चित्रध्वजपताकाग्रैरिभेंद्रस्यंदनार्वभिः । स्वलंकृतैर्भटैर्भूपा निर्ययू रुक्ममालिनः ॥११॥
यदुसृंजकांबोजकुरुकेकयकोसलाः । कंपयंतो भुवं सैन्यैर्यजमानपुरस्सराः ॥१२॥

भूप निघाले श्रीसन्नद्ध । विचित्र ध्वजपताका विविध । इभेन्द्र सज्जिले गाळिती मद । स्यंदन सिद्ध शातकौम्भी ॥९३॥
अर्वशब्दें अश्व जवीन । सज्ज संग्रामशिक्षाप्रवीण । जे कां बळिष्ठ प्रबळ नवीन । सपल्याण सलंकृत ॥९४॥
वरी वळघले राऊत राणे । रुचिर विलसती रत्नाभरणें । कटिबंधनें अंगत्राणें । शस्त्रप्रहरणीं प्रवीण जे ॥९५॥
अग्रीं पदातियांचे निकर । सन्नद्ध बद्ध यंत्रधार । परिजिती विविध शस्त्रभार । करिती गजर सिंहरवें ॥९६॥
ध्वज गज रथ अश्व पदाति । वेष्टित पृथक भारें भूपति । कनकरत्नाभरणद्युति । तिहीं शोभती भासुर जे ॥९७॥
ऐक तयांईं नामाभिधानें । पांच सात कथिजती वदनें । तयांमाजी अपरें गौणें । श्रोतीं अनुमानें जाणावीं ॥९८॥
वृष्णिभोजान्धकयादव नृपति । सृंजयकाम्बोजादि भूपति । दुर्योधनादि कौरवपति । केकयकोसलमगधादि ॥९९॥
पूर्वीं चैद्याचिये हननीं । चैद्यपक्षींच्या भूपाळगणीं । पलायन केलें मख सांडूनी । विमुख ये क्षणीं ते झाले ॥१००॥
अपर लहान थोर जे राजे । सुकृत साधनाचिये काजें । धर्मावभृथस्नानें वोजें । पुनीत व्हावया सादर ॥१॥
ऐसिया समस्तनृपांचीं कटकें । जियें कृतान्ता गमती अटकें । यजमान वेष्टूनियां कुतुकें । निघाले तोषें स्नानार्थ ॥२॥
तिया पृथक चतुरंगिणी । निघतां भारें भू दणाणी । कंपायमान करिती अवनी । देखतां नयनें भय भेडां ॥३॥
ऐसे यजमानपुरस्सर । निघाले समस्तही नृपवर । धर्माभोंवते ऋषीश्वर । करिती गजर मंत्रांचा ॥४॥

सदस्यर्त्विग्द्विजश्रेष्ठा बह्मघोषेण भूयसा । देवर्षिपितृगंधर्वास्तुष्टुवः पुष्पवर्षिणः ॥१३॥

सदस्य म्हणिजे सभानायक । महर्षि जे कश्यपादिक । श्रेष्ठ द्विजवर योगिप्रमुख । तपरवी स्नातक व्रतनिष्ठ ॥१०५॥
ऋत्विजसहित या द्विजवरीं । भूयसा म्हणिजे बहुतां परी । वेदघोष दीर्घस्वरीं । केला तेथ ते काळीं ॥६॥
वेदपठनघोषें द्विज । स्तविते झाले तेजःपुञ्ज । पितृदेवर्षिगंधर्व सहज । पुष्पवृष्टि करिताती ॥७॥
धर्मराजाच्या अवभृथोत्सवा । पहावया उत्साह सर्वां । नागरा नरनारींचा यावा । श्रवण करावा श्रुतिरसिकीं ॥८॥

स्वलंकृता नरा नार्यो गंधस्रग्भूषणांबरैः । विलिंपंत्योऽभिषिंचंत्यो विजर्‍हु र्विविधै रसैः ॥१४॥

धर्म यज्ञशाळेबाहीर । निघतां झाला मोठा गजर । तो ऐकूनि सर्व नागर । लहान थोर निघाले ॥९॥
आणि नृपांचीं बिढागारें । तेथ जीं होतीं अंतःपुरें । दासदासी सहपरिवारें । अत्यदरें तीं आलीं ॥११०॥
वसनाभरणें विराजित । केशरचंदनतिळकाङ्कित । मलयजगंधें सुचर्चित । पुष्पहार ज्यां कंठीं ॥११॥
ऐसिया नारीनरांचें यूथ । पाहों मिनलें सालंकृत । परस्परें आनंदभरित । क्रीडती तेथ निःशंक ॥१२॥
नारीनरांचीं नवनीतगोळीं । मुखें माखिती तये काळीं । एकीं भरूनि दध्यंजळी । पुरुषां मौळीं प्रक्षेपिती ॥१३॥
पुरुष तैसेचि नारीवरी । वर्षती इक्षुरसाच्या धारीं । एक माक्षिक मधु घेऊनि करीं । वनितावक्त्रीं विलेपिती ॥१४॥
एकी एकावरी दुग्धा । सप्रेम शिंपूनि क्रीडती मुग्धा । एक ऐक्षव एक स्निग्धा । टाकिती मोदास्तव तेथ ॥११५॥
ऐसिया विविध रसरांच्या घटीं । वर्षोनि वाराङ्गनांच्या थाटी । पुरुषसमुदाय कोट्यानुकोटी । क्रीडती गोठी ते ऐका ॥१६॥

तैलगोरसगंधोदहरिद्रासाद्रकुंकुमैः । पुंभिर्लिप्ताः प्रलिंपंत्यो विजर्‍हुर्वारयोषितः ॥१५॥

चंपक मोगरे सुगंधजाती । इत्यादि तैलीं सुवासितीं । जवादि कस्तूरी कुंकुमाक्तीं । पुरुष माखिती वधूवदनें ॥१७॥
वारमुख्या ज्या कुशला तरुणी । लावण्यामृतरसतरंगिणी । पुरुषसमाजीं निःशंकपणीं । पुरुषां वदनीं विलेपिती ॥१८॥
सुगंधद्रव्यांचे कर्दम । चर्चिती नरवदना निःसीम । यूनपुरुष जे सकाम । क्रीडती सप्रेम ते तेथ ॥१९॥
वेणिका धरूनि वनितावक्त्रा । विकसित करूनि ओतिती तक्रा । जें दुर्लभ स्वर्गीं शक्रा । शतक्रतूंच्या सुकृतेंही ॥१२०॥
अहव्य जाणोनि ऋत्विजवर्गीं । पूर्वीं होमिलें नाहीं यगीं । यालागिं ऐश्वर्य भोगितां स्वर्गीं । दुर्लभ तक्र शक्रातें ॥२१॥
ऐसीं तक्रें वनितामुखीं । यून ओतितां ललना एकी । फिरूनि तद्वदनावर थुंकी । होय तो सुखी तद्योगें ॥२२॥
वनिताधरामृताचें पान । विशेष सतक्रष्ठीवन । स्वर्गसुधा मानूनि गौण । करी लेहन औत्सुक्यें ॥२३॥
एकी मलयजगंधोदकें । प्रोक्षिती यूना नरांचीं मुखें । क्रीडा शोभे परम हरिखें । वनितावदनीं शिम्पिती ते ॥२४॥
एकी हरिद्रामिश्रित जळें । प्रोक्षिती नरांचीं वदनकमळें । ते नर तरुण उताविळे । वनितामौळें प्रोक्षिती ॥१२५॥
जवादि कस्तूरी केशर प्रचुर । नववनितांचीं वदनें रुचिर । यूनां विलेपती विलासचतुर । क्रीडापर होत्साते ॥२६॥
तेणें संक्षुब्ध वाराङ्गना । तत्कर्दमीं यूनां नाना । विलेपती त्या कुरुभूषणा । विहारकाळीं उत्साहें ॥२७॥
ऐसिया नरनारी नागरा । विशेष वाराङ्गना अप्सरा । अवभृथस्थानीं क्रीडापरा । सुरनिम्नगेमाझारी ॥२८॥
यावरी नृपाच्या पट्टमहिषी । प्रमुदित होत्सात्या मानसीं । त्या क्रीडल्या तद्विलासीं । तें नृपासी शुक सांगे ॥२९॥

N/A

References : N/A
Last Updated : June 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP