प्राणवहस्त्रोतस् - कास

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरूषार्थांच्या प्राप्तीकरितां आरोग्य हे अत्यंत आवश्यक असते.


व्याख्या - कसति शिरकण्ठात् उर्ध्व गच्छति वायु: इति कास: ।
मा.नि.कास २ टीका पान १३५
कसनात् कास उच्यते ।
च.चि.१८-५ पान १२५०
भिन्नकांस्यपात्रवत् हतस्वन: कास इति प्रदिष्ट: ।
मा.नि. कास २ म. टीका

गतिवाचक कस धातूपासून कास शब्द सिद्ध होतो. वायू हा कण्ठांतून वा शिरांतून जणु वेगानें बाहेर पडतो आहे असें वाटतें म्हणून या विकारांस `कास' हे नांव प्राप्त झालें आहें. किंवा खोकतांना काशाच्या फुटक्या भांडयाप्रमाणें ध्वनि येतो म्हणूनहि कास नांव दिले गेलें आहे.
शारीर
कण्ठ,स्वरवहस्त्रोतस्, कण्ठनाडी, अपस्तंभ, व क्वचित् गलनाडी (अन्नवाहिनी) या ठिकाणी असलेला क्षोभ, या स्त्रोतोरोध हा कास या विकारास कारणीभूत होतो. येथील स्त्रोतोरोधाची कारणें फुफ्फुस वा हृदय यांच्या विकृतिशीहि संबद्ध असतात.
स्वभाव
प्रकार भेदानें मृदु, दारुण
मार्ग
मध्यम व अभ्यंतर
प्रकार
पञ्चकासा: स्मृता वातपित्तश्लेष्मक्षतक्षयै: ।
क्षयायोपेक्षिता: सर्वे बलिनश्चोत्तरोत्तरम् ॥
अ.स.नि.३, पान २५

कासाश्चाष्टौ समुद्दिष्टा: क्षतजोऽन्य:प्रकीर्तित: ॥
वातिक: पैत्तिकश्चैव श्लेष्मिक: सान्निपातक: ॥
वातपित्तसमुद्भूत: श्लेष्मपित्तसमुद्‍भव: ॥
सप्तमो लोहितेनात्र चाष्टमो जायते क्षयात् ॥
हरिसंहिता, तृतीयस्थान १२, पान ३१५

कासाचे वातज, पित्तज, कफज, क्षतज व क्षयज असे पांच प्रकार आहेत. हे सर्व अनुक्रमानें एकापेक्षां एक अधिक बलवान आहेत. हारीतानें पाडलेल्या प्रकारांत सान्निपातिक, वातपित्तज व कफपित्तज असे तीन प्रकार अधिक आहेत. द्वंद्वज कास मानीत असतांना वातकफज असाहि एक प्रकार अधिक आहेत. द्वंद्वज कास मानीत असतांना वातकफज असाहि एक प्रकार करणें आवश्यक होतें. कदाचित् सामान्य संप्राप्तींतच वात व कफ यांचा संबंध असल्यामुळें वातकफज प्रकार वस्तुत: क्षतज कास आहे. पण हारीतानें क्षतजोन्य: प्रकीर्तित: असें म्हटलें आहे, त्याची संगती नीट लागत नाहीं.
हेतू
धूमोपघाताद्रजस्तथैव व्यायामरुक्षान्ननिषेवणाश्च ॥
विमार्गगत्वादपि भोजनस्य वेगावरोधात् क्षवथोस्तथैव ॥
सु.उ.५२-४, पान ७६५

उक्ता ये हेतवो नृणां रोगयो: श्वासहिक्कयो: ॥
कासस्यापि च विज्ञेयास्त एवोत्पत्तिहेतव: ॥
सु.उ.५२-३, पान ७६५

विदाहिगुरुविष्टम्भिरुक्षाभिष्यन्दिभोजनै: ।
शीतपानासनस्थानरजोधूमानिलानलै: ॥
व्यायामकर्मभाराध्ववेगाघातापतर्पणै: ।
आमदोषाभिघातस्त्रीक्षयदोषप्रपीडनै: ।
विषमाशनाध्यनशनैस्तथा समशनैरपि ।
हिक्का श्वासश्च कासश्च नृणां समुपजायते ॥
सु.उ.५० ३ ते ५, पान ७५८

कषायविज्जलासात्म्यकट्‍वम्ललवणोषणै: ।
रुक्षशीतगुरुस्निग्धोत्क्लेदिपर्युषिताशनै: ॥
धारणोदीरणायासरात्र्यह: स्वप्नजागरै: ।
अन्यैश्च तद्विधैर्धातुक्षयावरणकारिभि: ॥
अ.सं. नि. ३, पान २५, २६

रुक्षशीतकाषायाल्पप्रमितानशनं स्त्रिय: ।
वेगधारणमायासो वातकासप्रवर्तका: ॥
च.चि.१८-१०, पान १२५०

कटुकोष्णविदाह्यम्लक्षाराणामतिसेवनम् ।
पित्तकासकरं कोर्ध: संतापाश्चग्निसूर्यज: ॥
च.चि. १८-१४, पान १२५०

गुर्वभिष्यन्दिमधुरस्निग्धस्वप्नाविचेष्टनै: ।
च.चि. १८-१७, पान १२५०

अतिव्यवायभाराध्वयुद्धाश्वगजविग्रहै: ।
च.चि. १८-२०, पान १२५१

व्यायामभाराध्ययनाभिघातै: ।
सु.उ. ५२-११ पान ७६६

विषमासात्म्यभोज्यातिव्यवायाद्वेगनिग्रहात् ।
घृणिनां शोचतां नृणां ।
च.चि. १८-२४, पान १२५१

धूर, धूळ यांनीं नासा-कण्ठ-मुख यांचा उपघात होणें, व्यायाम, रुक्षान्नसेवन, अन्न विमार्गग होणें, न आलेले वेग उत्पन्न करणें, वेग विधारण करणें, विशेषत: शिंकेचा अवरोध करणें, मिरे, मोहोरी मद्य यासारखीं विदाहीं द्रव्यें, कषाय लवण रसात्मक द्रव्यें, क्लेद उत्पन्न झालेले बुळबुळीत, शिळे गुरु, अभिष्यंदी अवष्टंभ करणारे पदार्थ, यांचें सेवन करणें, शीत पेय पिणें, शीत स्पर्श असलेल्या आसनावर बसणें वा गारठ्याच्या जागेंत रहाणें, फार चालणें, ओझी वाहणें, लंघन करणें, आमदोष उत्पन्न होणें, मार लागणें, दिवसा झोपणें, जागरण करणें, अति मैथुन, धातुक्षय, विषमाशन, अध्यशन, आमोत्पत्ति, कफामुळें स्त्रोतसांचे आवरण होणें, अनशन, या कारणांनीं दोष प्रकुपित होऊन कास व्याधि उत्पन्न होतो. प्रतिश्याय या योगामुळें कास होतो (प्रतिश्यायादथ कास: मा नि.) यांतील रुक्ष, शीत, कषाय, अल्प, परिमित, असा आहार घेणें, अतिमैथून, वेगधारण, जागरण, श्रम या अपथ्यामुळें वातज कास होतो. तिखट, उष्ण, विदाही, अम्ल, क्षार, यांचें अतिसेवन, क्रोधानें किंवा अग्नीच्या वा सूर्याच्या तापानें संतप्त होणें यामुळें पित्तज कास होतो. गुरु, अबिष्यंदी, मधुर स्निग्ध अशा द्रव्यांचें सेवन, फार झोपणें, विशेष हालचाल न करणें या कारणांनीं कफज कास होतो. फार व्यायाम करणें, फार चालणें, मोठीं मोठीं ओझी उचलणें, हत्ती, घोडा, याच्याशीं झुंज करणें, मार लागणें, मोठयानें पठण करणें या सारख्या साहसी कृत्यानें क्षतज कास होतो. विषम भोजन करणें, न सोसणारें अन्न खाणें अतिमैथुन, वेग-निग्रह, घृणा, शोक, या कारणांनीं क्षयज कास होतो. धूळ, धूर, तिखट, विदाही पदार्थ, मोठयानें बोलणें, ठसका लागणें, धातु क्षीण होणें या कारणांनीं कण्ठामध्यें स्थानवैगुण्य निर्माण होतें. रुक्ष, विष्टंभी द्रव्यें, अतिव्यायाममैथुन या कारणांनीं वातप्रकोप होतो. वेगरोध, अभिष्यंदी पदार्थ, आमदोष, या सारख्या कारणांनीं वायु विमार्गग होतो - स्त्रोतोरोध होतो.

संप्राप्ति :
अध:प्रतिहतो वायुरुर्ध्वस्त्रोत:समाश्रित: ।
उदानभावमापन्न: कण्ठे सक्तस्तथोरसि ॥
आविश्य शिरस: खानि सर्वाणि प्रतिपूरयन् ।
आभञ्जन्नाक्षिपन् देहं हनुमन्ये तथाऽक्षिणी ॥
नेत्रे पृष्ठमुर:पार्श्वे निर्भुज्य स्तम्भयंस्तत: ।
शुष्को वा सकफो वाऽपि कसनात्कास उच्यते ॥
च.चि. १८-६ ते ८, पान १२४९-५०

क्रुद्ध: प्रतिहतोऽपाने यदापान: प्रपद्यते ।
ऊर्ध्व रसस्य स: स्थाने तिष्ठन्नुरसि पीड्यते ॥
उदानेन सजंस्तत्र कण्ठे चानुप्रपूर्य च ।
वाहिनीर्गलमूर्धस्थास्ततोऽड्गान्युत्क्षिपन्निव ॥
क्षिपन्निवाक्षिणी पृष्ठमुर: पार्श्वे च पीडयन् ।
विवृतत्वान्मुखेनैति भिन्नकांस्योपमध्वनि: ॥
यस्मात्तस्मात्स वर्णौजोबलमांसक्षयावह : ।
अ.सं. नि. ३, पान २६

प्राणो ह्युदानानुगत: प्रदुष्ट: सभिन्नकांस्यस्त्वनतुल्यघोष: ।
निरेति वक्त्रात् सहसा सदोष: कास: स विद्वद्भिरुदाहृतस्तु ॥
सु.उ.५२-५, पाठ ७६५

ऊर्ध्व गतोदानविपर्ययेण कफेन प्राणानुगतेन दीर्घ: ।
हृदं निरेति कफकासकण्ठे करोति तेनापि च काससंज्ञाम् ॥
हारीत संहिता, तृतीयस्थान १२-४, पान ३१५
कासो न श्लेष्मणा विना ।
हारीत तृतीयस्थान १२ पृष्ठ ३१५

प्रकुपित झालेला वायू मार्गावरोध करणार्‍या कारणांनीं प्रतिलोम होतो. पांचहि प्रकारच्या वायूंचें नियंत्रण अपानाकडे असल्यानें तो प्रतिलोम होताच. स्वभावत:च ऊर्ध्वगति असलेल्या उदानाला अधिक वेगवान करतो. त्यामुळें प्राणाच्या अनुलोम गतीस अडथळा करुन प्राणोदानांच्या परस्पर विरुद्ध गतीमध्यें एकप्रकारचा संघर्ष निर्माण होतो. उदानाच्या वेगामुळें प्राण प्रतिलोम होऊन उर, कण्ठ, कण्ठनाडी यामध्यें प्रवेश करुन त्याठिकाणीं प्रकोप पावतो. मुखावाटें वेगानें बाहेर पडत असतांना काशाच्या फुटक्या भांड्याप्रमाणें आवाज करतो. वायूच्या या वेगाच्या वा प्रकोपाच्या तीव्रतेप्रमाणें उर, पार्श्व, पृष्ठ, शिर यांच्यामध्येंहि वेदना होतात. तसेंच सतत खोकण्यामुळें वायूच्या प्रतिलोम गतीचा परिणाम होऊन रसरक्ताच्या वहन क्रियेंतहि व्यत्यय उत्पन्न होतो. डोळे बाहेर आल्यासारखे वाटणें, लाल होणें, तारवटणें, मुख लाल होणें, मुखावर किंचित् शोथ वाटणें अशी लक्षणें त्यामुळें होतात. कान - नाक - शंख यांच्यामध्यें पीडा होऊं लागते कासाच्या या सर्व संप्राप्तीमध्यें स्त्रोतोरोध उप्तन्न करणार्‍या कार्यात कफ हाच महत्त्वाचा घटक असतो. उर, कण्ठ ही कफाचीं स्थानें असल्यामुळें कफाच्या विकृतीवाचून कास संभवणें शक्य नाहीं, इतकेंच नव्हें तर संप्राप्तींत मूलभूत दृष्टीनें प्रेरक असलेल्या वातापेक्षांहि मार्गावरण करणार्‍या कफाचें महत्त्व लक्षांत ठेवणे आवश्यक आहे.

उदानो नाम यस्तूर्ध्वमुपैति पवनोत्तम: ॥
तेन भाषितगीतादिविशेषोऽभिप्रवर्तते ।
ऊर्ध्वजत्रुगतान् रोगान् करोति च विशेषत: ॥

नि.सं. - उदानस्य प्रकृतिभूतस्य नामादि व्यापन्नस्य च रोगान्निर्दिशन्नाह-उदान इत्यादि । उपैति गच्छति ।
स्थानं पुनरनुक्तमप्यस्य नाभ्युर:कण्ठादि । भाषितगीतादिरिति आदिशब्दादु:च्छ्‍वासादि । `विशेषोऽभिप्रवर्तते'
इत्यत्र केचित् `विषयोऽभिप्रवर्तते' इति पठन्ति । ऊर्ध्वजत्रुगतानितिनयनवदनघ्राणश्रवणशिर:संश्रयान् ।
चकारादन्यानपि कासादीन् करोति ।
नि.सं. टीकेसह, सु.नि. १-१४, १५; पान २६०

उर:स्थानमुदानस्य नासानामिगलांश्चरेत् ॥
वाक्प्रत्तिप्रयत्नोर्जाबलवर्णस्मृतिक्रिय: ।
वा.सू. १२-५, ६, पान १९३

उर, कण्ठ, नाभी हें उदानाचें कार्यक्षेत्र आहे. उच्छ्वास, बोलणें, उत्साह, प्रयत्न, बल देणें, हीं उदानाची कर्मे आहेत. असा उदान वायु कास या व्याधींत विकृत झालेला असतो.

पूर्वरुपें :
पूर्वरुपं भवेत्तेषां शूकपूर्णगलास्यता ।
कण्ठे कण्डूश्च भोज्यानामवरोधश्च जायते ॥
च.चि. १८-५, पान १२४९

तेषां भविष्यतं रुपं कण्ठे कण्डूररोचक: ।
शूकपूर्णाभकण्ठत्वमस्वास्थ्यं हृदयस्थ च ॥
अ.सं. नि. ३, पान २५

भविष्यतस्तस्य तु कण्ठकण्डूर्भोज्योपरोधो गलतालुलेप: ।
स्वशब्दवैषम्यरोचकोऽग्नि सादश्च लिड्गानि भवन्त्यमूनि ॥
सु.उ. ५२-७, पान ७६६

कासाच्या पूर्वरुपामध्यें घशामध्यें खवखवणें, घशांत बारीक तूस रुतल्यासारखें वाटणें, अन्नाला चव नसणें, घांस गिळतांना - आवंढा गिळतांना तो अडखळत खालीं जात आहे असें वाटणें, घसा व टाळू याठिकाणीं लेप लागल्यासारखें वाटणें, आवाज बदलणें, अग्नि मंद होणें, छाती-हृदय याठिकाणीं एक प्रकारें कासावीस झाल्यासारखें वाटणें अशीं लक्षणें होतात. पूर्वरुपाच्या स्थितींत संप्राप्ति ही स्थानसंश्रयापर्यन्त आलेली असते. पण स्थानसंश्रय अजून पुरा व्हावयाचा असतो. येथील लक्षणांचा विचार करतसं संप्राप्तीतील सर्व अवस्थान्तरांची सूचना मिळूं शकते. कण्ठशूक, कण्ठकण्डू, स्थानवैगुण्य दर्शवितात कण्ठशूल, उपलेप यामुळें दोष त्याठिकाणीं संचित होऊं लागले आहेत असें समजते. घांस अडखळणें हे वायूच्या गतीस प्रतिलोमता येऊं लागल्याचें लक्षण आहे. अरुचि, अस्वास्थ्य हीं लक्षणें आमोत्पत्ति, दोषप्रकोप यांची सूचक आहेत.

प्रतिघातविशेषेण तस्य वायो: सरंहस ।
वेदनाशब्दवैशिष्टयं कासानामुपजायते ॥

(च.पा.) एवं सामान्योक्तस्य कासस्य भेदहेतुमाह प्रतीघातेत्यादि ।
प्रतीघात इत्यवरणं, स च कफादि । सरंहस: सवेगस्य ।
वेदना पीडा, शब्द: कासशब्द: संज्ञा वा: तयोर्वैशिष्ठ्यं भिन्नत्वमिति यावत्
च.वि.१८-९, सटीक, पान १२५०


प्रकुपित झालेल्या वायूच्या मार्गामध्यें आवरण उत्पन्न करुन वेगरोधास कारणीभूत होणारे भाव ज्या स्वरुपाचे असतील तदनुरुप कासव्याधीमध्यें शब्दविशेष व वेदनाविशेष उत्पन्न होतात. या विशेषानुसार प्रकार पडतात.

वातज कास लक्षणें :

हृत्पार्श्वोर:शिर:शूलस्वरभेदकरो भृशम् ।
शुष्कोर: कण्ठवक्त्रस्य हृष्टलोम्न: प्रताम्यत: ॥
निर्घोषदैन्यस्तननदौर्बल्यक्षोभमोहकृत् ।
शुष्ककास: कफं शुष्कं कृच्छ्रान्मुक्त्वाऽल्पतां व्रजेत् ॥
स्निग्धाम्ललवणोष्णैश्च भुक्तपीतै: प्रशाम्यति ।
ऊर्ध्ववातस्य जीर्णेऽन्ने वेगवान्मारुतो भवेत् ॥
च.चि.१८-११ ते १३, पान १२५०

हृच्छड्खमूर्धोदरपार्श्वशूली क्षामानन: क्षीणबलस्वरौजा: ।
प्रसक्तमन्त: कफमीरणेन कासेत्तु शुष्कं स्वरभेदयुक्त: ॥
सु.उ. ५२-८, पान ७६६

हृदय, पार्श्व, उर, उदर, शिर, शंख येथें शूल उत्पन्न होतो. आवाज बसतो, आवाजाला घोगरेपणा येतो, उरामध्यें, कण्ठामध्यें, तोंडामध्यें कोरडे कोरडे वाटते, रोमांच उभे रहातात, चेहरा ओढल्यासारखा होतो, दैन्य वाटतें, उत्पन्न होणारा कासाचा वेग सुद्धां बलानें बाहेर रेटावा लागतो, अशक्तपणा वाटतो. डोळे बाहेर आल्यासारखे वाटतात. उर, नेत्र, कण्ठ या ठिकाणीं क्षोभ होतो. मोह होतो, खोकला कोरडा असतो, कफहि शुष्क असतो, खोकून खोकून मोठया कष्टानें थोडासा कफ बाहेर पडला म्हणजे कासाचा वेग कांही काळ शांत होतो, स्निग्ध, उष्ण अशीं पेयें घेतलीं असतां बरें वाटतें, अन्न पचल्यानंतर वा वातकाली कासाचे वेग वाढतात. या वातजकासातील क्षिपन्निवाक्षिणि, प्रताम्यत:, `दौर्बल्य' क्षोभ, मोह हीं लक्षणें लहान मुलांच्या ठिकाणीं विशेष आढळतात. हेतुविशेषामुळें उत्पन्न होणारा कास वाजज असला तरी मुलांच्या ठिकाणीं सहज असलेल्या कफ बाहुल्यानें स्त्रोतोरोध होऊन कासाच्या उग्रतेचा त्रासहि त्यांना अधिक होतो. मुलांच्या या वातज कासासच व्यवहारामध्यें डांग्या खोकला वा माकड खोकला असें म्हणतात. लहान मुलें सुकुमार, अपरिपूर्ण धातु असल्यामुळें तितकीशीं व्याधिक्षम असत नाहींत.

स्पर्शैकाहारशय्यादि सेवनात् प्रायशो गदा: सर्वे संचारिण:
(अ.स.नि. १४ पृ. ७३)
स्पर्श, निश्वास, इ. कारणाने बहुतेक सर्वच रोग एका व्यक्तींतून दुसर्‍या व्यक्तींत संचार करतात. या वृद्धवाग्भटाच्या वचनाप्रमाणें लहान मुलांना या स्वरुपाच्या कासाचा संसर्ग बाधण्याची भीति फार असते. बालकाच्या परिचर्येतील वैगुण्य हेंहि या कासास कारणीभूत असते. म्हणून हारीतानें `बालांना जायते कास: धात्रीवैकल्पयोगत: (हारीत तृतीय स्था. १२ २३ पृ. ३१७) असें म्हटलें आहे. धात्रीनें करावयाचें उपचार नीट न केल्यामुळें वा तिच्या शरीरांतील विकृतीमुळें दुष्ट झालेले स्तन्य बालकास मिळाल्यामुळें त्यांना कास रोग होतो मुलांचा हा कास वातप्रधान असल्यामुळें थोडासा नियतकालिक असतो तसेंच त्यामध्यें पित्त वा कफ यांच्या अनुबंधाप्रमाणें ज्वर, छर्दि अशीं लक्षणेंहि असतात.

पित्तजकास लक्षणें :

पीतनिष्ठीवनाक्षित्वं तिक्तास्यत्वं स्वरामय: ।
उरोधूमायनं तृष्णा दाहो तोतोऽरुचिर्भ्रम: ॥
प्रततं कासमानश्च ज्योतींषीव च पश्यति ।
श्लेष्माणं पित्तसंसृष्टं निष्ठीवति च पैत्तिके ॥
च.च. १८-२५, १६, पान १२५०

पित्तजेऽप्यस्मिन् श्लेष्मनिष्ठीवनं व्याधेरु:प्रभृति कफस्थानभूतत्वेन श्लेष्मपित्तसंसर्गजतयेति ज्ञेयम ।
च. चि. १८-१४, टीका, पान १२५०

उरोविदाहज्वरवक्रशोषैरभ्यर्दितस्तिक्तमुखस्तृषार्त: ।
पित्तेन पीतानि वमेत् कटूनि कासेत् स पाण्डु: परिदह्यमान: ॥
सु.उ. ५२-९, पान ७६६

पाण्डुना सह वर्तत इति सपाण्डु:, एतेन नयनादीनामपि पाण्डुत्वमुक्तम् ।
मा.नि.कास ६ आ. टीका, पान १३६

पित्तासृग्वमनं तृष्णा वैस्वर्य धूमको मद: ।
अ.सं. नि ३, पान २६

शिरोऽर्तिपित्तं निष्ठीवते पीतनखानि नेत्रे ।
हारीत तृतीयस्थान १२, पान ३१६

तोंड कडू पडणें, आवाज चिरल्यासारखा होणें, नेत्र, नख, ष्ठीवन यांना पीतता येणें, उरामध्यें घुसमटल्यासारखें वाटणें, खोकतांना डोळ्यापुढें तारे चमकणें, थुंकींतून कफमिश्रित पित्त पडणें, पीत वर्ण, कटु, रक्तयुक्त अशी छर्दि होणें कण्ठ, उर, नेत्र याचा दाह, त्वड्नखनेत्र इ. ठिकाणीं पाण्डुता (वा पीतता) तृष्णा, मोह, अरुचि भ्रम, मद, ज्वर, सुखशोष शिर:शूल अशीं लक्षणें पित्तज कासांत असतात. कास जरी पित्तप्रधान असला तरी उरस्थान हें कफाचें असल्यामुळें श्लेष्मपित्त संसर्गानें कफनिष्ठीवन होते, तेंहि पित्तयुक्त असतें. थुंकीतील ही पित्तयुक्तता निष्ठीवनाचा पीतवर्ण, अम्लकटुरस, दाहकता, द्रवता या लक्षणांनीं अनुमानिता येतें.

कफजकास लक्षणें

मद्गाग्नित्वारुचिच्छर्दिपीनसोत्क्लेशगौरवै: ।
लोमहर्षास्यमाधुर्यक्लेदसंसदनैर्युतम् ॥
बहुलं मधुरं स्निग्धं निष्ठीवति घनं कफम् ।
कासमानो हृरुग्वक्ष: संपूर्णमिव मन्यते ॥
च.चि. १८-१८, १९, पान १२५०-५१

प्र (वि) लिप्यमानेन मुखेन सीदन् शिरोरुजार्त: कफपूर्णदेह: ।
अभक्तरुग्गौरवसादयुक्त कासेत ना सान्द्रकफ: कफेन ॥
सु.उ. ५२-१०, पान ७६६

कफादुरोऽल्परुड्मूर्धहृदयं स्तिमितं गुरु ॥
कण्ठोपलेप: सदनं पीनसच्छर्द्यरोचका: ।
रोमहर्षो घनस्निग्धश्वेतश्लेष्मप्रवर्वनम् ॥
अ.सं.नि.३, पान ३६

सर्व शरीर जड वाटणें, अग्नि मंद होणें, तोंडास चव नसणें, उलटी होणें, पडसे येणें, नाक चोंदणें, अंग गळून जाणें, घशामध्यें चिकट लेप लागल्यासारखे वाटणे, मळमळणें, घशाशी येणें, अंगावर रोमांच उभें रहाणें, लाळ सुटणें, तोंड चिकट-गोड होणें,खोकतांना छाती, कण्ठ यामध्यें फारशा वेदना नसणें, डोकें दुखणें - जड होणे, कासामुळें पडणारा कफ मधुर, स्निग्ध, बहु घन असा असणें, छाती कफानें भरल्यासारखी वाटणें अशीं लक्षणें होतात.

संसर्ग संनिपातज कास

कण्डू दाहश्वासच्छार्दिशोषारोचकपीडिता: ।
शिरोऽर्तिशोफहृल्लास: कासे त्रिदोषसम्भवे ॥
कास: कण्डू: पिपासा च कुक्षिशूलो विनिद्रता ।
शुष्ककास: पिपासा: च वातपित्तोद्भव: कफ: ॥
धूमगन्ध: पीतवर्णोऽक्षिप्रपाके सरक्तक: ।
रक्तनेत्र: पिपासाद्य पित्तश्लेष्मान्वित: कफ: ॥
हारीत तृतीयस्थान १२, पान ३१६

वातपित्त कासामध्यें तृष्णा, कण्ठकण्डु, पार्श्वशूल, शुष्ककास, निद्रानाश अशीं लक्षणें होतात. पित्तकफज कासामध्यें श्वासाला धुरकट गंध येणें, नखनेत्राद्दि पीतता, डोळे येणें, डोळे लाल होणें, तृष्णा अशीं लक्षणें आढळतात. सान्निपातिक कासामध्यें कन्डु, दाह, श्वास, छर्दि, मुखशोष, अरुचि, शिर:शूल, मुखशोथ, हृल्लास अशीं लक्षणें असतात.

क्षतजकास

रुक्षस्योर: क्षतं वायुर्गृहीत्वा कासमावहेत् ॥
स पूर्व कासते शुष्कं तत: ष्ठीवेत् सशोणितम् ।
कण्ठेन रुजताऽत्यर्थ विरुणेनेव चोरसा ॥
सूचीभिरिव तीक्ष्णाभिस्तुद्यमानेन शूलिना ।
दु:खस्पर्शेन शूलेन भेदपीडाभितापिना ॥
पर्वभेदज्वरश्वासतृष्णावैस्वर्यपीडित: ।
पारावत इवाकूजन्कासवेगात्क्षतोद्‍भवात् ॥
च.चि. १८-२१ ते २३, पान १२५१

उरस्यन्त: क्षते वायु: पित्तेनानुगतो बली ॥
कुपित: कुरुते कासं कफं तेन सशोणितम् ।
पीतं श्यावं च शुष्कं च ग्रथितं कुथितं बहु ॥
ष्ठीवेत् कन्ठेन रुजता विभिन्नेनैव चोरसा ।
सूचीभिरिव तीक्ष्णाभिस्तुद्यमानेन शूलिना ॥
पर्वभेदज्वरश्वासतृष्णावैस्वैर्यकम्पवान् ।
पारावत इवाकूजन् पार्श्वशूली ततोऽस्य च ॥
क्रमाद्वीर्य रुचि: पक्तिर्बलं वर्णश्च हीयते ।
क्षीणस्य सासृड्मूत्रत्वं स्याच्च पृष्ठकटीग्रह: ॥
अ.सं.नि. ३, पान २७

स गात्रशूलज्वरदाहमोहान् प्राणक्षयं चोपलभेत कासी ।
सु.उ. ५२-१२, पान ७६६

अतिव्यवायादि साहसामुळे सर्व शरीर होऊन वायू प्रकुपित होतो. तो पित्ताच्या अनुबंधानें उरामध्यें क्षत करुन कास उत्पन्न करतो. हे क्षत प्राणवहस्त्रोतसांतील फुफ्फुसांचे फेनक प्राणवाहिन्या अपस्तंभ वा कंठनाडी येथें विशेषें करुन होते. या व्याधींत प्रथमत: कास शुष्क असतो नंतर पीत, श्याव वर्ण, ग्रंथिल, दुर्गंधी, प्रभूत रक्तयुक्त अशा कफाचें निष्ठीवन होतें. घसा फार दुखतो. छाती फुटल्यासारखी वाटतें, तीक्ष्ण सुयांनीं टोचल्याप्रमाणें वेदना होतात. उराच्या ठिकाणीं स्पर्शासहत्व असतें. ज्वर, श्वास, तृष्णा, वैस्वर्य, कंप, पर्वभेद अशी लक्षणें असतात. कासाच्या वेळीं वा नंतरहि रोगीं कण्हत राहतो. तो आवाज पारवा घुमल्यासारखा येतो. पार्श्वशूल हें लक्षणें यामध्यें असतें. व्याधि बळावत जाईल त्याप्रमाणें अरुचि लक्षण वाढत जातें. अग्नि मंद होतो. दौर्बल्य येते. उत्साह नाहीसा होतो, वर्ण निस्तेज होतो. शरीर क्षीण होतें. पृष्ठग्रह, कटिग्रह ही लक्षणें सतत राहतात. मूत्रप्रवृत्ति रक्तवर्ण होऊ लागते. अंग ताठतें. वाकडे होते. च.चि. (१८-१४७) या व्याधीमध्यें गात्रशूल, ज्वर, दाह, मोह हीं लक्षणें उत्पन्न झाली असतां प्राणक्षय होतो. उरक्षत व क्षतज कास यामधील भेद सुश्रुत टीकाकार डल्हण यानें पुढीलप्रमाणें वर्णन केला आहे.

उर:क्षतस्य उर:क्षतजकासस्य चायं भेद:- उर:क्षती पूर्वमेव
सरक्तादिकं कफं ष्टीवति, उर:क्षतजकासी तु पूर्व शुष्कं
कासते पश्चात् सशोणितं ष्टीवति । तथा चोक्तं - ``रुक्षस्योर:
क्षतं वायुर्गहीत्वा कासमावहेत् । स पूर्व कासते शुष्कं तत:
ष्टीवेत् सशोणितम्'' (च.चि.अ. १८) इति । किंच
उर:क्षते गात्रशूलादीनि लक्षणानि पूर्वमेव भवन्ति, तज्जकासे
त्वसाध्यावस्थायामेवेत्यतोऽपि भेद: ।
सु.उ. ५२-११, टीका, पान ७६६

उरक्षतामध्यें आरंभापासूनच रक्तयुक्त कफाचें निष्ठीवन होतें. तर क्षतज कासामध्यें प्रथम कास शुष्क असून नंतर सरक्त कफ निष्ठीवन होतें. तसेंच उरक्षतामध्यें गात्रशूलादि लक्षणें पहिल्यापासून असतात. क्षंतज कासामध्यें मात्र ती शेवटीं व्याधि गंभीर झाला म्हणजे दिसतात. क्षतज कासामध्यें कास या लक्षणाचें विशेष प्राधान्य असून इतर लक्षणें अनुषंगानें असतात. उरक्षतामध्यें इतर लक्षणांच्या जोडीनें एक लक्षण म्हणूनच कास असतो असेंहि म्हणतां येईल.

क्षयजकास

व्यापन्नेऽग्नौ त्रयो मला: ॥
कुपिता: क्षयजं कासं कुर्युर्देहक्षयप्रदम् ।
दुर्गन्धं हरितं रक्तं ष्ठीवेत् पूयोपमं कफम् ॥
स्थानादुत्कासमानश्च हृदयं मन्यते च्युतम् ।
अकस्मादुष्णशीतार्तो बह्णाशी दुर्बल: कृश: ॥
स्निग्धाच्छमुखवर्णत्वक् श्रीमद्दर्शनलोचन: ।
पाणिपादतलै: श्लक्ष्णै: सततासूयको घृणी ॥
ज्वरो मिश्राकृतिस्तस्य पार्श्वरुक् पीनसोऽ रुचि: ।
भिन्नसंहतवर्चस्त्वं स्वरभेदोऽनिमित्तत: ॥
च.चि. १८-२४ ते २८, पान १२५१-५२

अकस्मात्-निमित्तमन्तरेणापि, उष्णशीतेच्छा भवति ।
कदाचिच्छीतार्तोऽपिनोष्णमभिलषति, कदाचितत्युष्णक्लान्तोऽपि न शीतमभिषलति ।
वा. नि. ३-३४, स. टीका, पान ४७१

शुष्यन् विनिष्ठीवति दुर्बलस्तु प्रक्षीणमांसो रुधिरं सपूयम् ॥
ससर्वलिड्गं भृशदुश्चिकित्स्यं चिकित्सितज्ञा: क्षयजं वदन्ति ॥
सु.उ. ५२-१२, पान ७६६

विषमाशनादि कारणांनीं अग्नि मंद होऊन प्रकुपित झालेले तीनहि दोष धातुक्षयास (देहाच्या क्षीणतेस) कारणीभूत होऊन क्षयज कास उत्पन्न करतात. यामुळें धातूंचा क्षय अधिकाधिक होत जातो. या कासामध्यें पूयासारखे दुर्गंधी हरीत, रक्तवर्ण वा रक्तयुक्त असे कफनिष्ठीवन होतें. खोकला असतांना हृदय जणुं आपल्या स्थानापासून भ्रष्ट होत आहे असें वाटतें. उष्ण व शीत यांच्याविषयी कोणतेहि विशेष निमित्त नसतांना विचित्र अभिलाषा उत्पन्न होते. कधीं कधीं थंडी पडली असतांहि रुग्ण उष्णाची इच्छा करीत नाहीं वा खूप उकडत असतानाहि त्यास शीत हवेसें वाटत नाहीं. खाखा सुटते. रोगी कृश होत जातो. दुर्बलता येत. मुद्रा प्रसन्न दिसतें. मुद्रेवर एक प्रकारची तकाकी येते. दांत, डोळे तेजस्वी वाटतात. तळहात व तळपाय स्पर्शास गुळगुळीत वाटतात. रोगी स्वभावानें चिडचिडा होतो. त्याला सारखी कशाचीतरी किळस वाटत रहाते. निरनिराळ्या लक्षणांनी युक्त असा ज्वर त्यास असतो. पार्श्वामध्यें निरनिराळ्या तर्‍हेच्या वेदना होतात. पडसे असतें, तोंड बेचव असतें. विशेष कारणावाचून मलप्रवृत्ति द्रव वा धन अशी होते. तसेच कारणावाचून आवाज बसतो. अपान वायूच्या क्षेत्रांतहि विकृति उत्पन्न होऊन मूत्रकृच्छ्र निर्माण होते. मूत्राचा रंग पालटतो, शिस्न, गुद, वंक्षण, श्रोणी याठिकाणीं शोथ, शूल हीं लक्षणें उत्पन्न होतात (च.चि.१८-१५४.) [ततोऽस्य क्षयरुपाणि सर्वाण्याविर्भवन्ति च] (अ.सं.नि.उ.पृ.२७) क्षयज कास वाढला असतां राजयक्ष्म्याची सर्व लक्षणें उत्पन्न होतात
(राजयक्ष्म्यामध्येंहि क्षयज कासाची सर्व लक्षणें दिसतात.) म्हातारपणीं होणारा जो जरा कास तो क्षयज कासच आहे. वार्धक्यामध्यें होणार्‍या धातुक्षयाचा परिणाम म्हणून तो कास उत्पन्न झालेला असतो. मात्र जरासकाचें स्वरुप क्षयज कासाप्रमाणें सान्निपातिक नसतें. वातप्रधान असते. पुष्कळवेळां वात प्रकुपित होऊन उर:स्थानांतील प्रकृत स्थितीमध्यें असणार्‍या कफाचेहि वायूमुळें उदीरण होतें. आणि कासासवें हा कफ निष्ठीवनाच्या रुपांत मुखावाटें बाहेर पडतो. त्याचें स्वरुप बहुधा द्रव व प्रमाण पुष्कळ असतें. कफ निष्ठीवनामुळें कफ-वृद्धी वा दुष्टी गृहीत धरुन कफघ्न उपचार केले जाण्याची शक्यता असते. ते होऊ नये यासाठीं क्षयजकास व जराकास यांतील या आशयापकृष्ट अवस्थेचा विचार दक्षतेनें केला पाहिजे. चरकानें या स्वरुपाच्या संप्राप्तीचें वर्णन चिकित्सास्थान अध्याय (सूत्र १२१ येथें संक्षिप्तपणें केले आहे.) (च.चि. ८-१२१)

क्षयजं शुक्रक्षयजम् यद्यपि सामान्यक्षयज्ञब्देन रसादिक्षय:
प्राप्तस्तथाऽप्यत्र शुक्रक्षयो ग्राह्य:, तज्जनितत्वात् क्षयकासस्य
सर्वधातुक्षयस्य च । यद्यपि क्षयस्य क्षयकासस्य च भेदो
नोपलभ्यते, तथाऽपि क्षये यानि कासज्वरादीनि लक्षणानि
भवन्ति तान्येकदोषारब्धानि, क्षयजकासे पुनस्तानि त्रिदोषा-
रब्धानीत्यतो भेद: । तथा च तन्त्रान्तरम्, - ``क्षये कासा-
दिकं लिड्गेमकदोषकृतं मतम् । तदेव तत्कृते कासे सर्वदोषा-
न्वितं बुधै: -'' इति ।
सु.उ. ५२-१२, टीका, पान ७६६

क्षयजमिति शुक्रादिधातुक्षयजं, नतु राजयक्ष्मजम् । त्रिदोषजेऽ
पि राजयक्ष्मणि कास: कफेनैव क्रियेते । यदुक्तं, - ``कास:
कण्ठस्य चोध्द्वंसो विज्ञेय: कफकोपत: -'' इति ।
क्षयजकासस्तु त्रिदोषज इति । ननु, कासादेव क्षयो जायते
तत्कथं क्षयज: कास इति ? उक्तं हि - ``कासात्संजायते क्षय:'' -
इति । उच्यते, दृष्टो हि परस्परं व्यक्तिभेदेन कार्यकारणभावो
बहुश:, यथाऽतीसारार्शोग्निमान्द्यादाविति ।
मा.नि.कास १२-१३, म. टीका, पान १३७

क्षयज कास व राजयक्ष्मा यामध्यें पुष्कळच सारखेपणा आहे. काटेकोरपणें विशेषस्वरुपाचा भेद दाखवितां येणार नाहीं. तरीपण वेगळेपणा सांगता येण्यासारख्या कांहीं गोष्टी आहेत. क्षयज कासामध्यें रसादि धातुक्षयापेक्षां शुक्रधातूचा क्षय व्याधीच्या उत्पत्तीस विशेष कारणीभूत असतो. तसेच राजयक्ष्मांतील कासज्वरादि लक्षणें बहुधा एकदोषज असतात. क्षयज कासामध्यें मात्र सर्व लक्षणे त्रिदोषज असतात काम व क्षय यांच्यामध्यें परस्पर पौर्वापरता असूं शकते. क्षयज कास येथील क्षय शब्दानें राजयक्ष्मा न घेतां सामान्य धातुक्षीणता घेतली असतां कासात् संजायते क्षय: या वचनाशीं विरोध येणार नाहीं. माधवनिदानकारानें गात्रशूल इत्यादि सुश्रुतोक्त श्लोक क्षयज कास लक्षणांशी जोडला आहे. पण सुश्रुताच्या टीकाकाराच्या मताप्रमाणें ते योग्य नाहीं. विजय रक्षितानेंहि या प्रकरणांत पुढीलप्रमाणें लिहिलें आहे.

स गात्रशूल्येत्यादिश्लोकार्धस्य क्षयजकासमध्ये पाठोऽयुक्त:
प्रतिभाति, सुश्रुते क्षतजकासे पठितत्वात् क्षयकासश्चात्र
चरकसुश्रुतवाक्ये मेलयित्वा माधवकरेण लिखित:, उच्यते,
गात्रशूलेत्याद्यनन्तर क्षयकास: सुश्रुतेन पठित:, तेन स
गात्रशूल्येत्यादिश्लोकार्धस्य परेण संबन्धात क्षयकासलिड्गत्वमिति
माधवकरस्याभिप्राय:, एतच्चान्ये नानुमन्यन्ते, यत:
क्षतकासस्यावस्थायामसाध्यत्वख्यापनपरमेतद्‍व्याख्यातं
जेज्जटेन, गयदासेनापि क्षतजकासरुपत्वेनेति ।
मा.नि.कास १३, म. टीका, पान १३७

गात्रशूलादि लक्षणें जेज्जट गयदासांनीं सुश्रुतावर टीका लिहितांना क्षतज कासांतील असाध्यत्वाची द्योतक म्हणून सांगितली आहेत ती तशींच घेणें बरें. लक्षण म्हणून कास पुढील व्याधींत असतो. ग्रंथि विसर्प, कफजगुल्म, अर्श, रक्तार्श, वातकफग्रहणि, अग्निमांद्य, आमाशयगत व्याधि, हृद्रोग, वातकफज, छर्दि, कफज पाण्डु, उदर, यक्ष्मा, प्रतिश्याय, ज्वर, श्वास, कण्ठशुण्डि (गलशुण्डि) गलग्रह, रोहिणी, गिलायू.

चिकित्सा संदर्भानें लक्षणें व विकार

पार्श्वशूल, ग्रहणी, गुल्म (च.चि.१८-३८)
ज्वर, गुल्म, अरुचि, प्लीहावृद्धि, शिर:शूल, हृदशूल, पार्श्वशूल, कामला, अर्श, वाताष्ठीला, उर:क्षत:, शोष, राजयक्ष्मा (च.चि.१८-४१,४२)
उदावर्त, शिर:कंप, वंक्षणशूल, योनीशूल, सर्वांग रोग, एकांग रोग, प्लीहावृद्धि,
(च.चि. १८-४६)

हृद्रोग, श्वास, गुल्म, (च.चि.१८-५६)

क्षय, श्वास, हिक्का, विषमज्वर, अर्श, ग्रहणी, हृद्रोग, अरुचि, पीनस,
(च.चि.१८-६१,६२)

कटिशूल, हृदयशूल, पार्श्वशूल, कोष्ठशूल, श्वास, हिक्का,
(च.चि.१८-७८)

शुक्रदोष, रक्तदोष, शोष, उर:क्षत,
(च.चि.१८-१०५)

कण्ठरोग, मुखशोथ, श्वास, हिक्का, ज्वर,
(च.चि.१८-१३७)

हिक्का, श्वास, पीनस, पाण्डुरोग, क्षय, शोथ, कर्णशूल
(च.चि.१८-१८४)

प्रतिश्याय-कास-पीनस-क्षय-शोथ-

हारीतानें रोग संकराचा असा एक गट दिलेला आहे. (हरितसंहिता तृतीय १ पान १६२-१६३)

साध्या साध्यता

साध्या दोषै: पृथक् त्रय: ।
मिश्रा याप्या द्वयात्सर्वे जरसा स्थविरस्य च ॥
वा.नि. ३-३७, पान ४७१

स.- पृथग्दोषै: - वातपित्तश्लेष्माभि:, ये जातास्त्रय: कासास्ते साध्या: ।
ये पुनरुत्तरकालमाहारविहारादीना मिश्र:-मित्रलक्षणा: सम्पन्ना:, ये याप्या: ।
किं सर्व एव मिश्रदोषोत्पन्ना याप्या ? नेत्याह-द्वयात्, दोषद्वयात, ये मिश्रा: सम्पन्नास्ते याप्या: ।
न पुनर्दोषत्रयाद्ये मिश्रलक्षणास्तेऽपियाप्या इति द्वयग्रहणात् प्रतिपादयति ।
सर्वे-कासा ये साध्या उक्ता: पृथग्दोषजास्तेऽपि, जरसा-जरया हेतुभूतया, स्थविरस्योत्पन्ना याप्या ।
वृद्धो हि निष्कास एव याप्यानाम् । तथा चोवाच संग्रहे (सू.अ.१३) ``वृद्धो याप्यानाम् ।'' इति ।
वा.नि.३-३७ स.टीका, पान ४७१

इत्येष क्षयज: कास: क्षीणानां देहनाशन: ।
याप्यो वा बलिनां, तद्वत् क्षतजोऽभिनवौ तु तौ ॥
सिध्येतावपि सानाथ्यात् ।
स. - इत्येष: - एवमादिरुप:, क्षयज: कास: क्षीणानां देहनाशन: ।
बलिना-अक्षीणानां, याप्यो वा देहनाशनो वेति
वाशब्दस्यार्थ: । तद्वत-क्षयजकासवत् । क्षतज: कास:
क्षीणानां देहनाशनो बलवतां याप्यो वा देहनाशनो वा भवति ।
अभिनवौ तु तौ-नवेत्थितौ पुन: क्षयक्षतकासौ,
बलिनां सिध्येतामपि, न केवलमसाध्ययाप्यावित्यपिशद्वेन द्योत्यते ।
कृत: सिध्येताम् ? स्नानाथ्यात्-चतुष्पात्सम्पत्तेरित्यर्थ: ।
स. टीकेसह, वा.नि. ३-३६, पान ४७१

वातज, पित्तज, कफज हे तीन कास साध्य आहेत. द्वंद्वज व सान्निपातिक कास कष्टसाध्य वा याप्य आहेत. वृद्धांचा जराकासहि याप्य आहे. क्षयज आणि क्षतज कास नुकतेच झाले असतां योग्य रीतीनें उपचारिलें गेले, चतुष्पाद संपत् चांगली असली, रोगी बलवान असला, क्षीणता आली नसली तर कष्टानें साध्य होण्याची शक्यता असते, किंवा या अवस्थेंत ते याप्यहि होतात. सामान्यत: क्षतज, क्षयज व सान्निपातिक कास असाध्य आहेत.

उपद्रव
कासाच्छ्‍वासक्षयच्छर्दिस्वरसादादयो गदा: ।
भवन्त्युपेक्षया यस्मात्तस्मात्तं त्वरया जयेत् ॥
स: [यस्मात्] यत: कारणात्, कासादुपेक्षया सहकारि-
कारणभूतया श्वासादयो रोगा भवन्ति, तस्मात् तं-कासं,
त्वरया - शीघ्रमेव, जयेत् । आदिशब्देनात्र पीनसादयो
यक्ष्मनिदानोक्ता गृह्यन्त इति ।
वा.नि.३-३८, स. टीकेसह, पान ४७१ -७२

स्वरभेद, श्वास, छर्दि, पीनस, पार्श्वशूल, राजयक्ष्मा, हिक्का, हृद्रोग, अपान क्षेत्रांतील अर्श, गुदभ्रंश, योनिभ्रंश या सारखे विकार कास व्याधीमध्यें उपद्रव म्हणून होतात.

रिष्ट लक्षणें
कासश्वासौ ज्वरच्छर्दितृष्णातीसारशोफिनम् ॥
वा.शा.५-७६, पान ४२५

तीव्र ज्वर, रक्तज छर्दि, असाध्य स्वरुपाची तृष्णा, अतिसार, शोथ, हिक्का हीं लक्षणें व्यक्त झालीं असतां कासाचा रुग्ण जगत नाहीं.

वातज कास चिकित्सा
रुक्षस्यानिलजं कासमादौ स्नेहैरुपाचरेत् ।
सर्पिर्भिर्बस्तिभि: पेयायूषक्षीररसादिभि: ॥
वातघ्नसिद्धै: स्नेहाद्यैर्धूमैर्लेहैश्च युक्तित: ।
अभ्यड्गै: परिषेकैश्च स्निग्धै: स्वेदैश्च बुद्धिमान् ॥
बस्तिभिर्बद्धविड्वातं शुष्कोर्ध्व चोर्ध्वभक्तिकै:
घृतै: सपित्तं सकफं जयेत्स्नेहविरेचनै: ॥
च.चि.१८-३२ ते ३४, पान १२५२

वातज कासामध्यें ज्यावेळीं रुग्णांत रुक्षता अधिक असेल त्यावेळीं प्रथमत: स्नेहनोपचार करावेत. वातघ्न द्रव्यांनीं सिद्ध केलेलें सिद्ध केलेलें घृत वापरावें. स्नेहयुक्त बस्ति द्यावा. पेया, यूष, दूध, मांसरस यांचेबरोबर अभ्यंतर स्नेहन करावें. वातघ्न औषधांनीं सिद्ध केलेल्या स्नेहानें (तेलानें) अभ्यंग करावा. स्नेहयुक्त धूपन करावें. लेहहि स्नेहयुक्त असावा. स्निग्धद्रव्यांनीं परिषेक स्वेद द्यावा. ज्या रुग्णास अवष्टंभ आहे, वाताची वा मलाची प्रवृत्ति नीट होत नाहीं. त्याला बस्ति द्यावा. ज्या रुग्णाचें उर, कण्ठ, शिर हे उर्ध्वांगातील अवयव कोरडे कोरडे वाटत असतील वा ज्याचा कास अतिशय शुष्क असेल अशा रुग्णाला जेवणानंतर घृतपान द्यावें. वातज कासासवें पित्ताचा वा कफाचा अनुबंध असल्यास स्निग्ध असें विरेचन द्यावें. वातज कासासवें पित्ताचा वा कफाचा अनुबंध असल्यास स्निग्ध असें विरेचन द्यावें. टीकाकारानें सपित्तं सकफं या पदाचा अन्वय शुष्कोर्ध्व या पदाशीं केला आहे पण शुष्कोर्ध्व शब्दानें शुष्क कास गृहीत धरल्यानंतर कफपित्ताचा त्याचेशीं संबंध जोडणें विसंगत आहे. आमच्या मतानें सपित्तं सकफं चा अन्वय थोडा दूरान्वय होत असला तरी अनिलजं कासं शीं करावा. विरेचन हें पित्तावरील उत्तम शोधन आहेच. सुश्रुतानें स्नेहनासाठीं सुखोष्ण घृत प्यावयास सांगितले आहे. पिबेत् सुखोष्णं घृतमेव चात्र (सु उ.५२-२७) हें उपलक्षणात्मक मानून पेय, लेह, अभ्यंग असें सर्वच उपचार वातज कासामध्यें सुखोष्ण द्रव्यानें करावेत.

ननु, कासे बस्तिनिषेधात् कथमत्रास्थापनमुच्यते ? सत्यं:
निषिद्धमप्यास्थापनं वातकासे प्रयुज्यत, दोषप्रत्यनीकत्वात् ।
सु.उ.५२, पान ३७८

कासामध्यें बस्ति देऊं नये असें सांगितलेलें असूनहि याठिकाणचें आस्थापन अनुवासन हे उपचार वात दोषासाठीं केवळ दोषप्रत्यनीक म्हणून सांगितले आहेत असें समजावें. अर्थात् दोघांचा उपशम होताचा बस्तिप्रयोग संपूर्णपणें थांबवून लेहादिशमनचिकित्सा केली पाहिजे.

पित्तज कास चिकित्सा
पैत्तिके सकफे कासे वमनं सर्पिषा हितम् ।
हृतदोषस्तत: शीतं मधुरं च क्रमं भजेत् ॥
पैत्ते तनुकफे कासे त्रिवृत्ता मधुरैर्युताम् ।
दद्याद्धनकफे तिक्तैर्विरेकार्थे युतां भिषक् ॥
स्निग्धशेतैस्तनुकफे रुक्षशीत: कफे घने ।
क्रम: कार्य: परं भोज्यै: स्नेहैर्लेहैश्च शस्यते ॥
शर्कराचन्दनद्राक्षामधुधात्रफिलोत्पलै: ।
पैत्ते, समुस्तमारिच: सकफे, सघृतोऽनिले ॥
सर्वं च मधुरं शीतमविदाहि प्रशस्यते ॥
च.चि.श्लोक ८३-८६, १८ पान १२५८-५९

पित्तज कासामध्यें कफानुबंध असतांना घृतपान करुन मग वमन द्यावें. वमनानें दोषांचें निर्हरण झाल्यानंतर उपचारांचा क्रम शीत व मधुर असा ठेवावा. पित्तज कासामध्यें कफ पातळ असतांना निशोत्तर मधुर द्रव्याबरोबर वापरावें आणि कफ घट्ट असतांना निशोत्तर हे कडु रसाच्या द्रव्याबरोबर वापरावे. त्याप्रमाणेच शमनोपचार म्हणून वापरावयाचें भोज्य, स्नेह्य हे पदार्थ कफ पातळ (अल्प) असताना स्निग्ध व शीत गुणांचे असावेत व कफ या अर्थापेक्षां अल्प व प्रभूत असा अर्थ घ्यावा. म्हणजे कफ घन असतां करावयास सांगितलेल्या उपचारांतील रुक्ष, शीत या गुणांची संगती लागेल. बहलो घन: असा अर्थहि अष्टांगसंग्रहाच्या टीकेंत सांगितला आहे (अ.स.चि.४ पृ.१२८) शर्करा, चंदन, द्राक्षा, मध, आमलकी आणि कमळ अशीं द्रव्यें पित्त निरनुबंध असतांना लेहासाठीं वापरावीत. वाताचा अनुबंध असतांना शर्करादि द्रव्यें घृताच्या अनुपानाबरोबर द्यावींत. सामान्यत: पित्तज कासासाठीं करावयाचे सर्वच उपचार मधुर, शीत व अविदाही असे असावेत.

कफज कास चिकित्सा
बलिनं वमनैरादौ शोधितं कफकासिनम् ।
यवान्नै: कटुरुक्षोष्णै: कफघ्नैश्चाप्युपाचरेत् ॥
च.चि.१८-१०८,पान १२६०

प्रच्छर्दनं कायशिरोविरेकास्तथैव धूमा: कवलग्रहाश्च ॥
उष्णाश्च लेहा: कटुका निहन्यु: कफं विशेषेण विशोषणं चं ॥
सु.उ.५२-२८-२८॥, पान ७६८

वाते कफानुबन्धे तु कुर्यात् कफहरीं क्रियाम् ।
पित्तानुबन्धयोर्वातकफयो: पित्तनाशिनीम् ॥
आर्द्रे विरुक्षणं शुष्के स्निग्धं वातकफात्मके ।
कासेऽन्नपानं कफजे सपित्ते तिक्तसंयुतम् ॥
च.चि.१८-१३२-३३, पान १२६२

कफज कासाचा रोगी बलवान असेल तर त्यास प्रथम वमन द्यावें आणि नंतर कफघ्न अशा कट्ट, रुक्ष, उष्ण द्रव्यांनीं उपचार करावेत. कफजकासासाठीं वमनाप्रमाणेंच विरेचन, नस्य, धूम, कवलधारण हेहि उपचार करावेत नंतर जे लेह द्यावयाचें ते कफाचें शोषण करणारे व कटु-रसात्मक, उष्ण असें असावेत. कफाबरोबर वात असतांना पित्तघ्न उपचार करावेत. कफज कासामध्यें कफाला पातळपणा अधिक असल्यास रुक्षण करावें आणि शुष्कता अधिक असल्यास स्नेहन करावें.

क्षतज कास चिकित्सा
कासमात्ययिकं मत्वा क्षतजं त्वरया जयेत् ।
मधुरैर्जीवनीयैश्च बलमांसविवर्धनै: ॥
च.चि. १८-१३३ पान १२६२

क्षतकासाभिभूतानां वृत्ति: स्यात्पित्तकासिकी ।
क्षीरसर्पिर्मधुप्राया संसर्गे तु विशेषणम् ॥
वातपित्तार्दितेऽभ्यड्गो गात्रभेदे घृतर्हित: ।
तैलैर्मारुतरोगघ्नै: पीडयमाने च वायुना ॥
हृत्पार्श्वार्तिषु पानं स्याज्जीवनीयस्य सर्पिष: ।
सदाहं कासिनो रक्तं ष्ठीवत: सबलेऽनले ॥
मांसोचितेभ्य: क्षामेभ्यो लावादीनां रसा हिता: ।
तृष्णार्तानां पयश्छागं शरमूलादिभि: श्रृतम् ॥
रक्ते स्त्रोतोभ्य आस्याद्वाऽप्यागते क्षीरजं घृतम् ॥
नस्यं पानं यवागूर्वा श्रान्ते क्षामे हतानले ॥
स्तम्भायामेषु महतीं मात्रां वा सर्पिष: पिबेत् ।
कुर्याब्दा वातरोगघ्नं पित्तरक्ताविरोधि यत् ॥
निवृत्ते क्षतदोषे तु कफे वृद्ध उर: क्षते ।
दाल्यते कासिनो यस्य स धृमान्ना पिबेदिमान् ॥
द्वे मेदे मधुके द्वे च बले तै: क्षौमनक्तकै: ।
वर्तितैर्धूममापीय जीवनीयघृतं पिबेत् ॥
च.चि. १८-१३८ ते १४५, पान १२६३

क्षतज कास हा अत्यंत घातक व आशुकारी आहे. त्याचे गंभीर परिणाम फार लवकर दिसूं लागतात. त्यासाठीं त्याचेवरील उपचार त्वरित करावेत. बलमांस वर्धक होतील अशी मधुर रसात्मक व जीवनीय गणांतील द्रव्यें चिकित्सेसाठी वापरावीत. सामान्यत: क्षतज कासावर पित्तज कासाप्रमाणेंच दूध, तूप, मधुर रसाचीं द्रव्यें, यांनीं चिकित्सा करावी. दोषानुबंध व लक्षणें याचें वैशिष्ट्य असेल त्याप्रमाणें चिकित्सेंतील उपचारांची दिशा ठरवावी. वात्तपित्ताच्या पीडेनें गात्रभेद हें लक्षण असतांना तुपानें अभ्यंग करावा. केवळ वातदोषानें पीडा होत असल्यास वातघ्न द्रव्यांनीं तेल सिद्ध करुन ते अभ्यंगासाठीं वापरावें. हृदय व पार्श्व यांत पीडा असतांना जीवनीय द्रव्यांनीं सिद्ध केलेलें घृत प्राशन करावे. वायु बलवान झाल्यामुळें दाहयुक्त रक्तस्त्राव होणें, शरीर कृश होत जाणें अशीं स्थिती होत असल्यास मांसाहारी रुग्णास लावा पक्षाचा मांसरस द्यावा. तृष्णेसाठी रामबाण (शर) या गवताच्या साहाय्यानें सिद्ध केलेलें शेळीचें दूध द्यावें. नाकातोंडातून रक्तस्त्राव होत असल्यास दुधांतून काढलेलें तूप नस्यासाठीं व प्राशनासाठीं वापरावें. अग्निमंद झाला असेल, कृशता आली असेल, थकवा फार वाटत असेल तर यवागू प्राशन करावी. अंग ताठून वाकडें झालें असल्यास पचण्यासाठीं चोवीस तास लागतील येवढया मात्रेंत घृत प्राशन करावें किंवा पित्त व रक्त यांना विरोधी नसलेली वातरोगावरील चिकित्सा करावी. क्षतज कासामध्यें उरांतील क्षत बरे झाल्यानंतर अवशिष्ट कफ पीडा देतो. क्षतज कासामध्यें उरांतील क्षत बरे झाल्यानंतर अवशिष्ट कफ पीडा देतो. त्याच्या शमनासाठीं धूमपान करावें. मेदा, महामेदा, ज्येष्ठमध, बला, अतिबला यांचें चूर्ण व क्वाथ यांनीं रेशमी वस्त्र तयार करुन त्याची वर्ति बनवावी. हीच धूमपानासाठीं वापरावी व नंतर जीवनीय द्रव्यांनी सिद्ध केलेलें घृत प्राशन करावें.

क्षयज चिकित्सा
संपूर्णरुपं क्षयजं दुर्बलस्य विवर्जयेत् ।
नवोत्थितं बलवत: प्रत्याख्यायाचरेत्क्रियाम् ॥
तस्मै बृंहणमेवादौ कुर्यादग्नेश्च दीपनम् ।
बहुदोषाय सस्नेहं मृदु दद्याब्दिरेचनम् ॥
च.चि.१८-१४९-५०, पान १२६४

क्षयज कासामध्यें सर्व संपूर्ण लक्षणता असेल व रोगी दुर्बल असेल तर चिकित्सेचा कांहीच उपयोग होत नाहीं. पण रोग नुकताच उत्पन्न झाला असून रोगी बलवान असेल तर प्रत्याख्याय चिकित्सा करावी. प्रथम बृंहण व अग्निदीपन अशीं द्रव्यें देऊन मग दोषाचें प्रमाण फार आहे असें वाटल्यास स्नेहयुक्त मृदु विरेचन द्यावें.

औषधि द्रव्यें व कल्प
लवंग, खदिर, सुंठ, त्वक्, एला, वचा, तालीस, पिप्पली, कण्टकारी, वंशलोचन, कंकोळ, वासा, पारोसा पिंपळ, बकुळ, चाफा, जटामांसी, कापूर, अभ्रक, समीरपन्नग, रससिंदूर, चतुर्भुज, आनंदभैरव, त्वग्‍गुटी, खदिरादिगुटी, कर्पूरादि गुटीं, हेमगर्भ, च्यवनप्राश, द्राक्षासव, वासकासव, दशमूलारिष्ट, कनकासव, वासावलेह, कण्टकावर्‍यावलेह.

आहार
लघु, द्रव, बलवर्धक आहार.
वातकर, अम्लरसात्मक, विदाही, तळलेले, गुरु, अभिष्यंदी पदार्थ वर्ज्य.

विहार
विश्रान्ति, धूम, शीतसेवा, भाषण वर्ज्य.

व्याधिमुक्त लक्षणें
कास न येणें, स्वर प्रकृत होणें, उर, कण्ठ याठिकाणीं लाघव वाटणें, घास गिळतांना, बोलताना वा श्वासोच्छवासाला त्रास न होणें.

N/A

References : N/A
Last Updated : July 21, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP