राजोवाच - अजातशत्रोस्तं दृष्ट्वा राजसूयमखोदयम् । सर्वे मुमुदिरे ब्रह्मन्नृदेवा ये समागताः ॥१॥
दुर्योधनं वर्जयित्वा राजानः सर्षयः सुराः । इति श्रुतं नो भगवंस्तत्र कारणमुच्यताम् ॥२॥

राजा म्हणे जी योगीश्वरा । देखोनि धर्माच्या अध्वरा । आल्हाद समस्तां नृपवरां । चराचरांसमवेत ॥८॥
शत्रुभावना धर्मापोटीं । त्रिजगीं कोणे काळीं नुठी । यालागीं अजातशत्रु नाम सृष्टी । मुनि वाक्पुटीं वाखाणी ॥९॥
तयाचा मखेन्द्र राजसूय । ऐश्वर्यलक्ष्मीचा महोदय । देखोनि नृपांचा समुदाय । आनंदला जो मखागत ॥१०॥
एकला दुर्योधन वर्जून । सुरवर नृपवर मुनिवर पूर्ण । तोषले ऐसें वदलां वचन । यदर्थीं कारण तें सांगा ॥११॥
पाण्डवलक्ष्मी ऊर्जित मख । देखता जालें सुख । एका दुर्योधनासीच कां दुःख । हा हेतु सम्यक मज बोधा ॥१२॥
हें ऐकून नृपाचें वचन । वक्ता शुकाचार्य सर्वज्ञ । दुखवे मानसीं दुर्योधन । काय म्हणोन तें कथितो ॥१३॥

श्रीशुक उवाच - पितामहस्य ते यज्ञे राजसूये महात्मनः । बांधवाः परिचर्यायां तस्यासन्प्रेमबंधनाः ॥३॥

न सांगतां सविस्तर । नोहे शंकेचा परिहार । यालागीं पुढती धर्माध्वर । सिंहावलोकनें निरोपी ॥१४॥
सावध कुरुवर्या अवधारीं । तव जनकाचे जनकाजरी । कार्यें नेमिलीं पृथगाकारीं । बंधुवर्गांतें आप्तत्वें ॥१५॥
आपुले सदनींचा मखोत्सव । जाणोनि बंधूंचा समुदाव । नियमित परिचर्येतें सर्व । सप्रेमभावें प्रवर्तला ॥१६॥
कोण कार्य कोणा योग्य । हा अधिकार पाहोनि चांग । नियमिला कार्यचा नियोग । तो प्रसंग अवधारा ॥१७॥

भीमो महानसाध्यक्षो धनाध्यक्षः सुयोधनः । सहदेववस्तु पूजायां नकुलो द्रव्यसाधने ॥४॥
सतां शुश्रूषणे जिष्णुः कृष्णः पादावनेजने । परिवेषणे द्रुपदजा कर्नो दाने महामनाः ॥५॥

पाकशाळेचा अध्यक्ष । पाकशासना तुल्य दक्ष । तो भीम महानसाध्यक्ष । केला मुख्य लक्षूनी ॥१८॥
सूपशास्त्रीं परम कुशळ । पुण्यश्लोक नैषध नळ । तैसा मध्यम कुन्तीबाळ । निर्जरपाळसमतेचा ॥१९॥
किंवा पावक पाकप्रवीण । किम्वा रसज्ञ जैसा वरुण । पाकक्रियाविचक्षण । तो भीम स्थापिला महानसीं ॥२०॥
पाकक्रियाप्रवीणदूत । धर्माज्ञेनें शतानुशत । भीमापासीं अतंद्रित । परमसंयुक्त ओळंगती ॥२१॥
कौरवांमाजि प्रभु वरिष्ठ । जो दुर्योधन मानें श्रेष्ठ । तो धनाध्यक्ष केला स्पष्ट । परम दुष्ट असहिष्णु ॥२२॥
भूमंडळींचे सर्व नृपंती । उपायनें जीं घेऊनि येती । अर्पूनि दुर्योधनाप्रती । लेख लिहिती ते सर्व ॥२३॥
दुर्योधन पाहूनि नयनीं । कोशभाण्डार निक्षेपसदनीं । निक्षेपवी आज्ञापूनी । सेवकांलागूनि तन्निष्ठ ॥२४॥
हेमललामें नाना वस्त्र । गजाश्व जवीन मारुतजनित । दास दासी संख्येरहित । देखोनि हृदयांत जळे दुःखें ॥२५॥
शस्त्रें वस्त्रें पात्रें नाना । धान्यें षड्रसपूर्णभाजना । केशर कस्तूरी दिव्य चंदना । पशुगोधना रथशिबिका ॥२६॥
रत्नखचित विचित्र भूषा । भरूनि अर्पिती नृप मंजूषा । देखूनि दुर्योधन मानसा । माजी कोळसा होतसे ॥२७॥
ऊर्जित लक्ष्मी पाण्डवां घरीं । ऐसी नायकों नृपनिर्जरीं । येथूनि बळिष्ठ जाले वैरी । कोणे परी हे आकळती ॥२८॥
जंव जंव देखे धनाचा यावा । तंव तंव भडका लागे जीवा । जाणोनि तयाच्या अंतर्भावा । कार्यगौरवा प्रतिष्ठिलें ॥२९॥
पूजासामग्री घेऊनि सकळी । धर्मराजाचे आज्ञेतळीं । सहदेव सर्वदा तिष्ठे जवळी । सेवकमंदळीसमवेत ॥३०॥
यज्ञद्रव्यें पूजाद्रव्यें । अन्य जें सदस्यां नृपां सेव्यें । पाकप्रयोजनार्ह दिव्यें । ऐक्षवें गव्यें रसरूपें ॥३१॥
तयां द्रव्यांच्या साधनीं । नकुळ केला अग्रगणी । शतानुशत सेवकजनीं । सावधान सर्वदा ॥३२॥
पाकशाळेमाजी जें जें । भीमें आणविजती ओजें । तें तें द्रव्यें माद्रीतनुजें । समर्पिजती तत्काळ ॥३३॥
धौम्याचिये आज्ञावचनीं । होमद्रव्यें ते ते क्षणीं । अर्पी अविलंबेंकरूनी । मानस लक्षूनि वर्ततसे ॥३४॥
पूजाद्रव्यें जिष्णूकडे । कीं धर्म आज्ञापी जें जें तोडें । तें तें अर्पी वाडेकोडें । सावध चहूंकडे माद्रेय ॥३५॥
सदस्य अथवा सर्व नृपती । उपचारद्रव्यें जियें मागती । तें तें अर्पीं तयांप्रती । सावधवृत्ती सर्वत्र ॥३६॥
हय गज वृष गो क्रमेळ खर । इत्यादि पशुगण जो समग्र । तयांसि पिण्याक तृण कण नीर । पाववी सादर होत्साता ॥३७॥
विष्णुसंमत श्रीकृष्णासी । तो संतांचे परिचर्येसी । नियोजिला सद्गुणराशी । दासदासींसमवेत ॥३८॥
देव देवर्षि ब्रह्मर्षि । राजे राजर्षि महर्षि । अपर व्रतस्थ तपोराशि । तत्सेवेसी सावध जो ॥३९॥
शतानुशत किङ्करगण । घेऊनि सर्वकाळ फाल्गुन । सत्सेवनीं सावधान । मृदुभाषणें नम्रत्वें ॥४०॥
पादप्रक्षालनाचें काज । अंगीकारी गरुडध्वज । स्वजना दावी दीक्षावोज । कल्याणबीज म्हणोनियां ॥४१॥
सर्वत्र पूजेच्या प्रकरणीं । हरि प्रवर्ते पादार्चनीं । प्रवाळवज्री धरूनि पाणीं । मृदुतर चरणी मर्दूनियां ॥४२॥
निर्मळ घालूनि गंगाजळ । मृदुळ प्रक्षाळी पदकमळ । सकलैश्वर्याचें स्थळ । जाणोनि मौळ अभिवंदी ॥४३॥
गाढालिङ्गनें हृदयीं धरी । केवळ श्रीवत्साङ्कापरी । पादावनेजन वंदी शिरीं । कल्याणकारी जाणोनी ॥४४॥
उत्तरीयपीताम्बरें । श्रीपद परिमार्जी निजकरें । महद्भाग्य हें उत्साहगजरें । निजजननिकरां प्रतिबोधी ॥४५॥
ऐसें पादावनेजनकार्य । धर्ममखीं करी यदुवर्य । पतिव्रतांमाज धुर्य । ते पाञ्चाळी परिवेषीं ॥४६॥
मुनिवरनृपंवरद्विजवरपंक्ति । सुहृदां सदस्यां ऋत्विजां प्रति । द्रौपदी वाढी ढसाळ हस्तीं । भीम निष्पत्ति अर्पीतसे ॥४७॥
शतानुशत परिवेषणीं । कुशळा सुशीळा सुवासिनी । ब्रह्मनिष्ठांच्या ब्राह्मणी । याज्ञसेनीअनुगा ज्या ॥४८॥
द्रौपदी आज्ञा करितां तोंडें । तिया वाढिती सर्वांकडे । न्यूनपूर्ण कोठें न पडे । गमे निवाडें सुरसुरभि ॥४९॥
ऐसी परिवेषणाधिकारीं । नियोजिली पाञ्चाळकुमरी । दक्षिणादानप्रकरणावसरीं । केला भास्करि अध्यक्ष ॥५०॥
वदान्य दाता कर्णासम । याचकेच्छाप्रद निःसीम । तुलने एक कल्पद्रुम । किंवा राम दशरथि ॥५१॥
परंतु पाण्डवांसीं वैर । कौरवस्नेह वाहे सधर । तया कर्णा दानाधिकार । जाणोनि उदार नेमियला ॥५२॥
सरावी शत्रूची संपत्ती । म्हणोनि वांटी उदारहस्तीं । तेणें धर्माची यश कीर्ती । झाली पसरती त्रिजगांत ॥५३॥
गान्धार देखे धनसंपदा । तों तों हृदयीं पावे खेदा । कर्ण वांटी मानूनि मोदा । सदासर्वदा सरावया ॥५४॥
अनंतहस्तें पुरवी हरी । अढळ संपदा धर्माघरीं । कर्णें वांटितां नानापरी । त्रिजगीं भरी तत्कीर्ति ॥५५॥
द्रौपदी वाढी जेव्हां पंक्ति । तेथ जे दुष्टात्मे दुर्मति । कामबाणें भ्रान्त होती । ते आंचवती ऐश्वर्या ॥५६॥
महासतीचा अभिलाष मनीं । उठतां आयुष्या होय हानी । त्रयोदशाब्दांनंतर रणीं । पाण्डवबाणीं त्यां पडणें ॥५७॥
ऐसीं हेतुगर्भितें कार्यें । भीष्मसंमतें वृष्णिधुर्यें । योजूनि दिधलीं तीं तात्पर्यें । शुकाचार्यें नृपा कथिलीं ॥५८॥
यावरी सर्वसाधारणें । सुहृदां जिवलगां कारणें । कार्यभागीं नियोजणें । त्यांचीं अभिधानें अवधारा ॥५९॥

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP