मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|विविध अभंग|
७००६ ते ७०२०

दसरा - ७००६ ते ७०२०

तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.


॥७००६॥

करुनी आरती । आतां ओवाळूं श्रीपती ॥१॥
आजी पुरले नवस । धन्य झाला हा दिवस ॥२॥
पाहा वो सकळा । पुण्यवंता तुह्मी बाळा ॥३॥
तुका वाहे टाळी । होता सन्निध जवळी ॥४॥

॥७००७॥
द्याल माळ जरी पडेन मी पायां । दंडवत वांयां कोण वेची ॥१॥
आलें तें हिशोबें अवघिया प्रमाण । द्यावें तरी दान मान हो तो ॥२॥
मोकळिया मनें घ्याल जरी सेवा । प्रसाद पाठवा लवकरी ॥३॥
तुका ह्मणे तुह्मी झालिया कृपण । नामाची जतन मग कैंची ॥४॥

॥७००८॥
तुह्मी जावें निजमंदिरा । आह्मी जातों आपुल्या घरा ॥१॥
विठोबा लोभ असों देई । आह्मी असों तुमचें पायीं ॥२॥
चित्त करी सेवा । आह्मीं जातों आपुल्या गांवा ॥३॥
तुका ह्मणे दिशा भुललों । फिरोनी पायापाशीं आलों ॥४॥

॥७००९॥
झाली पाकसिद्धि सकळ । आली भोजनाची वेळ ॥१॥
तापउनी पाणी । उभ्या सिद्ध दासी जनी ॥२॥
चुवा अरगजा चंदन । सुंदर करुनी उटणें ॥३॥
बोलाऊं पाठविला तुका । चला पाक झाला निका ॥४॥

॥७०१०॥
देव चालिले घरांत । धरुनी उद्धवाचा हात ॥१॥
भक्त गर्जती महाद्वारीं । देव चालिले मंदिरीं ॥२॥
तुका ह्मणे भक्त जगा । कांहीं देवाजीसी मागा ॥३॥

॥७०११॥
घडिया घालुनी रुक्मिणी । देव चालती वरुनी ॥१॥
सुंदर उमटती पाउलें । चिन्ह ध्वजांकित रेखिलें ॥२॥
उद्धव अक्रुर दोहीं कडे । तुका चालतसे पुढें ॥३॥

॥७०१२॥
देव उठले स्नानासी । उटणें मर्दिती त्या दासी ॥१॥
सुगंधित तेलें । तेणें देवा चर्चियेलें ॥२॥
मग करुनिया स्नान । करी पीतांबर परिधान ॥३॥
रत्न जडित बैसावया । पाट देत जगमाया ॥४॥
तुका ह्मणे वर्णू कायीं । घेतों आलाई बलाई ॥५॥

॥७०१३॥
ताट विस्तारी रुक्मिणी । जेवा ह्मणे चक्रपाणी ॥१॥
नानापरीचीं पक्वान्ने । मांडें पोळ्या परिपूर्ण ॥२॥
पत्रशाखाचा तो थाट । फळशाखा घनदाट ॥३॥
नानापरीच्या त्या क्षिरी । आणि साठी कोशिंबिरी ॥४॥
शुद्ध साळीचा तो भात । वरी वरण शोभत ॥५॥
सद्यस्तप्त असे तुप । शुद्ध साजूक अमूप ॥६॥
देवा सावकाश जेवावें । विनवी विश्वमाता भावें ॥७॥
भोजन करुनी उठले । मग देव आंचवले ॥८॥
तेथें ठोंकतसे तुका । पाहे प्रसाद तो निका ॥९॥

॥७०१४॥
पाहें प्रसादाची वाट । द्यावें घोवोनिया ताट ॥१॥
शेष घेऊनीं जाईन । तुमचें झालिया भोजन ॥२॥
झालों एकसवा । तुह्मां आडूनियांदेवा ॥३॥
तुका ह्मणे चित्त । करुनी राहिलों निश्चिंत ॥४॥

॥७०१५॥
केली कटकट गाऊं नाचों नेणतां । लाज नाहीं भय आह्मां पोटाची चिंता ॥१॥
बैसा सिणलेती पाय रगडुं दातारा । जाणवूं द्या वारा उब झाली शरीरा ॥२॥
उशिरा उशीर किती काय म्हणावा । जननिये बाळका कोप कांहीं न धरावा ॥४॥
तुझिये संगतीं आह्मी करुं कोल्हाळ । तुका ह्मणें बाळें अवघीं मिळोन गोपाळ ॥४॥

॥७०१६॥
प्रसाद पावला । आतां सर्व तुह्मी चला ॥१॥
सकळां झालासे आल्हाद । मुखीं नामाचा तो छंद ॥२॥
नका करुं गलबला । तुका सांगे सकळांला ॥३॥

॥७०१७॥
आतां सुखें निद्राकरा । आह्मी जातों आपुल्या घरा ॥१॥
पुरले मनोरथ । झालों आनंदभरित ॥२॥
पावलों उच्छिष्ट भोजन । तेणें धालें आमचें मन ॥३॥
झोंप घ्यावी हो निश्चित । ऐसें तुका विनवीत ॥४॥

॥७०१८॥
उठोनियां संत गेले । हरिनामें सर्व धाले ॥१॥
मन ठेऊनी हारपायीं । आपण होऊनी विदेही ॥२॥
हरिसुखें सुखरुप । तुका झाला ब्रह्मरुप ॥३॥

॥७०१९॥
आरुष शब्द बोलों मनीं न धरावें कांहीं । लडिवाळ बालकें तूंचि आमुची आई ॥१॥
देई गे विठाबाई प्रेमभातुकें । अवघियां कवतुकें लहानां थोरां सकळां ॥२॥
असो नसो भाव आलों तुझिया ठाया । पाहें कृपादृष्टी आतां पंढरीराया ॥३॥
तुका ह्मणे आह्मी तुझीं वेडीं वाकुंडीं । नामें भवपाश आतां आपुलिया तोडीं ॥४॥

॥७०२०॥
आडकलें देवद्वार । व्यर्थ काय करकर ॥१॥
आतां चला जाऊं घरा । नका करुं उजगरा ॥२॥
देवा लागलीसे निज । येथें उभ्या काय काज ॥३॥
राग येतो देवा । तुका म्हणे नेघे सेवा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : June 09, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP