अध्याय आठवा - श्लोक १०१ ते १५०

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


कूर्मपृष्ठी जैसा कठोर ॥ तैसें हें कोदंड प्रचंड थोर ॥ दशरथकुमार सुकुमार ॥ कैसें उचलेल तयातें ॥१॥

मदनदहनाचें धनुष्य थोर ॥ रघुनाथमूर्ति मदनमनोहर ॥ अहा तात परम दुस्तर ॥ अनिवार पण हा तुझा ॥२॥

घनश्यामकोमळगात्र ॥ राजकुमार राजीवनेत्र ॥ अहा तात परम दुस्तर ॥ अनिवार पण हा तुझा ॥३॥

बळहत केला दशकंधर ॥ परम कोमल रघुपतीचे कर ॥ अहा तात परम दुस्तर ॥ अनिवार पण हा तुझा ॥४॥

वाटे खुपती कोमळ कर ॥ ऐसी रामतनु सुकुमार ॥ अहा तात परम दुस्तर ॥ अनिवार पण हा तुझा ॥५॥

मज न गमेचि दुसरा वर ॥ तुज सत्य करणें पण साचार ॥ अहा तात परम दुस्तर ॥ अनिवार पण हा तुजा ॥६॥

चंडीशकोदंड प्रचंड थोर ॥ लघुआकृति राम निर्विकार ॥ अहा तात परम दुस्तर ॥ अनिवार पण हा तुजा ॥७॥

श्रीरामावांचून इतर ॥ पुरुष तुजसमान साचार ॥ अहा तात परम दुस्तर ॥ अनिवार पण हा तुझा ॥८॥

दुजा वरावया येतां वर ॥ देह त्यागीन हा निर्धार ॥ अहा तात परम दुस्तर ॥ अनिवार पण हा तुझा ॥९॥

सीता विजयेसी म्हणे अवधारीं ॥ बाप नव्हे हा वाटतो वैरी ॥ हा पण त्यजोनि निर्धारीं ॥ रामासी मज अर्पीना ॥११०॥

ऐसें सीतेचें अंतर ॥ जाणोनियां जगदोद्धार ॥ दंड पिटोनि प्रचंड थोर ॥ कोदंडासमीप पातला ॥११॥

दशरथ महाराज दिग्गज ॥ त्याचा छावा रघुराज ॥ धनुष्यइक्षु देखोनि सहज ॥ परम चपळ धांविन्नला ॥१२॥

श्रीरामसव्यबाहु प्रचंड ॥ हाचि वरी केला शुंडादंड ॥ भवधनुष्यइक्षु द्विखंड ॥ करील आतां निर्धारें ॥१३॥

दशकंधर हें पद्मकानन ॥ वीस हस्त द्विपंचवदन ॥ तीस कमळें हीच पूर्ण ॥ कोदंड जाण इक्षु तेथें ॥१४॥

पद्मवनीं गज निघे लवलाहीं ॥ मग त्यासी कमळांची गणना काई ॥ तैशीं दशमुखाचीं हस्तकमळें पाहीं ॥ तुडवीत आला रघुवीर ॥१५॥

तटस्थ पाहती सकळ जन ॥ म्हणती विजयी हो कां रघुनंदन ॥ सीतानवरी हे सगुण ॥ यासीच घालो निजमाळा ॥१६॥

आनंदमय सकळ ब्राह्मण ॥ चिंतिती रामासी जयकल्याण ॥ म्हणती हें भवचाप मोडून ॥ टाको रघुवीर सत्वर ॥१७॥

एक म्हणती राम सुकुमार ॥ नीलपंकजतनु वय किशोर ॥ भवकोदंड प्रचंड थोर ॥ उचलेल कैसें रामातें ॥१८॥

एक म्हणती चिमणें रामाचें ठाण ॥ एक म्हणती सिंह दिसतो लहान ॥ परी पर्वताकार गज विदारून ॥ न लागतां क्षण टाकितो ॥१९॥

घटोद्भव लहान दिसत परी क्षणें प्राशिला सरितानाथ ॥ गगनीं सविता लघु भासत ॥ परी प्रभा अद्भुत न वर्णवे ॥१२०॥

असो ते वेळे रघुवीर ॥ विद्युत्प्राय उत्तरीय चीर ॥ तें सरसावोनि सत्वर ॥ कटिकप्रदेशीं वेष्टिलें ॥२१॥

माथां जडित मुकुट झळकत ॥ आकर्णनेत्र आरक्त रेखांकित ॥ मस्तकीचें केश नाभीपर्यंत ॥ दोहोकडोनि उतरले ॥२२॥

किशोर सुकुमार भूषण ॥ अलकसुवासें भरलें गगन ॥ त्या सुवासासी वेधून ॥ मिलिंदचक्र भ्रमतसे ॥२३॥

श्रीरामतनूचा सुवास पूर्ण ॥ जात सप्तावरण भेदून ॥ असों तें शिवधनुष्य रघुनंदन ॥ करें करोनियां स्पर्शीत ॥२४॥

नीलवर्ण कुंतल ते अवसरीं ॥ पडले दशकंठाचे हृदयावरी ॥ विषयकंठवंद्य ते अवसरीं ॥ सांवरोनि मागें टाकित ॥२५॥

शिवधनुष्यासीं घंटा सतेज ॥ वरी विद्युत्प्राय झळके ध्वज ॥ त्सासमवेत रघुराज ॥ उचलिता जाहला ते काळीं ॥२६॥

गज शुंडेनें आक्रमी इक्षुदंड ॥ तैसें रामें आकर्षिलें कोदंड ॥ पराक्रम परम प्रचंड ॥ दशमुंड विलोकीतसे ॥२७॥

परम म्लान द्विपंचवदन ॥ दृष्टीं देखोनि गाधिनंदन ॥ म्हणे नरवीरश्रेष्ठा वेगेंकरून ॥ संशय हरणे सर्वांचा ॥२८॥

जनक म्हणे कौशिक मुनी ॥ ज्या चापें दशकंठ धोळिला धरणींते धनुष्य रामाचेनी ॥ कैसें उचलेल नेणवे ॥२९॥

जनकासी म्हणे ऋषि कौशिक श्रीराम हा वैकुंठ नायक । अद्भुत करील कौतुका पाहें नावेक उगाचि ॥१३०॥

इकडे रामें धनुष्य उचलून । क्षण न लागता वाहिला गुण । ओढी ओढिली आकर्ण सुहास्य वदनें तेधवां ॥३१॥

श्रीरामाचें बळ प्रचंड । ओढीस न पुरेचि भव कोदंड । तडाडिलें तेणें ब्रह्मांड । चाप कर करिलें तेधवां ॥३२॥

मुष्टीमाजीं तडाडित । जैशा सहस्र चपळा कडकडित । विधि आणि वृत्रारि हडबडित । वाटे कल्पांत जाहला ॥३३॥

उर्वी मंडळ डळमळित । भोगींद्र मान सरसावित । दंतबळें उचलोनि देत । आदिवराह पाताळीं ॥३४॥

सभा सकळ मुर्च्छित जाहली । महावीरांची शस्त्रें गळालीं । राजे भाविती उर्वी चालिली । रसातळा आजीच ॥३५॥

रामें चाप केलें द्विखंड । प्रतापें भरलें ब्रह्मांड । पुष्प संभार उदंड । वृंदारक वर्षती ॥३६॥

सभा सकळ मुर्च्छित जाहली । परी एक चौघे सावध पाहत । जनक आणि गाधिसुत । सीता सौमित्र चौघेंही ॥३७॥

असो भवकोदंड मोडोनी । द्विखंड रामें टाकिली धरणीं । रावण उठोन ते क्षणीं । अधोवदनें चालिला ॥३८॥

सभेस मारावया आणिती तस्कर । तैसा म्लान दिसे दशवक्त्र । कीं रणीं अवेश आलिया महावीर । त्याचा मुखचंद्र उतरे जेवीं ॥३९॥

कीं दिव्य देतां खोटा होत । मग तो मुख नदाखवती लोकांत । तैसा प्रधानेंसी लंकानाथ । गेला त्वरित स्वस्थाना ॥१४०॥

पुण्य सरतां स्वर्गींहूनि खचला । कीं याज्ञिकें अंत्यज बाहेर घातला । कीं द्विज याती भ्रष्ट जाहला । तो जेवीं दवडिला पंडितीं ॥४१॥

याची प्रकारें सभेंतूनी । रावण गेला उठोनी । जैसा केसरीच्या कवेंतूनी । जंबूक सुटला पूर्व भाग्यें ॥४२॥

असो इकडे विजयी रघुनंदन । जैसा निरभ्र नभीं चंड किरण । सुकुमार नव घन तनु सगुण । भक्तजन पाहती ॥४३॥

सर्वांचे नयनीं अश्रुपात । ऋषि चक्र सद्रदित । हा कोमल गात्र रघुनाथ । कठीण चाप केवी भंगिलें ॥४४॥

श्रीराम सौकुमार्याची राशी । विश्र्वामित्रें धांवोनि वेगेंसी । रघुवीर आलिंगला मानसीं । प्रेमपूर न आवरे ॥४५॥

म्हणे आदिपुरुषा पूर्णब्रह्मा । स्मरारि मित्रा आत्मयारामा । भक्तकाम कल्पद्रुमा । अद्भुत लीला दाविली ॥४६॥

तुझ्या करणी वरूनि लावण्य खाणी । ओंवाळावी वाटे समग्र धरणी । आणि या जीवाची कुरवंडी करोनी । तुज वरोनि सांडावी ॥४७॥

इतुक्यांत करिणी वरोन लावण्य खाणी । खालीं उतरोनि तेच क्षणीं । माळ घेऊन नंदिनी । हंस गमनी चमकत ॥४८॥

मेदिनी म्हणे मी धन्य । माझी कन्या वरील रघुनंदन । श्रीराम जामात सगुण । मन मोहन जगद्वंद्य ॥४९॥

श्रीराम जगाचा जनिता । जानकी सहजचि जगन्माता । तारावयासी निज भक्तां । आली उभयतां रूपासी ॥१५०॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP