श्रावण वद्य १४

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


(१) अहल्याबाई होळकर यांचें निधन !

शके १७१७ च्या श्रावण व. १४ या दिवशीं पुण्यातील साध्वी राणी अहल्याबाई होळकर हिचा अंत झाला. औदार्य, न्यायप्रियता, भूतदया, सदाचरण, इत्यादि भारतीय संस्कृतीच्या गुणांचें मूर्तिमंत प्रतीक म्हणून लोक अहल्याबाईकडे पाहतात. प्रसिद्ध मल्हारराव होळकरांची ही सून. पति खंडेराव व्यसनी निघाला म्हणून हिच्या मनाची उदासीनता वाढली. पुढें कुंभेरीच्या वेढयांत खंडेराव मयत झाल्यावर अहल्या सती जाण्यास निघाली असतां "तूं आम्हांकडे पाहूण मागें राहिलीस तर खंडू राहिला व अहल्या गेली -" अशी विनवणी मल्हाररावानें केल्यामुळें सहगमन तहकूब करुन संस्थानचा सर्व कारभार तिनें आपल्या हातांत घेतला. अहल्या बुद्धिमान व बाणेदार होती. संस्थानच्या कारभारांत ढवळाढवळ करण्याच्या इराद्यानें राघोबादादानें इंदूरवर चाल करण्याचा धाक घातला. तरी राणी डगमगलीं नाहीं. लढ्याची सिद्धता करुन दादास कळविलें - "माझा पराभव झाला तरी मी अबलाच आहे. पण आपणांवर जर तो प्रसंग आला तर जग काय म्हणेल ? राघोबा नरमून गेला. बाईच्या धर्मशील आचरणामुळें तत्कालीन राजेराजवाड्यांचा हिच्यावर फार विश्वास होता. शिलकीच्या पैशाचा विनियोग अहल्याबाईनें सार्वजनिक कामांत केला. अन्नछत्रें, धर्मशाळा, विहिरी, घाट जागजागीं बांधले. कलकत्त्यापासून काशीपावेतों मोठा थोरला रस्ता बांधला. सोरटी सोमनाथाचें देवालय नवीन बांधवून हिनेंच त्यांत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. अशी ही अहल्या बीड तालुक्यांतील चौंढे गांवच्या पाटलाची साधी मुलगी होळकरांची राणी झाली आणि आपल्या पुण्यशील वर्तणुकीनें व आदर्श राज्यव्यवस्थेमुळें आपलें नांव भारतीयांना आदर्श म्हणून ठेवून अहल्याराणी शके १७१७ मध्यें श्रावण व. १४ या दिवशीं निधन पावली. अहल्याबाई दिसण्यांत सुंदर नसली तरी तिचा चेहरा अत्यंत तेजस्वी होता. वृत्ति शांत आणि गंभीर असे. या थोर स्त्रीच्या चारित्र्यामुळें मराठ्यांचा नैतिक दर्जा खूपच वाढला.

- १३ ऑगस्ट १७९५
-------------------------

(२) भरतखंड स्वतंत्र झालें !

शके १८६९ च्या श्रावण व. १४ रोजीं पंडित नेहरु यांनीं म्हटल्याप्रमाणें - ‘मध्यरात्रीं बारा वाजतां सारें जग निद्रित असतां भारतानें नवचैतन्यानें जागृत होऊन स्वातंत्र्य संपादन केलें. -’ दीडशें वर्षांच्या गुलामगिरीच्या शृंखला भारतमातेच्या पायांतून तुटून गेल्या. स्वातंत्र्याचा जयजयकार भरतखंडाच्या कानाकोपर्‍यांतून गर्जू लागला. ‘मी आतां तुमच्यांतील एक’ अशी घोषणा लाँर्ड माउंटबँटन यांनी केली. भारताच्या राजधानींत एकतीस तोफांची सलामी झाल्यावर घटनासमितीच्या इमारतीवरील ‘युनियन जॅक’  खालीं उतरुन तेथें स्वतंत्र भारताचा नवा राष्ट्रध्वज फडकविण्यांत आला. आणि सार्‍या भारतांत आनंदाचे सोहाळे सुरु झाले. या उत्साहाच्या सोहळ्याच्या वेळींच जबाबदार भारतीयांना दु:ख वाटत होतें. उत्साहाच्या लाटेनें उसळी मारल्याबरोबर ती विरुन जात होती. कारण अखंड भारत खंडित झाला होता. बाबू राजेंद्रप्रसादांनीं बोलूनच दाखविले, "आजचा दिवस आनंदाचा, उत्साहाचा आहे यांत शंकाच नाहीं, पण भरतखंड हें ईश्वरानें आणि निसर्गानें अखंड व एकजिनसी असें निर्मित केलें असतां आणि संस्कृति व परंपरा यांनीं एक असतां तें आज दुभंगलें आहे -" जगप्रसिद्ध योगी श्री. अरविंदबाबू यांनीं इषारा दिला कीं - "देशमातेचें देऊळ भंगलेलें आहे, तें एकसंघ केल्याविना देशाचें भवितव्य ठीक नाहीं." वयोवृद्ध अपक्ष संपादक के. नटराजन्‍ यांनीं आपल्या रुग्णशय्येवरुन सूचित केलें कीं, देशाचें अंत:करण घायाळ असतां उत्सव करणें उचित नाहीं. अशा प्रकारची दु:खद जाणीव सर्वांच्या अंत:करणांना बोचत होती. अखंड भारताचा अभिमान फार पूर्वीपासूनच भारतीयांना होता. "अटक नदीचे अलीकडे दक्षिणसमुद्रापावेतों हिंदूंचें स्थान-तुर्कस्थान नव्हे - हे आपली हद्द पांडवापासून विक्रमाजितापावेतों त्यांनी राखून उपभोग केला " अशा प्रकारचीं वाक्यें इतिहासांतील मुत्सद्यांच्या पत्रांतून सांपडतात. तरी पण श्रावण व. १४ हा अपूर्व दिवस होता. फार मोठा टप्पा भारतानें या दिवशीं गांठला आणि आपली मान अधिक उन्नत केली - !

- १५ ऑगस्ट १९४७

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP