अध्याय ३० वा - श्लोक १६ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


दैत्यायित्वा जहारान्यामेका कृष्णार्भभावनाम् । रिंगयामास काप्यंघ्री कर्षंती घोषनिःस्वनैः ॥१६॥

एकी गोपी नंदकुमर - । रूपें होती क्रीडापर । एकी चक्रवाताकार । गगनीं सत्वर उडविती ॥४८॥
गुरुतर सलंब कंठीं कृष्ण । होऊनि उत्पतनीं असहिष्ण । तेणें होऊनि गतप्राण । अधःपतन अनुकरती ॥४९॥
एकी कृष्णत्वें बाळभावें । रिंगणाकार घेती धांवे । चपळ जानुघर्षणा सवें । रशना नुपूरें गर्जती ॥१५०॥
घंटा किंकिणी वांकी वाळे । गर्जतां छंदें चपळ चौताळे । ऐसे कृष्णाचे बाळलीले । प्रज्ञाबळें अनुकरती ॥५१॥
चपळ पळतां जानुघर्षणीं । एकी सवेग कटिकर्षणीं । वोढूनि घेती आकर्षूनी । जाती पळोनि चपळांगी ॥५२॥

कृष्णरामायिते द्वे तु गोपायंत्यह्च काश्चन । वत्सायतीं हंति चान्या तत्रैका तु बकायतीम् ॥१७॥

एकी कृष्णाचे अनुकार । दावूनि म्हणवी नंदकिशोर । एकी म्हणवी रोहिणीकुमर । रामानुकार दावूनी ॥५३॥
कित्तेकी जालिया सवंगडे । भोंवतें कृष्णा मागें पुढें । एकी वत्सासुराचेनि पाडें । कैतवक्रीडे अनुकरती ॥५४॥
वत्सासुराचा केला वध । तैसे अनुकार दाविती विशद । एकी बकाकार प्रसिद्ध । तैशाच तद्वध अनुकरती ॥१५५॥

आहूय दूरगा यद्वत्कृष्णमनुर्कुवतीम् । वेणुं क्कणंतीं क्रीडंतीमन्याः शंसंति साध्विति ॥१८॥

धेनुरूपें दूरतरा । एकी अवगती व्रजसुंदरा । एकी वाहोनि वेणुस्वरा । घालिती कुकारा कृष्णत्वें ॥५६॥
कृष्णवेणूचिया क्कणिता । दूरस्थ धेनु तृणासक्ता । ऐकोनि धांवती जेंवि त्वरिता । तद्वत वनिता अनुकरती ॥५७॥
सप्तस्वरांचिया भंगी । वेणुक्कणितें विविधा रंगीं । दाविती कृष्णाचिया मार्गीं । अन्या चांगीं प्रशंसिती ॥५८॥
तालबद्ध मानउत्तरें । तेथ सुष्ठुत्व आविष्कारें । धन्य भला या उत्तरें । चमत्कारें शंसिती ॥५९॥

कस्यांचित्स्वभुजं न्यस्यं चलंत्याहापराननु । कृष्णेऽहं पश्यत गतिं ललितामिति तन्मनाः ॥१९॥

भूषामंडित बाहु खांदा । ठेवूनि एकीच्या एक प्रमदा । कृष्णावबोधें वदती शब्दा विन्यासभेदा दावुनी ॥१६०॥
पहा गे व्रजींच्या समस्त युवति । स्वयें कृष्ण मी माझी गति । न येचि मयूरां हंसांप्रति । लाजोनि ठाती गजगमना ॥६१॥
म्हणोनि डोलविती सुंदर आंगें । ललित पाउलें ठेविती चांगें । अमंद ना मंद वेगें । गमनें सुभगें शोभविती ॥६२॥
जेंवि शिल्पिकाचिये मती - । माजि अवतरे अव्यक्त मूर्ति । तो जेंवि आणूनि दावी व्यक्ति । नाना आकृति लेख्यादि ॥६३॥
नाना अध्वर्यूंची प्रज्ञा । तादात्म्ययोगें कवळीं यज्ञा । किंवा सांख्य समष्टिभाना । व्यतिरेकान्वयपूर्वक ॥६४॥
कीं ध्याननिष्ठांचें मानस । क्षीराब्धि श्वेतद्वीप अशेष । गुणोपकरणें भूषा वेष । पावे अभ्यासतादात्म्यें ॥१६५॥
तैशा तन्मना व्रजांगना । कृष्ण होऊनि ललितगमना । चालोनि दाविती तें तव मना । कुरुभूषणा कळलें कीं ॥६६॥

मा भैष्ट वातवर्षाभ्यां तत्त्राणं विहितं मया । इत्युक्त्वैकेन हस्तेन यतंत्युनिदधेंऽबरम् ॥२०॥

तंव एकी म्हणे बल्लववनिता । भेऊं नका हो वृष्टिवाता । मी तयाच्या निवारणार्था । आलों तत्त्वता गिरिधर ॥६७॥
निर्भय स्थान म्यां निर्मिलें । ते तुम्हीं पाहिजे आश्रयिलें । ऐसें म्हणोनि उचलिलें । शाठी वस्त्र गिरिभावें ॥६८॥
यत्नपूर्वक सत्वर । दावूनि गोवर्द्धनानुकार । लावूनियां एक कर । उत्तरीयांवर उचलिलें ॥६९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP