अन्वयव्यतिरेक - चतुर्थ: समास:

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥ श्रीराम समर्थ ॥  
ऐसा हा अन्वय जाला । स्वल्प संकेतें बोलिला । न्यून पूर्ण क्षमा केला । पाहिजे संतीं ॥१॥
पुढें व्यतिरेक निरूपण । निरोपिजेल जाण । येथें श्रोतीं सावधपण । अर्थ पाहावा ॥२॥
व्यतिरेक ऐसें म्हणिजे । अन्वयेंचि ओळ-खिजे । येथें मूळमाया न साजे । येथें शब्द कैंचा ॥३॥
दोरीचा सर्प जालचि नाहीं । तेथें अन्वय कैंचा कांहीं । संसार तो मुळींच नाहीं । म्हणूनिया ॥४॥
स्वरूपीं कांहीं जालें असतें । तरी तयासी संहारिजेतें । पूर्णीं कांहीं जालेंचि नाहीं तें । काय मारावें ॥५॥
नसोनि जालेंसें वाटलें । म्हणोनि उद्भवासि बोलिलें । नसतें अज्ञान देखिलें । अन्वयें येथ ॥६॥
जें लटिकें उद्भवलें । तयापरी संहारिलें । तयासी नांव ठेविलें । व्यतिरेक ऐसें ॥७॥
उद्भवासी पंचप्रळय बोलिले । शास्त्रीं असे निरोपिलें । तेंहि पाहिजे परिसविलें । स्वानुभवेंसी ॥८॥
पिंडीं दोन्ही ब्राह्मांडी दोन्ही । पांचवा जाणिजे ज्ञातेजनीं । हीच कथा मुळींहुनी । सावध ऐका ॥९॥
प्राणी जेव्हां निजेला । तेव्हां जागृतीव्यापार राहिला । स्वप्र अथवा सुषुप्ती त्याला । प्राप्त होय ॥१०॥
यासि बोलिजे निद्राप्रळय । जागृतीचा होतो क्षय । पुढें देहांतसमय । म्हणिजे मृत्यु ॥११॥
देह आत्मयाचे संगती । सुटतां होय मृती । प्राप्ती तो मृत्युप्रळय श्रोतीं । पिंडीं ओळखावा ॥१२॥
जोंवरी अज्ञान न नासे । तोंवरी जन्ममृत्यु न निरसे । म्हणोनी स्वरूपज्ञाना ऐसें । सार नाहीं ॥१३॥
चत्वारी युगें सहस्त्र होती । ब्रह्मयाची निद्रा प्राप्ती । तोचि लघुप्रळय श्रोतीं । ब्रह्मांडीं ओळखावा ॥१४॥
चत्वारी खाणी नासती । पंचभूतें तैसींचि असती । ब्रह्मयाची उठतां संसृती । खाणीस होय ॥१५॥
ऐसा लघुप्रळय । ब्रह्मांडींचा नि:संशय । तिहीं देवांचें वेंचे वय । तो महाप्रळय बोलिजे ॥१६॥
शत वर्षें मेघ जाती । तेणें प्राणी मृत्यु पावती । वायुचक्रीं असती । देह सांडोनी ॥१७॥
शत वर्षें मेघ गेले । तेणें प्राणी मृत्यु पावले । पायुचक्रीं वास्तव्य केलें । देह सोडोनियां ॥१८॥
बारा कळीं सूर्यमंडळ । किरणापाससाव निघती ज्वाळ । शत संवत्सर हा भूगोळ । दहान होय ॥१९॥
शंभर वर्षें मेघ नाहीं । पृथ्वी शुष्क जाली सर्वही । सूर्य जाळी तेही । पाताळपंर्यत ॥२०॥
शेषाच्या फणा पोळल्या । त्या हळहळोनि गरळा वमिल्या । तेणें अग्रीनें जाळिल्या । पाताळव्यक्ती ॥२१॥
शेषकूर्म जळाले । मेरूचे कदे कोसळले । तेव्हाम देवीं सांडिले । स्थूल देह ॥२२॥
पृथिवी अवघी तप्त जाली । जळोनी विरी सांपडली । आवरणोदकीं कालविली । तियेची रक्षा ॥२३॥
स्वर्ग मृत्यु पाताळ । तिहीं लोकींचीं शरीरें सकळ । नासोनि उरलीं केवळ । लिंगरूपें प्रभजनीं ॥२४॥
त्यावरी महावृष्टि जाली । मेघीं गर्जना मांडिली । नाना-परींची उठली । ध्वनी विद्युल्लतांची ॥२५॥
पर्वतांतून पडती गारा । असंभाव्य सुटतो वारा । निबिड तया अंधकारा । तया उपमा कैंची ॥२६॥
नद्या समुद्र एकवटले । आवरणवेढे मोकळे जाले । उदकरूप जालिया खवळे । प्रळयपावक ॥२७॥
समुद्रींचा वडवानळ । शिवनेत्रींचा नेत्रानळ । सूर्य आणि विद्युल्लतेचा मेळ । आणि वनाग्नि ॥२८॥
अग्नि मात्र एक झाले । तेणें उदक शोषिलें । तया वन्हीस झडपिलें । प्रळयवातें ॥२९॥
तो जैसा दीप मावळला । तैसा प्रळयाग्नि विझाला । पुढें निखिल वायु उरला । आकाशपंथें ॥३०॥
जोंवरी आस्तिक्य वायूसी तोंवरी आकाशत्व ब्रह्मासी । तया वायूचे विनाशीं । नभत्व कैंचें ॥३१॥
सूक्ष्म भूतें त्रिगुण भूतें त्रिगुण । महत्तत्व मूळमाया जाण । वायूरूपें विवरण । करूनि पाहावें ॥३२॥
तो वायु जेव्हां विराला । तेव्हां नाश झाला त्रिगुणांला । महत्तत्त्व मूळमायेला । तयाचिसरिसा ॥३३॥
मूळमायेचेनि गुणें । ईश्वर ब्रह्मासी म्हणणें । तिचा नाश होतां कोणें । ईश्वर म्हणावें ॥३४॥
जोंवरी मायेसी असतेपण । तोंवरी ईश्वरीं जाणपण । तिच्या निरासीं पूर्ण । जाणीव कैंची ॥३५॥
द्रष्टा साक्षी सत्ता । हे गुण मायेचिकरितां । जाणीव ईश्वर तत्त्वतां । तियेसीचि म्हणिजे ॥३६॥
ब्रह्म ऐसें जें म्हणणें । तेंहि तियेच्या गुणें । ते जाणीव नसतां कोणें । शब्द बोलावा ॥३७॥
म्हणूनि जें अनिर्वाच्य । तेथें कैंचें नाम निर्वाच्य । ऐसेंहि बोलणें आहाच । कैंचें तेथें ॥३८॥
ऐसे हे प्रळय चारी । निरोपिले अवधारी । पुढें पांचव्याची परी । सावध ऐका ॥३९॥
परी ज्ञानेविण लया गेले । ते मागुती उद्भवले । याकारणें निरसिलें । पाहिजे अज्ञान ॥४०॥
म्हणोनि ज्ञानप्रळय श्रेष्ठ । चहूं प्रळयांहूनि वरिष्ठ । येणें चुकें अरिष्ट । जन्ममृत्यूंचें ॥४१॥
तेंचि पुढें निरूपण । पंच प्रळयांचें लक्षण । स्वामीविरहित कोण । पावूं शके ॥४२॥
इति श्री व्यतिरेक । याचा करावा निश्चय विवेक । स्वामिकृपें निश्चयात्मक । मोक्ष होय ॥४३॥
इति चतुर्थ: समास: ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP