न त्रास इह वः कार्यो मद्धस्ताद्रिनिपातने । वातवर्षभयेनालं तत्त्राणं विहितं हि वः ॥२१॥

तुम्हीं समस्तबल्लवगणीं । पर्वत माझिये हस्तींहुनी । पडेल ऐसी शंका मनीं । भयें त्रासूनि न धरावी ॥६३॥
करका आणि विद्युत्पात । प्रळयवृष्टि झंझावात । यांच्या भयाचे आघात । तुम्हांसि येथें न बाधिती ॥६४॥
तुमच्या रक्षणार्थचि केवळ । उचलूनि गोवर्धनाचळ । म्यां निर्मिलें निर्भय स्थळ । येथ सकळ प्रवेशा ॥१६५॥
वातवृष्टि सलिलोपळ । विदुत्पातांचे बंबाळ । इंद्रक्षोभें प्रळयकाळ । अक्षत गोकुळ मी रक्षीं ॥६६॥
आप तेज प्रळयवात । गृहपतनाचे पार्थिवाघात । भूतक्षोभें प्रलय होत । तेथ मद्भक्त मी रक्षीं ॥६७॥
गोपगोपींसह लेंकुरें । गुरें वांसुरें लहानें थोरें । आपुलीं सांभाळ  समग्रें । निर्भयप्रकारें ममाज्ञा ॥६८॥
माझे कृपेचें अभेद्य वर्म । असतां तुम्हांसि न बाधी श्रम । इंद्रें केलें दुष्कर कर्म । मी पुरुषोत्तम परिहर्ता ॥६९॥
ऐसी ऐकोनि कृष्णवाणी । बल्लव निर्भय अंतःकरणीं । पर्वत धरिला एके पाणीं । तैं पतनग्लानि सांडिली ॥१७०॥

तथा निर्विविशुर्गर्तं कृष्णाश्वासितमानसाः । यथाऽवकाशं सधनाः सव्रजाः सोपजीविनः ॥२२॥

जैसें कृष्णें आज्ञापिलें । तैसें निर्भय मानस केलें । मग समस्त प्रवेशले । गोवर्धनातळवटीं ॥७१॥
गाडे भरूनि सोपस्कर । गोपिकांशीं कुमरी कुमर । बाळंतिणी आणि स्थविर । अतिसत्वर प्रवेशती ॥७२॥
लहान थोर दासी भृत्य । ज्यां अधीन जें जें कृत्य । तत्कर्माचें उपसाहित्य । घेऊनि त्वरित प्रवेशले ॥७३॥
आश्रित पुरोहित ब्राह्मण । सूत मागध बंदिजन । आशीर्वचन स्तुति स्तवन । पठनें जीवन ज्यां व्रजीं ॥७४॥
कुलाल कर्मार रथकार । दिवाकीर्ति स्नेहकार । कारुक कैवर्तक धीवर । सव्यापार प्रवेशती ॥१७५॥
दैवज्ञ गणकि देवलक । मनुत्वष्टा मयशिल्पक । चित्रलेखक तौर्यत्रिक । नटनाटक प्रवेशले ॥७६॥
पुक्कस चांडाल श्वपाक । किरातनिषादादि चर्मक । भ्राष्ट्र माल्यक वार्धुषिक । ऐंद्रजालिक प्रवेशले ॥७७॥
व्रजाश्रयें उपजीविका - । कर्ता समुदाय होता जितुका । विविधव्यासंग विविधां लोकां । ते ते स्वसुखा प्रवेशती ॥७८॥
बल्लव चतुर्विध गोधन । आपुलालें पुरस्करून । गिरितळवटीं निवेशन । करिती स्मरोन कृष्णातें ॥७९॥
ज्यांचें जैसें ज्ञातिकुळ । त्यांसि प्रशस्त तैसें स्थळ । सर्वप्रकारें यथानुकूळ । लाहती केवळ गिरितळीं ॥१८०॥

क्षुत्तृड्व्यथां सुखापेक्षां हित्वा तैर्व्रजवासिभिः । वीक्षमाणो दधावद्रिं सप्ताहं नाचलत्पदात् ॥२३॥

जाऊनि गिरीच्या तळवटीं । बसली व्रजजनगोधनथाटीं । गिरिधररूपीं जडल्या दृष्टि । पडली गांठी स्वानंदीं ॥८१॥
क्षुधेतृषेची व्यथा परम । विषयसुखाचा अपेक्षाकाम । सांडूनि तटस्थ इंद्रियग्राम । मेघःश्याम निरखिती ॥८२॥
एके हस्तीं धरिला अचळ । अपर हस्त अभयशील । पाहतां तटस्थ व्रजजन सकळ । सुखकल्लोळ भोगिती ॥८३॥
कृष्णलक्षीं जडल्या दृष्टि । तटस्थ ठेल्या शरीरयष्टि । नाठवे क्षुधेतृषेची गोष्टी । सुखसंतुष्टीमाजिवडी ॥८४॥
जैसें पर्वतगर्भींचें लेणें । पाषाण रेखिले मनुष्यपणें । परी चलनें वळणें नेत्रचाळणें । त्याकरणें जे विसरती ॥१८५॥
तेचि अवस्था सकळांप्रति । सप्त दिवस सप्तराती । कृष्णवदना निरीक्षिती । कृष्णीं वृत्ति उपरमल्या ॥८६॥
मेरूसारिखा अचलतर । गोवर्धनासि देऊनि कर । स्वस्थानींहूनि कमलावर । पद अणुमात्र चाळीना ॥८७॥
तैसींच अवघीं व्रजौकसें । कृष्णवदनेन्दुसुधारसें । वेधितां मुकलीं जीवात्मदशे । कृष्णसमरसें तटस्थ ॥८८॥
चंडकिरण कृष्णाचे नयन । कृष्ण समीरणाचा प्रान । कृष्ण ज्वलना उद्दीपन । कृष्ण जीवन सलीलांचें ॥८९॥
कृष्ण धरेचा आधार । कृष्णीं गगनासि विस्तार । कृष्णीं महदादि अहंकार । घेती अंकुर कृष्णेच्छा ॥१९०॥
ब्रह्मापासूनि काडीवरी । कृष्ण चैतन्य भूतमात्रीं । कृष्ण जगदात्मा असूत्रसुत्रीं । पहाती नेत्रीं व्रजवासी ॥९१॥
क्षेत्रज्ञ होतां सुखसुलीन । तटस्थ क्षेत्रींचा करणगण । तैसा व्रजात्मा अचल कृष्ण । तैं अचल व्रजजन सहजेंची ॥९२॥
व्रजींचा वृत्तांत ऐसिया परी । राया वर्तला सप्तरात्री । तो निवेदिला तुझिये श्रोत्रीं । जो बाळचरित्रीं कवि गाती ॥९३॥
तंव येरीकडे मरुद्गण । संवर्तकादि प्रळयघन । मेघज्योति प्रभंजन । व्रजीं वर्षोन त्रासलीं ॥९४॥
व्रजींचा वांकुडा नोहे रोम । वृथा झाला अवघा श्रम । निष्फळ देवेंद्राचा काम । दुःखें विराम पावले ॥१९५॥
वृत्तांत कथिती शक्रापासीं । कृष्ण ऐश्वर्याचा राशि । तेणें रक्षिलें गोकुळासी । गोवर्धनासी उचलूनी ॥९६॥
आमुचा झाला हृदयस्फोट । रिक्त झाला सिंधुघट । भरूनि जातां यमुनापाट । जीवसंवाट आटले ॥९७॥
जलोपळांचे झाले अचळ । कर्पूरगौराऐसे धवळ । तन्मौळींचें गंगाजळ । तैसेस हळुहळु पाझरती ॥९८॥
प्रभंजनाचीं वळली मेटें । विद्युल्लतांच्या कडकडाटें । दिग्गजांचीं कर्णकपाटें । घोषें अचाटें अडकलीं ॥९९॥
यावरी काय कर्तव्यता । ते विवराजी अमरनाथा । कृष्ण असतां पशुपांमाथां । विक्रम वृथा हा तुमचा ॥२००॥

कृष्णयोगानुभावं तं निशाम्येंद्रोऽतिविस्मितः । निःस्तंभो भ्रष्टसंकल्पः स्वान् मेघान् संन्यवारयत् ॥२४॥

योगमायाप्रवर्तक । तो श्रीकृष्ण व्रजनायक । त्याचा प्रताप ऐकोनि अचुक । झाला अधोमुख अमरेंद्र ॥१॥
गळाला आंगींचा पदाभिमान । व्रजनाशाचा संकल्प भग्न । सलज्ज विस्मित धरूनि मौन । हातें निजगण निवारी ॥२॥
मरुद्गण संवर्तक । संज्ञेवरूनि वारी सम्यक । कृष्णावज्ञेचा धरूनि धाक । विवर्णमुख अमरेंद्र ॥३॥
कुध्रघ्न मानी उदेलें विघ्न । ऐश्वर्यप्रताप झाला भग्न । लज्जा चिंता दोन्ही नग्न । लागलें लग्न तयांशीं ॥४॥
संवर्तकादि मरुद्गण । भ्रूसंकेतें निवारून । पुन्हा करूनि पटबंधन । प्रलयमेघगण ठेविला ॥२०५॥

खं व्यभ्रमुदितादित्यं वातवर्षं च दारुणम् । निशाम्योपरतं गोपान् गोवर्धनधरोऽब्रवीत् ॥२५॥

ऐकोनि इंद्राचें आज्ञावचन । प्रळयमेघ प्रभंजन । उपरम पावतां निरभ्र गगन । चंडकिरण उगवला ॥६॥
प्रळयकाळींची काळरात्री । दिग्मंडळ नभ धरित्री । व्रजीं अवतरली सप्त रात्री । सर्वां नेत्रीं अप्रकट ॥७॥
ऐसें दुर्दिन महाघोर । हरलें होतां नभ निरभ्र । निर्मळ प्रकटला सहस्रकर । प्राणी समग्र हरिखेले ॥८॥
प्रचंडवायूचा सडसडाट । प्रलयवृष्टीचा झडझडाट । विद्युत्पतनाचे कडकडाट । झाले प्रविष्ट निजलोकीं ॥९॥
कोवळें उष्ण अमृतोपम । सीतार्दिसांसि आवडे परम । निर्वात देखोनि हरले श्रम । सर्व विश्राम पावले ॥२१०॥
मेघवर्जित नभ मेदिनी । इंद्र व्रीडित अंतःकरणीं । हें जाणोनि पशुपां चक्रपाणि । अभयवचनीं आज्ञापी ॥११॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP