TransLiteral Foundation

श्री स्वामी समर्थ सारामृत - अध्याय १

स्वामी समर्थांचा आशीर्वाद "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"

अध्याय १

॥ पहिला अध्याय ॥
श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्री गुरुभ्यो नमः ॥ श्री कुलदेवतायै नमः ॥
श्री अक्कलकोटनिवासी - पूर्णदत्तावतार - दिगंबर - यतिवर्य स्वामिराजाय नमः ॥

श्लोक ... ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति । द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ॥
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं । भावातीतं त्रिगुणरहितं सदगुरुं तं नमामि ॥
जयजय श्रीजगरक्षका । जयजयाजी भक्तपालका । जयजय कलिमलनाशका । अनादिसिद्ध जगदगुरु ॥१॥
जयजय क्षीरसागर विलासा । मायाचक्रचालका अविनाशा । शेषशयन अनंतवेषा । अनामातीता अनंता ॥२॥
जयजयाजी गरुडवाहना । जयजयाजी कमललोचना । जयजयाजी पतितपावना । रमारमणा विश्वेशा ॥३॥
मेघवर्ण आकार शांत । मस्तकी किरीट विराजित । तोच स्वयंभू आदित्य । तेज वर्णिले न जाय ॥४॥
विशाळ भाळ आकर्ण नयन । सरळ नासिका सुहास्य वदन । दंतपंक्ति कुंदकळ्यांसमान । शुभ्रवर्ण विराजती ॥५॥
रत्नमाला हदयावरी । जे कोटी सूर्याचे तेज हरी । हेममय भूषणे साजिरी । कौस्तुभमणि विशेष ॥६॥
वत्सलांच्छनाचे भूषण । तेचि प्रेमळ भक्तीची खूण । उदरी त्रिवळी शोभायमान । त्रिवेणीसंगमासारखी ॥७॥
नाभिकमल सुंदर अति । जेथे विधात्याची उत्पत्ती । की चराचरा जन्मदाती । मूळ जननी तेचि पै ॥८॥
जानूपर्यंत कर शोभती । मनगटी कंकणे विराजती । करकमलांची आकृति । रक्तपंकजासमान ॥९॥
भक्ता द्यावया अभय वर । सिद्ध सर्वदा सव्य कर । गदा पद्म शंख चक्र । चार हस्ती आयुधे ॥१०॥
कांसे कसिला पीतांबर । विद्युल्लतेसम तेज अपार । कर्दळीस्तंभापरि सुंदर । उभय जंघा दिसताती ॥११॥
जेथे भक्तजन सुखावती । ज्याच्या दर्शने पतित तरती । ज्याते अहोरात्र ध्याती । नारदादि ऋषिवर्य ॥१२॥
ज्याते कमला करे चुरीत । संध्यारागा समान रक्त । तळवे योग्य चिन्हें मंडित । वर्णिता वेद शीणले ॥१३॥
चौदा विद्या चौसष्ट कला । ज्याते वर्णिता थकल्या सकळा । ऐशा त्या परम मंगला । अल्पमती केवि वर्णू ॥१४॥
नारदादि मुनीश्वर । व्यास वाल्मीकादि कविवर । क्रमू न शकले महिमांवर । तेथे पामर मी काय ॥१५॥
जो सकळ विश्वाचा जनिता । समुद्रकन्या ज्याची कांता । जो सर्व कारण कर्ता । ग्रंथारंभी नमू तया ॥१६॥
त्या महाविष्णूचा अवतार । गजवदन शिवकुमर । एकदंत फरशधर । अगम्य लीला जयांची ॥१७॥
जो सकळ विद्यांचा सागर । चौसष्ट कलांचे माहेर । ऋद्धि सिद्धीचा दातार । भक्त पालक दयाळू ॥१८॥
मंगल कार्यी करिता स्मरण । विघ्ने जाती निरसोन । भजका होई दिव्य ज्ञान । वेदांतसार कळे पां ॥१९॥
सकल कार्यारंभी जाणा । करिती ज्याच्या नामस्मरणा । ज्याच्या वरप्रसादे नाना । ग्रंथरचना करिती कवी ॥२०॥
तया मंगलासी साष्टांग नमन । करुनी मागे वरदान । स्वामी चरित्र सारामृत पूर्ण । निर्विघ्नपणे होवो हे ॥२१॥
जिचा वरप्रसाद मिळता । मूढ पंडित होती तत्त्वता । सकळ काव्यार्थ येत हाता । ती ब्रह्मसुता नमियेली ॥२२॥
मूढमती मी अज्ञान । काव्यादिकांचे नसे ज्ञान । माते तू प्रसन्न होवोन । ग्रंथरचना करवावी ॥२३॥
जो अज्ञानतिमिरनाशक । अविद्याकाननच्छेदक । जो सदबुद्धीचा प्रकाशक । विद्यादायक गुरुवर्य ॥२४॥
ज्याचिया कृपेकरोन । सच्छिष्या लाधे दिव्यज्ञान । तेणेच जगी मानवपण । येतसे की निश्चये ॥२५॥
मी मतिमंद अज्ञ बाळ । घेतली असे थोर आळ । ती पुरविणार दयाळ । सदगुरुराज आपणची ॥२७॥
नवमास उदरी पाळिले । प्रसववेदनांते सोशिले । कौतुके करुनी वाढविले ॥२८॥
जननीजनका समान । अन्य दैवत आहे कोण । वारंवार साष्टांग नमन । चरणी तयांच्या करीतसे ॥२९॥
ब्रह्मा विष्णु महेश्वर । तिन्ही देवांचा अवतार । लीलाविग्रही अत्रिकुमर । दत्तात्रेय नमियेला ॥३०॥
तीन मुखे सहा हात । गळा पुष्पमाळा शोभत । कर्णी कुंडले तेज अमित । विद्युल्लतेसमान ॥३१॥
कामधेनु असोनि जवळी । हाती धरिली असे झोळी । जो पाहता एक स्थळी । कोणासही दिसेना ॥३२॥
चार वेद होऊनी श्वान । वसती समीप रात्रंदिन । ज्याचे त्रिभुवनी गमन । मनावेगे जात जो ॥३३॥
त्या परब्रह्मासी नमन । करोनि मागे वरदान । स्वामी चरित्र सारामृत पूर्व । होवो कृपेने आपुल्या ॥३४॥
वाढला कलीचा प्रताप । करु लागले लोक पाप । पावली भूमि संताप । धर्मभ्रष्ट लोक बहू ॥३५॥
पहा कैसे दैव विचित्र । आर्यावर्ती आर्यपुत्र । वैभवहीन झाले अपार । दारिद्र्य, दुःखे भोगिती ॥३६॥
शिथिल झाली धर्मबंधने । नास्तिक न मानिती वेदवचने । दिवसेदिवस होमहवने । कमी होऊ लागली ॥३७॥
सुटला धर्माचा राजाश्रय । अधर्मप्रवर्तका नाही भय । उत्तरोत्तर नास्तिकमय । भरतखंड जाहले ॥३८॥
नाना विद्या आणि कला । अस्तालागी गेल्या सकला । ऐहिक भोगेच्छा बळावल्या । तेणे सुटला परमार्थ ॥३९॥
धर्मसंस्थापनाकारणे । युगायुगी अवतार घेणे । नानाविध वेष नटणे । जगत्पतीचे कर्तव्य ॥४०॥
लोक बहु भ्रष्ट झाले । स्वधर्मातें विसरले । नास्तिकमतवादी मातले । आर्यधर्माविरुद्ध ॥४१॥
मग घेतसे अवतार । प्रत्यक्ष जो का अत्रिकुमर । अक्कलकोटी साचार । प्रसिद्ध झाला स्वामीरुपे ॥४२॥
कोठे आणि कोणत्या काळी । कोण्या जातीत कोणत्या कुळी । कोण वर्णाश्रम धर्म मुळी । कोणासही कळेना ॥४३॥
ते स्वामी नामे महासिद्ध । अक्कलकोटी झाले प्रसिद्ध । चमत्कार दाविले नानाविध । भक्त मनोरथ पुरविले ॥४४॥
त्यांसी साष्टांग नमोनी । करी प्रार्थना कर जोडोनी । आपुला विख्यात महिमा जनी । गावयाचे योजिले ॥४५॥
तुमचे चरित्र महासागर । पावेन कैसा पैलतीर । परि आत्मसार्थक करावया साचार । मीन तेथे जाहलो ॥४६॥
किंवा अफाट गगनसमान । अगाध आपुले महिमाना अल्पमती मी अज्ञान । आक्रमण केवी करु ॥४७॥
पिपीलिका म्हणे गिरीसी । उचलून घालीन काखेसी । किंवा खद्योत सूर्यासी । लोपवीन म्हणे स्वतेजे ॥४८॥
तैसी असे माझी आळ । बाळ जाणूनी लडिवाळ । पुरविता तू दयाळ । दिनबंधू यतिवर्या ॥४९॥
कर्ता आणि करविता । तूंचि एक स्वामीनाथा । माझिया ठाई वार्ता । मीपणाची नसेची ॥५०॥
ऐसी ऐकुनिया स्तुती । संतोषली स्वामीराजमूर्ति । कविलागी अभय देती । वरदहस्ते करोनी ॥५१॥
उणे न पडे ग्रंथात । सफल होतील मनोरथ । पाहूनी आर्यजन समस्त । संतोषतील निश्चये ॥५२॥
ऐसी ऐकोनि अभयवाणी । संतोष झाला माझिया मनी । यशस्वी होवोनी लेखणी । ग्रंथसमाप्तीप्रति पावो ॥५३॥
आता नमू साधूवृंद । ज्यासी नाही भेदाभेद । जे स्वात्मसुखी आनंदमय । सदोदित राहती ॥५४॥
मग नमिले कविश्वर । जे शब्दसृष्टीचे ईश्वर । ज्यांची काव्ये सर्वत्र । प्रसिद्ध असती या लोकीं ॥५५॥
व्यास वाल्मीक महाज्ञानी । बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी । वारंवार तयांच्या चरणी । नमन माझे साष्टांग ॥५६॥
कविकुलमुकुटावतंस । नमिले कवि कालिदास । ज्यांची नाट्यरचना विशेष । प्रिय जगीं जाहली ॥५७॥
श्रीधर आणि वामन । ज्यांची ग्रंथरचना पाहोन । ज्ञातेही डोलाविती मान । तयांचे चरण नमियेले ॥५८॥
ईशचरणी जडले चित्त । ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित । वरप्रसादाकारणे ॥५९॥
अहो तुम्ही संत जनी । मज दीनावरी कृपा करोनी । आपण हदयस्थ राहोनी । ग्रंथरचना करवावी ॥६०॥
आता करु नमन । जे का श्रोते विचक्षण । महाज्ञानी आणि विद्वान । श्रवणी सादर बैसले ॥६१॥
महापंडित आणि चतुर । ऐसा श्रोतृसमाज थोर । मतिमंद मी त्यांच्यासमोर । आपले कवित्व केवी आणू ॥६२॥
परी थोरांचे लक्षण । एक मला ठाउके पूर्ण । काही असता सदगुण । आदर करिती तयाचा ॥६३॥
संस्कृताचा नसे गंध । मराठीही न ये शुद्ध । नाही पढलो शास्त्रछंद । कवित्वशक्ती अंगी नसे ॥६४॥
परी हे अमृत जाणोनी । आदर धरावा जी श्रवणी । असे माझे असंस्कृत वाणी । तियेकडे न पहावे ॥६५॥
न पाहता जी अवगुण । ग्राह्य तितुकेंच घ्यावे पूर्ण । एवढी विनंती कर जोडोनी । चरणी आपुल्या करीतसे ॥६६॥
स्वामींच्या लीला बहुत । असती प्रसिद्ध लोकांत । त्या सर्व वर्णिता ग्रंथ । पसरेल समुद्रसा ॥६७॥
त्या महोदधीतुनी पाही । अमोल मुक्ताफळे घेतली काही । द्यावया मान सुज्ञाही । अनमान काही न करावा ॥६८॥
की हे उद्यान विस्तीर्ण । तयामाजी प्रवेश करीन । सुंदर कुसुमे निवडोन । हार त्यांचा गुंफिला ॥६९॥
कवि होवोनिया माळी । घाली श्रोत्यांच्या गळी । उभा ठाकोनि बद्धांजुळी । करी प्रार्थने सप्रेमे ॥७०॥
अहो या पुष्पांचा सुवास । तृप्त करील आपुले मानस । हा सुगंध नावडे जयास । तेचि पूर्ण अभागी ॥७१॥
आता असोत हे बोल । पुढे कथा बहु अमोल । वदविता स्वामी दयाळ । निमित्त मात्र विष्णुकवि ॥७२॥
वैराग्ये प्रत्यक्ष शंकर । तेजे जैसा सहस्त्रकर । दुष्टा केवळ सूर्यपुत्र । भक्ता मातेसमान ॥७३॥
यतिराजपदकल्हार । विष्णुकवि होऊनी भ्रमर । ज्ञानमधुस्तव साचार । रुंजी तेथे घलीतसे ॥७४॥
स्वामी चरित्र सारामृत ॥ नाना प्राकृत कथासंमत । आदरे भक्त परिसोत । प्रथमोऽध्याय गोड हा ॥७५॥
श्रीशंकरार्पणमस्तु । श्री श्रीपादश्रीवल्लभार्पणमस्तु ।
इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणं नाम प्रथमोऽध्यायः ॥१॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2009-06-25T04:46:32.8500000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

MAHĀTALA(महातल)

  • A section of Pātāla. The descendants of the serpent Kadrū live here. These serpents are manyheaded and terrible monsters. Chief among them are Kahaka, Takṣaka, Suṣeṇa, Kāliya and others. All these serpents have long and slender bodies, large hoods and are of very cruel nature. Still they are all afraid of Garuḍa and so live quietly with their families in Mahātala. [Devī Bhāgavata, 8th Skandha]. 
RANDOM WORD

Did you know?

लग्न ठरवितांना पत्रिका पाहणे किती योग्य आहे? पत्रिका पाहूनही कांही विवाह अयशस्वी कां होतात
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.