श्रीमद्‍भगवद्‍गीता - अध्याय ८

श्रीमद्‍भगवद्‍गीतेत सांगितलेली भक्ति म्हणजे धार्मिक समाधान देणारे विचारयुक्त साधन आहे शिवाय श्रद्धा व भक्तियुक्त अंतःकरणाने एकाग्र होऊन विचार केल्यास एक वेगळाच शब्दातीत अनुभव येतो.


अर्जुन म्हणाला,

हे पुरुषोत्तमा ! ते ब्रह्म कार्य आहे ? अध्यात्म काय आहे ? कर्म काय आहे ? अधिभूत शब्दाने काय सांगितले आहे ? आणि अधिदैव कशाला म्हणतात ? ॥१॥

हे मधूसूदना ! येथे अधियज्ञ कोण आहे ? आणि तो या शरीरात कसा आहे ? तसेच अंतकाळी युक्त चित्ताचे पुरुष तुम्हांला कसे जाणतात ? ॥२॥

श्रीभगवान म्हणाले,

परम अक्षर ' ब्रह्म ' आहे. आपले स्वरूप अर्थात जीवात्मा ' अध्यात्म ' नावाने सांगितला जातो. तसेच भूतांचे भाव उत्पन्न करणारा जो त्याग आहे, तो ' कर्म ' या नावाने संबोधला जातो. ॥३॥

उप्तत्ति-विनाश असलेले सर्व पदार्थ ' अधिभूत ' आहेत. हिरण्यमय पुरुष अधिदैव आहे आणि हे देहधार्‍यांमध्ये श्रेष्ठ अर्जुना ! या शरीरात मी वासुदेवच अन्तर्यामी रूपाने अधियज्ञ आहे.॥४॥

जो पुरुष अंतकाळीही माझेच स्मरण करीत शरीराचा त्याग करून जातो, तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळीच शंका नाही. ॥५॥

हे कुन्तीपुत्र अर्जुना ! हा मनुष्य अंतकाळी ज्या ज्या भावाचे स्मरण करीत शरीराचा त्याग करतो, त्याला त्याला तो जाऊन मिळतो. कारण तो नेहमी त्याच भावाचे चिंतन करीत असतो. ॥६॥

म्हणुन हे अर्जुना ! तू सर्वकाळी निरंतर माझे स्मरण कर आणि युद्धही कर. अशाप्रकारे माझ्या ठिकाणी मन बुद्धी अर्पण केल्यामुळे तू निःसंशय मलाच मिळशील. ॥७॥

हे पार्था ! असा नियम आहे की, परमेश्वराच्या ध्यानाच्या अभ्यासरूपी योगाने युक्त, दुसरीकडे न जाणार्‍या चित्ताने निरंतर चिंतन करणारा मनुष्य, परम प्रकाशस्वरूप दिव्य पुरुषाला म्हणजे परमेश्वरालाच जाऊन मिळतो. ॥८॥

जो पुरुष सर्वज्ञ, अनादी, सर्वाचा नियामक , सूक्ष्माहूनही अतिसूक्ष्म, सर्वाचे धारण-पोषण करणारा, अतर्क्यस्वरूप, सूर्याप्रमाणे नेहमी चेतन प्रकाशरूप आणि अविद्येच्या अत्यंत पलीकडील अशा शुद्ध सच्चिदानंदघन परमेश्वराचे स्मरण करतो, ॥९॥

तो भक्तियुक्त पुरुष अंतकाळीसुद्धा योगबलाने भुवयांच्या मध्यभागी प्राण चांगल्या रीतीने स्थापन करून मग निश्चल मनाने स्मरण करीत त्या दिव्यरूप परम पुरुष परमात्म्यालाच प्राप्त होतो. ॥१०॥

वेदवेत्ते विद्वान ज्या सच्चिदानंघनरूप परमपदाला अविनाशी म्हणतात, आसक्ती नसलेले यत्‍नशील संन्यासी महात्मे ज्याच्यामध्ये प्रवेश करतात आणि ज्या परमपदाची इच्छा करणारे ब्रह्माचारी ब्रह्मचर्याचे आचरण करतात, ते परमपद मी तुला थोडक्यात सांगतो ॥११॥

सर्व इंद्रियंची द्वारे अडवून, मनाला हृदयाच्या ठिकाणी स्थिर करून, नंतर जिंकलेल्या मनाने प्राण मस्तकात स्थापन करून, परमात्मसंबधी योगधारणेत स्थिर होऊन जो पुरुष ॥१२॥

' ॐ ' या एक अक्षररूप ब्रह्माचा उच्चार करीत आणि त्याचे अर्थस्वरूप निर्गुण ब्रह्म जो मी, त्याचे चिंतन करीत देह टाकून जातो, तो परम गतीला प्राप्त होतो. ॥१३॥

हे अर्जुना ! जो पुरुष माझ्या ठिकाणी अनन्यचित्त होऊन नेहमी मज पुरुषोत्तमाचे स्मरण करतो, त्या नित्य माझ्याशी युक्त असलेल्या योग्याला मी सहज प्राप्त होणारा आहे. ॥१४॥

परम सिद्धी मिळविलेले महात्मे एकदा मला प्राप्त झाल्यावर दुःखाचे आगर असलेल्या क्षणभंगुर पुनर्जन्माला जात नाहीत. ॥१५॥

हे अर्जुना ! ब्रह्मलोकापर्यंतचे सर्व लोक पुनरावती आहेत. परंतु हे कुंतीपुत्रा ! मला प्राप्त झाल्यावर पुनर्जन्म होत नाही. कारण मी कालातीत आहे आणि हे सर्व ब्रह्मादिकांचे लोक कालाने मर्यादित असल्याने अनित्य आहेत. ॥१६॥

ब्रह्मादेवाचा एक दिवस एक हजार चतुर्युगांचा असून रात्रही एक हजार चतुर्युगांची असते. जे योगी हे तत्त्वतः जाणतात, ते काळाचे स्वरूप जाणणारे होत. ॥१७॥

सर्व चराचर भूतसमुदाय ब्रह्मदेवाच्या दिवसाच्या आरंभी अव्यक्तापासून म्हणजे ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरापासून उप्तन्न होतात आणि ब्रह्मदेवाच्या रात्रीच्या आरंभी त्या अव्यक्त नावाच्या ब्रह्मदेवाच्या सूक्ष्म शरीरात विलीन होतात. ॥१८॥

हे पार्था ! तोच हा भूतसमुदाय पुन्हा पुन्हा उप्तन्न होऊन प्रकृतीच्या आधीन असल्यामुळे रात्रीच्या आरंभी विलीन होतो व दिवसाचा आरंभी पुन्हा उप्तन्न होतो. ॥१९॥

त्या अव्यक्ताहून फार पलीकडचा दुसरा अर्थात विलक्षण जो सनातन अव्यक्त भाव आहे, तो परम दिव्य पुरुष सर्व भूते नाहीशी झाली तरी नाहीसा होत नाही. ॥२०॥

त्याला ' अव्यक्त ' अक्षर असे म्हणतात, त्यालाच श्रेष्ठ गती म्हणतात. ज्या सनातन अव्यक्त भावाला प्राप्त झाल्यावर मनुष्य परत येत नाही, ते माझे सर्वश्रेष्ठ स्थान होय. ॥२१॥

हे पार्था ! ज्या परमात्माच्या ठिकाणी सर्व भूते आहेत आणि ज्या सच्चिदानन्दघन परमात्म्याने हे सर्व जग व्यापले आहे , तो सनातन अव्यक्त परम पुरुष अनन्य भक्तीनेच प्राप्त होणारा आहे. ॥२२॥

हे अर्जुना ! ज्या काळी शरीराचा त्याग करुन गेलेल्या योगी परत जन्माला न येणार्‍या गतीला प्राप्त होतात आणि ज्या काळी गेलेले परत जन्माला येणार्‍या गतीला प्राप्त होतात, तो काळ अर्थात दोन मार्ग मी सांगेन. ॥२३॥

ज्या मार्गात ज्योतिर्मय अग्नीची अभिमानी देवता आहे. दिवसाची अभिमानी देवता आहे, शुक्लपक्षाची अभिमानी देवता आहे आणि उत्तरायणाच्या सहा महिन्यांची अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यावर गेलेले ब्रह्मज्ञानी योगी वरील देवतांकडून क्रमाने नेले जाऊन ब्रह्माला प्राप्त होतात. ॥२४॥

ज्या मार्गात धुराची अभिमानी देवता आहे, रात्रीची अभिमानी देवता आहे, कृष्णपक्षाची अभिमानी देवता आहे आणि दक्षिणायनाच्या सहा महिन्यांचे अभिमानी देवता आहे, त्या मार्गात मेल्यावर गेलेल्या सकाम कर्म करणारा योगी वरील देवतांकडून नेला जातो. पुढे तो चन्द्रतेजाला प्राप्त होऊन स्वर्गात आपल्या शुभकर्माची फळे भोगून परत येतो. ॥२५॥

कारण जगाचे हे दोन प्रकरचे शुक्ल आणि कृष्ण अर्थात देवयान आणि पितृयान मार्ग सनातन मानले गेले आहेत. यांतील ज्या मार्गाने गेले असता परत यावे लागत नाही, अशा मार्गाने गेलेला त्या परम गतीला प्राप्त होतो आणि दुसर्‍या मार्गाने गेलेला पुन्हा परत येतो म्हणजे जन्म- मृत्यूला प्राप्त होतो. ॥२६॥

हे पार्था ! अशा रीतीने या दोन मार्गाना तत्त्वतः जाणल्यावर कोणीही योगी पावत नाही. म्हणुन हे अर्जुना ! तू सर्व काळी समबुद्धिरूप योगाने युक्त हो अर्थात नेहमी माझ्या प्राप्तीसाठी साधन करणारा हो. ॥२७॥

योगी पुरुष या रहस्याला तत्त्वतः जाणुन, वेदांचे पठण, यज्ञ, तप, दान इत्यादी करण्याचे जे पूण्यफल सांगितले आहे, त्या सर्वाला निःसंशय ओलांडून जातो आणि सनातन परमपदाला पोहोचतो. ॥२८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 15, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP