अन्वयव्यतिरेक - द्वितीय: समास:

समर्थ रामदास स्वामींचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यात सन १६०८, शके १५३० रोजी झाला.  


॥श्रीराम समर्थ ॥
मुळीं ब्रह्म निराकार । निराभास परात्पर । निर्गुण वस्तु निराधार । असतचि असे ॥१॥
जेथें जाणणें ना नेणणें । जेथें उपजणें ना मरणें । तेथें येणें ना जाणें । असेचिना  ॥२॥
उपाधिविणें जें आकाश । तेंचि ब्रह्म निराभास । तये निराभासीं मूळमायेस । जन्म जाहला ॥३॥
अरे जें मुळीं जालेंचि नाहीं । त्याची वार्ता सांगो कायी । प्रबोधनिमित्त कांहीं । बोलणें लागे ॥४॥
मुळीं ब्रह्म निराकार । तेथें स्फूर्तिरूपें अहंकार । तो पंचभूतांचा विस्तार । ज्ञानदशकीं बोलिला ॥५॥
अहं ब्रह्मास्मि ऐसें स्फुरण । महावाक्यचतुष्टय जाण । हरिसंकल्प हें प्रमाण । बोलिलें अन्वयीं ॥६॥
तें स्फुरण जाणीवरूप । जाणीवेआंगीं वायुस्वरूप । ऐसे हे दोनी प्रकार एकरूप । असती सदा ॥७॥
जाणीवरूप स्फुरण जाले । त्यातें अनिर्वाच्य बोलिलें । त्यातें ईश्वर ऐसें नाम ठेविलें । मायागुणें ॥८॥
जोंवर असतेपण मूळमायेसी । तंववरी साक्षित्व ब्रह्मासी । जाणीव ईश्वर तयासी । नांव पडिलें ॥९॥
मूळ प्रकृति महाकारण देह सर्वेश्वराचें जाण त्यांत पंचभूतें जाण । सूक्ष्म असती ॥१०॥
वायु प्रकृति जाणीव पुरुष । दोनी मिळोनि अंतरात्मा विशेष । तोचि सकळांचा ईश । मायागुणें ॥११॥
सृष्टयादिक इच्छा जाली । तेचि अव्याकृती बोलिली । गुणत्रयातें प्रसवली । म्हणोनि गुणक्षोभिणी । बोलिजे ॥१२॥
ऐसा हा दुसरा देह । कारण सर्वेश्वराचा नि:संदेह । तेथूनि हिरण्यगर्भ देवतामय । निर्माण जालें ॥१३॥
सत्त्वगुणीं पंचक । रजोगुणीं पंचदशक । तमोगुणीं पंचभूतिक । तन्मात्रा जाला ॥१४॥
ऐसे पंचवीस प्रकार । मिळोनि हिरण्यगर्भ साचार । तिसरा देह निरंतर । बारा पाहों ॥१५॥
भूतें जडत्वा पावलीं । तेव्हां देवीं शरीरें धरिलीं । त्यासी विराटकाया बोलिली । ईश्वराची ॥१६॥
पुढें चत्वारी खाणी जाली । कर्त्यानें निर्माण केली । पुढें पंचीकरणें बोली । सावध ऐका ॥१७॥
ऐसे देह चत्वार । सर्वेश्वराचे साचार । त्यांचे निराभासी सार । अनिर्वाच्य असे ॥१८॥
मूळमाया अव्याकृती । हिरण्यगर्भ देवतामय असती । चौथे विराट हे जड स्थिती । ब्रह्मांडाची ॥१९॥
महाकारणरूप ज्ञान । कारणरूप अज्ञान । लिंगदेह वासनात्मक जाण । वायु असे ॥२०॥
ज्ञान अज्ञान वासनात्मक । तिन्ही मिळोनी रूप एक । प्रकृतिपुरुषांचे अंशक । असती तेथें ॥२१॥
अंत:करण मन बुद्धि चित्त अहंकार । आकाशपंचकाचा विचार । मूळपुरुषाचे अंश हे निर्धार । पांचहि एक ॥२२॥
एक अंतरात्म्याचिया । असती पांचहि क्रिया । म्हणोनि आकाश तया । म्हणिजेत असे ॥२३॥
प्राण अपान व्यान उदान समान । हे मूळ वायूचे अंश जाण । पांचहि नांवें भिन्न जाण । क्रियापरत्वें ॥२४॥
श्रोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण । हें तेजपंचक ज्ञानेंद्रिय जाण । कर्मेंद्रियपंचक सांगेन । सावध ऐका ॥२५॥
वाचा पाणी पाद । शिश्र आणि गुद । हे आपांश प्रसिद्ध । ओळखणें ॥२६॥
शब्द स्पर्श रूप रस गंध । हे पंच विषय पृथ्वीचे विशद । ये सोष्टीचा संवाद । प्रांजळ ऐका ॥२७॥
ऐसीं हीं पांच पंचकें । तीन असती क्रियारूपकें । दोन्ही प्रचीतीसी ओळखे । अंत:करण प्राण ॥२८॥
अंत:करण जाणीवरूप । प्राणवायु मायारूप । दोन्ही मिळोनि एक । अंतरात्मा तो ॥२९॥
निखिल जाणीव ब्रह्मांश । जीव बोलिजे तयास । मायायोगें विशेष । अंतरात्मा म्हणती ॥३०॥
तिन्ही पंचकें क्रियारूप । दोन्ही जिन्नस मायास्वरूप । पांचहि मिळोनि लिंगदेहरूप । सूक्ष्म असे ॥३१॥
अंत:करणपंचक जाणतें । प्राणपंचक चेतवितें । इंद्रियद्वारें भरोनि करवितें । विषयक्रिया ॥३२॥
जड चंचळ निश्चळ । त्रिपुटीयोगें क्रिया सबळ । वियोग होतां केवळ । कर्तृत्व कैंचें ॥३३॥
दशेंद्रियें स्थूळीं असती । क्रियारूपें सूक्ष्मीं वर्तती । देहात्मयोगें उठाती । नाना क्रिया ॥३४॥
सूर्य सूर्यकांत आणि कापूस । चौथा अग्नि होय दृश्य । म्हणऊनि कर्तृत्व विशेष । संयोगाचें ॥३५॥
तैसें अंत:करण निश्चळ । प्राणयोगें चंचळ । इंद्रिययोगें केवळ । कर्तृत्व भासे ॥३६॥
असो हे कथा । स्थूळदेहाची व्यवस्था । निरूपण कीजेल आतां । अवधान द्यावें ॥३७॥
अस्थि मांस त्वचा नाडी राम । हे पृथिवीचे गुण सुगम । प्रत्यक्ष शरीरीं वर्म । प्रचीत पाहतां ॥३८॥
लाळ मूत्र शुक्र शोणित स्वेद । हे आपांश प्रसिद्ध । अग्निगुण विशद । सावध ऐका ॥३९॥
क्षुधा तृषा आलस्य निद्रा मैथुन । हे अग्रीचे अंश जाण । या तत्त्वाचें विवरण । केलेंचि करावें ॥४०॥
चळण वळण आकुंचन । प्रसारण आणि निरोधन । हे वायूचे विशेष गुण । प्रसिद्ध असती ॥४१॥
काम क्रोध शोक मोह भय । हें आकाश नि:संशय । ये गोष्टीचा प्रत्यय । सावध ऐका ॥४२॥
आकाशादि आपपर्यंत । चारी पंचकें जीं असत । ते देहात्मयोगें वर्तत । जडदेहीं ॥४३॥
देह आत्म्याची संगती । तोंवरी चारी पंचकें दिसती । वियोग होतां प्रचीती । एक उरे ॥४४॥
म्हणोनि पृथ्वी अधिष्ठान स्थूलदेहाचें । अंतरात्मा अधिष्ठान लिंगदेहाचें । देहात्मयोगें त्रेताळीसाचें । कर्तृत्व उठे ॥४५॥
तें कर्तृत्व म्हणसी कैसें । चित्त ठेवून ऐक अंमळसें । परी हे प्रचीति विश्वासें । अंतरीं धरी ॥४६॥
तरी अंत:करणपंचक । चत्वारी क्रिया जाणीव एक । तैसेंचि प्राणपंचक । त्याचिसारखें ॥४७॥
इंद्रियदशक विषयपंचक । देहात्मयोगें क्रियारूपक । पंचदश अंशक । क्रियालिंगीं ॥४८॥
स्थूळी चार पंचकें । लिंगींचीं तेवीस नेमकें । दोनीहि मिळोनि विवेकें । त्रेताळीस जालीं ॥४९॥
म्हणोनि जाणीव वायु लिंगदेह । जीव अंतरात्मा नि:संदेह । वायुनिरासें होय । जीव ब्रह्म ॥५०॥
स्थूळ देह पृथ्वीरूपक लिंगदेह वायु वासनात्मक । कारण महाकारणाचें कौतुक । याचमध्यें ॥५१॥
सूक्ष्म कारण महाकारण । दोन्ही मिळोनि एक सान । ऐसे दोन्ही देह जाण । प्रचीतिरूप ॥५२॥
ऐसेचि देहद्वय ईश्वराचे । असे प्रचीतिरूपाचे । विराट हिरण्यगर्भ साचे । निश्चयात्मक ॥५३॥
तरी तो निश्चय केला कैसा । तुज निरोपिजेल ऐसा । अनुमान भ्रमाचा वळसा । सांडूनि द्यावा ॥५४॥
विराट जद पृथ्वीरूप । जितुकें दृश्याचें कौतुक । आप अग्रि द्वय एक । तिन्ही भूतें ॥५५॥
तिन्ही भूतें दृश्य जड । वायु आकाशें चंचळ अजड । प्रकृति अव्याकृति हा पवाड । दोन्हीचमध्यें ॥५६॥
भूतें दैवतें देवा देव । वायुचक्रीं असती सर्व । कार्यामुळें अवेव । दाखविती ॥५७॥
आकाश अंत:करण जाणीव । तोहि वायूचा स्वभाव । आकाश वायू निरावेव । एकचि रूप ॥५८॥
मूळप्रकृति अव्याकृती । हिरणगर्भ देवतामय असती । तिन्ही मिळोनी प्रचीति । द्वयभूतिक ॥५९॥
त्रय भूतें अधिष्ठान विराटाचें । द्बयभूतें अधिष्ठान हिरण्यगर्भाचें । गुणसाम्य गुणक्षोभिणीचें । तचि रूप ॥६०॥
म्हणोनी ईश्वरीं देह । द्बय असती नि:संदेह । तिन्ही भूतें अविद्यामय । द्वयें मायेचीं ॥६१॥
देहद्वयाचें बंधन । जीवासि म्हणती विवेकी जन । तैसेंचि सर्वेश्वरीं जाण । तत्प्रकारेंचि ॥६२॥
ऐसीं पिंडीं दोन ब्रह्मांडीं दोन । चत्वारी देह प्रचीति प्रमाण । यावेगळें अनुमानज्ञान । बोलोंचि नये ॥६३॥
इतिश्री अन्वय । केलचि करूं निश्चय । प्रचीतीनें सांपडे सोय । स्वरूपाची ॥६४॥
इति द्वितीय: समास: ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2014

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP