प्रसंग पंधरावा - सद्‌गुरुसेवाभाव व सद्‌गुरूची थोरीव

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


जैसा गोडीस झोंबे मुंगळा । ओढितां होये वेगळा । तैसं प्रवर्तावें वेळोवेळां । सद्‌गुरुचरणी ॥९१॥
जैसा निःसंग होउनि मासा । आहारालागी गळ गिळी तैसा । ऐसीच विषयांची आशा । जीव घात करी ॥९२॥
दृष्‍टीं देखोनियां सुंदरी । एकाग्र होती अविचारी । तैसें मन गुरुचरणावरी । माथा ठेवावा ॥९३॥
दरवडा घ्‍यावया दरवडेकरी । नानापरीचा लाग करी । तैसा भाव सद्‌गुरुसेवेवरी । धरावा श्रोतीं वक्तीं ॥९४॥
पक्षी कवड्या पंखाडे आवळणें । लक्षीनें न्याहाळून मीनें । बुडी आंघोळी ग्रास करणें । तैसें व्हावें गुरुचरणीं ॥९५॥
सुसरी बसून समुद्राभीतरीं । मोत्‍यें सांडून विष्‍टा आहार करी । तैसेंच जन जाले अविचारी । साधू सांडूनियां ॥९६॥
उडता पक्षी तो राजहंस । त्‍याला मोतियाचा सौरस । तैसा साधुसंतांस विश्र्वास सोऽहं नामरत्‍नांचा ॥९७॥
कमलिनीचें खोडी दर्दुर । परिमळे वोसंडले भ्रमर । तैसे साधूचे बोधविचार । प्रेम नामासंगे ॥९८॥
तैसे जन हे दर्दुर परियेसा । घेवों नेणेत साधुच्या रसा । जैसे विष्‍टा विरादून वायस । किडे भक्षण करिती ॥९९॥
चाटु फिरे षड्रसांभीतरी । परि तो चवि नेणें अद्यापवरी । तैसा जनीं जनार्दन विचारीं । हे जन जनार्दनीं ॥१००॥
पहा त्‍या मधाचा सायास । मक्षिकें मध केलासे उदास । मुखाग्रीं असोनि जाली निरास । झाडून आणिक भक्षिती ॥१०१॥
ओळंबे सायासें करिती महामारें । पाताळीं बांधूनियां मंदिरें । अंतीं डंखिलें भुजंगें विखारें । ग्रास करूनि बैसले ॥१०२॥
तदन्यायें जनाचा पर्वकाळ । अंगसंगें जपे महाकाळ । त्‍यास गिळितां न लगेच वेळ । पळ आयुष्‍य पुरों देतो ॥१०३॥
आयुष्‍य पुरल्‍या निरुतें । पात्‍यास लागों नेदी पातें । ग्रासील करूनियां दुश्र्चित्तें । सद्‌गुरु तत्‍पर सेवा ॥१०४॥
जैसा तो मृगजळाचा पूर । तैसा वोळखा मायाकार । जवळ गेल्‍या मिथ्‍या विचार । भासत असे ॥१०५॥
गुरुकृपा उजळे ज्‍यासी । ते मिथ्‍या भाविती आकारासी । येर गुंतले जैशी जळां मासी । गुंडाळुनी मेली ॥१०६॥
रविनें देखिलें विश्र्वजनास । जन देखोन ना वोळखे भानूस । तैसा साधु जगीं उदास । दीक्षा कोणी नेणती ॥१०७॥
काळा गोरा सांवळा राजस । नाहीं रवीस दिसे प्रकाश । न्याहाळूनि पाहातां नेत्रांस । लागती धारा ॥१०८॥
तैसा साधूचा उजेड वचनीं । अंतर गुह्य नेणेत महिमान । ब्रह्मादिक नेणती खुण । सद्‌गुरु स्‍वामीची ॥१०९॥
कांतेस होती आवड डोहोळे । भक्षिजे खापरें ढेकळें । ते प्रसिद्ध जनाला न कळे । गर्भ गुह्यें नेणती ॥११०॥
तैसा तत्त्वबोधी गुज निवांत । न कळे त्‍या साधूचा अंत । ऐका वैखरी ते ज्ञान मत । श्रांत्‍यांस कळों आली ॥१११॥
परी आत्‍म्‍याचा आभार नाहीं जना । त्‍या सांगेन ऐका उदास खुणा । सावध व्हावें अनुसंधाना । शेख महंमद म्‍हणे ॥११२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP