TransLiteral Foundation

श्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय १०

स्वामी समर्थांचा आशीर्वाद "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे."

अध्याय १०
श्री गणेशाय नमः ॥ गाठी होते पूर्वपूण्य । म्हणूनी पावलो नरजन्म । याचे सार्थक उत्तम । करणे उचित आपणा ॥१॥
ऐसा मनी करुनी विचार । आरंभिले स्वामीचरित्र । ते शेवटासी नेणार । स्वामी समर्थ असती पै ॥२॥
हावेरी नाम ग्रामी । यजुर्वेदी गृहस्थाश्रमी । बाळाप्पा नामे द्विज कोणी । राहत होते आनंदे ॥३॥
संपत्ति आणि संतती । अनुकूल सर्व तयांप्रती । सावकारी सराफी करिती । जनी वागती प्रतिष्ठित ॥४॥
तीस वर्षांचे वय झाले । संसाराते उबगले । सदगुरुसेवेचे दिवस असाले । मती पालटली तयांची ॥५॥
लटिका अवघा संसार । यामाजी नाही सार । परलोकी दारा पुत्र । कोणी नये कामाते ॥६॥
इहलोकी जे जे करावे । परलोकी त्याचे फळ भोगावे । दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविजे ॥७॥
बाळाप्पाचे मनात । यापरी विचार येत । सदा उद्विग्न चित्त । व्यवहारी सौख्या वाटेना ॥८॥
जरी संसारी वर्तती । तरी मनी नाही शांती । योग्य सदगुरु आपणाप्रती । कोठे आता भेटेल ॥९॥
हाचि विचार रात्रंदिन । चित्ताचे न होय समाधान । तयांप्रती सुस्वप्न । तीन रात्री एक पडे ॥१०॥
पंचपक्कान्ने सुवर्ण ताटी । भरोनी आपणापुढे येती । पाहोनिया ऐशा गोष्टी । उल्हासले मानस ॥११॥
तात्काळ केला निर्धार । सोडावे सर्व घरदार । मायापाश दृढतर । विवेकशस्त्रे तोडावा ॥१२॥
सोलापुरी काम आम्हांसी । ऐसे सांगूनी सर्वत्रांसी । निघाले सदगुरु शोधासी । घरदार सोडिले ॥१३॥
मुरगोड ग्राम प्रख्यात । तेथे आले फिरत फिरत । जेथे चिदंबर दीक्षित । महापुरुष जन्मले ॥१४॥
ते ईश्वरी अवतार । लोकां दाविले चमत्कार । तयांचा महिमा अपार । वर्णू केवी अल्प मती ॥१५॥
स्वामीचरित्र वर्णितां । चिदंबर दीक्षितांची कथा । आठवली ते वर्णिता । सर्व दोष हरतील ॥१६॥
महायात्रा संकल्पेकरुन । जन निघती घराहून । परी मार्गी लागल्या । पुण्यस्थान, स्नानदान करिताती ॥१७॥
महायात्रा स्वामीचरित्र । ग्रंथ क्रमिता मी किंकर । मार्गी लागले अति पवित्र । चिदंबर पुण्यस्थान ॥१८॥
तयांचे घेऊनी दर्शन । पुढे करावे मार्गक्रमण । श्रोती होउनी सावधान । श्रवणी सादर असावे ॥१९॥
मुरगोडी मल्हार दीक्षित । वेदशास्त्री पारंगत । धर्मकर्मी सदारत । ईश्वरभक्त तैसाची ॥२०॥
जयांची ख्याती सर्वत्र । विद्याधनाचे माहेर । अलिप्तपणे संसार । करोनी काळ क्रमिताती ॥२१॥
परी तया नाही संतती । म्हणोनिया उद्विग्न चित्ती । मग शिवाराधना करिती । कामना चित्ती धरोनी ॥२२॥
द्वादश वर्षे अनुष्ठान । केले शंकराचें पूजन । सदाशिव प्रसन्न होऊन । वर देत तयांसी ॥२३॥
तुझी भक्ती पाहोन । संतुष्ट झाले माझे मन । मीच तुझा पुत्र होईन । भरवसा पूर्ण असावा ॥२४॥
ऐकोनिया वरासी । आनंदले मानसी । वार्ता सांगता कांतेसी । तेही चित्ती तोषली ॥२५॥
तियेसी झाले गर्भधारण । आनंदले उभयतांचे मन । जो साक्षात् उमारमण । तिच्या उदरी राहिला ॥२६॥
अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी । इच्छामात्रे घडी मोडी । तो परमात्मा त्रिपुरारी । गर्भवास भोगीत ॥२७॥
नवमास भरता पूर्ण । कांता प्रसवली पुत्ररत्न । मल्हार दीक्षिते आनंदोन । संस्कार केले यथाविधी ॥२८॥
चिदंबर नामाभिधान । ठेवियले तयालागून । शुक्ल पक्षीय शशिसमान । बाळ वाढू लागले ॥२९॥
प्रत्यक्ष शंकर अवतरला । करु लागला बाललीला । पाहोनी जननी - जनकाला । कौतुक अत्यंत वाटतसे ॥३०॥
पुढे केले मौजीबंधन । वेदशास्त्री झाले निपुण । निघंट शिक्षा व्याकरण । काव्यग्रंथ पढविले ॥३१॥
एकदा यजमानाचे घरी । व्रत होते गजगौरी । चिदंबर तया अवसरी । पूजेलागी आणिले ॥३२॥
मृत्तिकेचा गज करोन । पूजा करिती यजमान । यथाविधी सर्व पूजन । दीक्षित त्यांसी सांगती ॥३३॥
प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता । गजासी प्राण येउनी तत्त्वता । चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान ॥३४॥
बाळपणी ऐशी कृति । पाहोनी सर्व आश्चर्य करिती । हे ईश्वर अवतार म्हणती । सर्वत्र ख्याती पसरली ॥३५॥
ऐशा लीला अपार । दाखविती चिदंबर । प्रत्यक्ष जे का शंकर । जगदुद्धारार्थ अवतरले ॥३६॥
असो पुढे प्रौढपणी । यज्ञ केला दीक्षितांनी । सर्व सामग्री मिळवूनी । द्रव्य बहुत खर्चिले ॥३७॥
तया समयी एके दिनी । ब्राह्मण बैसले भोजनी । तूप गेले सरोनी । दीक्षिताते समजले ॥३८॥
जले भरले होते घट । तयांसी लाविता अमृतहस्त । ते घृत झाले समस्त । आश्चर्य करिती सर्व जन ॥३९॥
तेव्हा पुणे शहारामाजी । पेशवे होते रावबाजी । एके समयी ते सहजी । दर्शनाते पातले ॥४०॥
अन्यायाने राज्य करीत । दुसर्‍यांचे द्रव्य हरीत । यामुळे जन झाले त्रस्त । दाद त्यांची लागेना ॥४१॥
तयांनी हे ऐकोन । मुरगोडी आले धावोन । म्हणती दीक्षितांसी सांगून । दाद आपुली लावावी ॥४२॥
रावबाजीसी वृत्तान्त । कर्णोपकर्णी झाला श्रुत । म्हणती जे सांगतील दीक्षित । ते अमान्य करवेना ॥४३॥
मग दीक्षितांसी निरोप पाठविला । आम्ही येतो दर्शनाला । परी आपण आम्हांला । त्वरित निरोप देईजे ॥४४॥
ऐसे सांगता दीक्षितांप्रती । तया वेळी काय बोलती । आता पालटली तुझी मती । त्वरित मागसी निरोप ॥४५॥
कोपला तुजवरी ईश्वर । जाईल राजलक्ष्मी सर्व । वचनी ठेवी निर्धार । निरोप तुज दिला असे ॥४६॥
सिद्धवाक्य सत्य झाले । रावबाजीचे राज्य गेले । ब्रह्मावर्ती राहिले । परतंत्र जन्मवरी ॥४७॥
एके समयी अक्कलकोटी । दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी । तेव्हा बोलले स्वामी यती । आम्ही त्याते जाणतो ॥४८॥
यज्ञसमारंभाचे अवसरी । आम्ही होतो त्यांच्या घरी । तूप वाढण्याची कामगिरी । आम्हांकडे तै होती ॥४९॥
लीलाविग्रही श्रीस्वामी । जयांचे आगमन त्रिभुवनी । ते दिक्षितांच्या सदनी । असतील नवल नसेची ॥५०॥
महासिद्ध दीक्षित । त्यांचे वर्णिले अल्पवृत्त । मुरगोडी बाळाप्पा येत ॥ पुण्यस्थान जाणोनी ॥५१॥
तिथे ऐकिला वृत्तान्त । अक्कलकोटी स्वामीसमर्थ । भक्तजन तारणार्थ । यतिरुपे प्रगटले ॥५२॥
अमृतासमान रसाळ कथा । ऐकता पावन श्रोता - वक्ता । करोनिया एकाग्र चित्ता । अवधान द्यावे श्रोते हो ॥५३॥
पुढले अध्यायी कथन । बाळाप्पा करील जप ध्यान । तयाची भक्ती देखोन । स्वामी कृपा करतील ॥५४॥
भक्तजनांची माउली । अक्कलकोटी प्रगटली । सदा कृपेची साउली । आम्हांवरी करो ते ॥५५॥
मागणे हेचि स्वामीप्रती । दृढ इच्छा माझे चित्ती । शंकराची प्रेमळ प्रीति । दास विष्णुवरी असो ॥५६॥
इति श्रीस्वामीचरित्रसारामृत । नाना प्राकृत कथा संमत । सदा परिसोत प्रेमळ भक्त । दशमोऽध्याय गोड हा ॥५७॥
श्री स्वामीराजार्पणमस्तु ॥ शुभं भवतु । श्रीरस्तु ॥
Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2009-06-26T01:41:09.4130000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गळ्यांत शेराची सरी आणि रिकामीच ओसरी

  • अंगावर दागीने खूप घालावयाचे, घरात खूप श्रीमंती आहे असे दाखवावयाचे पण प्रत्‍यक्ष पाहावें तो घरात काही सामुग्री, दाणेसुद्धा नसावयाचे. 
RANDOM WORD

Did you know?

कोणतीही ही पूजा करण्याआधी संकल्प कां करावा?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site