मराठी मुख्य सूची|भारतीय शास्त्रे|योगशास्त्र|योगासने, बंध आणि क्रिया|
महामुद्रा पाच *

महामुद्रा पाच *

प्रत्येक आसनाच्या नावानंतर एक चिन्ह * दिले आहे. हे चिन्ह आसनाचा सोपेपणा-अवघडपणा (तीव्रता) सुचवतात.
एक चिन्ह म्हणजे आसन करायला सोपे, दोन चिन्ह म्हणजे आसन करायला थोडे अवघड, तर तीन चिन्हे म्हणजे आसन करायला जास्त अवघड, हे आसन कोणी जाणकारांच्या मार्गदर्शनानुसारच करावे.


(चित्र क्र. १२५)
महा म्हणजे थोर किंवा श्रेष्ठ आणि मुद्रा म्हणजे बंद करणे किंवा मोहोर लावणे. बसून करावयाच्या या आसनात धडाच्या वरच्या आणि खालच्या बाजूची द्वारे घट्ट मिटवली जातात.

पध्दती
१. पाय सरळ समोर पसरुन जमिनीवर बसा. (चित्र क्र. ७७)
२. डावा गुडघा वाकवा आणि डाव्या मांडीची बाहेरची बाजू व डावी पोटरी जमिनीला स्पर्शेल अशा रीतीने तो गुडघा डावीकडे न्या.
३. डावी टाच डाव्या मांडीच्या आतल्या बाजूला शिवणीच्या जवळ लावून ठेवा. डाव्या पायाचा आंगठा उजव्या मांडीच्या आतल्या बाजूला लागलेला असावा. लांबवलेला उजवा पाय आणि वाकवलेला डावा पाय यांच्यामध्ये काटकोन असावा.
४. दोन्ही हात उजव्या पावलाच्या दिशेला पसरा. आंगठे व तर्जन्या यांनी उजव्या पायाचा आंगठा पकडा.
५. डोके धडाकडे झुकवा. आणि उरोस्थीच्या लगत वर आणि गळपट्टीच्या हाडांच्या मधील खोबणीमध्ये हनुवटी टेकवा.
६. पाठीचा कणा पूर्णपणे ताणून धरा आणि उजवा पाय उजवीकडे कल देऊ नका.
७. पूर्णपणे दीर्घ असा श्वास घ्या. गुदद्वारापासून तो वरच्या पडद्याच्या दिशेला खेचा.
८. पोटावरील ताण सैल करा. श्वास सोडा. पुन्हा श्वास घ्या आणि पोटाची पकड कायम ठेवून श्वास रोखून धरा. वर सांगितल्याप्रमाणे हे आसन करुन १ ते ३ मिनिटे टिकवून धरा. (चित्र क्र. १२५)
९. पोटावरील ताण सैल करा. श्वास सोडा. डोके वर उचला. हात मोकळे सोडा. वाकवलेला पाय सरळ करा.
१०. आता डावा पाय सरळ आणि उजवा पाय वाकवलेला अशा तर्‍हेने उलटया बाजूने आधीच्या इतकाच वेळ हे आसन पुन्हा करा.

परिणाम
या आसनामुळे पोटातील अवयव, मूत्रपिंड, आणि मूत्रस्थ ग्रंथी सुधारतात. गर्भाशय सरकल्यामुळे ज्या स्त्रियांना त्रास होतो त्यांना या आसनामुळे गर्भाशय योग्य जागी येत असल्यामुळे आरामा वाटतो. प्लीहेचा विकार किंवा पौरुषग्रंथींची वृध्दी यांचा त्रास असलेल्या व्यक्तींना या आसनात दीर्घकाळ राहिल्यास फायदा होतो. या आसनामुळे अपचन नाहीसे होते. ‘ही महामुद्रा मृत्यू आणि इतर अनेक दु:खे यांचा नाश करते.’ ‘खाता येणार नाही किंवा वर्ज्य केली पाहिजे अशी एकही वस्तू महामुद्रेचा सराव केल्यास जगात राहात नाही. कोणत्याही चवीचे अन्न, इतकेच काय परंतु प्राणघातक विषसुध्दा पचवता येत्ते.’ ‘जी व्यक्ती महामुद्रा नियमाने करते तिला क्षय, कुष्ठरोग, मूळव्याध, प्लीहावृध्दी, अजीर्ण आणि इतर दीर्घकालीन विकारांवर विजय मिळवता येतो. (हठयोग प्रदीपिका - अध्याय ३; श्लोक क्र. १४, १६, १७)

N/A

References : N/A
Last Updated : September 09, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP