श्रीनाथलीलामृत - अध्याय १२ वा

नाथसंप्रदाय भारताच्या सांस्कृतिक इतिहासांत महनीय स्थान पावलेला संप्रदाय आहे.


श्रीगणेशाय नमः ॥
श्रीआदिनाथ निरंजन । जो परब्रह्म पुरातन । निर्विकारविहीन । परंज्योति परमात्मा ॥१॥
वस्तुतः पाहतां भांगार । अलंकाररुपें अवतार । मत्स्येंद्र गोरक्ष जालंधर । चर्पटी चौरंगी मिरवले ॥२॥
जटामस्तकीं मत्स्येंद्रमुकुट । गोरक्ष अर्धचंद्र तो सुभट । तृतीय्य नेत्र जालंधर उद्भट । परमखंडित भूषणीं ॥३॥
चर्पटी चौरंगी उभयश्रवणीं । मुद्रे जडिले सुनीलवर्णी । पूर्व उत्तर मीमांसा दोनी । सहस्त्रकिरणीं डवरले ॥४॥
भर्तृहरी भस्म सुलेपण । गोपेंदु शैली विराजमान । कानीफ स्वयें मृगाजिन । व्याघ्रचर्म चांगया ॥५॥
अनुहतशृंगी मैनावती । विसोबा मेखळा काषायदीप्ती । हस्तीं झोळी लीलावती । अनर्ध्य दीप्ति जियेची ॥६॥
निवृत्ति ज्ञानेश्वर सोपानवर्य । हे अंशरुपें वेदत्रय । त्रिशूळपाणि तेजोमय । चिच्छक्ती मुक्तध्वज फडके ॥७॥
नामया डमरु सुढाळ । मेनीनाथ तो कमंडल । जनाबाई कुब्जा अढळ । आदिनाथपदी पादुका ॥८॥
ऐशा अनंत नाथमूर्ति । भूषणरुपें आले व्यक्ती । जे निकट मीनले नाथपंथीं । उगमीं संगम ज्यापरी ॥९॥
ऐसे भूषणीं मंडित । जो त्रैलोक्यनाथ आदिनाथ । तया दंडप्राय दंडवत । अखंड असो पैं माझे ॥१०॥
गताध्यायीं कथा सुरस । चर्पटी दिधला उपदेश । दीक्षा देऊनि जगन्निवास । जाते झाले तेथोनि ॥११॥
त्यागून चर्पटी राजभार । जाता जाला अतिसत्वर । जेवीं सोडून अयोध्यानगर । राम जाय वनासी ॥१२॥
कीं शरीर टाकोनि प्राण । जाय जेवीं न लगतां क्षण । तेवीं नृपवर नगर त्यागून । जाता झाला ते काळीं ॥१३॥
कीं नैषध हरिश्वंद्र वनातें । जातां दुःख झालें प्रजेतें । परम अट्टहास्य रुदनातें । पौरज जन करिती पैं ॥१४॥
तेवीं प्रसंद्ग प्राप्त आज । म्हणती बुडाले समूळ जहाज । कां क्षोभला वृषभध्वज । भूभुज जातो त्यागुनी ॥१५॥
अंतःपुरीं स्त्रियांचे वृंद । न वर्णवे तो शोक अगाध । प्राणिमात्रां उदेला खेद । नृपवर जातो म्हणोनि ॥१६॥
सुभद्रासह ते प्रधान । नारीनर नागरिकजन । स्वदुःखे झाल्या म्लानवदन । होते झाले सर्वही ॥१७॥
चर्पटी आज्ञापी तये वेळां । राज्यीं स्थापा सुभद्र भूपाळा । ऐसे ऐकोनि सर्वत्र डोळां । अश्रुपात येते जाहले ॥१८॥
सुभद्र म्हणे मज नलगे वैभव । मीही येतसें तुम्हांसवें । काय करावा राज्यगौरव । ममाग्रजा तुजवीण ॥१९॥
मी राज्य न करीं कल्पांतीं । तव सेवेसी निश्चयमती । शुश्रुषे शिष्यवर्ग स्थिती । राहीन मी प्रीती सर्वदा ॥२०॥
जैसा रामभक्तीत दृढ भरत । तैसा सुभद्र मज भासत । ज्येष्ठसेवेंत सदा निरत । प्रतिसौमित्र दुसरा ॥२१॥
अग्रज वदे न करीं ऐसें । राज्य करी द्वादश वर्षे । गोरक्षदर्शनें अपैसें । योगसिध्दी पावसी ॥२२॥
तूं तरी आहेस योगभ्रष्ट । राज्य भोगोनि अवशिष्ट । नंतर योगमार्ग श्रेष्ठ । योगदीक्षा अवलंबी ॥२३॥
मायामोहातें त्यागून । चर्पटी निघतसे तेथून । सुभद्रें पादुका स्थापून । स्वयें राहे उपवनीं ॥२४॥
करी वल्कल्वसनें परिधान । वटदुग्धें जटा वळून । मस्तकमंडीत वेष्टण । कंदमूळ सेवितसे ॥२५॥   
प्रधाना वदे आज्ञावचन । चंद्रचूडाचा जो सुनंदन । तया देऊन पट्टासन । राज्यभार चालवी ॥२६॥
ऐसें ऐकोनि जनांचे वृंद । सद्गद होवोनि पावती खेद । म्हणती धन्य बंधुत्व अगाध । रघुगीर भरतासारिखें ॥२७॥
असो इकडे कथा वर्तली कैसी । गोरक्ष पातले पुष्करासी । सिध्दमेळा त्या स्थळासी । होता झाला तें काळीं ॥२८॥
देव गंधर्व यक्ष दानव  । किन्नर अप्सरा नृप मानव । सिध्दयोगी मुनिपुंगव । महर्षि पातले ॥२९॥
सनक सनंदन सनत्कुमार । देवर्षि नारद तुंबर । शेष वासुकी पादोदर । नररुपेंसीं प्रगटले ॥३०॥
कपिल मार्कंडेय दत्तात्रेय । वामदेव व्यासतनय हरिहरादि ब्रह्मदेव । इंद्रचंद्र पातले ॥३१॥
निराळीं विमानांच्या थाटी । विबुध करिती सुमन वृष्टि । जयजयकाराचे बोभाटीं । भुवनत्रय कोंदलें ॥३२॥
तेथें मत्स्येंद्र आणि जालंधरी । येते झाले ते अवसरीं । चर्पटी चौरंगी निर्धारी । नवनाथही पातले ॥३३॥
महासिध्द चौर्‍यांशी । पातले योगी आणि तापसी । येते झाले आनंद मानसीं । मेळा मिळाला म्हणोनि ॥३४॥
श्रीमन्मत्स्येंद्रसद्गुरुचरणीं । गोरक्ष ठेवी अचळमूर्ध्नि । आदिपुरुषीं आदेशध्वनी । अलक्षोच्चार गाजला ॥३५॥
श्रीगुरु कुरुवाळिती आनन । पुसती तया कीं क्षेमकल्याण । येरू वदे विनयवचन । कुशल कल्याण गुरुकृपें ॥३६॥
नाथपंथीं श्रेष्ठ महंत । दिगंबर निरालंब अवधूत । वंदिते झाले गोरक्षनाथ । आदेश करिती सर्वही ॥३७॥
मत्स्येंद्रा वदती सकळ सिध्द । सर्वत्र इच्छिती भिक्षा प्रसाद । प्राप्त झालिया ब्रह्मानंद । प्राणिमात्रां होतसे ॥३८॥
गोरक्ष उजू निरखून सहज । अवश्य म्हणोनि घेतली पैज । म्हणे गुरु समर्थ योगीराज । काय अशक्य तयासी ॥३९॥
पंथपंथाचें समुदाय । सर्व पाचारा सांप्रदाय । अतिथि मात्र कोणी न राहे । ऐसें झालें पाहिजे ॥४०॥
मग पिटोनि टाळिये टाळी । आनंदली ते सिध्दमंडळी । म्हणती प्राप्त आज दिवाळी । अतिथिसमुच्चय भोजनी ॥४१॥
समस्तांसी दिधलें आमंत्रण । उदयीक यावें न लगतां क्षण । सर्वांसी एकचि पाचारण । द्वैतपण नसेचि ॥४२॥
ढोल दमामे झेंगट । पाचारण करिती प्रगट । मत्स्येंद्रनामाचा बोभाट । ते मठीं यावें भोजना ॥४३॥
मत्स्येंद्र म्हणती गोरक्षातें । कांही साहित्य नसे येथें । काय करिसी लक्षावधीतें । गोरक्षाराया सुजान ॥४४॥
गोरक्ष म्हणी कायसी चिंता । अनंत्त ब्रह्मांडें सद्गुरु निर्मिता । निर्विकल्पीं कल्पना करितां । उणें कदापि असेना ॥४५
असो होतां प्रातःकाळ । भिक्षेसी जाय मत्स्येंद्रबाळ । झोळी भरोनि तत्काळ । भिक्षा अर्पी गुरुसी ॥४६॥
मायारुपी मत्स्येंद्र दयाळें । सचिंत बैसले तये वेळे । भाळी ठेवूनिय करांगुळें । श्वासोच्छ्‍वास दाटला ॥४७॥
गुरु बैसले खिन्न होऊनी । म्हणे रत्नें आणिलीं पाताळाहुनी । संरक्षिलीं यत्नप्रयत्नीं । तीं त्वां व्यर्थ त्यागिलीं ॥४८॥
तो संग्रह असता जरी । या कार्यास येता तरी । जेवीं पुत्र होतां बरोबरी ॥ त्यापुढें न चले पित्याचें ॥४९॥
तेवी झाले आजि मज । हें कोणापुढें सांगूं गुज । प्राप्त झाली महत्त्वा लाज । काय तुज म्हणावें ॥५०॥
आपुले मठीं नाहीं अन्नसमुदाय । आतां येती सिध्दसमुदाय । तूं तरी अससी निर्भय । काय विचार करावा ॥५१॥
लक्षावधि तों आमंत्रण । झोळींत तें किंचित भिक्षान्न । केवीं होय संतर्पण । उद्विग्न मन पैं माझें ॥५२॥
ऐसें असतां तये वेळीं । सिध्द झाली महंत मंडळी । म्हणती पाकनिष्पत्ति कोणे स्थळीं । आम्हांप्रति सांगावें ॥५३॥
गोरक्ष म्हणती उपवनीं । शिबिरें उभविली पाहा लोचनीं । तेथें बैसावें जाउनी । आम्ही मागाहुनि येतसों ॥५४॥
तों लोटले अतीतसंभार । शिबिरे पाहती एकसर । दिव्य सुवर्णकलश सुंदर । मंडपतोरणें देखिलीं ॥५५॥
दैदीप्य ध्वजा तळपती । वायुवेगें पाचारिती । अतिथी संकेतें पालविती । या रे येथें म्हणोनियां ॥५६॥
मंडपीं वाजतीं मंगळवाद्यें । तंतवितंतादि चतुर्विध । अंबर कोंदलें ब्रह्मानंदें । अभिन्न सोहळा होतसे ॥५७॥
मणिमय सिंहासनीं मत्स्येंद्र । अष्टसिध्दि विंजीत चामर । गंधर्व गाती सुस्वर । आलापिती सारंगा ॥५८॥
तेथें गोरक्ष उभे असती । स्थळोस्थळीं पाचारणा जाती । अनंत प्रगटल्या गोरक्षमूर्ति । किती म्हणोनी दावाव्या ॥५९॥
पडिले पक्वान्न पर्वत । ऊष्णधूम्र अंबरीं कोंदत । तेणें घ्राणदेवता तृप्त होत । परमसुवासेंकरुनी ॥६०॥
परिमळअन्नें घमघमिती । विमानीं निर्जर स्वाद घेती । निर्जरगणां नव्हे प्राप्ति । लाळ घोटिती पैं तेथें ॥६१॥
पदार्थमात्र असती प्रचंड । पयघृतांची परिपूर्ण कुंडे । दाधिक्षीरींची अतिउदंडें । कथिकावापी भरियेल्या ॥६२॥
कित्येक भ्रमभ्रांती पावून । भावूनि अज्ञानजनजीवन । तृषार्थी करुं जाती पान । तंव तप्ताआज्य सज्ज पैं ॥६३॥
अन्नपूर्णेहस्तींचें उत्पन्न अन्न । तेथे पदार्था काय पडे न्यून । घृतपाचित दिव्य पक्वान्नें । चतुर्विध निपजलीं ॥६४॥
ओदनाचे विशाल अचळ । शाका कोशिंबिरी पुष्कळ । सुरर्णवर्णी वरान्न निखिळ । शर्करा शुभ्र गिरिसम ॥६५॥
अष्टसिध्दि जेथें राबत । तेणें उणा कोणता पदार्थ । तेथें सरस्वती होय चकित । वाकस्तुतीतें करावया ॥६६॥
अगाध गोरक्ष महिमान । पदार्थमात्र झाले आपण । जेवीं वत्सहरणीं जनार्दन । अनंतरुपें धरीतसे ॥६७॥
कर्ता कार्य कारण । भोज्य भोक्ता आणि भोजन । सेव्य सेवक स्वयें होऊन । अद्वैतपणें वर्ततसे ॥६८॥
आपणचि ब्रह्मचारी गृहस्थ । आपणचि झाला वानप्रस्थ । आपणचि संन्यासी नेमस्त । परमहंस आपणचि ॥६९॥ प्रत्यंग रुपें धरोनि ऐसीं । कोठें होय तपी तापसी । कोठें होय अरण्यवासी । कोठें मठपति अखंड ॥७०॥
कोठे करी धूम्रपान । कोठें करी पर्णाशन । कोठें भक्षूनियां पवन । कोठें कंदमूळ सेवित ॥७१॥
कोठें ऊर्ध्वबाहू जटिल । कोठें पंचाग्नि तेजाळ । अवघड रुखडही सकळ । अखाडे अपार असती ॥७२॥
षट्‍दर्शनें छत्तीस पाखांडें । आपणचि नटला रुपें उदंडे । सर्व पाचारिले वाडेकोडें । अनेक पंथें ते वेळां ॥७३॥
असो पातली सिध्दमंडळी । बैसका स्थापिल्या स्थळोस्थळीं । चित्रविचित्र भूमंडळीं । रंगमाळा रेखिल्या ॥७४॥
सुवर्णसुमनीं रजतासनें । कनकपात्री वाढिती अन्नें । पंथपरत्वें भिन्नभिन्न । बैसते झाले अपार ॥७५॥
श्रीपादादि हंसश्रेणी । ते न बैसती रजतासनीं । तयां पाटीरपाट निर्मुनी धातूरहित दिधले ॥७६॥
निरालंब वदती वैखरी । म्हणती गोरक्षा अवधारी । अष्टसिध्दि ये अवसरीं । असती कामारी पैं येथें ॥७७॥
यांचे दर्शनेंकरुन । विघ्नविकार होय जाण । स्त्रियांचें नसावें दर्शन । काष्ठमृत्तिका धातूची ॥७८॥
आम्ही यांचिये भयेकरुन । सेवीतसों घोर कानन । गिरिकपाटी राहून । अनुष्ठान करीतसों ॥७९॥
स्त्रिया वाढितीं आह्मांस । भोजन नव्हे एक ग्रास । सौंदर्या निरखूनि मानस । कामविव्हळ होईल ॥८०॥
आननमदनदर्पण । निरखितां विकार पावे मन । यास्तव प्रार्थितों विनयवचन । स्वहस्तें भोजन देईजे ॥८१॥
विधि हरि हर इंद्र चंद्र । कामें नाडिले ऋषीश्वर । अनंगचेष्टा दुर्धर । अनिवार आम्हां नावरती ॥८२॥
अग्निकुंडसमान ललना । घृतकुंड पुरुष जाणा । तेथें विकार उठती मना । निश्वळ केवी राहीळ हें ॥८३॥
मंदस्मित मत्स्येंद्रनंदन । वदते जाले प्रतिवचन । षडविकार नसतां स्वाधीन । दीक्षा उदित नसेचि ॥८४॥
अरेरे जननीजठरीं होय जनन । तद्भावें करावे अवलोकन । स्त्रियांत मातेंत काय भिन्न । तेवीं आननें विलोका ॥८५॥
निरालंब वदती तदोत्तर । आमची मति न राहे स्थिर । तरी करावा कृतोपकार । अंतरबाह्य समदृष्टीं ॥८६॥
ऐसें ऐकोन दयाघन । करिते झाले कृपावलोकन । तेणें निरसिलें भेदभान । सबाह्य झालें आत्मत्व ॥८७॥
स्त्रीपुरुषनपुंसकभेद । न राहे द्वैत पाहती अभेद । गोरक्षकृपेंसी सिध्दवृंद । गोरक्ष दिसे सबाह्य पैं ॥८८॥
असो यापरी बैसती सिध्दपंक्ति । निर्जर हंसरुपें तेथें येती । नाथप्रसादातें इच्छिती । महिमा अद्भुत म्हणोनि ॥८९॥
अलक्ष आदेश शृंगीनादीं । भोजनी बैसली सिध्दमांदी । हरहर म्हणोन ब्रह्मवृंदीं । प्राणाहुति घेतल्या ॥९०॥
पात्रपात्रीं मत्स्येंद्रपुत्र । सर्व झाला पदार्थमात्र । सबाह्य दाटला सर्वत्र । न्यून अणुमात्र असेना ॥९१॥
वेळा वाळा सुगंधोदके । जलें प्राशिती शीतळ कौतुकें । सुस्वाद परिमळ शीतळ निके । पीयूष न तुके त्यापुढें ॥९२॥
चतुर्विध आणि षड्रस । लेह्य पेय खाद्य चोष्य । रुचित अन्न परम सुरस । चवी अगाध जयाची ॥९३॥
अनंतजन्मीचे सुकृताचळ । म्हणती सिध्दांन्न प्राप्त केवळ । कृतार्थ स्वार्थ मानिती सकळ । परम काळ सुखाचा ॥९४॥
विविध अन्नें सांगतां समग्र । तरी ग्रंथीं होईल विस्तार । म्हणोनि संकलितोत्तर । श्रोतयांतें कथितसे ॥९५॥
इकडे गोरक्ष मत्स्येंद्र । मठीं बैसले चिंतातुर । तों अतिथींचे जाती भार । मत्स्येंद्रमठीं भोजना ॥९६॥
मत्स्येंद्र पुसती अतिथीतें । तुम्ही कोठें जाता भोजनातें । आम्ही येतसों सत्वर तेथें । कोणतें स्थळ सांगा पां ॥९७॥
तंव ते हसोनि वदती तापसी । किमर्थ विनोद करीतसां आम्हांसी । गोरक्ष आले पाचारणासी । म्हणोनि भोजना जातसों ॥९८॥
आश्चर्य वाटे मत्स्येंद्रासी । पुसते झाले गोरक्षासी । विनोद आपुला तापसी । उपहासिती वाटतें ॥९९॥
गोरक्ष वदती कर जोडून । सद्गुरुगृहीं काय न्यून । मत्स्येंद्र वद्ती वचन । तरी अद्यापि न दिसे ये स्थळी ॥१००॥
मायालाघवी गोरक्षनाथ । तों उत्पन्न झाले पक्वान्नपर्वत । येथें तेथें सारिखें निर्मित । द्वैत किमपि असेना ॥१॥
येथेंही येती अतीतभार । सिध्द तपस्वी योगेश्वर । भोजना बैसती एकसर । अगाध कर्तृत्व तयाचें ॥२॥
जे वातांबुपर्णाशनी । तेही बैसती भोजनीं । महाप्रसाद म्हणोनी । स्वीकारिती अन्नातें ॥३॥
जें अदृश्य परिभासे । तेवीं उभयस्थळी भेद नसे । कीं छळितां पांडव दुर्वासें । अन्न निर्मिलें दो ठायीं ॥४॥
आश्रमींही पांडव असती । आणि गंगातीरीं उत्पन्न होती । ऐसी अतर्क्य जयाची कृति । काय किती वदावी ॥५॥
उपवनीं मत्स्येंद्र गोरक्ष । तेथेंही असती प्रत्यक्ष । महिमा देखोन सहस्त्राक्ष । विस्मित होय अंतरी ॥६॥
अतिथीतें पारामर्षे । स्वयें गोरक्ष प्रार्थितसे । भोजन करा सावकाशें । अवेळ झाला यास्तव ॥७॥
प्रतिपात्रीं पदार्थ घेउनी । इच्छान्न वाढी त्यांलागोनी । इकडे तिकडे गोरक्ष नयनीं । पदार्थमात्रीं दिसतसे ॥८॥
मत्स्येंद्र देखोनि गोरक्ष कृत्य । विस्मित होऊनि मनीं कृतकृत्य । म्हणती हा विष्णुच होय निश्चित । त्यावीन प्रताप असेना ॥९॥
कोट्यावधीतें दिधलें अन्न । हा प्रताप काय सामान्य । प्रत्यक्स्वरुपीं आपण । नटला हें अश्चर्य वाटतें ॥११०॥
अग्निउदकावीण पाकक्रिया । कैसी निपजली ये ठायां । अन्न उत्पन्न होऊनियां । अनुहत क्रिया दाविली ॥११॥
जयाची अतर्क्य योगमाया । जे ब्रह्मादिकां न ये आया । ती साध्य गोरक्षराया । माझिया तनया जाहली ॥१२॥
असो गोरक्ष प्रार्थिती सर्वाप्रती । यथेष्ट करावें भोजन प्रीती । जो लागे पदार्थ पुनरावृत्ती । मागोन घेणे आवडीं ॥१३॥
गुरुनामाचीं मिष्ट पक्वान्ने । गोडी आवडीं करावें ग्रहण । विषय निरुच्य म्हणणें । वैराग्यत्यागे त्यागिजे ॥१४॥
अतिथि वद्ती सम्यक । दशइंद्रियां झाले सुख । मस्तकावरी न निर्मिलें मुख । चुकी अगाध विधीची ॥१५॥
अमृताहुनि मिष्टान्न । आकंठवरी जाहलें पूर्ण । दुजे न निर्मिलें आनन । चतुरानन चुकला ॥१६॥
यापरी गुरुगृहीं जेविले । स्वानंदस्वादा सुखावले । सवेंच संसारा आंचवले । ढेकर दिधले प्रेमाचे ॥१७॥
चर्पटी चौरंगी उभयतां । करशुध्दि देती समस्तां । त्रयोदशगुणी विडे तत्त्वतां । देऊनियां संतोषविती ॥१८॥
ऐसी त्रिलोकीं कीर्ति मिरवली । गोरक्षनामाची तये वेळीं । उच्चयश गुढी फडकली । उभारिली सुरेख ॥१९॥
झाला सिध्द समारंभ यापरी । जयजयकार गाजला अंबरी । शृंगीनाद उद्भट ते अवसरीं । दुमदुमीत कोंदला ॥१२०॥
मत्स्येंद्रगोरक्षादि समवेत । चर्पटी चौरंगीनाथ समस्त । आणिक सांप्रदायिक नृपनाथ । तोरणमाळा पातले ॥२१॥
चौरंगे वदे गोरक्षातें । समुद्रकंकणांकित पृथ्वीतें । येथील झाली समग्र तीर्थे । स्वर्गमात्र उरलेसें ॥२२॥
मत्स्येंद्रा गोरक्षा नमुनी । चौरंगी जातसे स्वर्गभुवनी । स्थिरावले तये स्थानीं । आनंदें करोनि ते वेळीं ॥२३॥
हें परम रहस्य पूर्वार्ध । येथून सुरस उत्तरार्ध । जयाचा महिमा अगाध । किती म्हणोन वर्णावा ॥२४॥
कीं दक्षिणायन उत्तरायण । कीं पूर्व उत्तर मीमांसा दोन । कीं प्रकृति आणि पुरुष जाण । कीं शर्करा गोडी ज्यापरी ॥२५॥
कीं द्वादश ज्योतिर्लिंगें भाळनेत्र । हें द्वादशस्कंध भागवत पवित्र । कीं व्रतांत द्वादशी जेवीं थोर । तेवी अध्याय श्रेष्ठ हा ॥२६॥
कीं द्वादश कावडी रामेश्वर । पूजिला जेवीं भाळचंद्र । कीं सिंहस्थ यात्रा त्र्यंबकेश्वर । याचा सुफल गौतमी ॥२७॥
हे अज्ञानतमांतक द्वादशमित्र । किं द्वादश मासांचा शुभसंवत्सर । सर्व व्रतांचें माहेर । ते असती हे ॥२८॥
आदिनाथलीलाऔषधी । भवरोग नाशी आधिव्यधि । श्रवणमात्रें मात्रा आर्धी । घेतां अर्धमात्रा अधिकारी ॥२९॥
आदिनाथलीला ज्ञानांजन । श्रवणें लेऊन पाहा धन । चिद्रत्नांची उघडली खाण । गुरुवाक्यदृष्टी पाहावी ॥१३०॥
श्रीमत‍ आदिनाथलीलामृत । ग्रंथकर्ता भैरव समर्थ । तत्प्रसादे आदिनाथ । द्वादाशाध्यायीं कथिलेला ॥१३१॥

N/A

References : N/A
Last Updated : February 07, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP