अध्याय सत्तावीसावा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते .


ऊर्ध्वपंथेंचि ठेवून ॥ भुजाबळें भोवंडून ॥ वृक्षावरी घातला नेऊन ॥ राघवापासी परतला ॥५१॥

भय आणि शाहारे पूर्ण ॥ गेले कपीचें निघोन ॥ जैसा उगवतां सहस्रकिरण ॥ तम जाय निरसोनि ॥५२॥

कीं हनुमंतें बळ दावून ॥ वानरांसी दिधलें रसायन ॥ हिमज्वरभय दारुण ॥ निघोन गेलें सर्वही ॥५३॥

असो श्रीरामचरणीं भाळ ॥ ठेवी अंजनीचा बाळ ॥ मग सुग्रीवादि कपी सकळ ॥ धांवोन भेटती हनुमंता ॥५४॥

शब्दसुमनें स्तुतिमाळा ॥ कपी घालिती मारुतीच्या गळां ॥ म्हणती कुंभकर्ण कवेंत सांपडला ॥ तरी कां सोडिला कळेना ॥५५॥

मारुतीचा अंतरार्थ ॥ कपीतें सांगे रघुनाथ ॥ त्यास माझे हातीं मृत्य ॥ हें हनुमंत जाणतसे ॥५६॥

सिंहावलोकने निश्चिती ॥ मागील कथा परिसावी श्रोतीं ॥ कुंभकर्ण जात सभेप्रती ॥ रावणासी भेटावया ॥५७॥

बंधु सन्मुख देखोन ॥ हरुषें कोंदला दशानन ॥ कुंभकर्ण प्रणिपात करून ॥ निजस्थानीं बैसला ॥५८॥

जेंवी मेघ करी गर्जन ॥ तेवी बोले कुंभकर्ण ॥ काय संकट पडिले येऊन ॥ म्हणोनि मज जागविलें ॥५९॥

महाप्रलय मांडला ॥ की उर्वी जात होती रसातळा ॥किंवा कृतांत चालून आला ॥ म्हणोनि मज जागविलें ॥६०॥

सांगे रावण वर्तमान ॥ जानकी आणिली हिरून ॥ यालागीं वानरदळ घेऊन ॥ सुवेळेसी राम आला ॥६१॥

धूम्राक्ष आणि वज्रदंष्ट्री ॥ प्रहस्त प्रधान पडला समरीं ॥ मग मी युद्धा गेलो झडकरी ॥ परी पावलो पराजय ॥६२॥

मज परम संकट पडलें ॥ म्हणोनि बंधु तुज जागविलें ॥ मज चिंताव्याधीनें पीडिलें ॥ त्यासी औषध देईं तूं ॥६३॥

संकटीं बंधु पावे साचार ॥ दरिद्रकाळीं जाणिजे मित्र ॥ संशय निरसावया समग्र ॥ सद्रुरुचरण धरावे ॥६४॥

तम दाटले जरी घोर ॥ तरी दीपिका पाजळाव्या सत्वर ॥ येतां वैरियाचें शस्त्र ॥ वोडण पुढें करावें ॥६५॥

दुष्काळ पडतां अत्यंत ॥ दात्यापासी जावें त्वरित ॥ संकट आम्हां पडलें बहुत ॥ म्हणोनि तुज जागविलें ॥६६॥

यावरी बोले कुंभकर्ण ॥ बुद्धि कर्मानुसारिणी पूर्ण ॥ जानकी व्यर्थ आणून ॥ कुळक्षय आरंभिला ॥६७॥

राम हा वैकुंठवासी नारायण ॥ सुरांचे अवतार वानर पूर्ण ॥ हें नारदें वर्तमान ॥ पूर्वींच मज सांगितलें ॥६८॥

असो जें शुभाशुभ कर्म होत ॥ तें भोगल्याविण न चुकत ॥ पुढील होणार भविष्यार्थ ॥ तो न चुके कदाही ॥६९॥

करूं नये तें त्वां राया केलें ॥ शेवटीं सीतेस तरी भोगिलें ॥ येरू म्हणे बहुत यत्न केले ॥ परी ते वश न होय ॥७०॥

ती रामावेगळी तत्वतां ॥ आणिकां वश नव्हे सर्वथा ॥ कुंभकर्ण म्हणे लंकानाथा ॥ राघवरूप धरीं तूं ॥७१॥

जपोनियां कापट्य़मंत्र ॥ होईं सुंदर रघुवीर ॥ सीता होईल वश साचार ॥ क्षणमात्रें न लागतां ॥७२॥

मग बोले लंकेश्वर ॥ मी जैं निजांगें होईन रघुवीर ॥ तेव्हां दुर्वासना समग्र ॥ मावळेल माझी समूळी ॥७३॥

घरासी येतां वासरमणी ॥ तम न उरे ते क्षणीं ॥ कीं गरुड येतां सर्पश्रेणी ॥ पळती उठोनि जीवभयें ॥७४॥

तैसा मी राम होतांचि जाण ॥ वाटे परनारी मातेसमान ॥ एकवचन एकबाण ॥ एकपत्नीव्रती होतों ॥७५॥

याचिलागीं बंधु जाण ॥ रामसौमित्र वानरगण ॥ यांसी संहारिल्यावांचून ॥ वश नव्हे जानकी ॥७६॥

यावरी बोले कुंभकर्ण ॥ आतां गिळीन सकळ सैन्य ॥ क्षणांत रामलक्ष्मण ॥ धरून आणीन पुरुषार्थ ॥७७॥

अपार सैन्यसमुद्र ॥ सवें देत दशकंधर ॥ रावणासी नेमून सत्वर ॥ कुंभकर्ण निघाला ॥७८॥

रणां येता कुभकर्ण ॥ तेथें होते वानरगण ॥ ते अवघे गेले पळोन ॥ रामचंद्रासी सांगावया ॥७९॥

कुंभकर्ण विचारी अंतरीं ॥ मी काय लोटूं वानरांवरी जंबुकावरी जैसा केसरी ॥ धांवतां पुरुषार्थ दिसेना ॥८०॥

पिपीलिकांवरी धांवे गज ॥ कीं अळिकेवरी द्विजराज ॥ मूढसभेंत तेजःपुंज ॥ पंडित शोभा न पावे ॥८१॥

आरंभीं राक्षसदळ तुंबळ ॥ वानरांवरी धांवले चपळ ॥ कपी उठावले सकळ ॥ शिळा वृक्ष घेऊनियां ॥८२॥

युद्ध झालें अपार ॥ लोटले अशुद्धाचे पूर ॥ परी ते न मानी घटश्रोत्र ॥ म्हणे हे युद्ध कायसें ॥८३॥

मूढ अपार बोलती ॥ परी तें न भरे पंडिताचें चित्ती ॥ जैसे वृषभ परस्परें भांडती ॥ महाव्याघ्रासी न माने तें ॥८४॥

असो तेव्हां मुद्रर घेऊन ॥ रामावरी लोटला कुंभकर्ण ॥ अठरा पद्में वानरगण ॥ पर्वत पाषाण भिरकाविती ॥८५॥

पर्वतावरी पर्जन्य पडत ॥ परी तो व्यर्थ न मानी किंचित ॥ कीं कूर्मपृष्ठीवरी बहुत ॥ सुमनें वर्षतां न ढळेंचि ॥८६॥

तों शतश़ृंगमंडित पर्वत ॥ घेऊन भिरकावी हनुमंत ॥ तो मुष्टिघातें त्वरित ॥ फोडून टाकी कुंभकर्ण ॥८७॥

म्हणे रे मर्कटा धरी धीर ॥ तुवां जाळिलें माझें नगर ॥ म्हणोनि धांवे घटश्रोत्र ॥ हनुमंतावरी तेधवां ॥८८॥

बळें शूळ भोवंडोनि ॥ मारुतीवरी घाली उचलूनि ॥ ते वेळे वायुसुत धरणीं ॥ मूर्च्छा येऊन पडियेला ॥८९॥

ते देखोनि वाहिनीपती ॥ नीळ धांवे समीरगती ॥ कुंभकर्णाची युद्धगति ॥ देव पहाती विमानीं ॥९०॥

नीळें पर्वत वरी टाकिला ॥ तो मुष्टिघातें चूर्ण केला ॥ नीळासीं मुष्टिघात दीधला ॥ मूर्च्छित पाडिला धरणिये ॥९१॥

तों धावलें चौघे वानर ॥ जे काळासही शिक्षा करणार ॥ ऋषभ शरभ गवाक्ष वीर ॥ गंधमादन चवथा तो ॥९२॥

चौघांजणीं चार पर्वत ॥ टाकिले पैं अकस्मात ॥ ते मुष्टिघातें पिष्टवत ॥ करूनियां टाकिले ॥९३॥

शरभ गवाक्ष धरणीवरी ॥ कुंभकर्णे आपटिले स्वकरीं ॥ दोघे भिरकाविले अंबरी ॥ जगतीवरी पडियेले ॥९४॥

मग अट्टहासें गर्जे कुंभकर्ण ॥ वाटे ब्रह्मांड जाय उलोन ॥ मग वानरांतें देखोन ॥ ग्रासावया धांवला ॥९५॥

कव घालोनि अकस्मात ॥ एकदांच वानर धरी बहुत ॥ मुखीं घालूनि चावित ॥ गिळिले गणित ऐका तें ॥९६॥

ऐशीं सहस्र द्रुमपाणि ॥ असुरें गिळिले मुख पसरोनि ॥ कित्येक कर्णरंध्रांतून निघोनि ॥ पळते जाहले एकसरें ॥९७॥

उरले वानर ते वेळे ॥ रण सांडोनि पळाले ॥ गिरिकंदरीं दडाले ॥ जीवभयेंकरूनियां ॥९८॥

कित्येक तेव्हां वानरगण ॥ सूर्यसुतासी गेले शरण ॥ ते वेळीं पर्वत घेऊन ॥ सुग्रीववीर धांविन्नला ॥९९॥

विशाळ पर्वत टाकिला ॥ येरे मुद्ररें चूर्ण केला ॥ सुग्रीव म्हणे अमंगळा ॥ वृथा पुष्ट राक्षसा ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : June 03, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP