TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

वेद तत्व
दिसति भेदम तें निगमाश्रितें परि समस्तहि नास्तिक - मिश्रितें
निगम - दूषक नास्तिक ते जसे श्रुतिगताऽर्थ - विदूषक हे तसे ॥१॥
अनाधिगत अवाधितार्थवेदीं अधिगत बाधित वर्णिताति भेदीं
अधिगत सकळांसि भेद जी हा निवडिति तत्वमसि श्रुतीतही हा ॥२॥
आहेसि तो तूं म्हणऊनि साचा जो अर्थ हा तत्वमसि श्रुतींचा
श्रुत्यर्थ हा अर्थ गुरुपदेशें कळे रमा - कांत - कटाक्ष - लेशें ॥३॥
चा० छं० सुधार्थ हा उलंडुनी अलौकिकार्थ खंडुनी
अदृष्ट अर्थ धुंडुनि प्रयत्न - भेद मांडुनी
स्वयेंचि जीव - ईश्वरा प्रसिद्ध भेद पामरा
असेंचि तत्व तत्परा निरुपती अहो परा ॥४॥
पृ० छं० नसोनि नृप ठाउका पुसत तो कसा भूपती
नव्हेसि नृप तूं असें वदति उत्तरें त्याप्रती
तसेंचि निगमासि जें पुसति ईश सांगा कसा
नव्हा तुम्हिं परेश तो म्हणुनि वेद बोले असा ॥५॥
जो सर्वेश्वर तूं नव्हेसि म्हणतो प्रामाण्य त्याला कसें
प्रख्याताऽर्थनिरुपणें करुनियां होतें कळेना असें
वृक्षाग्रावरि बैसले परि अहो तन्मूळ हें छेदिती
जे कां तत्वमसि श्रुति सहि असें जाणोनि वारवाणिती ॥६॥
स्पष्ट तत्त्वमसि वेद बोलतो अर्थ भेदपर यासि वाटतो
रोगियासि शशि जेवीं पींवळा तत्कळा न दिसती समुज्वळा ॥७॥
संध्या करा प्रतिदिनी म्हणवोनि जैंसा
वाक्यार्थ तत्वमसिचा न किमर्थ तैंसा
स्पष्टार्थ आणिक अलौकिक तत्व जेथें
व्याख्या बळेंचि करिती विपरीत तेथें ॥८॥
श्रुतिगत न दिसे जो अर्थ जो व्याकरीती
अधिगत सकळांतें साधिती द्वैत - रीती
श्रुति - गत दिसतो जो अर्थ तो आवडेना
गुरुविण नकळे जें बोलती तें घडे ना ॥९॥
विरुद्ध स्वभावें नये ऐक्य लक्षा स्वयें जीव तो ईश या पूर्वपक्षा
अहो टाकिलें श्रोत दूषोनि शास्त्रीं तिहीं घेतले त्यास सिद्धांत - पात्रीं
जसा टांकिला कांडुनी धान्य कीडा समर्थी दरिद्य्रासतो होय मांडा
विरुद्ध - स्वभावत्व होतो उपाधी स्वरुपीच तें मानिती स्थूळ - बुद्धी ॥११॥
सकळांविषयी अनीशत्व देहीं जगदीशत्व घडे तया न कांहीं
म्हणतां तरि तोहि अनीश ज्याला नघडे ऐक्य तुम्हीं तयासि बोला ॥१२॥
असो ईश आतां अनीशत्व ज्याला तुम्हीं तोचि कीं आपुलें रुप बोला
तुम्हां भ्रांत जो सांगवेनाच जेव्हां स्वयें कोण नेणेच तो भ्रांत तेव्हां ॥१३॥
अहंप्रत्यय स्फूर्ति ते वृत्ति जेथें तुम्हीं मानितां शुद्ध आत्मत्व तेथें
अहंवृत्ति हे स्फुर्ति ज्याच्या प्रकाशें विचारोनि सांगा तया सावकाशें ॥१४॥
तुम्हिं अहंस्फुरणात्मक जेधवां तरि चिदात्मक मीपण तेधवां
जरि जडत्व म्हणाल अहंपणा तरि वदा जड टांकुनि आपणा ॥१५॥
नवदयेच तई उगले असा तुम्हिं अनीश्वर तो म्हणतां कसा
तरि अनीश्वर - रुप उपाधि का मग परेश - उपाधिही तो पहा ॥१६॥
जड अहंपण ते जरि वेगळें अजड मीपण घ्याल जरी बळें
स्व - चिदहंपण यासि नसांडिता तुम्हिं वदा जड मीपण तत्वता ॥१७॥
अहं - स्फूर्ति ते मानितां आपणासी नये सांगता त्या जडा मीपणासी
यथापूर्व मी मी तुम्हीं बोलतां हा दिसेना जडा मीपणा ठाव पाहा ॥१८॥
अहं देह बोलाल त्या मीपणातें न पाहाल तेव्हां तुम्हीं आपणातें
अहं देह जेव्हां स्फुरे वृत्ति देहीं चिदात्मत्व आहे अहंस्फुर्ति नाहीं ॥१९॥
जडाऽहंकृतीनें अहंदेह वाटे न तेव्हां दुजी ते अहंस्फूर्ति भेटे
अहंस्फूर्ति चिद्रूप आत्मत्व जेव्हां दिसेना अहं देह हे स्फूर्ति तेव्हां ॥२०॥
अहं एक दूजी अहं देह ऐसी द्विधा स्फूर्ति हे एक काळींच कैसी
अहं स्फूर्ति काल - द्वयीं तुल्प जेव्हां अहं स्फूर्ति हे केवलात्मा न तेव्हां ॥२१॥
जसा देह मी मानितों देह - योगें अहंस्फूर्ति तैंसी अहंस्फूर्तिसंगें
अहं प्रत्यया टांकितां बुद्धि आहे तियेही पुढें आत्मया चित्त पाहे ॥२२॥
अहंरुप हे वृत्ति आत्मा नव्हे हा स्व - शास्त्राऽभिमानासि टांकोनि पाहा
जसी मीपणीं त्वंपण - स्फूर्ति नाहीं नसे त्वंपणीही अहंवृत्ति कांहीं ॥२३॥
अरे तूं म्हणोनी पराव्यासि जेव्हां म्हणे मी म्हणोनी नसे स्फूर्ति तेव्हां
दिसेना घट - स्फूर्ति जेव्हां पटाची पटामाजिही स्फूर्ति नाहीं घटाची ॥२४॥
तसें तूं स्फुरे तेधवां मी स्फुरेना असेही जरी मीपणातें स्मरेना
म्हणा ना घडी एक मी मी म्हणोनी घडी माजित्या तूमची काय हानी ॥२५॥
आतां म्हणाल न म्हणे जरि मी म्हणोनी
रुपीं प्रतीति तरि वर्तत मी म्हणोनी
ते मी असें न म्हणतांहि असे प्रतीती
मी वृत्ति तों जसिच तूं म्हणऊनि वृत्ती ॥२६॥
तूंवृत्ति आगम अपायपणांत मी हे
मी वृत्ति हे तदनुरुपचि दीस ताहे
तें मीपण स्फुरण - रुपचि होय जेव्हां
त्वंस्फूर्ति माजि तरि काय नसेल तेव्हां ॥२७॥
जैसा अहं म्हणुनि वृत्ति विणेंचि पाहे
मी वृत्ति - युक्तहि तसाच किं दीसताहे
वृत्तींत केवळ पणांतहि तुल्य जेव्हां
वाटे तुम्हांसि तरि केवळ हानि तेव्हां ॥२८॥
साळीस जो तांदुळ मानिताहे साळीसही त्याच समान पाहे
तेव्हां त्वचा युक्तचि धान्यमानी तुम्हीं न मानाचि मताऽभिमानी ॥२९॥
सहज मीपण टांकुनिही स्फुरे तरि न केवळ होउनियां उरे
स्फुरण मीपण - वर्जित जेधवां स्फुरतसे स्वमतींतचि तेधवां ॥३०॥
सहज केवळ तें न तुम्हां कळे बहुत - तर्क - बळेंहि न आकळे
गुरुमुखाविण ते नकळे गती म्हणुनि बोलति ये चरितीं श्रुती ॥३१॥
गुरुविणें म्हणती नकळे असें श्रुति तयास तुम्हीं वदतां कसें
गुरुकृपेंचि करीं वदता जरी गुरुमुखें श्रुत तत्व नव्हे तरी ॥३२॥
वेदांतही वाचिलिया कळेना तें श्रीगुरुवांचुनि आकळेना
आत्मा अहं स्फूर्ति म्हणोनि शास्त्रें भेदात्मकें बोलति भेदमात्रें ॥३३॥
जोकां अहं - प्रत्यय - रुप आत्मा तो बोलतां हा निज - तत्व - वर्त्मा
हा शास्त्रमात्रें कळणार याला कां पाहिजे हो गुरुराज बोला ॥३४॥
शास्त्रासही तों गुरु पाहिजे तो म्हणाल ऐसा तरि हा नव्हे तो
श्रुत्यर्थ सांगे परि तत्व नेणें तत्वज्ञ जो केवळ तत्व जाणें ॥३५॥
गुरुविणें नकळे हरिची गती जरि म्हणाल असें वदती श्रुती
तरि न जीव कळे सकळांसि कां तुम्हिं तुम्हांस कसें नवदों शंका ॥३६॥
शास्त्रें अनेक तुम्हिं वाचियली तथापी
जी वत्व केवळ तुम्हां न कळे स्वरुपीं
आतां म्हणा द्विविधही गुरु - गम्य तत्त्वें
तेव्हां गुरु न तुमच्या मिरवे गुरुत्वें ॥३७॥
न वळरवे गुरु आपण आपणा तरिच मानितसे चिदहंपणा
कवण आपण हें नकळे जया श्रुति - गताऽर्थ कळेल कसा तया ॥३८॥
असो ईश तो तो तुम्हां आकळेना जयाला अनीशत्व तोही कळेना
म्हणूनी तुम्हां तत्त्वमस्यादि वाक्यें बहू दुर्घटें व्याकराया अशक्यें ॥३९॥
अनीशत्व ईशत्व दोंन्ही उपाधी स्वरुपींच तें मानिती स्थूल - बुद्धी ॥४०॥
अहं प्रत्यय स्फूर्ति आत्मत्व जेव्हां सुषुप्तीमधें नाशतो काय तेव्हां
अहं प्रत्यय स्फूर्ति जेव्हां दिसेना सुषुओप्तींत मूर्छेत तेव्हां असेना ॥४१॥
आहे अहंस्फूर्ति तरी प्रतीती कांहो दिसेना पडतां सुषुप्ती
नाहीं म्हणावा तरि तोंचि कीं तो होऊनि जागा सुख आठवी तो ॥४२॥
आत्मा अहंस्फूर्ति नव्हेचि जेव्हां सुषुप्तिकाळीं नसतांचि तेव्हां
आतां अनीशत्व म्हणा उपाधी ऐसीच ईशत्व - उपादि - सिद्धी ॥४३॥
विसरतो निजतो अहमात्मता तरि कसा उरतो वद तत्वता
न वदवे तरि केवि अनीश तो धरुनि नीजउपाधिस भासतो ॥४४॥
आहे अहंप्रत्यय यासि तेव्हां निद्रा पडे गाढ अतीव जेव्हां
होऊनि जागा विसरे म्हणावा तेव्हां कसा स्वप्नहि आठवावा ॥४५॥
स्वप्नीं दिसे विश्व असेंचि यातें या कारणें हा स्मरतो तयातें
तैसें सुषुप्तीत दिसे न कांहीं या कारणें ते स्मृति यासि नाहीं ॥४६॥
ऐसें म्हणाल तरि अंध गृहांत जेव्हां
कांहीं दिसे न निज देहहि त्यासि तेव्हां
आहे प्रतीति दिवसा स्मरतो तियेतें
ऐसी सुषुप्ति नकळेचि किमर्थ यातें ॥४७॥
बुद्धींद्रिये सकळ अंध गृहांत जागीं
सूर्योदयीं स्मरतसे जन याचि लागीं
बुद्धीद्रियांवरि जई पडते सुषुप्ती
ऐसाचि हा परि न ते वदवे प्रतीती ॥४८॥
ऐसें म्हणाल तरि तो जरि जागताहे
निद्रिस्थ बुद्धि मन इंद्रिय कां न पाहे
पाहातसे तरि किमर्थ असे स्फुरेना
कां जागृतींत मग तें स्फुरणें उरेना ॥४९॥
सुषुप्तीमधें बुद्धि जागी असेना तियेवीण कांहींच याला कळेना
असे बोलतां वेद - सिद्धांत सिद्धीं अहं प्रत्ययें केविं त्यांची प्रसिद्धी ॥५०॥
अहं स्फूर्ति रुपें असें तेथ जेव्हां विनाबुद्धि कांही न जाणेचि तेव्हां
असे बोलतां हा तरी येच रीती जनालागिं कां नाठवे ते प्रतीती ॥५१॥
विनाबुद्धि कांहींच जेव्हा कळेना स्वधर्मत्व याला तई आकळेना
अहंस्फूर्ति आत्मा स्वरुपेंचि जेव्हां कळेना कसें ते स्थळी यासि तेव्हां ॥५२॥
प्रत्यक्ष येथें सकळाऽनुभूती मूर्छेत निद्रेंत नसे प्रतीती
अनीश - ईशत्व तयासि आंगा लागेल कोणे रिति हेंचि सांगा ॥५३॥
जे बुद्धिनें प्रत्यय यासि यावा अनीश ईशत्व तियेसि भावा
स्वयें तयाला असती प्रतीती तेव्हां खरी ही तुमचीच रीती ॥५४॥
अभीशत्व ईशत्वही बुद्धि - वृत्ती चिदात्मा तयाला स्वयें न प्रतीती
स्वतंत्रत्व वृत्तीस येईल जेव्हां प्रतीतिप्रद स्वात्मथा वृत्ति तेव्हां ॥५५॥
जरि म्हणाल असें तरि आइका नयनिं काष्ठहि दाखवि पावका
न निरुपाधिक अग्नि कधीं दिसे परि उपाधि - अधीन न तो असे ॥५६॥
काष्ठादि यत्किमपिवांचुनि अग्नि सृष्टी
कोणीतरी नयनिं देखियला न दृष्टी
दाह - प्रकाशक तथापिहि अग्नि जैसा
आत्मा स्वतंत्र परतंत्र उपाधि तैसा ॥५७॥
अमृत गोड असें रसनेविण जरि कळे न तथापिहि तो गुण
अमृतनिष्ठ सुधागत माधुरी न रसनेंद्रियनिष्ठ असे परी ॥५८॥
स्वतंत्र तें केवळ जेथ सत्ता सत्ता स्वरुपासि तसी न चित्ता
चित्तास निद्रेंत नसे प्रतीती तेव्हां उठे तामस मूढवृत्ती ॥५९॥
निद्रेंत वृत्तींस नसे प्रतीती प्रत्यक्ष तेथें जडरुप वृत्ती
होऊनि जागा सुख आठवी तो प्रकाशितो वृत्तिस जागरीं तो ॥६०॥
पूर्वाध्यायीं अर्थ हा स्पष्ट आहे वृत्तीते तों न स्वतंत्रत्व साहे
जोकां भोक्ता तो सुखेच्छा धरुनी वृत्ती सर्वा वर्तवी चेतऊनी ॥६१॥
वाचेविणे जेरिति बोलवेना पायांविणें जेरिति चालवेना
आत्मा तथापि प्रभु आत्मतंत्र जेणें प्रकाशे जड तत्वमात्र ॥६२॥
शक्तीविणें शक्ति नव्हे तथापी स्वतंत्रता केवळ चित्स्वरुपीं
जाऊनि मारी परि राष्ट्र - सेना सत्ता नृपा वांचुनियां दिसेना ॥६३॥
सत्तेंत वृत्तीविण न प्रतीती सत्ता - विहीना जड चित्त - वृत्ती
होतो असा चिज्जडयोग जेव्हां जीवत्व ईशत्वहि होय तेव्हां ॥६४॥
तथापि सत्ता न जडासि जेव्हां स्वतंत्र त्याला म्हणवे न तेव्हां
आत्मत्व जेव्हां नकळे तुम्हांला कां मोडितां हो निगमार्थ बोला ॥६५॥
म्हणाल सर्वास चिदैक्य जेव्हां सर्वास भोक्तृत्व समान तेव्हां
चैतन्य भेदेंविण एक भोगें दुःखी सुखी सर्वहि तत्प्रसंगें ॥६६॥
जो भोक्तृतत्व म्हणऊनि चतुर्थ येथें
अध्याय हा विशद निर्णय सर्व तेथें
बिंबासि भेद नघडे प्रतिबिंब - भेदें
भोक्तृत्व भिन्न जळचंचळताविनोदें ॥६७॥
येथें तुम्हीं धरुनियां स्व - मताऽभिमाना
स्थापावया स्व - मत युक्तिस या न माना
हे अस्मदादि मति कल्पित तों न युक्ती
वेदश्रुती वदति ज्या जगदीश - उक्ती
नानाजळीं रवि जसा बहुरुप भासे
आत्मा तसा बहुउपाधिंत वेद ऐसे
युक्ति स्वयें वदति त्यांस तुम्ही न माना
प्रत्यक्ष दाखवितसां स्व - मताऽभिमाना ॥६९॥
एक प्रभाकर अनेक जळांत जैसा
क्षेत्रें अनेक परि एकचि देव तैसा
नाना जसे दिसति सूर्य अनेक नीरीं
देवासि जीवपण भिन्न असे शरीरीं ॥७०॥
ऐशा श्रुती वदति ज्या जगदीश - युक्ती
प्रत्यक्षही अनुभवाप्रति येति युक्ती
एकत्व यास्तवचि तत्वमसीति वेदीं
नेतां वदा तुम्हिं किमर्थ तदर्थ भेदीं ॥७१॥
बिंबासिं प्रतिबिंब - ऐक्य न घडे ऐसें तुम्ही साधितां
झालें तें प्रतिबिंब कोठुनि वदा पाहोनियां तत्वता
जैसें बिंब तसेंचि तें उपजलें ज्यापासुनी सर्वथा
त्याचा त्या चमधें पुन्हा लय तुम्हीं कां हो नमाना वृथा ॥७२॥
मुख अधोमुख होउनि पाहतें उदकिं ऊर्ध्वमुखें मुख राहतें
मळिन - निर्मळतादिकलक्षणीं इतरता धरली अविचक्षणीं ॥७३॥
आधी उपाधिविण हें नव्हतेंचि जेव्हां
बिंबात भिन्न प्रतिबिंब नसेचि तेव्हां
नासे उपाधि न उरे प्रतिबिंब दूजें
मिथ्याच सर्व वदतां तुम्हि भेदबीजे ॥७४॥
आद्यंत ऐक्य तरि हें स्फुट दीसताहे
नाहीं तुम्हां नम्हणवे जरि हे नसाहे
मध्येचं भेद दिसतो तरि पाहिजे तो
भेंदेक रोनिच सुखा सुखभेद होतो ॥७५॥
आद्यंत काळीं तरि भेद नाहीं मध्यें न हा भेद विरुद्ध कांहीं
हा भेद तों साधन - भोग - भेदी याचेंचि तें त्वंपद - ऐक्य वेदीं ॥७६॥
अद्वैत तत्वमसि जोंवरि भेद नाहीं
अद्वैतबोध करणें नघडेचि कांहीं
जीवेश शिष्य गुरु यासि न ठाव जेव्हां
कोणासि कोण उपदेश करील तेव्हां ॥७७॥
भोक्तृत्व भिन्न दिसतें सकळांसि जेव्हां
आत्मत्व ऐक्य सकळांसि घडेल तेव्हां
आत्मत्व एक तरि भोग - विभेद कैसा
हा पूर्वपक्ष हरिला हरिनेंच ऐसा ॥७८॥
असे एक जीवत्व अद्वैत वादीं जगीं बोलती तो विरुद्धार्थ वेदीं
न अद्वैत हें द्वैतही तें घडेना गुरु वांचुनी तत्व हें सांपडेना ॥७९॥
चैतन्य - भेद नसतां तरि भेद भोगीं
ऐसें कदापि नव्हते सुख - दुःख योगीं
हें वर्णिलें विशद येथचि भोक्तृतत्वीं
तें पाहणें अनुभवीं अति - शुद्ध - सत्वीं ॥८०॥
वेदांताश्रित एक - जीव - मत तें जेव्हां नव्हे सर्वथा
भेदीं बोलति आत्मता बहुमती येथें तिची कां कथा
तें श्रीमाधव उत्तर प्रकरणीं दूषील जें अन्यथा
आत्मत्व प्रतिपादिती सकळही भिन्नात्मवादी वृथा ॥८१॥
जीवेशभेद वदताति विरुद्ध - धर्मै
ते तों उपाधि - गुण हें नकळोनि वर्मे
अद्वैत तत्व उपपादिति सर्व वेदीं
तो अर्थ मोडिति अबाधित भेद - वादी ॥८२॥
जयां बोलती ऐक्य जीवां घडेना तयां जीव तो पूसतां सांपडेना
अहं प्रत्यया बोलती आत्मता हे अहंवृत्ति त्या केवळातें नसाहे ॥८३॥
स्वयें जीव होऊनि तो जीव कैसा असें पूसतां सांगवेनाच तैसा
अहं प्रत्ययालागिं तो आकळेना अहं प्रत्ययेंवीण याला कळेना ॥८४॥
स्वयें भ्रांत आत्मत्व ज्याला कळेना म्हणोनीच वेदार्थही आकळेना
स्वयें भ्रांत होऊनिही भेदवादी अहो मोडिती ऐक्य जें स्पष्ट वेदीं ॥८५॥
प्रामाणिकाऽर्थ - अवलंबित एक गोष्टी
आहे तथापि नपडेचि तयासि दृष्टी
ऐसें तथापि निज - तत्व तया कळेना
आचार्य - वर्य - करुणेविण आकळेना ॥८६॥
अहं स्फूर्ति आत्मा नव्हे हा तथापी स्फुरे तो अहं प्रत्ययो चित्स्वरुपीं
तयालागिं आत्मत्व बोलाल जेव्हां नव्हे तो असें बोलवेनाच तेव्हां ॥८७॥
प्रतिकूळ परंतु तो तुम्हांला नकळूनी जरि बोलतां तयाला
अहमीश अनीश दोनि जेथें नुरती केविं विरुद्ध धर्म तेथें ॥८८॥
नव्हे अहं प्रत्ययरुप जेव्हां अनीश ईशत्व उपाधि तेव्हां
आहे अहं प्रत्यय भिन्न जेथें अनीश ईशत्वहि भिन्न तेथें ॥८९॥
तथापि आत्मत्व न शुद्ध तेहीं जैसें सुषुप्तींत दिसे न कांहीं
यालागिं कोणासहि तें कळेना जें श्रीगुरु वांचुनि आकळेना ॥९०॥
विरुद्ध धर्मे श्रुति मोडितां हा होतो महादोष तुम्हांसि पाहा
अगम्य वेदाऽर्थ तुम्हां कळेना जो श्रीगुरु वांचुनि आकळेना ॥९१॥
म्हणाल वेदांतचि भेद आहे श्रुतीस त्या ऐक्यहि हें नसाहे
हें बोलणेंही तुमचें घडेना श्रुतीमधें द्वैतचि सांपडेना ॥९२॥
जीवत्व ईशत्व उपाधि - भेदें निरुपिलीं ही असतील वेदें
गीतादिशास्त्रांतहि येचरीती तुम्हांसि तीं साधनरुप होती ॥९३॥
तुम्हीं द्वासुपर्णा श्रुती द्वैतरुपें पहातां तुम्हां द्वैत वाटे स्वरुपें
तयां द्वासुपर्णासही भेद ऐसे नसोनी अहो मानितां भेद कैसे ॥९४॥
द्वैतश्रुती द्विवचनें जरि मानितांहा
श्रीरामकृष्ण म्हणतां द्वय कां न पाहा
वेद प्रमाणचि जसे अवतार ऐक्यें
श्रुत्युक्त - ऐक्य बहु तत्वमसीतिवाक्यें ॥९५॥
तयोरन्यथा अन्यशब्दासि भेदीं तुम्हीं मानुनी दावितां द्वैत वेदीं
तयोरन्य दोघांत त्या ऐक्य ऐसा असोनी तुम्हीं मानितां भेद कैसा ॥९६॥
तयोरन्य एथें तयोर्भेद ऐसा तुम्हीं बोलतां अर्थ होईल कैसा
तयां दोंमधें भेद तो पिप्पलातें जई भक्षितो इष्ट आम्हांसि होतें ॥९७॥
तया दोंमधें भेद तो उपाधी तया भेद तो आमुचा पक्ष साधी
तया भेदयोगेंचि भोक्तृत्व याला उपाधीविणें ऐक्य बिंबी जयाला ॥९८॥
अशन - अनशनत्वें भेद बोलाल जेव्हां
तरि हरि - अवतारीं घ्या विरुद्धार्थ तेव्हां
व्रज - पर - वधु - जारी एक लीलाऽवतारी
बहुविध विपरीतेंही न कां त्या प्रकारीं ॥९९॥
निष्ठा तुम्हांला बहुसाल भेदीं तो वाटतो या करितांचि वेदीं
घटादिनामें व्यवहार जेव्हां न बोलती मृन्मय तत्व तेव्हां ॥१००॥
दत्द्यांचें दुधाचें जळाचें घृताचें असें बोलतां पात्र - एकत्व कैचें
असा कोटिशब्दें जरी भेद वाटे असा भेद शब्दैकमात्रेंचि तूटे ॥१०१॥
घटादीक हें सर्वही एक माती अशा ऐक्य शब्देंचि ते भेद जाती
तसें सर्वही ब्रम्ह इत्यादि - शब्दीं उडे भेद तो साधिला कोटि - अव्हीं
असे वेद जे बोलती भेद नाना तयांमाजि तों तत्व कांहीं असेना
असे तत्व यालागिं तत्वोपदेशें श्रुती बोलती तत्वमस्यादि लेशें ॥१०३॥
चिदैक्य तें तत्वमसीति - वाक्यें सव्र खलु ब्रम्ह अचेतनैक्यें
अद्वैत ऐसे उपदेश वेदीं नदीसती हे उपदेश भेदीं ॥१०४॥
सत्यं भिदा म्हणुनि यास्तव कल्पियेल्या
वेदश्रुती तुम्हिं तथापिहि त्या उडाल्या
प्रत्यक्ष जें दिसतसे उपदेश त्याला
कांहो वृथा करुनि कष्टति वेद बोला ॥१०५॥
याही प्रमाणीं श्रुति मानितांहा तरी श्रुती त्या पुढिल्यांहि पाहा
सत्यं भिदा बोलति तेचि दोषी पुढें श्रुती बोलति वाक्य - लेशीं ॥१०६॥
भेदोपदेश निगमीं सहसा घडेना
सत्यं भिदादि निगमीं श्रुति सांपडेना
जीवेश लोकरचनादिक भेद वेदीं
भासे प्रमाण तरि हें नघडेचि भेदीं ॥१०७॥
डेरे रांझण घागरी म्हणुनि हीं नावें स्वरुपें जसीं
नाना - यज्ञ - कलाप लोक रचना वेदामध्येंही तसी
पात्रांचा विनियोग कर्म इतुक्या भेदासही बाधि तो
हे माती अवघी म्हणोनि वदनीं हा शब्द जो ऊठतो ॥१०८॥
असा भेदही बोलतो वेद जेथें तुम्हीं भेद तो मानितां तत्व तेथें
वदे ऐक्य तो अर्थ मोडोनि वेदीं घडेना तरी योजिती अर्थ भेदीं ॥१०९॥
जगत्सत्य जीवेश्वरा भिन्न जेथें किमर्थ श्रुती पाहिजेतील तेथें
अशा दूषणें ग्रंथ वाढेल भारी म्हणोनी नबोलेचि येथें मुराऽरी ॥११०॥
हरीनेचि या संस्कृतीं ग्रंथ केले असे दोष हे तेस्थळीं बोलियेले
महाराष्ट्र - भाषेंत या वेदरीती बहू बोलतां श्रोतयां वीट येती ॥१११॥
दपटिजे खल - नासिक जेधवां पसरितो मुख दुर्जन तेधवां
वदति शश्वदनेकचिदात्मता न वदवे पुसतां दृढ तत्वता ॥११२॥
जीवेश्वराऽभेद विरुद्धधर्मे हें बोलती जे नकळोनि वर्मे
ज्याच्या वळें मोडिति जे श्रुतीला ते व्यर्थ हा निर्णय येथ झाला ॥११३॥
कर्मप्रशंसादि निमित्त वेदीं जो भासतो भेद अतत्ववादीं
प्रमाण तें मानुनि तत्व जेथें श्रुतीमध्यें मोडिति अर्थ तेथें ॥११४॥
जगत्सत्यता भेद जीवेश्वरातें श्रुतीवांचुनीही कळे जें जनातें
श्रुती बोलती तत्वता तेंचि जेव्हां प्रमाणत्व त्याचेंचि थारे न तेव्हां ॥११५॥
असा वेद - तत्वाऽर्थ त्याला कळेना विना ऐक्य सिद्धांत हा आकळेना
म्हणोनीच अध्याय हा वासुदेवें असे निर्मिला वेद - तत्वारव्य - नावें ॥११६॥
न ऐक्यें घडे एक - जीवत्व जैसें न भेदें अनेकत्व जीवासि तैसें
असा उत्तराऽध्याय आरंभता हे कळे ज्यास तो ब्रम्ह होऊनि राहे ॥११७॥
Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2009-06-27T03:38:06.7600000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

amylidene

 • न. ऍमिलिडीन 
RANDOM WORD

Did you know?

कापूर जाळण्यामागची संकल्पना काय? कांही फायदे आहेत काय?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.