अध्याय आठवा - श्लोक ५१ ते १००

श्रीधरस्वामी रचित ’ श्रीरामविजय ’ ग्रंथाचे पारायण केल्याने जीवनातील वनवास संपून सुख प्राप्त होते.


असो ऐशी ते चित्कळा ॥ सुकळ सभा विलोकी डोळां ॥ तो ऋृषिपंक्तिमाजी घनसांवळा ॥ परब्रह्मपुतळा देखिला ॥५१॥

विजयनामें सखीप्रति ॥ सीता म्हणे पाहें ऋषिपंक्ति ॥ त्यांमाजी विलसे जी मूर्ति ॥ माझी प्रिति जडली तेथें ॥५२॥

घनश्याम सुंदर रूपडें ॥ देखतां कामाची मुरकुंडी पडे ॥ सखे मज वर जरी ऐसा जोडे ॥ तरीच धन्य मी संसारीं ॥५३॥

बहुत जन्मपर्यंत ॥ तप केलें असेल जरी अत्यंत ॥ तरीच हा मज होईल कांत ॥ विजये निश्र्चित जाणपां ॥५४॥

नवस करूं कवणाप्रति ॥ कोणती पावेल मज शक्ति ॥ रघुवीर जरी जोडेल पति ॥ तरी त्रिजगतीं धन्य मी ॥५५॥

राजीवनेत्र घनसांवळा ॥ स्वरूपठसा सर्वांत आगळा ॥ आपले हातीं यासी घालीन माळा ॥ मग तो सोहळा न वर्णवे ॥५६॥

तों विश्र्वामित्र म्हणे जनकाप्रति ॥ आतां कोदंड आणावें शीघ्रगती ॥मिळाले येथें सर्व नृपती ॥ जे कां पुरुषार्थीं थोर थोर ॥५७॥

अष्टचक्रशकट प्रचंड ॥ त्यावरी ठेविलें चंडकोदंड ॥ सहस्रवीरांचे दोर्दंड ॥ ओढितां भागले न ढळेचि ॥५८॥

मग गजभार लाविले ॥ रंगमंडपीं ओढून आणिलें ॥ देखतां सर्व राजे दचकले ॥ म्हणती हे नुचले कोणाशीं ॥५९॥

एक म्हणती हें शिवचाप ॥ उचलील ऐसा न दिसे भूप ॥ एकास सुटला चळकंप ॥ गेला बळदर्प गळोनियां ॥६०॥

एक महावीर बोलत ॥ आम्ही कौतुक पाहों आलों येथ ॥ एक म्हणती जनकाचा स्नेह बहुत ॥ म्हणोनि भेटीस पातलों ॥६१॥

जनक सांगे सकळांतें ॥ हें विरूपाक्षें घेऊन स्वहतें ॥ शिक्षा लाविली दक्षातें ॥ सहस्रक्षातें नुचले हें ॥६२॥

ऐसिया चापासी उचलोन ॥ जो राजेंद्र वाहील गुण ॥ त्यासी हे जनकी गुणनिधान ॥ माळ घालील स्वहस्तें ॥६३॥

तटस्थ पाहती सकळ वीर ॥ कोणी न देती प्रत्त्युतर ॥ कोणी सांवरोनियां धीर ॥ चाप उचलूं भाविती ॥६४॥

तों मूळ न पाठवितां रावण ॥ प्रधानासहित आला धांवोन ॥ सभा गजबजली संपूर्ण ॥ म्हणती विघ्न आलें हें ॥६५॥

आतां गति येथें नव्हे बरी ॥ बळेंचि उचलोन नेईल नोवरी ॥ कोणी म्हणती क्षणाभीतरीं ॥ चंडीशचाप चढवील हा ॥६६॥

जनकासी म्हणे रावण ॥ तुवां धनुष्याचा केला पण ॥ तरी क्षणमात्रें तें मोडून ॥ कुटके करीन येथेंचि ॥६७॥

म्यां हालविला कैलास ॥ बंदीं घातले त्रिदश ॥ ऐरावतासमवेत देवेश ॥ समरभूमीस उलथिला ॥६८॥

तो मी रावण प्रतापशूर ॥ चाप लावाया काय उशीर ॥ उपटोनियां मेरुमांदार ॥ कंदुका ऐसे उडवीन ॥६९॥

पृथ्वी उचलोनि अकस्मात ॥ घालूं शकें मी समुद्रांत ॥ कीं घटोद्भवासारिखा सरितानाथ ॥ क्षणमात्रें शोषीन मी ॥७०॥

तरी आतां हेंचि प्रतिज्ञा पाहीं । हें चाप मोडूनि लवलाहीं ॥ होईन जनकाचा जावई ॥ सकळ रायां देखतां ॥७१॥

बसनें भूषणें सांवरून । चापाकडे चालिला रावण । गजगजिले जानकीचें मन अति उदिग्न जाहली ॥७२॥

म्हणे आपर्णापति त्रिनयना ॥ त्रिपुरांतका मदन दहना ॥ तुझें चाप नुचले रावणा ॥ गजास्थ जनका ऐसें करी ॥७३॥

या दुर्जनाचे तोंड काळें ॥ सदाशिवा करी शीघ्र वहिलें ॥ महा दैवतें प्रचंड सबळें ॥ या धनुष्यावरी बैसवी ॥७४॥

अहो अंबे मूळपीठ निवासिनी ॥ मंगळ कारके आदि जननी । या रावणाच्या शक्ती हिरुनी ॥ नेई मृडानी सत्वर ॥७५॥

ऐसें जानकीनें प्राथिलें । तो दैवतें धांविन्नलीं सकळे । गुप्तरूपें शीघ्र काळैं ॥ येऊन बैसली चापावरी ॥७६॥

नवकोटी कात्यायनी ॥ चौसष्ट कोटी योगिनी ॥ यां सहित कालिका येउनी ॥ धनुष्यावरी बैसत ॥७७॥

धनुष्य उचलूं गेला दशवक्त्र । तंव ते न ढळेचि अणुमात्र । बळें लाविले वीसही कर । जाहलें शरीर निस्तेज पै ॥७८॥

द्विपपंक्तीनें अधर प्रांत । शक्रारि जनक बळेंरगडित । चा उभें करितां त्वरित । जाहलें विपरीत तेधवां ॥७९॥

जैसा महाद्रुय उन्मळे । तैसें शिवचाप कलथलें । रावण उताणा पडे ते वेळे । हलकल्लोळ मांडला ॥८०॥

जैसा पूर्वीं गयासुर दैत्य । त्यावरी ठेविला पर्वत । तैसाचि पडला लंकानाथ । धनुष्य अद्भुत उरावरी ॥८१॥

रावण पडतां भूतळीं । सभेवरी उसळली धुळी । दाही मुरवीं मृत्तिका पडली । आनंदली जानकी ॥८२॥

दाही मुखीं रुधिर वाहत । कासावीस जाहला बहुत । म्हणे धांवा धांवा समस्त । धनुष्य त्वरित काढा हें ॥८३॥

रावण म्हणे जनकाप्रती । माझे प्राण चालिले निश्र्चितीं । परी इंद्रजित कुंभकर्ण असती । तुज निर्दाळिती सहमुळीं ॥८४॥

गजबजली सभा समस्त । म्हणती कोण बळिवंत । हें चाप उचलील उद्भुत । महा अनर्थ ओढवला ॥८५॥

घाबरा झाला मिथुळेश्र्वर । म्हणे पृथ्वी झाली निर्वीर । क्षेत्री भार्गवें आटिले समग्र । त्रिसप्त वेळां हिंडोनि ॥८६॥

या सभेमाजीं बळिवंत । कोणी क्षेत्री नाहीं रणपंडित । कौशिकें ऐसी ऐकतां माता खुणावित श्रीरामचंद्रा ॥८७॥

जैसा निद्रिस्त सिंह जागा केला । कीं याज्ञिकें जात वेद फुंकिला । तैसा विश्र्वामित्रें ते वेळां । खुणाविला रघुवीर ॥८८॥

म्हणे नरवीर पंचानना । त्रिभुवन वंद्या राजवनयना । पुराण पुरुषा रघुनंदना । अरि मर्दना ऊठ वेगीं ॥८९॥

कमलोद्भव जनका उदारा । ताटिकांतका अहल्योध्दारा । मख पाळका समर धीरा । असुर संहारका ऊठ वेगी ॥९०॥

जैशी निशा संपतां तत्काळ । उदयाद्रिवरी ये रविमंडळ । तैसा राम तमालनीळ । उठून उभा ठाकला ॥९१॥

कीं महायाग होतां पूर्णाहुती । तत्काळे प्रकटे आराध्य मूर्ती । तैसा उभा ठाकला रघुपती । राजे पाहती टकमकां ॥९२॥

कीं प्रल्हादा कारणें झडकरी । स्तंभांतूनि प्रकटे नरहरी । कीं वेदांत ज्ञान होतां अंतरीं । निजबोध जेवीं प्रकटे ॥९३॥

वंदोनियां गुरुचरणां सवेंचि नमिलें सकळ ब्राह्मणां । पूर्ण ब्रह्मानंद रामराणा । वेद पुराणां वंद्य जो ॥९४॥

श्रीराम विरक्त ब्रह्मचारी । हे रमा आपणाविण कोण नवरी । या लागीं शरशुवीर विहारी । उठता जाहला तेधवां ॥९५॥

सभेस बैसले नृपवर । केले नानापरींचें शृंगार । परी सर्वांत श्रेष्ठ श्रीरामचंद्र । रोहिणीवर भगणांत जैसा ॥९६॥

कीं शास्त्रांमाजी वेदांत । कीं निर्जरांमाजी शचीनाथ । तैसा श्रीराम समर्थ । सभेत मुख्य विराजे ॥९७॥

उठिला देखोनि श्रीरामचंद्र । उचंबळला सीचे चा सुख समुद्र । नव मेघ रंग रघुवीर । रंग मंडपा प्रति आला ॥९८॥

कोटि अनंग ओवाळून । टाकावे ज्याच्या नखावरून ॥ जो अरिचक्रवारण पंचानन ॥ जात लक्षून धनुष्यातें ॥९९॥

देखतां राम सुकुमार ॥ घाबरलें सीतेचें अंतर ॥ म्हणे कोमळगात्र रघुवीर ॥ प्रचंड थोर धनुष्य हें ॥१००॥

N/A

References : N/A
Last Updated : March 23, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP