श्रीनाथलीलामृत - अध्याय २६ वा

नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.


श्रीगणेशाय नमः ॥
जो आदिनाथ परात्पर शिव । तेथून विज्ञानगंगेचा प्रवाह । उभयतटपावनी पाहें । ज्ञानविज्ञान तीरें जिचीं ॥१॥
ऐलतीरी आदिनारायण । पैल आदिनाथ उमारमण । एवं उभयांपासून । स्मार्त भागवत धर्म हे ॥२॥
कीं एक तो पूर्वमीमांस । एक तो उत्तरमीमांस । कीं शशिसूर्य मज भासे । कीं प्रकृतिपुरुष जाणिजे ॥३॥
कीं आदिबीज हा तरुवर । तया उद्भवशाखा निरंतर । स्मार्त भागवत विस्तार । विस्तारलें फलें पुष्पीं ॥४॥
मूळ दत्तनाथ सांप्रदाय । पाहतां असती अद्वय । एका स्थळीचें मार्ग उभय । परि अवसानीं एकचि ॥५॥
मुख्य स्मार्त भागवत । शैव तरी तो वैकुंठनाथ । परम वैष्णव उमाकांत । एवं हरिहरऐक्य पैं ॥६॥
प्रथम तो आदि शंकर । गिरिजेसि उपदेशिलें सविस्तर । तेथून लाधले मत्स्येंद्र । गोरक्षादि चौरंगी ॥७॥
नवनाथादि चौर्‍यांशीं सिध्द । जयांचा महिमा परम अगाध । नामें परिसावी विशद । अद्भुत प्रताप जयांचा ॥८॥
प्रकाश विमर्श आनंदनाथ । ज्ञानानंद सत्यानंदनाथ । पूर्नानंद स्वभावानंदनाथ । प्रतिभा सुभगा हे नव ॥९॥
स्मार्तधर्मी परायण । ध्वनित परिसा नामाभिधान । श्रवणें श्रवण होती पावन । स्मरणें दोष नासती ॥१०॥
दधीचि दुर्वास मृकंडपुत्र । कौशिक विरिंचि देवेंद्र । कण्व भार्गव अंगिराकुमर । हरिशक्ति जाण पां ॥११॥
बाण रावण रामचंद्र । चंडी भृंगी नंदिकेश्वर । रिटादय (?) उपमन्यु कुबेर । वामदेव इत्यादि ॥१२॥
श्रियाळ चांगुणा चिल्लाळ । व्याघ्र मृग पशुपक्षीकुळ । परमशैव हे केवळ । प्राणप्रिय शिवाचे ॥१३॥
ऐसे नेणो अपार किती । काय वर्णू मी अल्पमति । परि स्वस्वार्थकाचे आर्ती । यथामति निवेदितों ॥१४॥
हे शरीर माळिकारत्न । संतश्रोतयां केले अर्पण । आतां भागवतधर्मी जे निपुण । तेही श्रवण करावे ॥१५॥
सर्वाद्य तो आदिनारायण । हंसरुपें चतुरानन । उपदेशिलें गुह्यज्ञान । प्राप्त तेथून सर्वांतें ॥१६॥
सनक सनंदन सनत्कुमार । नारद अत्रि ऋषीश्वर । प्रसन्न होऊन चतुर्वक्त्र । स्वयें उपदेश देतसे ॥१७॥
व्यास वाल्मीक प्रल्हाद । ध्रुवा दिधलें अक्षयपद । नारदमहिमा अगाध । जो जगद्गुरु सर्वांसी ॥१८॥
अत्रि उपदेशी दत्तात्रेय । व्यासापासाव शुकाचार्य । जो योगेंद्र योगवर्य । ज्ञान ऐश्वर्य जयाचें ॥१९॥
आतां नवयोगींद्र करावे श्रुत । आणि परमवैष्णव भागवत । भगवत्परायण जे विख्यात । महासमर्थ वंद्य जे ॥२०॥
कवि हरि अंतरिक्ष पिप्पलायन । आविर्होत्र प्रबुध्द जाण । चमस आणि करभाजन । द्रुमिल नववा जाणिजे ॥२१॥
प्रल्हाद नारद पराशर । पुंडरीक व्यासांबरीष ऋषीश्वर । शुक शौनक शंतनुकुमार । दाल्भ्य रुक्मांगद किरीटी ॥२२॥
आणि वसिष्ठ विभीषण । ज्या नामोच्चारें अगाध पुण्य । भागवतधर्माचें महिमान । हेंचि जाणते जाणती ॥२३॥
ते देवाधिदेव योगीजन । देवत्रयासी होय लांछन । योगी जोती निर्लाछन । कैसी परी ते ऐका ॥२४॥
विधि अविधि कन्यागमनीं । सक्त शंकरासी प्रिय मोहिनी । विष्णू वृंदेचे स्मशानीं । देवेंद्र भोगी अहल्या ॥२५॥
तैसे नव्हते योगीजन । शुकसनकादि गोरक्ष जाण । वामदेव अनसूयानंदन । अनंग तोडरीं जयाचे ॥२६॥
कामक्रोधादि षडविकार । तयांपुढें कायसी पामर । जें महाराज ज्ञानसमुद्र । तुच्छ समग्र ज्यापुढें ॥२७॥
ते निःस्पृह निरिच्छ निर्दोष । निश्चयेसीं तेचि पुरुष । जयांनी त्यागिला आशापाश । तेचि ईश त्रिदशांचे ॥२८॥
मुख्य वैराग्यासी कारण । निरिच्छता हें प्रथम लक्षण । निर्लोभ निःसीम अंतःकरण । त्यासीच जाण तपसिध्दि ॥२९॥
कनक कामिनी प्रतिष्ठा । मनी मानी काकविष्ठा । कामक्रोधादि न चलती चेष्टा । त्या ब्रह्मनिष्ठापुढें पैं ॥३०॥
जयासी नसे देहाभिमान । हार कीं विखार कांही नेणें । सदा समाधिस्थ मनोन्मनें । अखंड स्वानंदीं विचरत ॥३१॥
मज देह आहे किंवा नाहीं । देही जया स्मरणचि नाहीं । तोचि जाणावा विदेही । संशय कांहीं न धरावा ॥३२॥
कीं क्लीबचि एकटा शय्यास्थानी । एकांत एकटी जाय पद्मिणी । तेवीं विकार नुठे मनीं । तोचि ज्ञानी मान्य पैं ॥३३॥
निंदक निंदी वाकशस्त्रें । पुढें क्षमा वोढन निरंतर । परि न दुखवेचि अंतर । तोचि ईश्वर नररुपें ॥३४॥
परनिंदा आणि परस्तवन । चित्तीं मानी श्वानवमन । तेंचि जाणावें अपरोक्षज्ञान । विरक्तचिन्हे हींच पैं ॥३५॥
धन्य धन्य ते गुरुभक्त । त्यांसी साष्टांग प्रणिपात । ते महाराज महासमर्थ । दर्शनें कृतार्थ करिती जे ॥३६॥
जे गुरुभजनावीण नर । तेचि जाणा श्वानसूकर । गुरुमहिमा नेणती पामर । नरक अघोर चुकेना ॥३७॥
सौभाग्यभूषण मंगळसूत्र । नसतां अमंगळ तें वक्त्र । काय जाळावें अळंकार । कुंकुमहीन आनन तें ॥३८॥
निर्नासिक बत्तीस लक्षण । शकुन न घेती विलक्षण । तेवी अध्यात्मज्ञानाविण । व्यर्थ जिणें तयाचें ॥३९॥
असो गुरुभक्ताचें महिमान । काय वंदु मी एकवचन । सहस्त्र जिभेंकरुन । शेषाही शीण येतसे ॥४०॥
गताध्याय़ींचें हेंचि कथन । गोरक्ष मत्स्येंद्र मल्लाळ त्यागुन । गोरक्षें दाविलें विंदान । मूत्रें केला कनकाद्रि ॥४१॥
पुढें जाती मत्स्येंद्रनाथ । तो माध्यान्हकाळ जाहला प्राप्त । गुरु गोरक्षा आज्ञापित । भिक्षा त्वरित आणी कां ॥४२॥
अवश्य म्हणे आज्ञा प्रमाण । तेंचि गोरक्ष देती प्रतिवचन । मग पात्र काढिलें झोळीतून । काय करिते जाहले ॥४३॥
जें स्थळ परमाटव्य दुर्धर । संनिध नसे ग्रामनगर । वापी कूप नदीनीर । कांही अणुमात्र नसेचि ॥४४॥
परिमळेचें वचन स्मरोन । पात्र प्रेषिलें पैं तेथून । परिमळेपुढें येऊन । अकस्मात पडियेलें ॥४५॥
मत्स्येंद्रपात्र निरखोनी । परिमळा परम आश्चर्य मानी । नाथगृहाची अघटित करणी । न भूतो न भविष्यति ॥४६॥
परि संतोष संशय झाला चित्तीं । साशंकते होऊनि युवती । म्हणे पात्र सान हें निश्चितीं । उभय पूर्ती कैसेनि ॥४७॥
पाकसदनीं निपजे अन्न । परमपरिमळ । दिव्य पक्वान्न । परिमळा वोपी परमप्रीतीनें । सप्रेम आवडीकरुनी ॥४८॥
जंव जंव पात्रीं वाढीत । तें विस्तीर्ण तंव तंव होत । आश्चर्य करी मग मनांत । हे विपरीत पैं कैसें ॥४९॥
हावें भरोनि ईर्षावारें । आंगीं आवेश कदाही नावरे । परिमळा वाढी उभयकरें । न भरे निकरें पात्रही ॥५०॥
पाहा गे हें कैसें नवल । हें पात्र सान परि सखोल । अमर्याद अन्न वाढिलें । काय झालें कळेना ॥५१॥
आश्चर्य करिती सकळ युवती । अन्नें आणिती हातोहातीं । परि पूर्ण नव्हेचि कल्पांती । विचित्र गति काळाची ॥५२॥
की लंकेस जाऊन मारुति । पुच्छी गुंडाळिलीं वस्त्रें किती । परि कदाही न पुरती । ईश्वरगति नेणवे ॥५३॥
किंवा श्रीकृष्नातें गोकुळीं । यशोदा बांधी कटिमंडळीं । परि रज्जु न पुरे ती कदा काळीं । तेवी नव्हाळी दिसे ही ॥५४॥
चित्ती विचार करी अबळा । म्हणे गोरक्षाची अगाध कळा । असंख्य मेनी दाविले डोळां । पर्वत केला कनकाचा ॥५५॥
सद्गद होऊनि कंठयुगुळ । नेत्री वाहे अश्रुजळ । रोमांच स्फुरण वेळोवेळ । परिमळेचें जाहलें ॥५६॥
अनन्य होतां अंतःकरण । सवेंचि पात्र भरिलें पूर्ण । अहंभाव गेला गळोन । हेंचि कारण प्राप्तीचें ॥५७॥
हर्षे वोसंडली पोटीं । भावविश्वास पडिली गांठी । म्हणे माझी निश्चयकसोटी । पाहिली वाटे गोरक्षें ॥५८॥
काया वाचा तनमनधन । वोवाळावें उभयांवरुन । तें चरणांगुष्ठ कैं देखेन । तैंच दैवें दैवांची ॥५९॥
मग षोडशोपचारेंकरुन । करिती झाली पात्रपूजन । हरिद्राकुंकुम सुगंधसुमन । अर्ची प्रीतीनें ते काळी ॥६०॥
गच्छइ गच्छ इतिवचनीं । वदती झाली परिमळा राणी । तंव तें जाय तेच क्षणीं । चोज नयनी पाहती ॥६१॥
जड असतां कैसें चर । अद्भुत नाथचमत्कार । प्रमदावृंद उपरीवर । पाहों ठेल्या सर्वही ॥६२॥
सहस्त्रविद्युल्लतासमान । तेवीं प्रकाश देदीप्यमान । कीं कोंदाटलें उष्ण चांदणें । गगन व्यापिलें सुप्रभें ॥६३॥
पाशुपत वासवी ब्रह्मास्त्र । तेवीं जातसे गोरक्षपात्र । त्या तेजें झाकिन्नला भास्कर । अघटित सूत्र जयाचें ॥६४॥
पात्र जातसे मनोगती । ललनाललामी विलोकिती । तंव दत्तात्रेय सिंहपर्वतीं । उभे लक्षिती तयातें ॥६५॥
जो देवत्रयाचा अवतार । जो योगियांमाजीं योगेश्वर । ब्रह्मरुप तें दिगंबर । स्वइच्छें तिष्ठती ॥६६॥
अवलीले असतां दंडपाणि । ते पवनगतीं पात्र जाय गगनीं । दंड थडकतां तत्क्षणीं । पवन पावे क्षणिक ॥६७॥
विस्मित होऊनि अत्रिपुत्र । परिपुर्ण देखिलें अन्नपात्र । तंव कामिनीरुपें कंजनेत्र । अकस्मात प्रगटली ॥६८॥
तीतें पुसती कोठील कोण । येरी निवेदी वर्तमान । मी गोरक्षसिध्दि घेऊन अन्न । जाय माध्यान्ह लक्षुनी ॥६९॥
ऐसें ऐकोनी वद्ती वचन । जाई सुखें करीं गमन । शीघ्र निघे पैं तेथून । चपळचपळेम चालिली ॥७०॥
जेवीं द्रोणाद्रि नेतां वायुनंदन । भरतें आणिला बाणेकरुन । मारुति होतां गताभिमान । तेवीं सिध्दि सलज्ज ॥७१॥
असो पात्र पातलें मठानिकटी । सिध्दवृंदांच्या बैसल्या थाटी । तंव सिध्दि देखिली म्लान हिंपुटी । गोरक्ष पुसती तयेसी ॥७२॥
सद्गुरु वदती झालें काय । समूळ वृत्तांत निवेदी माय । मार्गी विलंब कोण अपाय । झालासे तो श्रुत करीं ॥७३॥
सिध्दि म्हणे ऐका निवांत । मी सिध्दि घेऊन येतां त्वरित । मार्गी देखिला दीर्घ पर्वत । त्यावरी पुरुष पैं उभा ॥७४॥
तो विराटसम विशाळ । परि त्याचे करी दंड सबळ । तयाचे स्पर्शे पडे विकळ । मूर्छित होत भूमीसी ॥७५॥
नंतर तेणें मज पुसिलें । मग म्यां गोरक्षनाम निवेदिलें । पुन्हा वदे जाई वहिलें । स्वस्थळीं आपुलें पैं ॥७६॥
परि तयाचे दंडप्रहार । शरीर माझें परमजर्जर । ऐसें ऐकोन तदोत्तर । गोरक्ष सकोप जाहले ॥७७॥
करुन मत्स्येंद्रपूजन । सिध्दांसह योगीजन । धूपदीपनीरांजन । भोजन देस समस्तां ॥७८॥
जेवीं धनुष्यापासोनि बाण । सुटोनि जाय न लगतां क्षण । कीं उल्हाटयंत्रमुखांतून । गोळा उसळे ज्यापरी ॥७९॥
हस्तीं वाहोनियां त्रिशूळ । वातवेगें जाय चपळ । तवं देखिला त्रिकूटाचळ । रजताचळ पैं दुजा ॥८०॥
तया शिखरी विशाळ पुरुष । त्यावरी धाविन्नला आवेश । ह्र्दयीं शूळ मारी गोरक्ष । परि अद्भुत देखिलें ॥८१॥
त्रिशूळ भेदतां सत्राणीं । शुळासारिसा जाय आप्ण । जेवीं झुगारितां पाषाण । इकडून तिकडे जाय पैं ॥८२॥
कीं उद्कीं मारितां दंड । कदा नोहे तें दुखंड । कीं आकाश देखोन प्रचंड । विहंगम उडती ज्यापरी ॥८३॥
तैसें द्त्तात्रेयह्र्दयांतून । गोरक्ष पडती पैंल जाऊन । परम विस्मित होऊन । विचार करिते जाहले ॥८४॥
हा शिव विष्णु कीं चतुरानन । अगाध देखिलें हे महिमान । इकडेही अनसूयानंदन । गोरक्ष परिक्षा पाहती ॥८५॥
येणें ब्रह्मांडसमाधि साधिली । याची प्रचीति पाहूं वाहिली । ऐसी मनीषा उदेली । तये काळीं तयातें ॥८६॥
मग धरोनि सौम्यवेष । धरोनि वदती गोरक्षास । तुज सिध्दि साध्य बहुवस । सिध्दांत सिध्द होसी पैं ॥८७॥
आणि ब्रह्मांडसमाधीसी प्रत्यय । तूंतें आहे अनुभव । तरी पंचतात्त्वीं लीन होय । तुज शोधून आणितों ॥८८॥
अवश्य म्हणोन मत्स्येंद्रसुत । तत्काळ झाले गुप्त । क्षीराब्धीचे ह्रदयांत । सान मत्स्य जाहले ॥८९॥
यापरी अनसूयाह्रदयरत्न । करिती पिंडीं ब्रह्मांडशोधन । तंव पयाब्धींत होऊनि मीन । तेथें ध्यानस्थ बैसलें ॥९०॥
कुक्षीं घालोनियां हात । मस्त्य धरिला अकस्मात । तंव सिध्द प्रगटे गोरक्षनाथ । जो अवतार विष्णूचा ॥९१॥
मग म्हणती देवत्रयांस । आतां मीच होतों अदृश्य । मज शोधिल्या अवश्य । सर्वस्व वश्य तुजलागीं ॥९२॥
सवेंचि पावले अंतर्धान । गोरक्षें देखिलें चतुर्दश भुवन । तीर्थी क्षेत्रीं गुहावन । परि दृश्य नव्हेचि ॥९३॥
गोरक्ष परम चिंतातुर । कांही न चले न सुचे विचार । संकट जाणोनि नाथ मत्स्येंद्र । प्रगट झाले पैं तेथें ॥९४॥
मत्स्येंद्र म्हणे वत्सा परियेसी । हा आत्रेय गा निश्चयेंसी । दुजा याचिये उपमेसीं । भुवनत्रयीं असेना ॥९५॥
येणें पृथ्वीमाजी पृथ्वी लीन । आपें आपचि गेला मिळोन । पवनीं संलग्न मिळे पवन । तेजीं तेज नभी नभ ॥९६॥
मत्स्येंद्र -आज्ञे सर्व सरिसें । तत्त्वीं तत्त्व शोधी तैसें । तें साध्य झालें गोरक्षास । स्वयें आपैसें अनुभवी ॥९७॥
तत्त्वी तत्त्व मेळवूं जातां । त्वरीत सिध्दि आली हातां । पंचतत्त्वें जंव उभविता । तों अत्रिसुता देखिलें ॥९८॥
पाहा मानसंधानांतोनि अवचट । प्रत्यक्ष झालें स्वरुप प्रगट । विमानयानीं तेहतीस कोट । निर्जर पाहूं पातलें ॥९९॥
पुष्पें वोपिती सघन वृष्टि । दुंदुभिनादें कोंदलीं सृष्टि । शशिसूर्यप्रभा एकवटी । अनेक कोटी चपळेच्या ॥१००॥
जेवीं उदेलें बाळभास्कर । असंख्य अनंगांहूनि सुंदर । कौपीनमंडित दिगंबर । कुमारवेष जयाच ॥१॥
योगपद शैली शृंगी । भस्म चर्चित सर्वांगीं । श्रवणीं मुद्रा उभयभागी । अनादियोगी सिध्द जे ॥२॥
सायुध षड्‍भुज जटामंडित । पात्र शूळ डमरु विराजित । शंख चक्र कमंडलुधृत । दंडपाणि मेखळा ॥३॥
कंथा पादुका कुक्षीं झोळीं । त्रिदश ध्याती ज्या त्रिकाळीं । त्रिमूर्ति विग्रह एकमेळी । देवत्रयअंश जो ॥४॥
जो अत्रितनय दत्तात्रेय । ज्यातें वंदी देवत्रय । जो योगसंपन्न ज्ञानवर्य । वैराग्य ऐश्वर्य जया हें ॥५॥
ज्याची दशनामें वदतां वाणीं । विघ्नें निरसती दिनरजनीं । ते श्रोती परिसिजे श्रवणीं । एकाग्र करोनि सद्भावें ॥६॥

दत्तात्रेयो हरिः कृष्ण उन्मादी नंददायकः मुनिर्दिगंबरो बालः पिशाचो ज्ञानसागरः ॥१॥
एतानि दशनामानि सर्वकाले सदा पठेत‍ । मनसा चिंतितं कार्य सिध्दं भवति नान्यथा ॥२॥
 

या दशनामांचें करितां स्मरण । तत्काळ चुके जन्ममरण । मनेच्छित सिध्दि संपूर्ण । वाक्य प्रमाण नारद ॥७॥

अत्रिपुत्रो महातेजा दत्तात्रेयो महामुनिः । तस्य स्मरणमात्रेण सर्वपापैः प्रमुच्यते ॥३॥

जो अत्रिऋषीचा नंदन । तेजोमय ज्ञानसंपन्न । दत्तात्रेय सकृत्स्मरण । नासे विघ्न तत्काळ ॥८॥
दत्तात्रेय वदतां वदन । प्रत्यक्ष प्रगटे न लगतां क्षण । भुक्तिमुक्ति अनंत कल्याण । सदा सुप्रसन्न सर्वदा ॥९॥
असो मानसध्यानेंकरुन । प्रगटले दत्तात्रेय स्वयें आप्न । गोरक्ष लक्षून तें ध्यान । अलक्ष आदेश करिती पैं ॥११०॥
अलक्ष गोरक्ष प्रतिवचन । तेंचि धरोनि सप्रमाण । त्याचि वोव्या पदरचन । अर्थशोधन करावें ॥११॥
अलक्ष दत्तात्रेय अवधूत । तूं निरालंब मायातीत । अध ऊर्ध्व आजपा जपत । अलक्षलक्षीं जागसी ॥१२॥
अलक्षचिन्नभीं चिदद्वयचंद्र । तो अमृत स्त्रवे निरंतर । कोटि विद्युल्लता चंद भास्कर । अलक्षलक्षीं जागसी ॥१३॥
अलक्ष इडा पिंगला सुषुम्ना । मनोन्मन ध्यानधारणा । सहजसमाधि मनोपावना । अलक्षलक्षीं जागृत ॥१४॥
अलक्ष शून्यभुवन श्रुत । तें सहस्त्रदळहारी निवांत । भ्रमरगुहा गुंजारवित । अलक्षलक्षीं जागसी ॥१५॥
अलक्ष मी आदिनाथपौत्र । मत्स्येंद्रगुरुचा वरदपुत्र । तत्प्रसादें निगममंत्र । अलक्षलक्षीं जागृत ॥१६॥
अलक्ष चित्तचैतन्यचिद्रस । तेथें संलग्न समरस । गोरक्षचौपदी अविनाश । अलक्षलक्षें लक्षीं पैं ॥१७॥
यावरी विज्ञानस्तोत्र दत्तात्रेय । वदते झाले ज्ञानसूर्य । तोचि धरोनि अभिप्राय । अर्थअंश घेईजे ॥१८॥
अलक्ष अगोचर सर्वसाक्ष । अलक्ष गोरक्ष योगदक्ष । तूं सर्वज्ञ ज्ञानापरोक्ष । नाथ पक्षधारक तूं ॥१९॥
तरी ऐक माझीं यथार्थ वचन । मी सर्वातीत वेगळा जाण । तेंही सांगतो तुजलागून । श्रवण करी मद्वाक्य ॥१२०॥

न वेदान्न लोकान्न सुरान्न यज्ञवर्णाश्रमान्नैव कुलं न यातिः । मे धूम्रमार्गो न च दीपमार्गो ब्रह्मैवरुपं परमार्थतत्त्वम् ॥४॥

मी वेदशास्त्रा अगोचर । मी लोकत्रयाहूनि पर । मी नव्हेचि गा निर्जर । यज्ञादि वर्न नव्हे मी ॥२१॥
मज नसे कुळगोत्र याति । मज स्वर्ग ना अधोगति । मी ब्रह्मैव अरुपस्थिति । मी परमार्थ तत्त्व जाण पां ॥२२॥
मी पर ना अपर । मी क्षर ना अक्षर । मी शब्द ना ओंकार । अकार उकार नव्हें मी ॥२३॥
मी कृपण ना उदार । मी प्रकाश ना अंधकार । मित्र ना रोहिणीवर । चत्वारशृंग नव्हें मी ॥२४॥
मी कर्ता ना अकर्ता । मी भोक्ता ना अभोक्ता । मी सत्ता न असत्ता । आर्ता पाता नव्हे मी ॥२५॥
मी जाणता न अजाण । मी सेव्य ना शरण । मी कर्ता ना अकारण । ज्ञान अज्ञान नव्हे पैं ॥२६॥
मी पाप ना पुण्य । मी कुरुप ना लाव्ण्य । मी अल्प ना अगण्य । धन्याधन्य मी नव्हें ॥२७॥
मी श्वेत ना सांवळा । मी रक्त ना पिवळा । मी नील ना सुनीळा । रंगावेगळा असें मी ॥२८॥
मी अध ऊर्ध्व ना अर्धचंद्र । मी अकार उकार ना अर्धमात्र । मी परत्र ना स्वतंत्र । पुत्रकलत्र मी नसें ॥२९॥
मी ब्रह्मचर्य ना गृहस्थ । मी वानप्रस्थ ना संन्यस्त । मी स्वस्थ ना अस्वस्थ । वृत्तस्थ कूटस्थ नसें मी ॥१३०॥
मी ध्ये ध्याता नसें ध्यान । मी ज्ञेय ज्ञाता नसें ज्ञान । मी कर्म उपासना ज्ञान जाण । मी त्रिपुटी नसेंचि ॥३१॥
मी त्रास ना अत्रास । मी स्मरण जो निजध्यास । मी अस्ति भ्रांति प्रियही नसें । हेंचि परिसे गोरक्षा ॥३२॥
मी जहद जहल्लक्षण । मी वेगळा याहून । व्यष्टि समष्टिही जाण । असें अभिन्न त्याहूनी ॥३३॥
मी स्वजाति विजातिभेद । त्याहून वेगळा मी अभेद । त्व तत्‍ आणि असिपद । त्याहून परिच्छिन्न मी वर्ते ॥३४॥
मी दोर ना विखार । मी शुक्ति ना रजतविकार । मी स्नाणु ना तस्कर । मृगभ्रम मी जळ नव्हे ॥३५॥
नव्हे पुरुष नपुंसक । नव्हें सिंह व्याघ्र जगतीर्थक । मी नसें अंडज कीटक । त्याहूनि निष्टंक वेगळा ॥३६॥
मी नसें स्थावर जंगम । मज नसें क्रियाकर्म । वर्णाश्रम धर्माधर्म । अनामा नाम मज कैचें ॥३७॥
मी चहूं वाचे अगोचर । मी नसें चराचर । मी पिंडब्रह्मांड हा विचार । मी साचार नसेंचि ॥३८॥
मी शाश्वत ना अशाश्वत । मी अंतवंत ना शाश्वत । मी चित्तचतुष्टया विरहित । व्याप्त अलिप्त मी नसें ॥३९॥
मी देवभक्त ना विरक्त । मी सक्त ना असक्त । मी नसें बंध ना मुक्त । सूक्त असूक्त मज कैचा ॥१४०॥
मी खेचरी ना भूचरी । मी चाचरी ना अगोचरी । मी अलक्ष नव्हें निर्धारी । पवन मन नव्हे मी ॥४१॥
मी नव्हे प्राणपंचक । मी नव्हे ज्ञानेंद्रिय पंचक । मी नव्हें कर्मेद्रियपंचक । देहचतुष्टय मी नव्हे ॥४२॥
मी तंतूचि ना कैचा पट । मी नव्हेचि गा घटमठ । मी घोट ना निघोट । वीट अवीट मी नव्हें ॥४३॥
जागृत स्वप्न सुषुप्ति तुर्या । हेही भेद भासती वायां । मी नसेंचि मत्स्येंद्रतनया । छायामायारहित मी ॥४४॥
यापरी ऐक्यमिळणीसंवाद । मग कैचा उरला तेथें भेद । समरसतां ब्रह्मानंद । स्वानंदसुख दों पक्षीं ॥४५॥
परस्परें हेचि खूण । अन्योन्य नसेचि द्वैतपण । तेथें निरसें द्वैतभान । हंससोऽहं विराले ॥४६॥
तंव मत्स्येंद्र पातले तेथ । गोरक्षाचा धरोनि हात । दत्तात्रेयाचे हातांत । घालितें झाले सद्गुरु ॥४७॥
यावरी मत्स्येंद्र म्हणती ऐक वचन । हे उभय पंथ नसती दोन । परि यांचे पर्यवसान । एकचि असे सुजाना ॥४८॥
हा दत्तात्रेयगोरक्षसंवाद । याचा विस्तार करितां विशद । तरी ग्रंथ वाढेल अगाध । संकलित कथियेला ॥४९॥
उत्तरार्ध मागें सरला । परि कथारंग वोघासि आला । तो स्वानंदाचा पूर दाटला । तो माघारा नच जाय ॥१५०॥
नाथलीला सुरस कुमुद । स्वाद घेती सज्जन षट‍पद । दुर्बुध्दिदर्दुर कुटिळ निंद्य । कुतर्ककर्दमीं मिसळती ॥५१॥
शुध्द किंवा अशुध्द ग्रंथ । कर्ता करविता सद्गुरुनाथ । वंशवाद्य करोनि निमित्त । आपुलें सत्य वाजवी ॥५२॥
श्रीमत्‍ गोरक्ष दत्तात्रेय । सुप्रसन्न वरदो भव । त्वं शरण मां पाहि । जगदोध्दार जगद्गुरु ॥५३॥
हा अध्याय करितां श्रवण । त्याचें चुके जन्ममरण । कैवल्यसुखातें आमंत्रण । मोक्षसुख ये हातां ॥५४॥
पंचविसाव्याहूनि केवळ । सव्विसावें तत्त्व अमळ । हें वर्म कोणा न कळें । एक जाणती गुरुपुत्र ॥५५॥
हा अध्याय प्रयाग प्रत्यक्ष । दत्तात्रेय मत्स्येंद्र गोरक्ष । कथातीर्थी सुस्त्रात मुमुक्ष । अंती मोक्ष पावती ॥५६॥
हा अध्याय करितां श्रवण । आयुरारोग्य ऐश्वर्य संपूर्ण । पुत्रपौत्राभिवृध्दि जाण । राजद्वारीं जाय सदा ॥५७॥
नमो आदिनाथलीलाग्रंथ । साह्य भैरव गुरु समर्थ । तत्प्रसादें आदिनाथ । शरणागत सद्भावें ॥१५८॥

N/A

References : N/A
Last Updated : February 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP