श्रावण वद्य ६

दिन विशेष - वर्षातील प्रत्येक दिवसाचे ऐतिहासीक महत्व.


प्रामाणिकपणाची चूक !

शके १८४७ च्या श्रावण व. ६ रोजीं प्रसिद्ध ‘काकोरी’ प्रकरणांतील क्रांतिकारकांनीं लखनौजवळील काकोरे स्टेशनावर एक आगगाडी लुटली. काकोरी कटाचे सूत्रधार शचींद्रनाथ संन्याल व योगेशचंद्र चतर्जी हे होते. शचींद्र संन्याल हे पूर्वी क्रांतिकारकांच्या खटल्याबद्दलच भीषण शिक्षा भोगून आलेले होते. त्यांना झालेली आजन्म काळ्या पाण्याची शिक्षा लाहोरच्या कटाचे वेळीं झाली होती. सन १९२० च्या सावत्रिक सुटकेमुळें त्यांचीहि सुटका झाली. आणि त्यानंतर त्यांनी पं. रामप्रसाद बिस्मल यांच्या साह्यानें ‘हिंदुस्थान रिपब्लिक संस्था’ स्थापन केली; आणि हिच्या तर्फेच काकोरी कटाची निर्मिर्ति झाली. पुन: त्यांनी शस्त्रें जमवून दहाबारा राजकीय दरवडे घालून सरकारास हालवून सोडिलें. आणि सरकारी आगगाड्या थोपवून खजिने लुटले. कारण त्यांना सशस्त्र क्रांतीवांचून दुसरा उपाय सुचत नव्हता. चालत्या गाडीसच रोखून धरुन त्यांनीं हल्ला केला. प्रवाशांना त्यांनीं कळविलें कीं, आम्ही फक्त खजिना लुटणार आहोंत, तुम्ही निर्भय असा. एकदोन प्रवासी विरोध करुं लागले, त्यांना मात्र गोळ्या खाव्या लागल्या. पुढें लौकरच खटल्यास सुरुवात झाली. अशकाफउल्ला खां, चंद्रशेखर आझाद, मन्मथनाथ गुप्ता, इत्यादि चाळीस तरुण खटल्यांत होते. शेंकडों साक्षी होऊन न्यायाधीशानें सांगितलें " "सशस्त्र क्रांति करुन हिंदुस्थानांत स्वातंत्र्य स्थापिण्याचा ‘कट’ आरोपींनीं केला. त्यासाठीं सरकारी अधिकार्‍यांवर हल्ले केले, खजिने लुटले, स्फोटक साहित्य जमविलें, दरवडे घातले." निर्णयांत राजेंद्रनाथ लाहिरी, रामप्रसादजी आणि रौशनसिंग यांना फांशीची शिक्षा सांगण्यांत आली. शचींद्र संन्यालांना जन्मठेप काळें पाणी, मन्मथनाथ गुप्तांना चौदा वर्षे, खत्री, खन्ना, इत्यादींना दहा दहा वर्षे अशा भयंकर शिक्षा ठोठावून न्यायमूर्ति म्हणाले, "ज्या मार्गानें तुम्ही स्वातंत्र्य संपादन करुं इच्छीत होतां तो मार्ग चुकला होता. पण ती चुकी प्रामाणिकपणाची होती. तुमच्या तत्त्वांनुसार तुम्ही प्रामाणिकपणें झुंजलांत. मी स्पष्टपणें सांगतों कीं, या सर्व खटाटोपांत स्वार्थाचा ‘लवलेशहि तुम्हांस शिवला नव्हता. तुम्ही जें जें केलेंत तें तें स्वदेशासाठींच केलेंत."

- ९ आँगस्ट १९२५

N/A

References : N/A
Last Updated : September 26, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP