श्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय १३

'कथा कल्पतरू' या ग्रंथात चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे, तसेच रामायण, महाभारत व श्रीमद्‍भागवत हे हिंदू धर्मिय वाङमय ओवीरूपाने वर्णिलेले आहे.


श्री भगवान म्हणाले.

हे अर्जुना ! हे शरीर क्षेत्र या नावाने संबोधले जाते आणि याला जो जाणतो त्याला, त्याचे तत्त्व जाणणारे ज्ञानी लोक 'क्षेत्रज्ञ' असे म्हणतात. ॥१॥

हे अर्जुना ! तू सर्व क्षेत्रांमध्ये क्षेत्रज्ञ अर्थात जीवात्माही मलाच समज आणि क्षेत्र व क्षेत्रज्ञ अर्थात विकारांसहित प्रकृती व पुरुष यांना जे तत्त्वतः जाणणे, ते ज्ञान आहे, असे माझे मत आहे. ॥२॥

ते क्षेत्र जे आणि जसे आहे, तसेच ज्या विकारांनी युक्त आहे आणि ज्या कारणांपासून जे झाले आहे, तसेच तो क्षेत्रज्ञही जो आणि ज्या प्रभावाने युक्त आहे. ते सर्व थोडक्यात माझ्याकडून ऐक. ॥३॥

हे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञान तत्त्व ऋषींनी पुष्कळ प्रकारांनी सांगितले आहे आणि निरनिराळ्या वेदमंत्रांतूनही विभागपुर्वक सांगितले गेले आहे. तसेच पुर्णपणे निश्चय केलेल्या युक्तियुक्त ब्रह्मसूत्राच्या पदांनीही सांगितले आहे. ॥४॥

पाच महाभूते , अहंकार, बुद्धी आणि मूळ प्रकृती तसेच दहा इंद्रिये , एक मन आणि पाच इंद्रियांचे विषय अर्थात शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध ॥५॥

तसेच इच्छा, द्वेष, सुख, दुःख , स्थूल देहचा पिंड, चेतना आणि धृती अशा प्रकारे विकारांसहित हे क्षेत्र थोडक्यात सांगितले गेले आहे. ॥६॥

मोठेपणाचा अभिमान नसणे, ढोंग न करणे, कोणत्याही प्राण्याला कोणत्याही प्रकारे त्रास न देणे, क्षमा करणे, मन,वाणी इत्यांदीबाबतीत सरळपणा, श्रद्धाभक्तीसह गुरुंची सेवा, अंतर्बाह्य, शुद्धी अंतःकरणाची स्थिरता आणि मन व इंद्रियांसह शरीराचा निग्रह. ॥७॥

इह-परलोकांतील सर्व विषयांच्या उपभोगाविषयी आसक्ती नसणे आणी अहंकारही नसणे, जन्म, मृत्यू वृद्धत्व आणि रोग इत्यांदीमध्यें दुःख व दोषांचा वारंवार विचार करणे. ॥८॥

पुत्र , स्त्री, घर आणि धन इत्यादींची आसक्ती नसणे व ममता नसणे तसेच आवडती आणि नावडती गोष्ट घडली असता नेहमीच चित्त समतोल ठेवणे. ॥९॥

मज परमेश्वरामध्ये अनन्य योगाने अव्यभिचारिणी भक्ती, तसेच एकान्तात शुद्ध ठिकाणी राहण्याचा स्वभाव आणि विषयासक्त मनुष्यांच्या सहवासाची आवड नसणे. ॥१०॥

अध्यात्मज्ञानात नित्य स्थिती आणि तत्त्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा त्यालाच पाहणे हे सर्व ज्ञान होय आणि याउलट जे असेल, ते अज्ञान होय, असे म्हटले आहे. ॥११॥

जे जाणण्याजोगे आहे आणि जे जाणल्यामुळे मनुष्याला परम आनंद मिळतो, ते चांगल्या प्रकारे सांगतो, ते अनादी परम ब्रह्म 'संत्' हे म्हणता येत नाही आणी 'असत्' ही म्हणता येत नाही. ॥१२॥

ते सर्व बाजुनीं हात-पाय असलेले, सर्व बाजूंनी डोळे डोकी व तोंडे असलेले, तसेच सर्व बाजुंनी कान असलेले आहे. कारण ते विश्वात सर्वाला व्यापून राहिले आहे. ॥१३॥

ते सर्व इंद्रियांच्या विषयांना जाणणारे आहे. परंतु वास्तविक सर्व इंद्रियांनी रहित आहे. ते आसक्तिरहित असूनही सर्वाचे धारण - पोषण करणारे आणि निर्गुण असूनही गुणांचा भोग घेणारे आहे. ॥१४॥

ते चराचर सर्व प्राणिमात्रांच्या बाहेर व आत परिपूर्ण भरले आहे. तसेच चर आणि अचरही तेच आहे आणि ते सुक्ष्म असल्यामुळे कळल्याजोगे नाही. तसेच अतिशय जवळ आणि दूरही असलेले तेच आहे. ॥१५॥

तो परमात्मा विभागरहिन एकरूप असा आकाशासारखा परिपूर्ण असूनही चराचर संपुर्ण भुतांमध्ये वेगवेगळा असल्यासारखा भासत आहे. तसाच तो जाणण्याजोगा परमात्मा विष्णुरूपाने भूतांचे धारण-पाषण करणारा, रुद्ररूपाने संहार करणारा आणी ब्रह्मदेवरूपाने सर्वांना उत्पन्न करणारा आहे. ॥१६॥

ते परब्रह्म ज्योतींची ज्योत आणि मायेच्या अत्यंत पलीकडचे म्हटले जाते. तो परमात्मा ज्ञानस्वरूप, जाणण्यास योग्य आणि तत्त्वज्ञानाने प्राप्त होण्याजोगा आहे. तसेच सर्वाच्या हृदयांत विशेषरूपाने राहिलेला आहे. ॥१७॥

अशा प्रकारे क्षेत्र तसेच ज्ञान आणि जाणण्याजोगे परमात्म्याचे स्वरूप थोडक्यात सांगितले. माझा भक्त हे तत्त्वतः जाणून माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. ॥१८॥

प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही अनादी आहेत, असे तू समज आणि राग - द्वेषादी विकार तसेच त्रिगुणात्मक सर्व पदार्थही प्रकृतीपासूनच उप्तन्न झालेले आहेत, असे समज. ॥१९॥

कार्य व कारण यांच्या उप्तत्त्तीचे कारण प्रकृती म्हटली जाते आणि जीवात्म सुखदूःखांच्या भोगण्याला कारण म्हटला जातो. ॥२०॥

प्रकृतीत राहिलेल्या पुरुष प्रकृतीपासून उप्तन्न झालेल्या त्रिगुणात्मक पदार्थांनां भोगतो आणि या गुणांची संगतीच या जीवात्म्याला बर्‍या वाईट योगीत जन्म मेळण्याला कारण आहे.॥२१॥

या देहात असलेला आत्मा वास्तविक परमात्माच आहे. तोच साक्षी असल्यामुळे उपद्रष्टा आणि खरी समंती देणारा असल्याने अनुमन्ता, सर्वांचे धोरण-पषण करणारा म्हणुन भर्ता, जीवनरूपाने भोक्ता, ब्रह्मदेव इत्यादींचाही स्वामी असल्याने महेश्वर आणि शुद्ध सच्चिदानन्दघन असल्यामुळे परमात्मा म्हटला जातो. ॥२२॥

अशा रीतीने पुरुषाला आणि गुणांसहित प्रकृतीला जो मनुष्य तत्त्वतः जाणतो, तो सर्व प्रकारे कर्तव्य कर्मे करीत असला, तरी पुन्हा जन्मला येत नाही. ॥२३॥

त्या परमात्म्याला काहीजण शुद्ध झालेला सूक्ष्म बुद्धीने ध्यानाच्या योगाने हृदयात पाहतात. दुसरे काहीजण ज्ञानयोगाच्या द्वारा आणि इतर कितीतरी लोक कर्मयोगाच्या द्वारा पाहतात म्हणजेच प्राप्त करतात. ॥२४॥

परंतु यांखेरीज इतर अर्थात मंदबुद्धीचे पुरुष आहेत, ते अशाप्रकारे न जाणणारे असतात. ते दुसर्‍याकडून म्हणजेच तत्त्वज्ञानी पुरुषांकडुन ऐकूनच तद्‌नुसार उपासना करतात आणि ते ऐकलेले प्रमाण मानणारे पुरुषसुद्धा मृत्युरूप संसारसागर खात्रीने तरून जातात. ॥२५॥

हे अर्जुना ! जेवढे म्हणुन स्थावर जंगम प्राणी उप्तन्न होतात, ते सर्व क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाच्या संयोगानेच उप्तन्न होतात, असे समज. ॥२६॥

जो पुरुष नाशिवंत सर्व चराचर भूतांत परमेश्वर हा अविनाशी व सर्वत्र समभावाने स्थिर असलेला पाहतो, तोच खरे पाहतो. ॥२७॥

कारण जो पुरुष सर्वामध्ये समरूपाने असलेला परमेश्वराला समान पाहून आपणच आपला नाश करून घेत नाही, त्यामुळे तो परम गतीला जातो. ॥२८॥

आणि जो पुरुष सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीकडून केली जाणारी आहेत, असे पाहतो आणी आत्मा अकर्ता आहे, असे पाहतो, तोच खरा पाहतो. ॥२९॥

ज्या क्षणी हा पुरुष भुतांचे निरनिराळे भाव एका परमात्म्यातच असलेले आणि त्या परमात्म्यापासूनच सर्व भूतांचा विस्तार आहे. असे पाहातो, त्याच क्षणी तो सच्चिदानन्दघन ब्रह्माला प्राप्त होतो. ॥३०॥

हे अर्जुना ! हा अविनाशी परमात्मा अनादी आणि निर्गुण आसल्यामुळे शरीरात राहात असूनही वास्तविक तो काही करीत नाही आणि लिप्त होत नाही. ॥३१॥

ज्याप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आकाश सूक्ष्म असल्याकारणाने लिप्त होत नाही त्याचप्रमाणे देहात सर्वत्र व्यापून असलेला आत्मा निर्गुण असल्यामुळे देहाच्या गुणांनी लिप्त होत नाही. ॥३२॥

हे अर्जुना ! ज्याप्रमाणे एकच सूर्य या संपूर्ण ब्रह्मांडाला प्रकाशित करतो, त्याचप्रमाणे एकच आत्मा संपूर्ण क्षेत्राला प्रकाशित करतो. ॥३३॥

अशाप्रकारे क्षेत्र व क्षेत्रज्ञ यांतील भेद तसेच कार्यासह प्रकृतीपासून मुक्त होण्याचा मार्ग ज्ञानदृष्टीने जे पुरुष तत्वतः जाणतात, ते महात्मे परम ब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. ॥३४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP