मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
आकर्ण धनुरासन *

आकर्ण धनुरासन *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. १७३ व १७५)
कर्ण म्हणजे कान. ‘आ’ या उपसर्गाचा अर्थ आहे ‘कडे’. धनु म्हणजे धनुष्य. या आसनामध्ये एखादा तिरंदाज धनुष्याची दोरी ओढतो त्याप्रमाणे टाच कानाजवळ येईल अशा रीतीने डावे पाऊल वर खेचले जाते. उजवा पाय सरळ जमिनीवर टेकविलेला असतो, त्याचा आंगठा दुसर्‍या हाताने पकडला जातो. त्यानंतर वर उचललेला पाय जमिनीशी जवळजवळ काटकोन करील इतका ताठ केला जातो आणि सर्वकाळ आंगठा हातामध्ये ओढलेल्या धनुष्याप्रमाणे धरलेला राहातो. हे आसन खाली दोन टप्प्यांमध्ये दिले आहे.

पद्धती
१. पाय सरळ समोर पसरुन जमिनीवर बसा. (चित्र क्र. ७७)
२. उजव्या हाताचा आंगठा व पहिली दोन बोटे यांमध्ये उजव्या पावलाचा आंगठा धरा. याच पद्धतीने डाव्या पावलाचा आंगठाही पकडा. (चित्र क्र. १५३)
३. श्वास सोडा. डावे कोपर वाकवा आणि गुडघा वाकवून डावे पाऊल वर उचला. (चित्र क्र. १७२) एकदा श्वास घ्या. श्वास सोडा. आणि टाच डाव्या कानाशी येईल अशा पद्धतीने डावे पाऊल वर ओढा. त्याच वेळी डावा हात खांद्यापासून पाठीमागे ओढून धरा. (चित्र क्र. १७३) उजव्या पायाच्या आंगठ्यावरील पकड सोडू नका. सर्वकाळ उजवा पाय पसरलेला असू द्या. आणि त्या पायाची संपूर्ण मागची बाजू जमिनीवर टेकलेली राहू द्या. पसरलेला उजवा पाय गुडघ्याशी वाकता कामा नये.
४. नेहमीप्रमाणे श्वसन करीत या स्थितीत १५ ते २० सेकंद राहा. हा या आसनाचा पहिला टप्पा.
५. आता श्वास सोडा आणि पाय वरच्या दिशेला ताणा. (चित्र क्र. १७४) एकदा श्वास घ्या. श्वास सोडा. आणि पाय डाव्या कानाला स्पर्शेल इतका मागे ओढा. (चित्र क्र. १७५) दोन्ही पावलांच्या आंगठयावरील पकड कायम ठेवा. आणि दोन्ही पाय पूर्णपणे लांबवलेले असू द्या. ते गुडघ्यांशी वाकवू नका. या दुसर्‍या टप्प्यामध्ये शरीर तोलून धरण्याचा सराव होण्यास वेळ लागतो. नेहमीप्रमाणे श्वसन करीत, या स्थितीत १० ते १५ सेकंद राहा.
६. श्वास सोडा. डावा पाय गुडघ्याशी वाकवा. डावी टाच स्थिती क्र. ३ प्रमाणे डाव्या कानाशी आणा. (चित्र क्र. १७३) त्यानंतर डावा पाय जमिनीवर आणा आणि दोन्ही पाय जमिनीवर ताणून ठेवा. (चित्र क्र. १५३)
७. आता उजवे पाऊल उजव्या कानाशी ओढून ते उजव्या कानाजवळ वर उभे उचलून हे आसन उजव्या बाजूने पुन्हा करा. डावा पाय जमिनीवर सरळ पसरलेला असू द्या. आंगठयावरील हातांची पकड सोडू नका. दोन्ही बाजूंकडील आसनांना सारखाच वेळ द्या. नंतर आंगठे सोडा आणि विसावा घ्या.

परिणाम
या आसनाच्या अभ्यासामुळे पायाचे स्नायू अतिशय लवचिक बनतात. पोटाचे स्नायू आकुंचित होतात. त्यामुळे आतडी कार्यान्वित होतात. पुठ्ठ्याच्या सांध्यामधील बारीकसारीक विकृती नाहीशा होतात. पाठीच्या कण्याच्या खालच्या भागाला व्यायाम घडतो. हे आसन अतिशय डौलदार आहे. हे अत्यंत सहजपणे करता येईपर्यत आणि पट्टीचा तिरंदाज धनुष्यावरुन बाण सोडीत आहे असे रुप त्याला येईपर्यत त्याचा सराव करावा.

N/A

References : N/A
Last Updated : September 10, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP