अध्याय ३० वा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच :- अंतर्हिते भगवति सहसैव व्रजांगनाः । अतप्यंस्तमचक्षाणाः करिण्य इव यूथपम् ॥१॥

तेंवि गोपी भगवत्संग । लाहतां मदगर्वाचा योग । अंतर्धान अंतरंग । करी श्रीरंग जाणोनि ॥२१॥
अकस्मात अंतर्धान । पावला असतां जनार्दन । गोपी विरहतापें करून । करिती गवेषण संतप्ता ॥२२॥
मधुमासींच्या मधुतर शाखा । करिणी भक्षूनि मिथुनोन्मुखा । इच्छूनि अभीष्ट मन्मथसुखा । निजनायका वेष्टिती ॥२३॥
त्यांतील जैसा यूथपति । वनीं अंतरतां विहारवृत्ति । विरहतप्ता त्या हुडकिती । तेंवि व्रजयुवति कृष्णातें ॥२४॥
शक्तिपातोत्थित जैसा शिष्य । देहादिभवभानीं वैरस्य । पावोनि अभीष्ट सामरस्य । लाहे अवश्य विनिमयता ॥२५॥
कीटकी जैसी भिंगुरटी । ध्यानतादात्म्यें तनु पालटी । तेंवि कोहंसा उफराटी । वळे उलटी सोहंते ॥२६॥
हरिसुखभुक्ता तेंवि ललना । प्रेष्ठ पावतां अंतर्धाना । वेधें करितां तीव्र ध्याना । ज्ञप्तितादात्म्यें पालटल्या ॥२७॥

गत्यानुरागस्मितविभ्रमेक्षितैर्मनोरमालापविहारविभ्रमैः ।
आक्षिप्तचित्ताः प्रमदा रमापतेस्तास्ता विचेष्टा जगृहुस्तदात्मिकाः ॥२॥

भगवंताचे पदविन्यास । लक्षितां असाम्य गमती हंस । जडतां तीव्रध्याना ध्यास । पावे मानस तन्मयता ॥२८॥
चंद्रापासूनि चकोरनयनां - । पर्यंत पीयूषरसाचा पान्हां । तेंवि इंगितेंसहित ध्याना । वेधक तनुमना अनुराग ॥२९॥
सस्निग्ध तान्हुलें आणि जननी । सकाम कामुक आणि कामिनी । गुरुशिष्यांचा अभेदभजनीं । अवंचकपणीं अनुराग ॥३०॥
सूर्यदर्शनें पद्मिनी । कां शशांकोदयीं कुमुदिनी । तैसी सानुरागनिरीक्षणीं । मिथा विकसित स्मितवक्त्रें ॥३१॥
कटाक्षविक्षेपमनोहर । सानुरागविलसपर । मधुरगायन आलाप रुचिर । क्रीडाविहार स्मरवृद्धि ॥३२॥
इत्यादि रमारमणइंगितें । हरितां व्रजरमणींचीं चित्तें । तादात्म्य पावोनि त्या चेष्टांतें । घेत्या झाल्या शिक्षितवत् ॥३३॥
वादककौशल्य वाजंतरीं । कीं बिंबींचे विकार दर्पती मुकुरीं । तेंवि तादात्म्यवेधनिर्भरीं । गोपीशरीरीं हरिचेष्टा ॥३४॥
हरितादात्म्यें हरिइंगितें । घेऊनि हरिपण आपणांतें । भावूनि विसरल्या पूर्वावस्थे । भजती स्मृतीतें कृष्णत्वें ॥३५॥
कोहं विसरोनि सोहंबोधें । प्रत्यक्चैतन्य स्वरूपवेधें । वेंठतां मिथ्यात्वें विवर्तरोधें । फावे नुसधें एकत्व ॥३६॥
तेंवि गोपिका कृष्णात्मका । कृष्णानुराग लाहतां निका । करिती तच्चेष्टा एकैका । व्रजनायका भावूनी ॥३७॥

गतिस्मितप्रेक्षणभाषणादिषु प्रियाः प्रियस्य प्रतिरूढमूर्तयः ।
असावहं त्वित्यबलास्तदात्मिका न्यवेदिषुः कृष्णविहारविभ्रमाः ॥३॥

केवळ कृष्णइंगितेंसहित । आपण होऊनि मूर्तिमंत । एकीमेकींतें सांगत । मी नंदसुत म्हणोनी ॥३८॥
कृष्णाचिये चालती चाली । कृष्णमधुरता बोलती बोलीं । कृष्णकृपेच्या न्याहाळीं । न्याहाळिती त्या तादात्म्यें ॥३९॥
हास्यवक्त्रें विभ्रमापांग । कृष्णमयचि ज्यांचें सांग । कृष्णा ऐसा स्वजनानुराग । एवं अव्यंग हरिचेष्टा ॥४०॥
ऐशा गोपी हरिम जाल्या । वेधें तनुभावा विसरल्या । पूर्वस्मृतीसी अंतरल्या । मग संचरल्या वनांतरीं ॥४१॥

गायंत्य उच्चैरमुमेव संहता विचिक्युरुन्मत्तकवद्वनाद्वनम् ।
पप्रच्छुराकाशवदंतरं बहिर्भूतेषु संतं पुरुषं वनस्पतीन् ॥४॥

कृष्णविरहें भ्रमिता अबळा । सबाह्य प्रवृत्ति मार्गीं बरळा । उचस्वरीं श्रीगोपाळा । गाती वेल्हाळा निर्लज्ज ॥४२॥
कृष्णविरहें भ्रमिताचिये परी । रात्रीं भरल्या वनांतरीं । आलापूनि उच्चस्वरीं । श्रीमुरारि हुडकिती ॥४३॥
ग्रहपिशाचभ्रमोपहत । मदिरामदें जेंवि उन्मत्त । तैशा फिरती वनाआंत । तीं चिह्नें समस्त अवधारा ॥४४॥
कृष्णा म्हणोनि उच्चस्वरीं । हाका मारिती वनान्तरीं । धांवती उन्मत्ताचिये परी । घोर कांतारीं हरिवेधें ॥४५॥
वनें लंघूनि वनाप्रति । विखुरल्या सैराटा वनीं भ्रमति । हरिगुण उच्चस्वरीं गाती । वोळखी देती नामाची ॥४६॥
ये गा अघबळसंहर्त्तिया । ये गा गोवर्धनधर्त्तया । ये गा स्वजना सुखकर्त्तया । परिहर्त्तया उपसर्गा ॥४७॥
पूतनास्तनगरप्राशनकरणा । ये गा गोपीचीरापहरणा । ये गा यमलार्जुनोद्धरणा । दुर्घटहरणा दुरितारि ॥४८॥
ये गा मुरलीवादनशीला । ये गा ललनालालनलोला । ये गा प्रमदामानसकमला । अळिउळप्राय अभिरमका ॥४९॥
ऐशा गाती अनेक परी । धुंडित होत्सात्या कांतारीं । पुसती विरुद्ध द्रुमवल्लरी । सबाह्याभ्यंतरीं नांदतया ॥५०॥
अंतर्बाह्य जैसे गगन । तैसा भूतीं जो परिपूर्ण । पुसती वनस्पतींलागून । जातां श्रीकृष्ण देखिला ॥५१॥
त्या गोपींच्या उन्मत्त रीति । स्थावरजंगमीं ज्या प्रश्नोक्ति । श्लोकनवकें वदल्या युवति । तें सावध श्रोतीं परिसिजे ॥५२॥

गोप्य ऊचु :- दृष्टो वः कच्चिदश्वत्थ प्लक्ष न्यग्रोध नो मनः । नंदसूनुगतो हृत्वा प्रेमहासावलोकनैः ॥५॥

पिंपरी म्हणिजे प्लक्षतरु । वट अश्वत्थ थोर थोर । उच्चपणें दूरद्रष्टार । म्हणोनि श्रीधर त्यां पुसती ॥५३॥
अगा अश्वत्था प्लक्षा वटा । आमुच्या चित्ताचा चोरटा । कृष्ण जातां इया वाटा । तुम्हांसि अवचटा आढळला ॥५४॥
आकर्षूनि मुरलीगानें । वनीं आणूनि सन्निधानें । प्रेमहासावलोकनें । आमुचीं मनें हरतिलीं ॥५५॥
गायनरूप घालूनि फांसा । तेणें आकर्षिलें मानसा । शस्त्रासमान विलोकहासा । प्रेरूनि मानसा चोरिलें ॥५६॥
तो आमुचा सर्वस्वहर्ता । तुम्हीं देखिला असेल जातां । झणें असेल अर्ता पर्ता । त्याची वार्ता सांगा हो ॥५७॥
ऐशा पुसोनि पुढें जाती । तंव देखिल्या पुष्पजाती । विरहाकुळा बल्लवयुवति । त्यांतें पुसती हरिवार्ता ॥५८॥

N/A

References : N/A
Last Updated : May 03, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP