मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध|
अध्याय ११ वा

श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ११ वा

‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी वाड्मयाच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे.


श्रीगणाधिपतये नम: ॥
श्रीगुरुभ्यो नम: ॥ मन ठेवूनि दत्तचरणीं ॥ वंदितसें कमलोद्भवनंदिनी ॥ जो ग्रंथकर्ता शहामुनी ॥ वंदूनि ग्रंथ लिहितसे ॥१॥
अगाध महिमा देवाची ॥ केली रचना ब्रह्मांडाची ॥ पेंढी बांधोनि पंचभूतांची ॥ त्यांत घातले जीव सानू ॥२॥
जीव शरीराची प्रीत ॥ दोन्ही एकरुपें वर्तत ॥ घरीं दारीं सुखदु:खांत ॥ एकमेकां न सोडिती ॥३॥
आसनीं शयनीं भोजनीं ॥ उभयतां राहाटती एकमिळणीं ॥ एकांत लोकांत भोगमैथुनीं ॥ पडदा नसे दोघांसी ॥४॥
येवढें दोघांचें सख्यत्व ॥ चालत असतां प्रेमप्रीत ॥ काळें येऊनि अकस्मात ॥ जीवासी पाश घातला ॥५॥
काळें नेतां जीवासी ॥ बिघड पडला दोघांसी ॥ जीव म्हणे कुडीसी ॥ संबंध तुझा तूटला ॥६॥
आतां कुशल असो तूतें ॥ मी जातों स्वर्गपंथें ॥ केलिया कर्माचें संचितें ॥ पडेल तैसें भोगीन ॥७॥
ऐकोन जीवाचें वचन ॥ काया बोले हो रडोन ॥ तूं गेलिया मजापासोन ॥ क्षेम कोठून होईल ॥८॥
तुजवांचून वपूप्रत ॥ लोक म्हणती पडलें प्रेत ॥ अवघे उचला म्हणत ॥ दहन करिती श्मशानीं ॥९॥
तुझ्या माझ्या संगतीकरुन ॥ सखे लागती विश्वजन ॥ माय बाप बंधु बहीण ॥ आप्तपणा लावित ॥१०॥
दोघे मिळोन सांगातें ॥ फिरत होतों पृथ्वीवरुतें ॥ द्रव्य आणून कुटुंबातें ॥ प्रतिपाळिलें बहुकष्टें ॥११॥
आतां बिघड होतां दोघांसी ॥ लुटून घेती नगवस्त्रांसी ॥ सेखीं तोडिती कटी सूत्रासी ॥ निर्दय होती आप्तची ॥१२॥
आतां सख्या सांगतों ऐक ॥ सोडूं नको माझी भाक ॥ जीव म्हणे तूं मूर्ख ॥ बोलसी तितुकें व्यर्थचि ॥१३॥
थोर काळाचे चपेटघात ॥ ब्रह्मांडाचा ग्रास करित ॥ तुह्मी आम्ही तृणवत् ॥ कोण धरितो लेखासी ॥१४॥
ऐसें बोलूनि जीवान ॥ काया त्यजूनि केलें गमन ॥ यालागीं मानवान ॥ उदास रहाणें सर्वांसी ॥१५॥
कैचें घर कैचें दार ॥ मिथ्या मायिक विचार ॥ सखा जोडा परमेश्वर ॥ कामा येईल शेवटीं ॥१६॥
असें समजोनि अंत:करणीं ॥ निष्ठा धरली श्रीकृष्णचरणी ॥ जेवी पतिव्रता पतिवांचोनी ॥ स्पर्श न करि परपुरुषा ॥१७॥
माझें जप तप अनुष्ठान ॥ तूं श्रीकृष्ण नारायण ॥ करी मनाचें समाधान ॥ इच्छा पुरवी दयाळा ॥१८॥
यापरी श्रीकृष्णसांवळा ॥ भक्तिभावें आर्जविला ॥ जयाच्या कृपेनें ग्रंथाला ॥ लिहितां पैस बुध्दीसी ॥१९॥
जाहला बुध्दी आत्मबोध ॥ यालागीं निर्मी सिध्दांतबोध ॥ सकळदेवांचा घेत शोध ॥ मुख्य देव वोळखावया ॥२०॥
करीत तत्वांचा झाडा ॥ दावीन पिंडब्रह्मांडाचा निवाडा ॥ होय परमार्थ रोकडा ॥ उधार लागों देईना ॥२१॥
फेडोनि मनाची आशंका ॥ स्वस्थ चित्तें प्रांजळ ऐका ॥ समग्र ग्रंथाची पीठिका ॥ श्रवणें संदेह वारेल ॥२२॥
एथें माझी काय सत्ता ॥ श्रीदत्त मज बुध्दि प्रेरिता ॥ तयाचे आज्ञेनें कविता ॥ करावया लागलों ॥२३॥
भावें वंदूनि शार्ड्गधर ॥ जाहलों कथेसी सादर ॥ नैमिषारण्यीं मुनीश्वर ॥ सांगे निरुपण तें ऐका ॥२४॥
समुदाव बैसला ऋषींचा ॥ कडाका होतो ब्रह्मज्ञानाचा ॥ आपुलाले अनुभवाचा ॥ झाडा देती सर्वही ॥२५॥
मागील अध्यायीं निरुपण ॥ सांगितलें तिहीं देवांचें कथन ॥ पुढें शिवाचें महिमान ॥ सांगतों तें परिसावें ॥३६॥
ऋषि सांगें आपुलें ज्ञान ॥ म्हणे ऐका समस्त तपोधन ॥ परमात्मा तो निर्गुण ॥ गुणत्रयावेगळा ॥२७॥
स्वरुपास गुणांचा विटाळ ॥ शिव तमोगुणी निखळ ॥ सुवर्ण आणि पितळ ॥ मोला एका चढेना ॥२८॥
पयतक्र सारिखें दिसत ॥ चवी चाखितां भिन्न लागत ॥ मेरु आणि पर्वत ॥ केवीं येती सम तुका ॥२९॥
ब्रह्मीं नाहीं खटपट ॥ शिवास उपाधीचें कचाट ॥ तेंही ऐका प्रगट ॥ उकलोनि तुम्हां दावितों ॥३०॥
एके समयीं काशीस ॥ राज्य करीं दिवोदास ॥ जयाच्या पाहतां सामर्थ्यास ॥ ब्रह्मांड हळुवट दिसतसे ॥३१॥
येवढा बळानें वरिष्ठ ॥ निर्मूं शके नवी सृष्ट ॥ देवांस म्हणे तुम्ही नष्ट ॥ नका राहूं काशींत ॥३२॥
दूतांस म्हणे धांवा सकळीं ॥ पिटोनि लावा चंद्रमौळी ॥ येणें देवपूजा वाढविली ॥ माझ्या नगरांत राहोनि ॥३३॥
माझ्या राज्याभीतर ॥ देव तितुके तस्कर ॥ दंडोनि लावा बाहेर ॥ सोटे देवोनि पाठीसी ॥३४॥
राजा क्षोभला दारुणं ॥ शिवें ते वार्ता ऐकोन ॥ धाकें होऊन कंपायमान ॥ पार्वती घेऊनि पळाला ॥३५॥
शिव गेला सांडोनि काशी ॥ प्रळय मांडिला इतर देवांसी ॥ राजभृत्य मारुनि त्यांसी ॥ देशाबाहेर घालिती ॥३६॥
राजा म्हणे पृथ्वीवरुतें ॥ कोणी घेईल देवनामातें ॥ शिक्षा करुन तयांतें ॥ यमसदना धाडीन ॥३७॥
चौखंडांत द्वाही फिरविली ॥ पूजा देवांची राहिली ॥ इंद्रासहित सुरमंडळी ॥ दर्पे पळती दशदिशा ॥३८॥
राजा म्हणे पर्जन्यास ॥ तुम्ही देवाचे अंश ॥ माझे पृथ्वीस न करावा स्पर्श ॥ जाय नष्टा येथोनी ॥३९॥
मी स्वतां ईश्वर आपण ॥ नूतन पाऊस निर्माण करीन ॥ हें परिसोन भूपाळवचन ॥ वरुण तोही पळाला ॥४०॥
नृपती म्हणे अग्नीला ॥ तूंही जाई परदेशाला ॥ माझे राज्यांत राहावयाला ॥ आज्ञा तूतें असेना ॥४१॥
मी सत्तेचा अनल करीन ॥ विश्वाचें कार्य चालवीन ॥ वायु तोही लावा पिटोन ॥ प्रभंजन दूसरा निर्मितों ॥४२॥
चंद्रासी म्हणे क्षयरोगी ॥ आमुची प्रजा असे निरोगी ॥ येथें राहावयालागीं ॥ कार्य तुझें असेना ॥४३॥
जन्म घेतला सूर्यवंशीं ॥ म्हणोनि ठेविलें भानूसी ॥ इतर देव दर्शनासी ॥ स्वप्नीं न दिसे प्रजेला ॥४४॥
शिवासहित सकळदेव ॥ कोठें राहावया न मिळे ठाव ॥ परदेशीं होऊन सुरस मुदाव ॥ भणंगन्यायें हिंडती ॥४५॥
मग हिमालयाच्या विवरांत ॥ वस्ती करोनि राहिले तेथ ॥ काशी अंतरतां दु:खित ॥ शिव कष्टी होतसे ॥४६॥
शिव म्हणे सुरवरांला ॥ कधीं देखेन मी काशीला ॥ कांहीं उपाय करा जावयाला ॥ वियोग मातें साहेना ॥४७॥
एक घटिका मजकारण ॥ जाय चौयुगांसमान ॥ काशी पहावया नयन ॥ निद्रा त्यागोन बैसलों ॥४८॥
सुख न पडे सेजेसी ॥ चटपट लागली मानसीं ॥ केव्हं देखेन वाराणसी ॥ धैर्य मातें रिघेना ॥४९॥
ऐसें बोलोनि चंद्रमौळी ॥ संतप्त होऊनि कर चोळी ॥ म्हणे कोण सखा या वेळीं ॥ कार्य माझें करील ॥५०॥
मग ब्रह्मा गणेश येऊनि ॥ चौसष्टियोगिनी चामुंडा मिळोनि ॥ गुप्तरुपें काशीस जाऊनी ॥ प्रयत्नें राजा मोहिला ॥५१॥
दिवोदास राजाप्रती ॥ सकळ देव अर्जी करिती ॥ ठाव मागोनियां क्षिती ॥ केला प्रवेश जावया ॥५२॥
मग रायें टाकोनि काशी ॥ गमन केलें स्वर्गासी ॥ शिवें घेऊनी गौरीसी ॥ पुन्हा काशीस पातला ॥५३॥
हें सांगावया कारण ॥ दिवोदासाचा प्रताप गहन ॥ ज्याच्या धाकें शिव पळोन ॥ गिरीकपाटी बैसला ॥५४॥
परमात्मा अव्यक्त परिपूर्ण ॥ सबाह्य अंतरीं व्यापून ॥ शिवस्वरुप तत्समान ॥ केवीं घडे समतेसी ॥५५॥
कांहीं सामर्थ्य पाहिजे त्याला ॥ एवढयावरी निश्चय केला ॥ पुरता पैस बुध्दीला  ॥ जाहला नाहीं अद्यापि ॥५६॥
ऐका शिवाची कहाणी ॥ एके दिवशीं कैलासभुवनीं ॥ भस्म चोळितां अंगालागोनी ॥ त्यांत खडा निघाला ॥५७॥
हातीं घेऊनि पुढें टाकिला ॥ सजीव बाळ सगुण जाहला ॥ शिवासन्मुख नाचूं लागला ॥ गीत गाय सप्तस्वरें ॥५८॥
ऐकोनि बाळकाची मंजुळवाणी ॥ शिवसंतोष मानीं मनीं ॥ म्हणे तूं जन्मलासी भस्मांतूनी ॥ नांव तुझें भस्मासुर ॥५९॥
आतां प्रसन्न जाहलों तूंतें ॥ कांहीं वर मागें आमुतें ॥ जें आवडेल मनातें ॥ तेंचि पुरवीन बाळकां ॥६०॥
ऐकोनि शिवाची प्रसन्न वाणी ॥ बाळ विचारी अंत:करणीं ॥ हा भिक्षुक दिसे नयनीं ॥ काय यातें मागावें ॥६१॥
करी चर्माचें परिधान ॥ अंगीं सर्पाचें भूषण ॥ बैसावया मागों वहन ॥ एक बैल यापाशीं ॥६२॥
भोंवता भूतावळींचा मेळ ॥ मध्यें बैसे जैसा वेताळ ॥ गळ्यांत घाली रुंडमाळ ॥ दिसे जेवीं झोटिंग ॥६३॥
भांडवल पाहतां यापासी ॥ दिसे पार्वती लावण्यराशी ॥ याविरहित मागावयासी ॥ पदार्थ कांहीं दिसेना ॥६४॥
तरी गिरिजा आवडे शिवातें ॥ केवीं मागतां देईल मातें ॥ काहीं वर मागोनि यातें ॥ भस्म करावें रुद्रासी ॥६५॥
मग सहज पार्वती ॥ मातें प्राप्त होईल सती ॥ ऐसें विचारोनी चित्तीं ॥ वर मागें शिवाला ॥६६॥
भस्मासुर शिवालागून ॥ कर जोडूनि करी नमन ॥ प्रसन्न जाहलां जरी आपुण ॥ तरी इच्छा पुरवीं दयाळा ॥६७॥
ज्याचें मस्तकीं ठेवीन करमकमळ ॥ त्याची रक्षा होय तत्काळ ॥ हाचि अभयवर अढळ ॥ वोपीं मातें कृपेनें ॥६८॥
अवश्य म्हणे गौरीरमण ॥ तुझा हेत होऊं पूर्ण ॥ परिसोनि शिवाचें वचन ॥ हर्ष मानी मानसीं ॥६९॥
जाहला शिवाचा अभयवर ॥ ऐसें विचारी भस्मासुर ॥ मग उचलोनि दोन्ही कर ॥ ठेवूं पाहे रुद्र माथां ॥७०॥
शिव म्हणे भस्मासुराला ॥ त्वां पाणी कां उचलिला ॥ येरु म्हणें प्रतीतीला ॥ साक्ष घेतों तवमाथा ॥ ऐसें ऐकतां शिव भ्याला ॥ पार्वती घेऊनि पळाला ॥ एकवीस स्वर्गांवरुता गेला ॥ फिरोनि पाहे मागुती ॥७२॥
कांहीं बैसोनि टाकितां श्वासां ॥ भस्मासुर पावला सरिसा ॥ शिव पाहोनि त्यापुरुषा ॥ कंपित जाहला शरीरीं ॥७३॥
भये तेथूनि पळाला ॥ सप्तपाताळांखालताम गेला ॥ तों भस्मासुर पाठीं लागला ॥ विसांवा घेऊं देईना ॥७४॥
मग कडेस गिरिजा घेऊन ॥ शिव तेथूनि करी गमन ॥ मृत्युलोकास येऊन ॥ स्थळ पाहे लपावया ॥७५॥
देखोनि विशाळ बहुतरु ॥ बुडीं पोकळ जैसें विवरु ॥ त्यांत प्रवेशोनि गिरिजावरु ॥ आच्छादूनी बैसला ॥७६॥
नेत्र उघडोनि पाहे बाहेर ॥ सुसाटें येतसे भस्मासुर ॥ जैसा धनुष्याचा शर ॥ भेदुं पाहे हृदयातें ॥७७॥
अवलोकूनि असुरप्रतिमा ॥ शिवासी हृदयीं भरला दमा ॥ मग म्हणे वल्लभे उमा ॥ काय आतां करावें ॥७८॥
तुज पाहोनियां गोरटी ॥ येणें घेतली आमुची पाठी ॥ बहु पेटलासे हटीं ॥ जाळूं पाहे मज शिवातें ॥७९॥
भय पावोनि त्रिपुरारी ॥ भावें आठविला मुरारी ॥ म्हणे धांवे आतां लौकरी ॥ करीं उपाय या नष्टा ॥८०॥
कमलावरा वैकुंठवासी ॥ समयीं पावें हृषीकेशी ॥ ऐसिया मारोनि हांकेशी ॥ बहुत झाला घाबरा ॥८१॥
शिवमुखभांडयाआंतून ॥ शब्दगोळा निघाला दणाणून ॥ विष्णु निशाण कल्पून ॥ अंत:करणीं भेदला ॥८२॥
ध्वनि पडतांचि कानीं ॥ त्वरें पातला चक्रपाणी ॥ म्हणे कोणें दुष्टें शूळपाणी ॥ संकटीं पडिला ममसखा ॥८३॥
मनपवनासरीस त्वरित ॥ प्रगट झाला रमाकांत ॥ शिवास न कळतां गुप्त ॥ असुरां सन्मुख पैं गेला ॥८४॥
जाहला मायिक सुंदर ललना ॥ दिव्य दामिनी मृगलोचना ॥ नेट नेटकी चंद्रवदना ॥ तेज फांके अंबरी ॥८५॥
भस्मासुरें देखिली नयनीं ॥ चमके जेवीं गजगमनी ॥ पतंग जेवीं दीपालागोनि ॥ तेवीं सन्मुख पातला ॥८६॥
विष्णूनें दाविला गौरीवेश ॥ मोहिले भस्मासुराचें मानस ॥ म्हणे तुजकरितां शिवास ॥ त्यागिलें म्यां जाण पां ॥८७॥
वृध्द पाहोनि तयाची दशा ॥ म्यां त्यागिले महेशा ॥ लज्जा टाकून तुज पुरुषा ॥ लंपट जाहलें मन माझें ॥८८॥
परी म्यां केला नवस ॥ तो पुरविशी जरी नि:शेष ॥ तरी तुझा माझा विलास ॥ घडेल इच्छेसारिखा ॥८९॥
हें ऐकोनि मनीं हर्षला ॥ म्हणे भाग्याचा उदय जाहला ॥ आजि माझे आनंदाला ॥ नसे जोडा ब्रह्मांडीं ॥९०॥
ऐसा पावोनि आल्हाद ॥ म्हणे सांडीं आतां खेद ॥ मजसंगें सुखविनोद ॥ भोग भोगीं सुखाचे ॥९१॥
आतां ऐकें वो सुंदरी ॥ काय वसिलें त्वां अंतरीं ॥ येरी म्हणे नृत्य करीं ॥ गाऊनि गाणें मजसंगे ॥९२॥
नाचतां मी लावी हात ॥ तूंही तैसेंचि करीं सत्य ॥ इतुकेनि मनोरथ ॥ माझा सिध्दीस जाईल ॥९३॥
अवश्य म्हणे भस्मासुर ॥ नाचे विष्णूचिया समोर ॥ हरीनें उचलोनियां कर ॥ चरणावरी ठेविला ॥९४॥
गुडघे मांडया उरावरुत ॥ लक्ष्मीरमण लावी हात ॥ तैसेंचि भस्मासुर करीत ॥ अंतर पडों देईना ॥९५॥
ऐसें जाणोनि वैकुंठपाळ ॥ मस्तकीं ठेवी करकमळ ॥ तैसेंचि वर्तला असुर चांडाळ ॥ भस्म जाहला तत्काळीं ॥९६॥
विष्णूनें मायारुप त्यागोनि ॥ भस्मासुराची राख घेऊनी ॥ जेथें बैसले शिवभवानी ॥ तेचि स्थानीं पातला ॥९७॥
विष्णु म्हणे शिवाला ॥ ज्या भस्मांतूनी हा उदेला ॥ तेंचि लावूनि अंगाला जिरवीं जेथीच्या तेथेंच ॥९८॥
ज्या असुरें लाविला धाक ॥ त्याची जाळूनि केली राख ॥ आतां निर्भय होऊनि देख ॥ स्वस्थ जाईं कैलासा ॥९९॥
विष्णुवचन रविकिरण ॥ शिवउल्हास मनोजकमळीण ॥ हरिस प्रेमें आलिंगन ॥ म्हणे कैसें असुरा जाळिलें ॥१००॥
कोणें उपायें करुन ॥ असुर मारिला मन मोहून ॥ माझे पाहावया नयन ॥ क्षुधातुर उदित ॥१॥
शिवें प्रार्थितां विष्णूसी ॥ जाह्ला मोहनी लावण्यराशी ॥ पार्वती दिसे जैसी दासी ॥ ऐसें धरिलें रुप तेव्हां ॥२॥
हास्यवदनी मृगलोचना ॥ शिवासी ताडिलें कामबाणा ॥ विसरोनियां ते क्षणा ॥ धरुं धांवे हरीसी ॥३॥
विष्णु धाकें पळों लागला ॥ शिव पाठीसी धांविन्नला ॥ सांडोनियां कडासनाला ॥ फिटली कौपीन सुटल्या जटा ॥४॥
फिरोनि पाहे मुरारी ॥ पाठी लागला त्रिपुरारी ॥ वेष पालटोनी झडकरी ॥ गेला पळोनि वैकुंठा ॥५॥
शिव होऊनि पिशाचवत् ॥ धांवतां गळालें रेत ॥ लज्जित जाहलां मनांत ॥ गेला परतोनी स्वस्थाना ॥६॥
त्याचे रेताचा जाहला पारा ॥ लोक वेंचिती व्यवहारा ॥ ऐसी वर्तणूक त्या हरा ॥ केवीं ब्रह्मीं तुकावा ॥७॥
एके समयीं शिवाला ॥ विषयवासनेचा मद चढला ॥ विशेष वाढवूनि लिंगाला ॥ भोगूं पाहें गौरीसी ॥८॥
धाकें पळे हिमालयकुमरी ॥ पाठी लागला त्रिपुरारी ॥ एके ऋषीच्या गुंफेभीतरीं ॥ शरण गेली योगींद्रा ॥९॥
मुनीस म्हणे माझा प्राण ॥ वांचवीं शिवभयापासोन ॥ ऋषीनें देवोनि अभयवचन ॥ निर्भय केली जगदंबा ॥११०॥
तों पावला शिव मुनिसदन ॥ झोंबूं पाहे गौरीलागुन ॥ मुनीनें तें देखोन ॥ मनीं क्रोधाग्न पेटला ॥११॥
म्हणे पातालासी शंकरा ॥ भोगूं पाहसी सकुमार दारा ॥ कोणें पाजिला तुज धत्तुरां ॥ किंवा चढला कैफ शांभवीचा ॥१२॥
मग क्षोभोनि महाऋषी ॥ दारुण वदला शाप शिवासी ॥ तुझे लिंग भूमीसी ॥ गळोनि पडो तत्काळ ॥१३॥
ऋषिवचन वज्रधार ॥ लिंग कापून केलें चूर ॥ पतन होऊन महीवर ॥ जाहले तुकडे द्वादश ॥१४॥
तींच बारा ज्योतिर्लिंगें ॥ ऋषीनीं स्थापिलीं यथासांगें ॥ पूजा करिजे त्रिजगें ॥ ईश्वरनिष्ठा धरोनि ॥१५॥
तळीं पसरली शाळुंका ॥ ते योनिआकृति देखा ॥ ते लिंगाची पिंडिरेखा ॥ उभयतां भाग दोहींचा ॥१६॥
योनि आणि प्रजापती ॥ तोचि ईश्वर जन म्हणती ॥ नाहीं ज्ञानाची प्रकाशज्योती ॥ निष्ठा धरिती पाषाणी ॥१७॥
ईश्वर म्हणतां शिवाला ॥ ऋषीचा शाप कां लागला ॥ लिंगपतनातें पावला ॥ विचार करा चतुर हो ॥१८॥
इंद्र चंद्र हरि हर ॥ ब्रह्मा आणि सुरवर ॥ अवघे मायेचे किंकर ॥ व्यर्थ बडिवार मिरविती ॥१९॥
जितुके देव नामांकित देख ॥ तितक्यांस लागला कळंक ॥ हाही पुरता विवेक ॥ समजा तुम्ही अंतरीं ॥१२०॥
एके समयीं पार्वती ॥ बैसली होती एकांती ॥ इंद्र आपुल्या कार्यार्थी ॥ तेचि स्थानीं प्रवेशला ॥२१॥
नग्न होती भवानी ॥ इंद्रें अवलोकितां नयनीं ॥ लज्जा पावोनि तो मनीं ॥ मौनें फिरला मागुता ॥२२॥
पार्वती म्हणे रे नष्टा ॥ माते अवलोकिलें पापिष्ठा ॥ आतां घेई शाप दुष्टा ॥ सकळदेवासहित ॥२३॥
पावाल वृक्षांची दशा ॥ मृत्युलोक घडो अमरेशा ॥ आदिकरुनि महेशा ॥ शाप वदली जगदंबा ॥२४॥
त्यादिवसापासोन ॥ शिव वटीं जन्म घेऊन ॥ पारंब्या लोंबती जटांची खूण ॥ असे प्रत्यक्ष ते ठायीं ॥२५॥
विष्णूनें घेतला पिंपळवेष ॥ आवळीं जन्म इंद्रास ॥ ब्रह्मा झाला वो पळस ॥ शापें सत्य जाणपां ॥२६॥
देव तितकें आदिकरुनी ॥ वृक्षरुपें उतरले मेदिनीं ॥ नामें सांगतां विस्तारुनी ॥ होईल पाल्हाळ ग्रंथासी ॥२७॥
समस्त देवांची मंडळी ॥ मुख्य गवसून चंद्रमौळी ॥ याची राहटी सकळी ॥ श्रुत केली तुम्हांसी ॥२८॥
सकळ देवांसी चाळक ॥ आदिमायाचि देख ॥ हा नेणोनियां विवेक ॥ ईश्वर म्हणती भलत्यासी ॥२९॥
निराकार आणि सगुण ॥ मुख्य मायाचि कारण ॥ जियेपासोन तीन ॥ निर्माण जाहले यथार्थ ॥१३०॥
येथूनि ऋषि व्युत्पन्न ॥ सांगेन मायेचें महिमान ॥ श्रवण करोनि मुनिजन ॥ उत्तर देतील पुढारीं ॥३१॥
तेचि कथेचा विनोद ॥ श्रोतयां परिसवीन सुशब्द ॥ चतुरांस वाटेल आल्हाद ॥ म्हणतील पीयूष वाढिलें ॥३२॥
सामग्री आणोनियां पुरती ॥ वोपिली सुगरणीचे हातीं ॥ प्रकार करावया चित्तीं ॥ आळस कांहीं असेना ॥३३॥
तेवीं माझे बुध्दीला हरुष ॥ स्तवन करावया जगदीश ॥ ते पुरवावया आस ॥ साहित्य पुरवी सद्गुरुअ ॥३४॥
त्या गुरुसी करुनि नमन ॥ प्रेमें भरोनि अंत:करण ॥ शहामुनि कर जोडून ॥ ऐका म्हणे सज्जन हो ॥१३५
इति श्रीसिध्दांतबोधे अध्यात्मनिरुपणतत्त्वसारनिर्णये एकादशोध्याय: ॥११॥
अध्याय ॥११॥ ओंव्या ॥१३५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 23, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP