैन्य सज्जुनी आला तुजवरी ॥ आपुला जीव घेऊनि लौकरी ॥ करावें गच्छ लंकेसी ॥२४॥
नारदाच्या शब्दावरी ॥ कपी रागें डोळे वटारी ॥ तूं ब्राह्मण ब्रह्मचारी ॥ चेष्टा करिशी मजपुढें ॥२५॥
आतां राखोनि महत्त्वातें ॥ सोडिला तुज जाय पैरातें ॥ मुनि आपल्या मनातें ॥ हर्षे नाचत चालिला ॥२६॥
देखोनि बळरामाचें कटक ॥ मुनि धांवोनि मारी हांक ॥ द्वारकेंतील मूर्ख लोक ॥ व्यर्थ मरणा पातले ॥२७॥
बळरामाचा धरोनि कर ॥ म्हणे आतां मागे फिर ॥ तुझ्या जीवास्तव लौकर ॥ धांवत आलों घाबिरा ॥२८॥
मोठा कोप मारुतीसी ॥ नाश करील सकळ सैन्यासी ॥ ऐकोनि बळराम मानसीं ॥ म्हणे काय बोलसी उध्दटा ॥२९॥
त्वां लावोनि लंगोटी ॥ जावोनि बैससी गिरिकपाटीं ॥ ऊर्ध्व उचलोनि भृकुटी ॥ मुद्रा लक्षीं खेचरी ॥३०॥
झोळी बांधोनि काखेसी ॥ भिक्षा मागावी लोकांपासी ॥ या युध्दाच्या कामासी ॥ कोण तूतें पूसतो ॥३१॥
ऐसा बळराम बोलिला ॥ मुनि मनांत हर्ष पावला ॥ गणेशाचा नवल केला ॥ युध्द लौकरी होऊं दे ॥३२॥
आजि कोणाचें मुख देखिलें ॥ माझिया मनोगता ऐसें जाहलें ॥ आतां समरंगणा वहिले ॥ केव्हां भिडती हे दोघे ॥३३॥
असो नारदाचा हरुष ॥ ब्रह्मांडीं न माय नि:शेष ॥ घेवोनि जाळीं फांस ॥ कपीस वेढा घातला ॥३४॥
माळणी सैनिका हाटांभीतरीं ॥ देतां घेतां चकचक करी ॥ भांडतां येत निकरी ॥ मोठा वाढे गलबला ॥३५॥
तैसा हनुमंतासमोर ॥ भरला सैन्याचा बाजार ॥ चहूंकडे विष्टूनियां वीर ॥ बाणवृष्टी वर्षती ॥३६॥
मनीं विचारी वायुकुमर ॥ प्रसन्न होऊनियां रघुवीर ॥ माझ्या पुच्छासी आहार ॥ भक्षावया धाडिला ॥३७॥
मग आपुल्या पुच्छालागुन ॥ हृदयीं धरुनि करी चुंबन ॥ म्हणे गुज ऐक सांगेन ॥ चितीं धरीं आपुलें ॥३८॥
जंवजंव देखे सैन्यासी ॥ तंवतंव हर्ष चढे कपीसी ॥ करी गुदगुल्या पुच्छासी ॥ नाचे हांसे गदगदां ॥३९॥
येरीकडे बळराम नृपती ॥ म्हणे मारुं नका मारुती ॥ जिवंत धरोनि कृष्णाप्रती ॥ दावावया नेइंजे ॥४०॥
बहुत पसरोनि जाळीं ॥ पाश घालोनि धरा सकळीं ॥ येणें चेष्टा फार केली ॥ शिक्षा करुं पुरती ॥४१॥
आज्ञापून सैन्याला ॥ एकवेळ हलकल्लोळ केला ॥ पाहोनि मारुती हर्षला ॥ म्हणे यांचे फेडूं पारणें ॥४२॥
भुभु:कार करुनि गडबडिला ॥ जाणों भूगोळ खचोनि पडला ॥ सप्त समुद्रां हेलावां जाहला ॥ दचक बैसला बळरामा ॥४३॥
मारुतीनें त्वरा करुन ॥ विशाळ गिरी पुच्छीं धरुन ॥ दीधला चमूवरी लोटून ॥ केला नि:पात बहुतांचा ॥४४॥
गिरिखालीं कटक दडपलें ॥ बळरामाचे रथ मोडिले ॥ उघडया अंगें पळों लागले ॥ आश्रय पाहती लपावया ॥४५॥
तेचि समयीं नारदमुनी ॥ म्हणे कां पळतां जीव घेऊनी ॥ वेगीं धरा मर्कटालागोनी ॥ समयो गेला दीसताहे ॥४६॥
बळराम म्हणे नारदा ॥ कपीनें थोर दाविली आपदां ॥ जाहला सैन्याचा चेंदा ॥ काय आतां करावें ॥४७॥
नारद म्हणे मी पहिलेंची ॥ गोष्टी सांगीतली हिताची ॥ तुवां विषाद मानून आमची ॥ हेळणां केली अमूप ॥४८॥
बहुत गेले जीव मरुनी ॥ स्वल्प उरले ते जमा करुनी ॥ आपुला प्राण रक्षूनी ॥ शीघ्र जाईं द्वारके ॥४९॥
मान्य करोनि मुनीवचनासी ॥ बळराम गेला द्वारकेसी ॥ समोर आले हृषीकेशी ॥ म्हणती वानर दाखवीं ॥५०॥
शब्द नव्हे यमधाड ॥ तेणें गर्व जाहला दुघड ॥ बोलावया नये धड ॥ हरीपुढें शब्द एकही ॥५१॥
लज्जा पावोनि बळराम ॥ कृष्णासी म्हणे तूं परब्रह्म ॥ मी नेणोनि मूर्ख अधम ॥ तुजसी पुरुषार्थ बोलिलों ॥५२॥
तूं निराकारींचा आकार ॥ म्यां मर्यादा सोडिली फार ॥ दुष्ट वचन बोलिलों कठोर ॥ तुज परमात्मया निंदिलें ॥५३॥
मी अन्यायाची राशी ॥ क्षमा करावी हृषीकेशी ॥ ऐसें वदोनि हरीसी ॥ गमन केलें स्वगृहीं ॥५४॥
रामगर्वाचे पर्वत ॥ खचले वज्रपुच्छें त्वरित ॥ यावरी तो रुक्मिणीकांत ॥ पाचारित गरुडाते ॥५५॥
कृष्ण म्हणे खगेंद्रासी ॥ त्वरें जावें कपीपासी ॥ बोलावित हृषीकेशी ॥ ऐसें सांगोनि आणिजे ॥५६॥
परिसोनि कृष्णाची बोली ॥ गरुडासी आली गर्वकळी ॥ हरीसी म्हणे बुध्दि चळली ॥ भलतें सांगा भलत्यासी ॥५७॥
गाय-वाघांसी सोयरिक ॥ करुं पाहतां हा विवेक ॥ राजा आणि रंक ॥ मित्र कैसे होतील ॥५८॥
नागर धरुनि महीशी ॥ पुढें जुंपावे खर गजासी ॥ कामधेनु आणि शुनीशी ॥ केवीं समता दुग्धाची ॥५९॥
एक जाय काशीला ॥ एक जाय रामेश्वराला ॥ दोघांच्या संगाला ॥ संयोग केवीं घडेल ॥६०॥
मूषक आणि महिषांसी ॥ झोंबी लावूनि पाहसी ॥ हेंही ज्ञान हृषीकेशी ॥ साजे युक्ति तुम्हांतें ॥६१॥
मारीन चंचूनें प्रहार ॥ करीन ब्रह्मांडाचा चूर ॥ किंवा पृथ्वी पंखावर ॥ उचलोनि घालूं पालथी ॥६२॥
भरुं समुद्राचा घोट ॥ करुं मेरुचें पिष्ट ॥ येवढें बळ माझें अचाट ॥ नेणसी तूं श्रीहरी ॥६३॥
बैसला रायाचे शेजारीं ॥ त्यासी म्हणे उपानह जतन करीं ॥ हाही न्याय बरा चतुरीं ॥ पुरता आणिजे मानसीं ॥६४॥
तुम्ही आज्ञापिलें मातें ॥ न जातां दूषण लागतें ॥ आज्ञा मागोन हरीतें ॥ जाता जाहला खगेंद्र ॥६५॥
जेथें बैसला अंजनीपुत्र ॥ तेथेंचि पातला खगेंद्र ॥ कपि जपताहे राममंत्र ॥ प्रेमें नेत्र झांकिले ॥६६॥
गरुड म्हणे उठ मर्कटा ॥ सांडी वानरपणाच्या चेष्टा ॥ आग्रह करीतां शेंपुटा ॥ धरुनी वोढीन फरफरां ॥६७॥
म्हणे यासी लागली झोंप ॥ यास्तव पावला समीप ॥ करोनी शंखध्वनीचा जप ॥ दीर्घ आरोळी ठोकिली ॥६८॥
तुज बोलावी श्रीकृष्ण ॥ विलंब होतां शिक्षा करीन ॥ श्रवणीं परिसतां वचन ॥ कपि क्रोधें खवळला ॥६९॥
गरुडाच्या मुखावरी ॥ करतालिका ताडिली निकुरीं ॥ चक्राकार गगनोदरीं ॥ फिरत गेला द्वारके ॥७०॥
कृष्णसभेच्या पटांगणांत ॥ पडला जैसा पर्वत ॥ भूकंप जाहला नगरांत ॥ सभेसी लोक दचकले ॥७१॥
उतरडी खचली गृहांची ॥ गडबड माजली लोकांची ॥ कृष्ण म्हणे गरुडाची ॥ कोणें अवस्था हे केली ॥७२॥
गरुडापासी त्वरित ॥ लोक मनिले समस्त ॥ एक नीर सुंदिती मुखांत ॥ एक धरिती छायेतें ॥७३॥
गात्रें सर्व जाहिलीं ढिलीं ॥ श्वास ऊरला नाहीं मुळीं ॥ मग श्रीकृष्णें कृपा केली ॥ अमृतहस्तें स्पर्श केला ॥७४॥
मूर्च्छना त्यजोनि सावध जाहला ॥ नेत्र उघडोनि पाहे लोकांला ॥ भावी सावध कीं निमाला ॥ थोर वेढिला भ्रमानें ॥७५॥
श्रीकृष्ण म्हणे अंडजातें ॥ कोणें पाजिलें तुज मद्यातें ॥ पावलासी गाढ मूर्च्छेतें ॥ भूमीवरी कां लोळसी ॥७६॥
कीं भुजंग वैरियें डंकिलें ॥ त्याचें विष तुज चढलें ॥ घरीं येऊनी झेंडू फुलें ॥ यास्तव पावलासी हे दशा ॥७७॥
अथवा नृसिंहमंत्र चळला ॥ त्याचा धाक तुज बैसला ॥ गरुड म्हणी जी गोपाळा ॥ काय आताम बोलतोसी ॥७८॥
म्या तुज पुढें कथिला पुरुषार्थ ॥ त्याची पावलों हे गत ॥ मर्कटाहातें ताडिलें मातें ॥ शिक्षा केली पुरती ॥७९॥
हरी म्हणे चूक पडली ॥ नाम सांगतां गोष्ट गेली ॥ आतां सांगेन तुजजवळी ॥ तेची रीती वर्तावें ॥८०॥
फिरोनि जावें कपीपासी ॥ श्रीरामें पाचारिलें तुम्हांसी यारीतीं बोधितां त्यासी ॥ उडी सरिसा येईल ॥८१॥
तक्षकारी म्हणे देवा ॥ तूं उठिलासी माझिया जीवा ॥ तरी खड्ग घेवोनि बरवा वधीं आपुल्या हस्तकीं ॥८२॥
परी कपीसी संबंधा ॥ नको पाठवूं गोविंदा ॥ तो करील माझा चेंदा ॥ दावील सदन शमनाचें ॥८३॥
त्याचिया उच्चारितां नांवा ॥ कंप सुटला माझिया जीवा ॥ ध्यानीं मनीं तोचि आघवा ॥ भासे माझे लोचनीं ॥८४॥
कृष्ण म्हणे खगेंद्रातें ॥ आतां होवोनि निर्भय चित्तें ॥ जावोनि आणावें कपींतें ॥ आग्रह नकरी जाण त्या ॥८५॥
तुझिया एका रोमासी ॥ दु:ख होऊं नेदीं मी हृषीकेशी ॥ गरुड म्हणे आलिया भोगासी ॥ केलें कर्म सोडीना ॥८६॥
असेल प्रारब्धीं लिहिलें ॥ मर्कटहातीं मरण आथिलें ॥ मग कोणाचें काय चाले ॥ रुसावें आपुल्या संचिता ॥८७॥
मग नमस्कार करोनि देवा ॥ म्हणे लोभ असो द्यावा ॥ मृत्यू पावल्या माझिया जीवा ॥ मोक्षपदीं तरी पाठवीं ॥८८॥
परिसोन सुपर्णवचना ॥ हासें श्रीहरीशी आवरेना ॥ अंडज म्हणे तुज करुणा ॥ नाहीं कोणा जीवाची ॥८९॥
प्रारब्धीं असेल तें भोगावें ॥ संचितासारखें पावावें ॥ ऐसें भावोनि आपुल्या जीवें ॥ आज्ञा घेऊनि निघाला ॥९०॥
फिरोनि पाहे द्वारके ॥ आतां कैंची दृष्टी पडसी ॥ सती जाय मरणखाईसी ॥ मीही तैसा जातसें ॥९१॥
पुढे जातं मार्गानें ॥ कोठें जातोसि पुशिलें एकानें ॥ गरुड म्हणे ऐक गार्‍हाणें ॥ सांगतों तुज मी मार्गस्था ॥९२॥
माझिया आयुष्यदोरीला ॥ कृष्णक्षोभतैल लागला ॥ तो वास कपिमूषका आला ॥ करंडावया पाहतसे ॥९३॥
हरीनें मातें पतंग करुन ॥ दीप ठेविला अंजनीनंदन ॥ त्यासी भेटतां माझा प्राण ॥ कैसा राहील सांगपां ॥९४॥
काय सांगों हे तुम्हांला ॥ आग लागो परसेवेला ॥ जिताची जीव विकिला ॥ सांगेल तैसें करावें ॥९५॥
धाड पडो या उदरासी ॥ येणें पीडिलें बहुतांसी ॥ दैत्य राक्षस सुर नरांसी ॥ पोट कोणासी सोडीना ॥९६॥
उदरानिमित्त चोरी करित ॥ धरोनी राजा शूळीं देत ॥ विष्ठा लोकांची एक काढित ॥ नसे शुभाशुभ त्यांलागी ॥९७॥
उदरनिमित्तवेश्या ॥ शरीर ओपीत परपुरुषा ॥ पोटासाठीं दाही दिशा ॥ श्रमी होती मनुष्यें ॥९८॥
विंचु सर्प अपवित्र खाणी ॥ दृष्टी पडतां मारिती प्राणी ॥ त्यांस गारोडी जतन करोनी ॥ उदर पोषिती आपुलें ॥९९॥
योगी सिध्द ऋषी तापसी ॥ अन्नाविण तेही कासाविशी ॥ राव रंक जीव जीवासी ॥ क्षुधा कोणासी सोडीना ॥१००॥
उदरानिमित्त भृत्यत्व करिती ॥ अंतर पडतां मुखीं ताडिती ॥ उगेंचि राहाती सोसूनि चित्तीं ॥ एवढें पोटें पेंचिलें ॥१॥
पोटासाठीं शिपाई होऊन ॥ समरंगणीं जाय मरोन ॥ तैसा मी आपुला प्राण ॥ वेंचिला असे श्रीकृष्णासी ॥२॥
राजद्वारीं व्याघ्रास ॥ धाडिती बकरें रतीबास ॥ तेवीं मी कपीसमोर जावयास ॥ सिध्द असें ब्राह्मणा ॥३॥
उशीर जाहला मार्गस्था ॥ माझें गार्‍हाणें परिसतां ॥ ऐसें बोलोनी त्वरिता ॥ खगेंद्र गेला कपीपासी ॥४॥
दुरीं उभा कोस एक ॥ म्हणे कैसी मारुं हाक ॥ जवळीं जातां यमलोक ॥ रोकडाची दावील ॥५॥
तेथूनि मारुं हाकेशी ॥ उध्दटाचार दिसेल त्यासी ॥ बहुत क्षोभेल मानसी ॥ शिक्षा करील मागुती ॥६॥
मार्जाराहातीं मूषक पडेल ॥ काकुळती येतां काय सोडील ॥ सती पाहोनि अग्निज्वाळ ॥ संमुख होतां सार्थक ॥७॥
जरी ते सती फिरोनि परते ॥ तरी मारुनि घाली खाईतें ॥ ऐसें विचारोनि चित्तें ॥ नेत्र झांकी आपुलें ॥८॥
त्यापरी मी आतां ॥ जरी फिरेन मागुता ॥ कपि धरील तत्त्वतां ॥ उरों नेदी जीविता ॥ चिरोनि करील दुखंड ॥९॥
मागें पळतां पुढें सरतां ॥ हा तंव न सोडी सर्वथा ॥ ऐसें विचारोनि चित्ता ॥ धारिष्ट केले जावया ॥११०॥
हळुवार पदीं सन्निध गेला ॥ कंप सुटला अंगाला ॥ बोबडी वळे बोलावयाला ॥ शब्द कांहीं सुचेना ॥११॥
हळुच म्हणे कपिराजा ॥ तुम्हांसी बोलाविलें रामराजा ॥ परिसतां ऐसें चरंणांबुजा ॥ मिठी घाली गरुडाचे ॥१२॥
कपीनें तया हृदयीं धरिलें । गरुड म्हणे घर बुडालें ॥ येरु म्हणे श्रीरामदयाळें ॥ बोलविलें कवणे ठायीं ॥१३॥
गरुडासी घेऊनि खांद्यावरी ॥ मार्गी चालिला झडकरी ॥ कैसी आहे सीता सुंदरी ॥ रामासहित दावीं पां ॥१४॥
गरुड म्हणे विपरीत ॥ राम सीता कैंची तेथ ॥ पाहोनि श्रीकृष्ण मूर्तिंमंत ॥ माझा प्राण घेईल हा ॥१५॥
करील यादवांचे तारंगण ॥ द्वारकेचें होईल निसंतान ॥ शेखीं रामकृष्ण दोघेजण ॥ होईल आकांत पृथ्वीचा ॥१६॥
गरुड म्हणे कपिलागुन ॥ खाली उतरा मी चालेन ॥ येरु म्हणे रामदर्शन ॥ होतां सोडीन तुजलागीं ॥१७॥
ऐसें वदतां बलांढमूर्ती ॥ खगेश म्हणे जाहली निश्चिंती ॥ इकडे कृष्णें द्वारकेप्रती ॥ नारदासी पाचारिलें ॥१८॥
कृष्ण म्हणे नारदमुनी ॥ गरुड येतसे कपि घेऊनी ॥ राम न देखतां नयनीं ॥ अनर्थ करील तत्काळ ॥१९॥
तुम्हीं सांगा सत्यभामेसी ॥ राम जाहले हृषीकेशी ॥ सीता होऊनियां सरिसी ॥ त्वरें सभेसी येइंजे ॥१२०॥
परिसोनि कंसारीचे उत्तरा ॥ मुनीस भरला हर्षवारा ॥ वीण्याच्या तुटोनि गेल्या तारा ॥ एवढया छंदें गातसे ॥२१॥
संतोष मानूनि मुनिराज ॥ म्हणे कृष्णें मांडिली मौज ॥ जेथें बैसली हरिभाजे ॥ प्रवेश केला त्या सदनीं ॥२२॥
पाहोनि नारदाची मूर्ती ॥ पायां पडे रुक्मिणसवती ॥ बैसका देवोनि मुनीप्रती ॥ बहु आदरें पूजिला ॥२३॥
मुनि म्हणे कृष्णांगने ॥ हनुमंत आणिला गरुडानें ॥ यालागीं तुम्हीं दोघें जणें ॥ रामसीता होइंजे ॥२४॥
कृष्णें अवलंबिली लीला ॥ श्रीरामनृप नटला ॥ तूतें पाचारीतसे सभेला ॥ सीता होईं लौकरी ॥२५॥
परिसोनि विधिसुताची वाणी ॥ हांसोनि बोले मृगनयनीं ॥ माझिया रुपालागोनी ॥ जोडा नसे ब्रह्मांडीं ॥२६॥
मग पाचारी दासीला ॥ आणी माझिया श्रृंगारांला ॥ येरी जाणोनि वस्त्रांला ॥ शत एक पुढें ठेविलीं ॥२७॥
वस्त्रें नेसोनि सत्यभामा ॥ म्हणे पाहाहो मुनिसत्तमा ॥ माझिया रुपाची प्रतिमा ॥ देवलोकीं नसे कीं ॥२८॥
मुनि म्हणे सीतेसरिसें ॥ तितुकेंचि दावीं तूं राजसे ॥ येरी धरोंनि हरुषें ॥ अधिक लेई भूषणें ॥२९॥
सत्यभामा गर्वभरित ॥ बहुवेळां श्रृंगार करीत ॥ मुनि म्हणे सीतेच्या रुपांत ॥ अणुमात्र कांहीं दिसेना ॥१३०॥
एक मदनसावित्रीमाय ॥ म्यां सीता देखिली आह्य ॥ तिच्या दासीसमान सौंदर्य ॥ जोखितां तुझें तुकेना ॥३१॥
मुनिवचनें मूर्च्छित पडली ॥ म्हणे माझी काया विटंबिली ॥ नारद म्हणे कृष्णाजवळी ॥ काय आतां सांगावें ॥३२॥
मग जावोनि रुक्मिणीपासीं ॥
म्हणे सीता होणें त्वरेंसी ॥ येरी फिरवितां पदरासी ॥ जाहली जानकी जगदंबा ॥३३॥
कृष्णें मुगुट शिरींचा काढिला ॥ मंदील जरीचा बांधिला ॥ धनुष्य भाते काखेला ॥ जाहला श्रीराम महाराज ॥३४॥
घेऊनि सीतेच्या रुपासी ॥ रुक्मिणी बैसली वामांकाशी ॥ लोक म्हणती द्वारकेसी ॥ अयोध्याची आणिली ॥३५॥
सभेंत बैसली राममूर्ती ॥ मनोवेगें आला मारुती ॥ गरुड म्हणे आपुले चित्तीं ॥ मरण वेळा पातली ॥३६॥
पुढें मंडपाचे सभेंत ॥ बैसला श्रीरामसमर्थ ॥ कपीनें देखतां भगवंत ॥ प्रेमें हृदयीं दाटला ॥३७॥
गरुडासह खालीं उतरला ॥ मिठी घातली रामचरणाला ॥ कपीस थोर आनंद जाहला ॥ लिहितां नये अक्षरीं ॥३८॥
बाहीं कवळोनि मारुतीला ॥ आवडीनें सुखदायक भेटला ॥ कपीनें वंदोनी जानकीला ॥ स्वस्थ बैसला सभेंत ॥३९॥
मनीं विचारी रुक्मिणीरमण ॥ कृष्णमूर्तीचें महिमान ॥ मारुती सर्वथा नेणें आपण ॥ यासी दाऊं प्रगट ॥१४०॥
हरि म्हणे अंजनिसुता ॥ तुझें समाधान जाहले आतां ॥ श्रीकृष्णमूर्ति तत्त्वतां ॥ तेही तूंतें दावितों ॥४१॥
मुगुट ठेवितां डोईवरी ॥ जाहलीं चतुर्भुज मुरारी ॥ तैसीच सीता सुंदरी ॥ रुक्मिणी होय मागुती ॥४२॥
कपीनें मनांत विचारिलें ॥ येथें हरीनें नवल केलें ॥ कृष्ण राम एकचि वहिले ॥ ऐसें दिसोनी येतसे ॥४३॥
हनुमंत म्हणे रामा ॥ कोण जाणे तुझा महिमा ॥ दर्शन देऊनि माझा आत्मा ॥ संतोषविला स्वामिया ॥४४॥
नमस्कारोनि चरणांसी ॥ आज्ञा मागोनी श्रीकृष्णासी ॥ विस्मयो पावोनि मानसीं ॥ गेला लंकेशी प्लवंगम ॥४५॥
ऐसी जगदीशाची करणी ॥ मारुतीसि भेड देवोनि ॥ श्रीकृष्णमहिमा दाखवोनी ॥ गर्व हरिला सर्वांचा ॥४६॥
बळरामाची ऊर्मी जिरली ॥ सत्यभामा ते अपमानिली ॥ ऐसा कृष्ण माझा बळी ॥ उरी न ठेवी कवणाची ॥४७॥
थोरथोरांची ही गत ॥ इतरांचा लेखा कोण करित ॥ यालागीं शरणागत ॥ होतां बरवें देवासी ॥४८॥
ऐसें जाणोनि सर्वथा ॥ श्रीकृष्णचरणीं ठेविला माथा ॥ मागील जालंधराची कथा ॥ सांगतों तैसीच राहिली ॥४९॥
ते कथेचें निरुपण ॥ पुढील अध्यायीं परिसोत कानें ॥ श्रीसद्गुरुकृपें करुन ॥ शहामुनि वदेल ॥१५०॥
इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णय षष्टोध्याय: ॥६॥ अध्याय ॥६॥ ओंव्या ॥१५०॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP