लघुभागवत - सावित्रीगीत

लघुभागवत हे एक उपपुराण आहे.


अथ सावित्रीगीतप्रारंभ: ।
(कविश्रेष्ठ मोरोपंतकृत.)
मद्रदेशीं होता राजा महामती । नामें अश्वपती साधुमान्य ॥१॥
आलें वृध्दपण, नाहीं पुत्ररत्न । केले बहू यत्न करावे ते ॥२॥
सावित्रीदेवीचें करी आराधन । देह, दारा, धन असमर्पूनी ॥३॥
निष्ठेनें सर्वदा अष्टादश वर्षे । जप होम हर्षे चालवीतां ॥४॥
अग्रिकुंडांतूनी प्रकटली देवी । अश्वपती ठेवी पायीं शीर ॥५॥
देवी म्हणे, ‘मागं,’ राजा म्हणे, ‘माते ! । पुत्रदानें दाते लाजवावे’ ॥६॥
सावित्री म्हणे, ‘म्यां स्वामी दयानीधी । विनवीला विधी तुजसाठीं ॥७॥
दिली तुज पुत्रशताहूनी धन्या । पतिव्रता कन्या विचारुनी ’ ॥८॥
ऐसें सांगोनी ती देवी गुप्त झाली । कन्या पोटीं आली मानवीच्या ॥९॥
पुत्राचें तैसेंच विधीनें बा रसें । सुदिनीं बारसें तीचें करी ॥१०॥
जिनें पूर्ण केला वरदानें  काम । ठेवी तीचें नाम कन्यकेसी ॥११॥
रुपें गुणें  कांहीं उणी न सावित्री । तशी न सावित्री भुवनांत ॥१२॥
तिला न मागती राजपुत्र गुणें । स्वरुपासी ऊणें  जाणोनियां ॥१३॥
राजा चिंता करी झाली उपवर । अनुरुप वर न ये कोणी ॥१४॥
सावित्रीला म्हणे, ‘वत्से ! लग्रकाळ । आला, न भूपाळ कोणी मागों ॥१५॥
तूंची वर स्वयें  योग्य पहा, जा गे ! । कोणीही न मागे येऊनीयां ॥१६॥
या माझ्या वचनें तुवां न कोपावें । तूज म्यां ओपावें योग्य हस्तीं’ ॥१७॥
सावित्री पित्याची आज्ञा मान्य करी । ठेवी पायांवरी मस्तकातें ॥१८॥
पित्याचा प्रधान, कुलगुरु, दाया । आप्तसमुदायासह निघे ॥१९॥
गेली पृथ्वीवरी पहावया वरा । करी शोध बरा देशोदेशीं ॥२०॥
शोधी ती मानेसा नवरा जीवाला । नव राजीवाला जैशी भृंगी ॥२१॥
रसिकास जैशी कविता ती सती । पाहे योग्य पती जनीं वनीं ॥२२॥
एके दिवशीं आला संसारपारद । श्रीमुनी नारद मृत्युलोकीं ॥२३॥
अश्वपतीला तो भेटे तपोधन । चातकाला घन स्वयें जैसा ॥२४॥
अश्वपती पावे सुखास, नमूनी । सुखासन मुनी अंगीकारी ॥२५॥
सुधारस तूपें कीं सागर कूपें । तैसा मुनी भूपें सत्कारीला ! ॥२६॥
उध्दराया अश्वपतीराय कवी । कथा आयकवी पुरातना ॥२७॥
अशा समयांत सावित्रीही आली । पायीं नम्र झाली दोघांच्याही ॥२८॥
नारद विलोकी करुनीयां कृपा । म्हणे, ‘तूझी नृपा ! कन्या कीं हे ! ॥२९॥
कोठें गेली होती? कोठोनी ही आली ? । सत्य श्रीची आली रुपें गुणें ॥३०॥
अहा ऊजवीलें  कां न कन्यकेला? । ईनें धन्य केला न कां कोणी ? ॥३१॥
राजा म्हणे, ‘स्वामी ! हे़ची भूमीवर । पहावया वर धाडीली म्यां ॥३२॥
आतांची आली हे सावित्री या धामीं । ईचें  वाक्य स्वामी ! आयकावें ॥३३॥
वत्से ! सांग कोण वर त्वां पाहीला ? । ऐकाया राहीला स्वस्थ मुनी’ ॥३४॥
सावित्री म्हणे, हो ! शाल्वदेशपती। द्युमत्सेन अती विख्याताहे ॥३५॥
धर्मन्यायनिष्ठ , दाता, सत्यसंध । झाला दैवें अंध वृध्दपणीं ! ॥३६॥
आलें अंधपण, पुत्र तोही बाळ । असा कष्टकाळ प्राप्त होतां ॥३७॥
शत्रूनें हरुनी राज्यभ्रष्ट केला । सस्त्रीपुत्र गेला तपोवनीं ॥३८॥
साहोनीयां वर्षा हिमा आतपाला । तो महा तपाला करीतसे ॥३९॥
त्याचा पुत्र नामें सत्यवान्‍ सुमती । वरीला तो पती भावें मनें ’ ॥४०॥
मुनी म्हणे, केलें सावित्रीनें खोटें । यांत पाप मोठें; काय सांगो ? ॥४१॥
सत्य बोलतसे द्युमत्सेन राजा । बोले त्याची भाजा तेंही सत्य ॥४२॥
स्वयेंही तो सत्य सर्वदा बोलतो । सत्वेंचि बोलतो तपोवनीं ॥४३॥
चित्रीं लिही अश्व मृत्तिकेचा घडी । हाची घडीघडी छंद त्यास ॥४४॥
म्हणोनि सत्यवान्‍ चित्राश्व हीं नावें । मुनींनीं स्वभावें ठेवीयेलीं ॥४५॥
आम्हां ठावें आहे त्याचें वृत्त सारें । आमुच्या, विचारें चूकली हे ॥४६॥
राजा म्हणे, ‘रुपें बरा आहे तो कीं ? ’ । मुनी म्हणे, ‘लोकीं तसा कैंचा ? ॥४७॥
राजा म्हणे,  ‘जाणे विद्या कळा कांहीं ?’ । मुनी म्हणे, ‘नाहीं तैसा सुज्ञ’ ॥४८॥
राजा म्हणे, शौर्य कसा असे बोला? ’ । मुनी म्हणे, ‘ तोला महेंद्राशीं ! ॥४९॥
राजा म्हणे, ‘ आहे गुरुविप्रभक्त ? ’ । मुनी म्हणे,‘ व्यक्त भक्तीरस’ ॥५०॥
राजा म्हणे, ‘तरी नसेल तो दाता’ । मुनी म्हणे,  ‘हाता त्याच्या गावें’ ॥५१॥
राजा म्हणे, ‘तरी क्षमा नाहीं काय ?’ । मुनी म्हणे, हाय ! नायकों हें’ ॥५२॥
राजा म्हणे, ‘पाहे हरिहरां भेद? । तेणें तूज खेद वाटतसे ’ ॥५३॥
मुनी म्हणे, ‘शिवशिव ! हरीहरी ! त्याची फार बरी दृष्टी आहे ’ ॥५४॥
राजा म्हणे, ‘त्याच्या कोण दोष आंगा । स्पर्शलासे ? सांगा तुम्ही स्वामीं ! ॥५५॥
मुनी म्हणे, ‘गुणग्रामा ! एक थोर । दोष , चंद्रा घोर राहू जैसा ॥५६॥
त्या गुणमंदरा वर्षमात्र आयु । जातां काळवायू उन्मूळील’ ॥५७॥
राजा म्हणे, ‘तृषा हरी त्या सुसरा । सेवावें, दुसरा पहा बाई ! ’ ॥५८॥
सावित्री म्हणे, जो वरीला मीं मनें । तोची गुरुजनें द्यावा मज ॥५९॥
तो सत्यवान्‍ सत्य पती हो कल्पायू ।  किंवा हो अल्पायू; अन्य पीता ॥६०॥
त्यालाची वरील तुमची हे कन्या ।तुम्हांसम अन्या पाहातसे’ ॥६१॥
मुनी म्हणे, ‘राया ! स्थीरबुध्दी कन्या । हे सावित्री कन्या निश्चयाची ॥६२॥
सत्यवंता ऐसा गुणी नाहीं कोणी । पाहीली म्यां क्षोणी विचारुनी ॥६३॥
चित्राश्वा कारणें द्यावें कन्यादान । कांहीं अनमान करुं नको ॥६४॥
धर्मे वर्ते त्याचा ईश्वर कैवारी । सर्वानर्थ वारी धार्मिकांचे ॥६५॥
तुम्हां समस्तांचें  कल्याण असावें । जातों मीं, बसावें स्वस्थ तुवां’ ॥६६॥
ऐसें बोलोनी तो मुनी स्वर्गा जाय । गेला तोही राय तपोवना ॥६७॥
द्युमत्सेन भेटे; म्हणे अश्वपती । ‘ तुझ्या पुत्राप्रती कन्या देतो ’ ॥६८॥
द्युमत्सेन म्हणे, ‘आमुची हे गती । अन्य क्षितीपती काय थोडे?  ॥६९॥
तुझी एकूलती कन्या भाग्यवती । सुखोचिता अती सुकूमारी ॥७०॥
नाहीं सुगंध, राज्यभ्रष्ट, अंध । अशाशीं संबंध कां रुचला ? ’ ॥७१॥
अश्वपती म्हणे, ‘सत्यशीलधन ।  हेंचि सुज्ञजन इच्छितात ॥७२॥
संकटाला भीऊं नये सत्वरतें । जातें सत्वर तें सोडूनीयां ॥७३॥
निश्चयें घेऊनी आलों कन्यकेला । अर्थी धन्य केला पाहिजे हो ! ’ ॥७४॥
द्युमत्सेन म्हणे, ‘अतिथी तूं पूर्ण । तुझा काम पूर्ण करावाचि ’ ॥७५॥
पाचारीले त्यांहीं सर्व तपोनीधी । लग्र यथाविधी संपादीलें ॥७६॥
परमार्थदृष्टी हिमालयापरी । कन्यादान करी अश्वपती ॥७७॥
कन्या निरखीतां  पडे महीवर । राया गहींवर आवरेना ७८॥
सावित्री पित्याच्या नेत्रांतें पदरें । पुसूनी आदरें समजावी ॥७९॥
घेऊनी निरोप निघे अश्वपती । ती सावित्री सती स्वस्थ राहे ॥८०॥
हर्षली पावोनी जशी सती भर्गा । वनाहुनी स्वर्गा तुच्छ मानी ॥८१॥
तशीच सावित्री आनंदली मनीं । क्रीडे तपोवनीं पतीसंगें ॥८२॥
वांटी बहु स्वल्प वस्त्र नग ठेवी । वल्कलें ती देवी सुखें नेसे ॥८३॥
श्वशुराची आज्ञा जशीच वेदाची । तीळही भेदाची बुध्दी नाहीं ॥८४॥
कुळदेवताचि ती श्वश्रू मानीली । पूजीली, वानीली सावित्रीनें ॥८५॥
केवळ अतिथी अभ्यासगत बाळ । करी प्रतीपाळ माता सती ॥८६॥
मानीयला शाकफळमूळकंद । रसाहुनि मंद सुधारस ॥८७॥
बोलावें सस्मित, मृदु , परिमीत । सत्य , प्रिय, हित, बोलवील्या ॥८८॥
सर्वाच्या मागूनी तृणशय्येवरी । सुखें निद्रा, करी ऊठे आधीं ॥८९॥
एकांतीं पतीचें हॄदय रमवी । संताप शमवी सेवाधर्मे ॥९०॥
न पडे विसर मुनीच्या शब्दाचा । अवघी अब्दाचा सदा मोजी ॥९१॥
जसा तो अवधी होय देह ऊणा । नित्य ताप दूणा साबित्रीचा ॥९२॥
उरले दिवस अवधीचे चार । व्रताचा विचार करी मनीं ॥९३॥
उपोषण तीन दिवस करावें । शेवटीं मरावें पतीसह ॥९४॥
त्रिदिनव्रताचा संकल्प करुनी । बैसली धरुनी नियमातें ॥९५॥
दु:ख पावे राजा तीच्या त्या निश्चयें । आहारार्थ स्वयें असें प्रार्थी ॥९६॥
म्हणे, ‘बाई ! मज अंधाकडे पाहें । उपोषण कां हें आरंभीलें ? ॥९७॥
मुली ! हा उपास तिसरा कीं आहा ! । कां हे कष्ट महा करितीस ? ॥९८॥
गुर्वाज्ञापालनव्रत कुलीनेतें । बाईं मुली ! नेतें सुखें स्वर्गा’ ॥९९॥
सावित्री म्हणे, ‘जी ! नको होऊं श्रमी । उद्यां व्रतास मी उजवीन ॥१००॥
कळेल करीतें व्रत ज्याकारणें । करीन पारणें उद्यां याचे’ ॥१०१॥
राजा म्हणे, ‘तरी घडो हें अव्यंग । कोणी व्रतभंग करुं नये ॥१०२॥
न भोगीतां अशी संतापतीव्रता । संतां पतिव्रता सदा मान्या’ ॥१०३॥
ऐसें सांगोनीयां हीत,ऊगा राहे । राजा वाट पाहे उदयाची ॥१०४॥
चवथे दीवशीं प्रात:काळीं सती । समाप्त व्रत ती करी भावें ॥१०५॥
नमस्कारी श्वश्रूश्वशुरचरणा। पतीच्या मरणा चुकवाया ॥१०६॥
म्हणती, ‘सौभाग्यवती पुत्रवती । चिरकाळ  पतीसह नांदें’ ॥१०७॥
ऐसेंच म्हणती तपोधन मुनी । मागतां नमूनी आशीर्वाद ॥१०८॥
आशीर्वादवर गुरुंचे साधिलें । पदरीं बांधिले सावित्रीनें ॥१०९॥
आली तपोधन करुनी प्रणती । वडील म्हणती, ‘भुक्ती करीं ’ ॥११०॥
विनवी जोनीनी हात त्याकारणें, । ‘करीन पारणें अस्तमानीं’ ॥१११॥
मनींच सावित्री वाहे काळजीला । दिसे काळ जीला क्षणक्षणां ॥११२॥
सत्यवंत स्कंधीं परशू वाहोनी । स्त्रीकडे पाहोनी वना निघे ॥११३॥
सावित्री म्हणे, ‘जी ! मी येत्यें वनाला । वियोग मनाला न सोसवे’ ॥११४॥
तो म्हणे, ‘त्वां केलीं उपोषणें तीन । झाला शक्तिहीन देह तूझा ॥११५॥
वर्णावीं पावलें तुझीं नवनीतें ! । गमन वनीं तें कठीनांचें ॥११६॥
सुखद नव्हे तें दु:खद कानन । म्हणसी कां न ‘न’ आतां येतो’ ॥११७॥
सती म्हणे, ‘मज दु:खांतचि सूख । तुमचें श्रीमूख विलोकीतां ॥११८॥
स्वामीसंगें मज न बाधेल ताप । जसा भवताप संतसंगें’ ॥११९॥
सत्यवंत म्हणे ,‘कांते ! न रुसावें । तुवां हें पुसावें वडीलांस’ ॥१२०॥
सासूसासर्‍यांते म्हणे, ‘न कोपावें । मज हें ओपावें वरदान ॥१२१॥
फळें आणावया जातांना वनांत । माझ्याही मनांत वाटे जावें ॥१२२॥
वर्षं झालें आल्या सोडूनी माहेर । आश्रमाबाहेर गेल्यें नाहीं ॥१२३॥
स्वामीसमागमें, तपस्वी शरण्य । पाहेन अरव्य, आज्ञा द्यावी’ ॥१२४॥
राजा म्हणे, ‘बाई ! वर्षांत त्वां कांहीं । मागीतलें नाहीं आम्हांपाशीं ॥१२५॥
वन पाहावया आज्ञा मागतीस । पायां लागतीस तरी जावें ॥१२६॥
वत्सा ! उपवासी सुकुमारी बाळा । शीघ्र या, सांभाळा अन्योन्यांतें’ ॥१२७॥
वंदूनीयां सती निघे झडकरी ।धैर्यें धड करी हॄदयातें ॥१२८॥
पुष्पीत फलीत तरु, मृग पक्षी । वनांतरीं लक्षी राजकन्या ॥१२९॥
पतीच्या सुखार्थ बळें आणी हास्य अ। मयूराचें लास्य विलोकूनी ॥१३०॥
विनोदवचनें पतीतें डोलवी । दाटूनी बोलवी पुण्यकथा ॥१३१॥
एके नेत्रें प्रिया, एके नेत्रें काळा । पाहे राजबाळा हृष्टा, भीता ॥१३२॥
चित्राश्व वेंचूनी फळें पात्र भरी । मग काष्ठावरी घाव घाली ॥१३३॥
शक्तीहूनी बहु घडतां आयास । तयाच्या कायास धर्म आला ॥१३४॥
कठीणा काष्ठाच्या करीतां भेदना । उठली वेदना शिरीं भारी ॥१३५॥
म्हणे, ‘प्रिये ! शूळ ऊठला मस्तकीं’ । धांवूनी हस्तकीं साध्वी धरी ॥१३६॥
म्हणे, ‘कधी झाला ऐसा खेद नाहीं । शिरोवेदनांहीं धैर्य गेलें ॥१३७॥
जाणों शूलाघातें मस्तक फाटतें । मनांत वाटतें निजावेंसें ’ ॥१३८॥
पतीच्या मस्तकाखालीं घाली मांडी । जाणों  ऊशी मांडी कुसुमांची ! ॥१३९॥
धरुनी मस्तक मनीं म्हणे बाळा । ‘आला ठोकताळा भविष्याचा’ ॥१४०॥
तों पुरुष पाशहस्त उभा आहे । असें साध्वी पाहे पुण्यबळें ॥१४१॥
रक्तनेत्र कृष्णवर्ण तेजें अर्क । काळ असा तर्क मनीं केला ॥१४२॥
हळूचि मस्तक उतरुनी ठेवी । उठोनी ती देवी हात जोडी ॥१४३॥
म्हणे, बा ! तूं देव, काय तूझें नाम? ।कोण कार्य काम मज सांग? ’ ॥१४४॥
काळ म्हणे, ‘शुध्दा म्हणानीच तूज । सांगतों मी गूज पतिव्रते ! ॥१४५॥
करीता जीवाची प्राणहानी यम । जाण हा नियम व्रतसिध्दे ! ॥१४६॥
सरलें आयुष्य नियत, मान्या या । प्रियतमा न्याया तुझ्या आलों’ ॥१४७॥
पतिव्रता म्हणे, ‘दूत कीं  येतात । जीवाला नेतात तुजकडे ॥१४८॥
स्वयें कां आलास ? काय केले दूत? ।  प्रभूस प्रभूस श्रम झाला’ ॥१४९॥
यम म्हणे, ‘पितृभक्त सत्यवंत । यासी सर्व संत मानवती ॥१५०॥
कोणी रुपें गुणॆं नाहीं असा मान्य । सत्य असामान्य सत्यवंत ॥१५१॥
दूत कैसा धाडूं न्यावया अशाला? । रक्षाया यशाला स्वयें आलों ॥१५२॥
ऐसें बोलोनीयां तो देव कीनाश । घालोनीयां पाश बळें ओढी ॥१५३॥
पुरुषासी राजा काढी गेहांतूनी । तसा देहांतूनी काढीयेला ॥१५४॥
पुरुष काढीतं अंगुष्ठप्रमाण । निष्प्रभ निष्प्राण देह झाला ॥१५५॥
पाशांनीं बांधोनी सूक्ष्मपुरुषाला । घेऊनी निघाला धर्मराज ॥१५६॥
यापरी हॊऊनी कृतकार्य काळ । निघाला तत्काळ दक्षिणेला ॥१५७॥
त्यामागूनी साध्वी तशीच निघालीं । न तीच्या रिघाली मनीं शंका ॥१५८॥
सतीव्रतें तीच्या अंगा सिध्दी आली । आकाशांत झाली गती प्राप्त ॥१५९॥
करी मनुष्यत्वापासूनी सुटका । जड, ही गुटका न कां धर्म ? ॥१६०॥
यम म्हणे, ‘ दूरपावीत आलीस । सावित्री ! झालीस उतराई ॥१६१॥
जा, उत्तम लोक प्राप्त व्हाया प्रिया । करीं सांग क्रिया यथाशक्ती’ ॥१६२॥
सावित्री म्हणे, गा ! देहासवें छाया । जशी तशी जायां पतीसवें ॥१६३॥
प्राण जाऊं द्यावे, पती न सोडावा। स्वधर्म जोडावा मुख्य हाची ॥१६४॥
गुरुंच्या, तुझ्याही प्रसादें आजी या । गतीला माझीया विघ्र नाहीं ॥१६५॥
सात पदें गांठी जरी मार्गी पडे । तरी मैत्री घडे सज्जनाशीं ॥१६६॥
या न्यायें तूजशी सख्य झालें वाटे । दोघें एके वाटे चालतसों ॥१६७॥
तुजशीं बोलत्यें कांहीं मित्रभावें । तें त्वां आयकावें धर्मराजा ! ॥१६८॥
इंद्रियें जिंकील्याविना केलें कर्म । त्यासी संत धर्म न म्हणती ॥१६९॥
गृहस्थाश्रमांत सर्व धर्म घडे । तेणें मळ झडे अंतरींचा ॥१७०॥
विषयवासनामळ जातां, ज्ञान । होय समाधान आत्मलाभें ॥१७१॥
गृहस्थाला सोपें न तसें अन्यास । न लागे संन्यास ज्ञानासाठीं ॥१७२॥
असें म्यां ऐकिलें ऐसेंच कीं बा । हें । विचारुनी पाहें धर्मराज !’ ॥१७३॥
धर्म म्हणे, ‘बाई ! मदालसा धन्या । कीं तूं, नसे अन्या आढळली ॥१७४॥
रोमांच माझिया देहीं उभारती । तुझी सुभारती आकर्णितां ॥१७५॥
पतीविना देतों  एक वर, मागें । जा फिरोनी मागे, भागलीस’ ॥१७६॥
साध्वी म्हणे, ‘देसी जरी आज वर । तारीं राजवर द्युमत्सेन ॥१७७॥
त्याचें  अंधपण, वृध्दापण जावें । गेलें तेज यावें  अनायासें ॥१७८॥
यम म्हणे, ‘हें म्यां दिलें महाभागे ! । परतोनी जा गे ! भागलीस’ ॥१७९॥
साध्वी म्हणे,  ‘मला कांहीं नाही श्रम । पतीसमागम सुखमय ॥१८०॥
दुर्लभ सत्संग दैवें प्राप्त जाला । सत्संगानें धाला नाहीं कोण? ॥१८१॥
सत्संग दीना श्री वना दे वसंत । धना देव, संत ज्ञाना देती ॥१८२॥
सत्संग दुर्लभ, कामप्राप्तिहेतु । सत्संग हा सेतू भवार्णवीं ’ ॥१८३॥
यम म्हणे, बाई ! तुझी दिव्य दृष्टी। अमृताची वृष्टी तुवां केली ॥१८४॥
बोलतीस तैसें श्रुतींनें बोलावें । ऐकतां डोलावें जडांनींही ॥१८५॥
वेधीला बाई ! बोल तुझा । पतीविना दूजा वर मागें’ ॥१८६॥
पतिव्रता म्हणे, ‘स्वराज्या आसरा । हो माझा सासराअ द्युमत्सेन ॥१८७॥
कोणाही निमित्तें स्वधर्मातें जोडूं । सज्जनाच्या जोडूं प्रसादातें ॥१८८॥
धर्म म्हणे, ‘दिलें जा बाई ! आश्रमा । त्वत्तनू या श्रमा योग्य नव्हे ॥१८९॥
सावित्री म्हणे, ‘जे ज्ञानातें जोडिती । न तयां सोडिती तुझे पाश ॥१९०॥
नरकीं जीवास भोगवीसी ताप । केलें असे पाप ज्यांहीं जैसें ॥१९१॥
त्वां पापी सर्वही निरयास नेला । यातना तयाला भोगावया ॥१९२॥
शुध्द, पूरवूनी काम, सभाजीला । तामस भाजीला कुभीपाकीं ॥१९३॥
जो द्रोह न करी कोणाही भूताचा । त्या तुझ्या दूतांचा धाक नाहीं ॥१९४॥
जो कोणी सर्वत्र करी अनुग्रहा । त्यासी अनुग्र हा तुझा देह ॥१९५॥
सर्वत्र अद्रोह, अनुग्रह, दान । हें त्रय निधान कल्याणाचें ॥१९६॥
संतांच्या ठायीं हें धर्मत्रय वसे । इतरत्र नसे क्षणमात्र ॥१९७॥
संतांसी जो आला शत्रुही शरण । तयासी मरण न ते देती ॥१९८॥
सर्वाही संतांत मुख्य तूं बा ! धर्म । तुझें पुण्यकर्म काय वर्णू? ॥१९९॥
यम म्हणे, ‘जशी तान्हेल्यासी सुधा । तुझी वाणी बुधा मज तशी ॥२००॥
पतीविना इष्ट वर माग तीजा । पर मागती जा, श्रमीं न हो ! ’ ॥२०१॥
सती म्हणे, ‘ताता दे औरस शत । पुत्र धर्मरत, वंशकर’ ॥२०२॥
यम म्हणे, ‘शुचिव्रतारंभरते ! भ्राते शंभर ते पहाशील ॥२०३॥
स्वस्थान जा शीघ्र, दूर तूं आलीस । श्रमी कीं झालीस बाढ वेळ’ ॥२०४॥
साध्वी म्हणे,  ‘आहे पतीसंनिधान । अती सन्निधान सुखाचें हें ॥२०५॥
तुझा उत्पादक, विश्व भासवीता । देव हा सवीता जगदात्मा ॥२०६॥
अत्यंत हीत तूं सम, पुण्यकाम । सत्य तुझें नाम धर्मराज ॥२०७॥
फळतो दगड धरिता विश्वास । हें आहे विश्वास अवगत ॥२०८॥
मग संतीं दृढ ठेऊनी विश्वास । सोडील नि:श्वास उष्ण कोणीं? ’ ॥२०९॥
यम म्हणे, ‘बाई ! धन्या तूं सुशीला । आलीस कुशीला जीच्या तीही ॥२१०॥
दिलें त्वां सूख हें वर्णवे दान न । वर्ण वेदानन व्यालें असे ॥२११॥
तुझ्या शब्दामृता तृप्तीच्या हेतुल्का । प्राशून, हे तुला कर्ण गाती ॥२१२॥
पतीविना वर मागें चवथा, न । मागें चव थान ठेवी पानीं ॥२१३॥
ती सती मुरली गाय कृष्णसार । काय कृष्णसार यमधर्म ॥२१४॥
‘चित्राश्वाची जाया योग्य पुत्रशत । पावो सतीव्रत स्वस्थ राहो’ ॥२१५॥
म्हणे दिले पुत्र शंभर हीताचें । दंभरहीताचे धर्म जैसे ॥२१६॥
आतां तरी बाई सावित्री ! परतें । भूमीला भर ते झालें शव ’ ॥२१७॥
साध्वी म्हणे , ‘देवा ! जी धर्मसंतती । इच्छिती संत ती धर्मासाठीं ॥२१८॥
संताची शाश्वत धर्मी चित्तवृत्ती । अधर्मीं प्रवृत्ती स्वप्रीं नसे ॥२१९॥
संतांची संसारनदीनौका कथा । त्या संतासी व्यथा कासयाची ? ॥२२०॥
साधू संतगंगायमुनांचे ओघ । हा संगम मोघ कधीं नाहीं ॥२२१॥
संतांपासुनीयां संतां भय झालें । असें काना आलें नाहीं कधीं ॥२२२॥
संत चालवीती सत्यें तरणीतें । तपें धरणीतें धरिताती ॥२२३॥
किंबहुना संत सर्वाचीही गती । संत मुक्तीपती, संत ज्ञान ॥२२४॥
व्रत चालवीं तें एक संतराय । नामें अंतराय जाती दूर ॥२२५॥
प्रसाद शाश्वत, अर्थ,क बहूमान । यांचें मूलस्थान संत तुम्ही’ ॥२२६॥
यम म्हणे, ‘वाणी नव्हे बोलकी ती । बाई ! बोल कीती तुझे वर्णूं ॥२२७॥
तुज वर्णावया नाहीं मज शक्ती । तुझे ठायीं भक्ती माझी झाली ॥२२८॥
पांचवा अद्भुत वर महाभागे ! । माग न हा भागे वर देता’ ॥२२९॥
सावित्री म्हणे, ‘बा देवा ! वरदान । तुझें वरदा ! न व्यर्थ व्हावें ॥२३०॥
स्वसत्य सांभाळा, मत्पती वांचवा । द्या वर पांचवा हाची मज ॥२३१॥
स्वर्गीं भाग्यसुख, शतपुत्र , जीणें । नको पतीविणें मज देवा ! ॥२३२॥
वांचवावा माझा भर्ता सत्यवंत । देवा ! सत्यवंत त्वांही व्हावें ॥२३३॥
शतपुत्रवर दयेनें देऊनी । परतीला घेऊनी कसा जासी? ’ ॥२३४॥
धर्म म्हणे, ‘बाई ! प्रताप हा भला । जिंकीलें त्वां मला पतिव्रते ! ॥२३५॥
मार्कडेया जशी तारी शंभुभक्ती । तशी तुझी शक्ती सत्यवंता ॥२३६॥
बाई ! म्यां तूझा हा भर्ता केला मुक्त । याशीं तूं हो युक्त चिरकाळ ॥२३७॥
पतीसह राज्य चार शत वर्षे । करीशील हर्षे धर्मन्यायें ॥२३८॥
षड्रिपु होतील नत पतिव्रते ! । न तप तीव्र ते साहतील’ ॥२३९॥
ऐसें सांगोनी तो गुप्त झाला धर्म । प्रकटलें शर्म सतीमनीं ॥२४०॥
आली जेथें होतें वनीं कलेवर । मनीं केले वर चमत्कार ॥२४१॥
बैसे घेऊनी तें शिर मांडीवर । चिर मांडी वरशुश्रूषा ती ॥२४२॥
संज्ञा पावोनी तो उघडी नयन । करुनी शयन उठलासा ॥२४३॥
वाटे जाऊनी तो आला परदेशा । सती वरदेशा मनीं वंदी ॥२४४॥
पदरें पुसूनी मुख, घाली वारा । जपे सती दारा मातेपरी ॥२४५॥
म्हणे, ‘कांते ! तूज चिर भागाविलें । कां न जागवीलें तुवां मज? ॥२४६॥
पुरुष ओढीत होता मज श्याम । तों कोठें ? तन्नाम काय सांग? ॥२४७॥
पाहीला स्वप्रीं, कीं सत्य तो देखीला ? । म्यां मनीं लेखीला सत्य काळ’ ॥२४८॥
सावित्री म्हणे,  ‘तो पापपुण्यकर्म । फळदाता धर्मराज देव ॥२४९॥
गेला स्वस्थानाला, आम्ही जाऊं चला । तुम्ही न ऊचला भार कांहीं ॥२५०॥
रात्र झाली, गुरु चिंतेला वाहात । वाटेला पाहात असतील’ ॥२५१॥
‘निजलों त्वदंकीं बहू घोरत मी । तसा घोर तमीं देखीला तो २५२॥
स्वप्र कीं सत्य हें कसें काय सांग? । आठवीतां अंग थरारतें’ ॥२५३॥
साध्वी म्हणे, ‘तुम्हीं न धरावी व्यथा । सांगेन हे कथा उद्यां सारी’ ॥२५४॥
सत्यवंत म्हणे, ‘अंधकार दाट । वनीं कशी वाट सांपडेल ?’ ॥२५५॥
सती म्हणे, ‘शुष्क वृक्षीं तो दहन । दीसतो, गहन प्रकाशी तो ॥२५६॥
उपाय दीसाया वाट भली तमीं । चला, अलात मीं हातीं घेतें ॥२५७॥
अधवा नसेल शक्ती तरी राहूं । प्रात:काळीं पाहूं गुरुंप्रती’ ॥२५८॥
सत्यवंत म्हणे, ‘वृध्द मायबाप । पावतील ताप वियोगानें ॥२५९॥
घडींत शतदां मज स्मरतील । शोकें मरतील नि:संदेह ॥२६०॥
मी शोकें हा प्राण सोडीन हें जाण । सत्य तुझी आण वाहातसें’ ॥२६१॥
ऐसें म्हणोनी तो पितृभक्त रडे । सत्यवंत पडे स्त्रीच्या गळां ॥२६२॥
सावित्री म्हणे, ‘म्यां  स्वधर्म जोडीला । असले सोडीला दुष्टमार्ग ॥२६३॥
तरी त्यासी सुखें भेटी घडो । संकट न पडो कोणा काहीं’ ॥२६४॥
सत्यवंत म्हणे, ‘कसें तरी करीं । सावित्री ! उध्दरीं दु:खांतूनी’ ॥२६५॥
उठोनी प्रथम स्वकेश सांवरी । सावित्री त्यावरी सत्यवंता ॥२६६॥
चित्राश्व तो तीच्या बळें उभा राहे । पात्राकडे पाहे फळांच्या तो ॥२६७॥
सती म्हणे, ‘येव्हां वृक्षीं राहो पात्र । परशु हा मात्र मीच्स घेत्यें ॥२६८॥
जेणें सर्प शुंडाकार तो तोडावा । पतीचा तो डावा रम्य बाहू ॥२६९॥
वाहे वामस्कंधीं आपुल्या तरी सती । स्वदक्षानें पती आलिंगूनी ॥२७०॥
निघालीं तों वनीं चंद्रिका दीवटी । होऊनी, नीवटी अंधकारा ॥२७१॥
एरीकडे, आली द्युमत्सेना दृष्टी । दीसे सर्व सृष्टी यथापूर्व ॥२७२॥
गेलें अंधपण नुमजला तो हें । झाला पुत्रमोहें पुन्हां अंध ! ॥२७३॥
भार्येसह नृपें सर्वांही ऋषीतें। पुशीलें, ऋषी ते जसें पाणी ॥२७४॥
शोधूनी सस्त्रीक भूप तो रडला । मूर्च्छीत पडला पुत्रशोकें ॥२७५॥
करीती विलाप जेव्हां ते दंपती । समाधी संपती ब्राह्मणांचे ॥२७६॥
मिळाले पावोनी ताप, सखेद हा । तापस, खेद हा निवाराया ॥२७७॥
स्त्रीसह तो राजा आश्रमांत नेला । त्यांहीं बोध केला परोपरी ॥२७८॥
सुवर्चा, गौतम, दाल्भ्य, मुनीराज । धौम्य, भरव्दाज, आपस्तंब ॥२७९॥
म्हणती, ‘संताप हा जाईल क्षणे । उत्तम लक्षणें सावित्रीचीं ॥२८०॥
सुचविते दृष्टि लाभ, महोदया । ऐसा अहो ! दया देवाची हे ॥२८१॥
धरीं ब्राह्मणाच्या वचनीं विश्वास । बा ! उष्ण नि:श्वास सोडूं नको’ ॥२८२॥
ऐसें जो बोले ती मंडळी, मावली । तों साध्वी पावली पतीसह ॥२८३॥
भूपाहूनी बहू ब्राह्मण हर्षले ।  मेघसे वर्षले आशीर्वादें ॥२८४॥
राजासी म्हणती,  ‘आलें कीं प्रत्यया ।बोलतो सत्य  या मुखें वेद’ ॥२८५॥
पुसती, ‘वत्सा ! कां विलंब लागला ? । नृपाळ भागला चिंताभारें’ ॥२८६॥
‘शिरीं बाधा झाली फोडीतां  लांकडें । निजलों, सांकडें पडलें हें ॥२८७॥
नाहीं जागवीलें ईनें घोर तमीं । सुखें घोरत मी नीजलोंच’ ॥२८८॥
गौतम म्हणे, ‘बा ! बोलिलासी खरें । परी तत्व बरें  नेणसी तूं ॥२८९॥
अकस्मात्‍  दृष्टीचा लाभ असा अंधा । राया सत्यसंधा द्युमत्सेना ॥२९०॥
सावित्री बाई ! तूं....... ।.........................’ २९१॥
ती सती तें सर्व वृत्त आयकवी । तेव्हां काय कवी विसरले ॥२९२॥
करिती ते बंदीसम स्तव मुनी । समस्त वमूनी मानविष ॥२९३॥
‘अश्वपतीकन्या सावित्री हे धन्या । अशी नाहीं अन्या पतिव्रता ॥२९४॥
सावित्रीनें दोनी कुळें उध्दरिलीं । कीर्तीनें हरीलीं पापदु:खें’ ॥२९५॥
स्तवूनी, पुसोनी, मनांत नमूनी । सनातन मुनी स्थळा गेले ॥२९६॥
प्रात:काळीं प्रजा येऊनी प्रणती । करुनी म्हणती द्युमत्सेना ॥२९७॥
‘तुमच्या प्रधानें मारिला अराती । सनाथा करा ती राजधानी ॥२९८॥
न्यावयासी आलें चतुरंग सैन्य । शत्रुपक्षीं दैन्यदु:ख गेलें’  ॥२९९॥
गौतमादि सर्व तपोधन वंदी । प्रेमें होय बंदी द्युमत्सेन ॥३००॥
करी मुक्तकरीसम स्तवनातें । समस्त वनातें प्रदक्षिणा ॥३०१॥
बैसे राजपदीं होय पूर्णकाम । तो जसा श्रीराम अयोध्येंत ॥३०२॥
सावित्रीची कथा सज्जनांसी तशी । मयूरास जशी मेघमाला ॥३०३॥
सावित्रीच्या कथा गातील ज्या स्त्रिया । होतील त्या प्रिया बहू मान्या ॥३०४॥
‘सावित्री’ ‘सावित्री’ असें जे म्हणती । कल्याणा गणती नाहीं त्यांच्या ॥३०५॥
सावित्रीस्मरण, सावित्रीपूजन । सावित्रीकीर्तन सत्यसार ॥३०६॥
पतिव्रता तरे, पतिव्रता तारी । पतिव्रता नारी जगदंबा ॥३०७॥
॥ श्रीकृष्णार्पमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP