लघुभागवत - सीतागीत

लघुभागवत हे एक उपपुराण आहे.


अथ सीतागीतप्रारंभ: ।
(कविश्रेष्ठ मोरोपंतकृत.)
यज्ञासाठीं भूमी नागरीतां धन्या । सांपडली कन्या सीतादेवी ॥१॥
जनकाची पुत्री दुर्जनां दुर्मिळा । ती भार्या उर्मिळा लक्ष्मणाची ॥२॥
जनकाचा बंधू होता एकनिष्ठ । वयानें कनिष्ठ, श्रेष्ठ गुणें ॥३॥
तेणें भरतासी मांडवी दुहिता । दिली, जी सुहिता दोहीं कुळीं ॥४॥
शत्रुघ्राला दिली दुजी श्रुतकीर्ती । जीची गाती कीर्ती पतिव्रता ॥५॥
चवघी बहिणी भाग्यें झाल्या जावा । त्यांचा गीतीं गावा सुसंवाद ॥६॥
वनवासवृत्त सीतेसी पुसती । प्रेमें त्या सुसती तिघीजणीं ॥७॥
सीता म्हणे, -" ऐका वनवासकथा । परी मनीं व्यथा न धरावी ॥८॥
चित्रकूटाहूनी पादुका घेऊनी । वियोग देऊनी तुम्हीं आलां ॥९॥
आम्हींही तेथूनी तशींच निघालों । वनांत रिघालों तिघेंजणें ॥१०॥
लक्ष्मण भावोजी मागें,  पुढें स्वामी । मज आहें धामीं ऐसें वाटे ॥११॥
न बाधेचि मज उष्ण क्षुधा तृषा । तुम्हांपाशीं मृषा बोलावें ॥१२॥
जेव्हां कांहीं वाटे चालतां मी भागें । मुरडोनि मागें विलोकिती ॥१३॥
बाई ! काय सांगों स्वामींची ती दृष्टी । अमृताची वृष्टी मज होय ॥१४॥
अत्रीच्या आश्रमीं नेलें मज वाटे । माहेरची वाटे खरेंखुरें ॥१५॥
अनुसूया सती करी वेणी फणी । आनंदाची धणी दिली मज ॥१६॥
आजवरी ओली चंदनाची ऊटी । आली नाहीं तुटी माळागुणीं ॥१७॥
ऋषीतें वंदीत गेलों गोदातटीं । जेथें पंचवटी पुण्यस्थान ॥१८॥
भावोजींनीं केली माझी बहु सेवा । ती त्या महादेवा ठायी असे ॥१९॥
तेथें शूर्पणखी भार्या व्हाया आली । तिला माझी भ्याली चित्तवृत्ती ॥२०॥
भावोजींनीं तीचा कर्णनासाछेद । केला, कीं ते वेदशास्त्रार्थज्ञ ॥२१॥
तीचा भाऊ खर होऊनियां क्रुध्द । करावया युध्द आला बाई ! ॥२२॥
चवदा सहस्र राक्षस पापिष्ठ । रणीं केले पिष्ट स्वामींनीं ते ॥२३॥
तीनें घ्राण रक्तें मुख मळवीलें । वृत्त कळवीलें रावणासी ॥२४॥
छळाचा उपाय मनीं आठवीला । दुष्टें पाठवीला मायामृग ॥२५॥
स्वर्णरत्नमय मृग म्यां देखीला । तो सत्य लेखीला मनामध्यें ॥२६॥
गृहा आणावया मागें हरीणा मी । दु:ख परीणामीं नेणोनीयां ॥२७॥
मज रक्षावया लक्ष्मणा ठेऊनी । निघाले घेऊनी धनुर्बाण ॥२८॥
मायामृगामागें जगदेकशूर । गेले बहू दूर अरण्यांत ॥२९॥
कपटी राक्षस जाणोनियां प्राण । घ्यावयासी बाण मोकलीला ॥३०॥
तो बाण लागतां हृदय विदारी । दुष्ट हांका मारी स्वामीवाणी ॥३१॥
‘हा सीते ! हा बंधो ! लक्ष्मणा ! ये धांवें । अंतकाळीं पावें, भेटावया’ ॥३२॥
मज वाटे माझ्या स्वामींचीच हांक । शिरे कंप धाक हृदयांत ॥३३॥
मी म्हणें, ‘भावोजी ! धावा, रक्षा प्राण । हे घ्या चाप बाण, ऊठा वेगीं’ ॥३४॥
भावोजी म्हणती, ‘राक्षसाची माया । कोण रामराया पाहों शके?’ ॥३५॥
वाटलें तें वाक्य सत्य परी खोटें । झालें दु:ख मोठें माझ्या मनीं ॥३६॥
न वदावें तेंची बोलिल्यें मी कोपें । चित्त शब्दरोपें विदारीलें ॥३७॥
‘वांच्छितोसि दुष्टा अग्रजाचा घात । माझ्या आंगा हात लावावया ॥३८॥
हात लावीतांची सोडीन मी प्राण । शिरीं पादत्राण कोण वाहे ? ॥३९॥
माझ्या दृष्टीपुढें  नको राहों, जाच । नरकींचा जाच मूर्त तूंची’॥ ४०॥
ऐशी बाई ! माझी ऐकतांची वाणी । डोळां आलें पाणी भावोजींच्या ॥४१॥
मातेनें दापीतां वत्स पित्याकडे । जाय, तैसें घडे लक्ष्मणांसी ॥४२॥
साधूसी गांजीतां झालें सध्यां फळ । सज्जनाचा छळ करुं नये ॥४३॥
वाटेंत धनुष्य ओढोनियां रेघ । गेले दयामेघ स्वामींकडे ४४॥
तों आला रावण होवोनी संन्यासी । नकळे अन्यासी छद्म त्याचें ॥४५॥
भिक्षा द्याया गेल्यें  रेघेच्या बाहेर । सासूर माहेर बुडवाया ॥४६॥
न लंघीतें  जरी धनुष्याची रेखा । तरी त्याचा लेखा काय होता ? ॥४७॥
रेघेच्या बाहेरी जसा दिला पाय । झाला महाकाय दशमुख ॥४८॥
जसा हरीणी तें हरीतो लांडगा । तसा तो दांडगा हरी मातें ॥४९॥
त्या पाप्याच्या स्पर्शें देह हा कोमेल । आकाशीं तो मेला रथीं चढे ॥५०॥
‘ह राम ! लक्ष्मण !’ ऐशी हांक माजी । जटायू मामाजी आयकती ॥५१॥
सखे दशरथ मामाजींचे आप्त । सोडवाया प्राप्त  झाले दैवें ॥५२॥
जातीचे ते गृध्र वृध्द मोठे शूर । रथ केला चूर रावणाच ॥५३॥
चंचूनखायुध गृध्र युध्ददक्ष । रावणाचें वक्ष विदारीतें ॥५४॥
अन्यायें रावण छेदी त्यांचे पक्ष । मज वाटे लक्षबंधूघात ॥५५॥
मूर्च्छित मामाजी पडले भूवरी । स्कंधीं वाहे अरी मला बाइ ! ॥५६॥
रडतां काढीले पांच सात नग । वस्त्रखंडीं मग बांधीले म्यां ॥५७॥
पर्वतीं वानर देखीले म्यां मग । त्यांमध्ये ते नग सोडीयेले ॥५८॥
शतगांवें सिंधू,  त्यांत एक लंका । तेथें ने कलंका लावावया ॥५९॥
नेऊनियां ठेवी अशोकवनांत । न शोक मनांत माये माझ्या ॥६०॥
सहस्र राक्षसी करीती रक्षण । चिंतातीर क्षण न सांपडे ॥६१॥
दिव्यान्नांचा ज्यांत नानापरी थाट । धाडी नित्य ताट शक्रभार्या ॥६२॥
दिव्यानांचें ताट ये मजजवफ़्ळ । भक्षीं मी कवळ एक दोन ॥६३॥
फिरले घेऊनी मारीचाचे प्राण । दिव्यधनुर्बाणपाणी मागे ॥६४॥
मार्गीं लक्ष्मणजी करीती वंदन । श्रीरघुनंदनचरणांतें ॥६५॥
म्हणतीं, ‘वत्सा ! त्वां कां आज्ञा मोडीली । एकली सोडीली कां ती वनीं ?’ ॥६६॥
भावोजींनी सर्ववृत्त कळवीलें । मुख मळवीलें  अश्रुपातें ॥६७॥
ऐकोनी बोलीले स्वामी, ‘झालें खोटें । राक्षसांनीं मोठें विघ्र केलें’ ॥६८॥
दोघांच्या हृदयीं धडधड करी । आले झडकरी धांवोनीयां ॥६९॥
पर्णशाळेमध्यें  देखीले कावळे । स्वामींचा मावळे धैर्यसूर्य ॥७०॥
केला आधी फार शोध, मग शोक । धन  जातां लोक करी जैसा ॥७१॥
शोधीतां वनांत मामाजी पाहीले । धरुनी राहिले कंठीं प्राण ॥७२॥
पुसती, ‘बापाजी ! झाली हे कां गती? ’ । मामाजी सांगती अर्धशब्दें ॥७३॥
स्वामीपाशीं माझें सांगतां हरण । पावले मरण शोकभरें ॥७४॥
‘हा तात ! ’ म्हणूनी रडले । मूर्च्छीत पडले घडीभरी ॥७५॥
मामाजींची सांग संपादिली क्रिया । त्या काळीं हे प्रिया नाठविली ॥७६॥
पुन्हां वनीं मातें रडत शोधीती । लक्ष्मण बोधीती नाना यत्नें ॥७७॥
आलिंगील्या वल्ली, वियोगें भ्रमले । शोधीतां श्रमले रात्रंदीस ॥७८॥
वनीं कबंधानें केला होता घात । चार कोस हात लांब त्याचे ॥७९॥
धरीतां खडांनीं केला भुजच्छेद । शाप ताप खेद निवारीला ॥८०॥
मतंगमुनीच्या आश्रमीं शबरी । व्हाया यश बरी युक्ती सांगे ॥८१॥
हनूमंतावरी केली अनुकंपा । या प्रभूंनीं पंपासरोवरीं ॥८२॥
सुग्रीवासीं भेटी ऋष्यमूकीं झाली । त्याची दृष्टी धाली पाहतांची ॥८३॥
त्याच्या मुखें  वृत्त आयकीलें मग । आणूनी ते नग दाखविले ॥८४॥
सुग्रीव वानर सूर्याचा तनय । ज्या स्वप्रीं अनय नाहीं ठावा ॥८५॥
दोषावीणें रागें सुग्रीवासी जाची । त्याच्या अग्रजाची बुध्दी खोटी ॥८६॥
बंधूची स्त्री वाळी बळात्कारें भोगी । सुग्रीव तो जोगी केला होता ॥८७॥
एके बाणें वाळीस्वामींनीं मारीला । सुग्रीव तारीला संकटांत ॥८८॥
वानरांचे राज्य दिलें सुग्रीवाला । तो फार निवाला ऊपकारें ॥८९॥
माझी वार्ता कोणा नकळे किमपी । पाठवीले कपी शोधावया ॥९०॥
न लागतां माझा शोध कपी सारे । म्हणती ते, ‘हा रे ! दूरदृष्टा ! ॥९१॥
मारील सुग्रीव लंघीला  अवघी । मरावें, नवधी करुं नये’ ॥९२॥
समुद्राच्या तीरीं पर्वतीं रडले । मराया पडले उपोषीत ॥९३॥
‘धिक्कार आम्हांला, झालों सेवाचोर । व्यर्थ मृत्यु थोर खेद वाटे ॥९४॥
श्रीरामाची भार्या सोडवीतां मेला । जटायू तो गेला सद्रतीसी’ ॥९५॥
ऐसी जी बोलीले वाणी, दे कंपा ती । विचारी संपाती गृध्रराज ॥९६॥
वार्ता वाटे कानीं पडतां शंपा ती । रडला संपाती बंधूशोकें ॥९७॥
त्यानें सांगीतली त्यांना माझी शुध्दी । त्या कवीची बुध्दी समदृष्टी ॥९८॥
शतगांवें बाई १ मारुती उडाला । पुण्यें न बुडाला सागरांत ॥९९॥
पुरीं शोधी होय सशोक मनांत । अशोकवनांत मग आला ॥१००॥
तो रात्रीं रावण प्रार्थी, बडबडे । बुध्दी गडबडे मारुतीची ॥१०१॥
पाण्यापरीस मी पातळ तो केला । मग रागें मेला असें म्हणे ॥१०२॥
‘दोंमासांत मान्य, न होतां हे मारा । राक्षसी हो !  चारा मांस मज’ ॥१०३॥
ऐसें राक्षसीला सांगोनी तो जाय । म्हणे ‘हाय ! हाय !’ हनूमंत ॥१०४॥
हळूच मारुती सद्रुणसमुद्रा । वर्णी, मग मुद्रा मज दावी ॥१०५॥
निववी हृदय प्रियसखी मुद्रा । काय सुधा क्षुद्रा नीववील? ॥१०६॥
मज म्हणे, ‘चाल, बैस माझे स्कंधीं । तूं दुर्गा, मी नंदी, दास तुझा’ ॥१०७॥
तेव्हां मी बोलील्यें , नेशील बा ! खरें । परी नव्हे बरें असें जाणें ॥१०८॥
युध्दीं मारितील या मेल्यासी स्वामी । तेव्हां मुखा बा ! मी दाखवीण ॥१०९॥
मग तें अशोकवन कपी मोडी । राक्षसांचें झोडी बळें सैन्य ॥११०॥
मारीला संगरीं, रावणाचा अक्ष । कुमार, जो दक्ष रणरंगीं ॥१११॥
इंद्रजिताला तों दाटूनी सांपडे । हनूमंत पडे ब्रह्मपाशीं ॥११२॥
रावणें वानर मानूनियां तुच्छ । पेटवीलें पुच्छ जाळावया ॥११३॥
पुच्छ पेटतांची हनुमंत ऊडे । लंकेमध्यें हूडे वाडे जाळी ॥११४॥
देवांनीं वदनीं घातली आंगोळी । लंकेची रांगोळी पाहोनीयां ॥११५॥
विचारोनी मज जाय स्वामींकडे। पायांवरी पडे हनूमंत ॥११६॥
माझा समाचार ऐकोनी हर्षले । प्रेमाश्रू वर्षले स्वामी माझे ॥११७॥
स्वामीस मव्दृत्त करी सुप्रसन्न । जैसें दिव्य अन्न क्षुधार्ताला ॥११८॥
हनूमंतावरी झाली दया मोठी । उपकार कोटी मानीयेले ॥११९॥
निघाले घेऊनी वानरांची सेना । धरणी दिसेना सूर्यप्रभा ॥१२०॥
रावण धर्माच्या वाटे न लागला । सांगोनी भागला बिभीषन ॥१२१॥
नायके रावण, क्रोधानळें पेटे । श्रीमंतासी भेटे सिंधूतटीं ॥१२२॥
म्हणे, ‘गुणकल्पवृक्षांच्या अरण्या ! । दयाळा ! शरण्या, रक्षीं मज’ ॥१२३॥
स्वामीचें शरणागतीं प्रेम प्राज्य । दिलें लंकाराज्य वंदीतांची ॥१२४॥
भेटला सागर जोडोनीयां करा । म्हणे, ‘सेतु करा, तारा मज’ ॥१२५॥
शतगांवें सेतु समुद्रीं रचिला । पर्वतीं खचीला मार्ग मोठा ॥१२६॥
सेतुपंथें सिंधु लंघूनियां आले । वार्तामृतें धाले कर्ण माझे ॥१२७॥
दूत पाठवीला दुर्जनभंगद । तेजस्वी अंगद वाळीपुत्र ॥१२८॥
 स्वामींचा निरोप दोहीं लोकीं पथ्य । सांगीतला तथ्य अंगदानें ॥१२९॥
खळ नेघे वाक्य स्वामींचें तोखद । न सेवी ओखद गतायुष्य ॥१३०॥
म्हणे, ‘आम्हांपुढें बोलतें वाकडें । मर्यादा माकडें टाकीली कीं ॥१३१॥
राक्षस हो ! धरा, मारा, धांवा, चावा । पळ न वांचावा हा मर्कट’ ॥१३२॥
 अंगासी राक्षस झोंबले चवघे । झाडोनी अवघे पिष्ट केले ॥१३३॥
उडतां मोडिली स्वर्णवज्रसभा । मळवीली प्रभा रावणाची ॥१३४॥
धर्ममर्यादेच्या संकोचें थोपले । अधर्मे कोपले राक्षसाच्या ॥१३५॥
ज्याला चावावया वज्राहूनी गाढा । काळाच्याही दाढा न शकल्या ॥१३६॥
तें राक्षसलक्षकोटी बळ पूर्ण । वानरांनीं चूर्ण नखीं केलें ॥१३७॥
रक्तनद्या तेथें शतशा वाहिल्या । देवांनीं पाहिल्या डोळेभर ॥१३८॥
मारिले प्रधान, रावणाचे पोर । त्यांत बळा थोर इंद्रजित ॥१३९॥
रावणाचा भ्राता कुंभकर्ण काळ । तेणें कपीपाळ धरीयेला ॥१४०॥
बहिणीची तैशी त्याची करी गती । स्वयें कपीपती सुटोनियां ॥१४१॥
जसे बरे गरे, बहु कपीभट । तेणें गटगट गिळीयेले ॥१४२॥
पळाया त्यां वाट मिळे कर्णीं नाकीं मिथ्या वर्णीं ना कीं, जानकी मी ॥१४३॥
प्रभूंनी हरिलें तत्तेज सर्व तें । नुरावें पर्वतें वज्रापुढें ॥१४४॥
माझे स्वामी झाले त्या तमा तरणी । त्यांची मात रणीं, काय सांगों? ॥१४५॥
इंद्रासी असह्य इंद्रजित, परी । मारीला तो अरी भावोजीनीं ॥१४६॥
वाहूनी मस्तकें तोषवीला भर्ग । कांपवीला स्वर्ग कैलासही ॥१४७॥
तो काय सामान्य ? परी झाला गर्व । त्याचें तेज सर्व वायां गेलें ॥१४८॥
मारीला प्रभूंनीं सहपरीवार । उतरीला भार धरणीचा ॥१४९॥
उर्मीळे ! मूर्च्छीत तूझे माझे धणी । झाले होते रणीं सेनेसह ॥१५०॥
वांचवीले सर्व हनूमंतें बाई ! । सांगों याचे काई उपकार? ॥१५१॥
ओषधीपर्वत समूळ खाणीला । घडींत आणीला, जैसा चेंडू ॥१५२॥
हनूमंतें आम्हां  दिलें चूडेदान । ऐसा नाहीं आन आप्त कोणी ॥१५३॥
उठले वानर अमृतवृष्टीनें । स्वामीच्या दृष्टीनें हेंचि सत्य ॥१५४॥
शिबिकेंत मज घालोनी आणिलें । देह म्यां न्हाणिलें  अग्रिकुंडीं ॥१५५॥
त्या काळीं देवांनीं केली पुष्पवृष्टी । आनंदानें सृष्टी कोंदाटली ॥१५६॥
आले दशरथमामाजी विमानीं । धन्या जीवीं मानी आपणा मी ॥१५७॥
देवांची प्रार्थना, मामाजींची आज्ञा । केली सर्व प्राज्ञा सुखवाया ॥१५८॥
मांडीवरी मज घेतलें  स्वामींनीं । घनीं सौदामिनी जना वाटे ॥१५९॥
भृंगयुक्त पती पुष्पक विमानीं । पुष्प कवी मानी, जैं बैसले ॥१६०॥
स्वामींनीं समुद्रीं दाखवीला सेतू । भवाब्धींत हेतू तराया जो ॥१६१॥
रुंद दहा गांवें, लांब शत गावें । पाप न तगावें जो देखतां ॥१६२॥
दाविली किष्किंधा, भेटाविली तारा । सुग्रीवाची दारा, जाऊबाईं ॥१६३॥
स्वामींच्या मुखींच्या ज्या म्यां आयकिल्या । गोष्टी, काय किल्या सर्वस्वाच्या ॥१६४॥
‘अवघी टळेल, असें नच वदा । असेन चवदा वर्षे वनीं ॥१६५॥
ऐसा भारतासीं शत्रुघ्राशीं बोल । प्रभूंनीं तो फोल, केला नाहीं ॥१६६॥
संतती संपत्ती वाढे, होय हीत । प्रेमें गातां गीत श्रीरामाचें ॥१६७॥
न बाधे पर्जन्य वात उष्ण शीत । प्रेमें गातां  गीत श्रीरामाचें ॥१६८॥
धन्य धन्य होय संसारीं जीवीत । प्रेमें गातां गीत श्रीरामाचें ॥१६९॥
काळापासूनीही नव्हे चित्त भीत । प्रेमें  गातां गीत श्रीरामाचें ॥१७०॥
अंती वसे स्वर्गीं अमृताचे पीत । प्रेमें गातां गीत श्रीरामाचें ॥१७१॥
श्रीरामातें घ्यावें, श्रीरामातें गावें । श्रीरामातें भावें आठवावें ॥१७२॥
रामाचें चरित अमृतभरित । सेवावें त्वरित सर्वांनींही ॥१७३॥
श्रीरामाचें गीत गातील ज्या कन्या । होतील त्या धन्या संसारांत ॥१७४॥
श्रीराम दयेचा मेघ, त्या समोर । प्रेमें दासमोर नाचताती" ॥१७५॥
या श्रीरामदयातोयदासमोर । होय दास मोर आनंदीत ॥१७६॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP