मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
सिंहासन १ *

सिंहासन १ *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. १०९)
या आसनाला नरसिंह या विष्णूच्या एका अवताराचे नाव दिले आहे. आपल्याला दिवसा किंवा रात्री, घरात किंवा बाहेर, जमिनीवर किंवा पाण्यात आणि देवाच्या किंवा माणसाच्या, किंवा पशूंच्या हातून मृत्यू येऊ नये असा वर असुरांचा राजा हिरण्यकश्यपू याने ब्रह्मदेवाकडून मिळवला होता. नंतर हिरण्यकश्यपूने देवांना आणि मनुष्यांना, तसेच विष्णुभक्त असलेला आपला मुलगा प्रल्हाद यालाही त्रास देण्यास सुरवात केली. प्रल्हादाला त्याने अनेक दिव्यांमधून जायला लावले, परंतु विष्णूच्या कृपेमुळे तो सुरक्षित राहिला. आणि सर्वसाक्षी व सर्वशक्तीमान अशा विष्णूचे  महात्म्य अधिक श्रध्देने आणि जोमाने लोकांनी शिकवू लागला. त्यामुळे चिडून जाऊन हिरण्यकश्य़पूने मुलाला विचारले की विष्णू जर सर्वव्यापी असेल तर राजवाडयातल्या एखाद्या खांबामध्ये तो कसा दिसत नाही ? आपल्या मुलाची श्रध्दा ही कशी चुकीची आहे हे त्याला पटवून देण्यासाठी त्याने तुच्छतापूर्वक त्या खांबावर लाथ मारली. प्रल्हादाने विष्णूचा धावा केला, तेव्हा तो देव वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग माणसाचा अशा भयंकर रुपात खांबातून प्रकट झाला. देवाने हिरण्यकश्यपूला उचलले, स्वत: उंबरठयावर बसला आणि हिरण्यकश्यपूला मांडीवर घेऊन त्याने आपल्या पंज्याने त्याचे शरीर फाडून त्याला मारुन टाकले. भारतीय शिल्पांमध्ये नरसिंह अवतार अनेकदा दाखवला जातो. वेरुळच्या लेण्यांमध्ये अशा तर्‍हेची एक सामर्थ्यवान शिल्पकृती पाहायला मिळते. या आसनाचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार जुन्या ग्रंथांत सांगितलेला असून त्याची पध्दती येथे दिली आहे. दुसरा प्रकार करावयास कठीण असला तरी त्याच्यापासून लाभ अधिक चांगले मिळतात. हा प्रकार सिंहासन २ या शीर्षकाखाली दिला आहे. (चित्र क्र. ११०)   

पध्दती    
१.  पाय सरळ समोर पसरुन जमिनीवर बसा. (चित्र क्र. ७७)
२. ढुंगण उचला. उजवा गुडघा वाकवा आणि उजवे पाऊल डाव्या कुल्ल्याखाली ठेवा. डावा गुडघा मोडा आणि डावे पाऊल उजव्या कुल्ल्याखाली ठेवा. डावा घोटा उजव्या घोटयाच्या खाले असू द्या.
३. पायाची बोटे मागच्या बाजूस वळवून टाचांवर बसा.
४. शरीराचा भार मांडी आणि गुडघे यांवर टाका.
५. धड पुढच्या दिशेला न्या. गुडघे आणि पाठ ताठ ठेवा.
६. उजवा तळहात उजव्या गुडघ्यावर आणि डावा तळहात डाव्या गुढग्यावर ठेवा. हात सरळ पसरा आणि ताठ ठेवा. बोटे पसरुन ती गुडघ्यांवर दाबून ठेवा.
७. जबडा वासा आणि जीभ बाहेर काढून ती हनुवटीच्या दिशेने जास्तीत जास्त ताणा. (चित्र क्र. १०९)
८. भुवयांच्या मध्ये किंवा नाकाच्या अग्रावर दृष्टी खिळवा. या स्थितीत तोंडाने श्वसन करीत सुमारे ३० सेकंद रहा.
९. जीभ ओढून तोंडात न्या. गुडघ्यावरुन हात उचला आणि पाय लांब करा यानंतर प्रथम डावे पाऊल उजव्या कुल्ल्याखाली आणि नंतर उजवे पाऊल डाव्या कुल्ल्याखाली, अशा तर्‍हेने बसून हे आसन पुन्हा करा.
१०. दोन्ही बाजूंकडील आसनात सारखाच वेळ राहा.

परिणाम
या आसनामुळे श्वासाची दुर्गंधी जाते आणि जीभ स्वच्छ होते. सातत्याने हे आसन केल्यामुळे शब्दोच्चार अधिक स्पष्ट होऊ लागतात. त्यामुळे बोलताना चाचरणार्‍या व्यक्तींना हे आसन उपयुक्त आहे. या आसनामुळे तीन बंधांवर प्रभुत्व मिळविण्यास मदत होते. (विभाग ३ पाहा)

N/A

References : N/A
Last Updated : September 09, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP