श्रीशुक उवाच - इंद्रस्तदाऽऽत्मनः पूजां विज्ञाय विहतां नृप ।
गोपेभ्यः कृष्णनाथेभ्यो नंदादिभ्यश्र्चुकोप सः ॥१॥

शुक म्हणे गा यादवीपौत्रा । वारिधिपरिधान पाळिसी गोत्रा । हरिमित्राच्या पुत्रपुत्रा । कृष्णचरित्रा परियेसीं ॥१८॥
कृष्णें निवारितां शक्रमख । तेणें मानिलें परमदुःख । अमर ऐश्वर्याचा हरिख । मानी फोक सक्रोध ॥१९॥
पंक्तीमाजूनियां उठविलें । कीं सभेमाजि निर्भत्सिंलें । किंवा रासभीं आरूढ केलें । गजावरूनि उतरूनियां ॥२०॥
तैसा आपुला पूजानिषेध । इंद्रें जाणोनिया प्रसिद्ध । नंदादिगोपांवरी सक्रोध । करूं निरुद्ध प्रवर्तला ॥२१॥
नंदादिगोपां रक्षणार्थ । शिरीं असतां कृष्णनाथ । इंद्र त्यांच्या संहारार्थ । स्वसामर्थ्य अवलंबी ॥२२॥

गणं सांवर्तकं नाम मेघानां चांतकारिणाम् । इंद्रः प्राचोदयत् क्रुद्धो वाक्यं चाहेशमान्युत ॥२॥

प्रळयकर्ता जो मेघगण । जया सांवर्तक अभिधान । इंद्र तया करी प्रेरण । बोले कोपोन ईशत्वें ॥२३॥
अहो तुम्ही प्रळयमेघ । घेऊनि दुर्वृष्टीचा वोघ । करा नंदादिगोकुळभंग । अतिसवेग वर्षोनी ॥२४॥
गोपांशिरीं नाथ कृष्ण । असतां न चले म्हणाल यत्न । तरी मरुद्गणेंशीं परिवारून । शक्र भगवान् मी येतों ॥२५॥
आंगीं भरतां क्रोधवारें । सहसा विवेक तेव्हां न थरे । गर्वें आंगींच्या हुंबरे । सत्त्वविचार सांडवला ॥२६॥
शिव विरंचि प्रमुख करून । क्षीराब्धितटीं करितां स्तवन । प्रसन्न होऊनि जो भगवान । विधीच्या वदनें बोलिला ॥२७॥
साक्षाद्वसुदेवाचे सदनीं । भूभार उतरावया लागुनी । मी अवतरतों ऐसी वाणी । शक्र ऐकोनि विसरला ॥२८॥
त्यावरी गर्भस्तुतीचे ठायीं । सुरविरंच्यदिसुरसमुदायीं । सर्वीं स्तविला शेषशायी । तें ये समयीं विसरला ॥२९॥
आणि पूतनादिअघबकहननीं । सुरसमुदायें सहित गगनीं । दुंदुभिघोषें विमायींहुनी । वर्षें सुमनीं उत्साहें ॥३०॥
तें आजि अवघेंचि विसरला । स्वमानभंगें संतापला  पदाभिमानें गर्वा चढला । बोले दुर्वोला सक्रोधें ॥३१॥
आपुला अपमान अंतरीं । स्मरोनि दुःखें विस्मय करी । त्या शक्रोक्ति शुकवैखरी । पांचां श्लोकीं वाखाणी ॥३२॥

इंद्र उवाच - अहो श्रीमदमाहात्म्यं गोपानां काननौकसाम् ।
कृष्णं मर्त्यमुपाश्रित्य ये चक्रुर्देवहेलनम् ॥३॥

अहो ऐसें म्हणे खेदें । मनुष्यें देवां न मनती श्रीमदें । वृथा आमुचीं शक्रादिपदें । बल्लववृंदें हेळितां ॥३३॥
श्रीमदाचा महिमा कैसा । कळूनि कृष्ण मनुष्य ऐसा । धरूनि तयाचा भरंवसा । केलें उपहासा सुरांच्या ॥३४॥
जळामाजि आपुलें जिणें । वैर मत्स्यांशीं लावणें । ऐसें केलें बल्लवगणें । उन्मत्तपणें श्रीमदें ॥३५॥
गौळियें वनौकसें वनीं । यांची जीविका गोधनीं कृष्ण । मनुष्य आश्रयूनी । माझे अपमानीं प्रवर्तलीं ॥३६॥

यथा‍ऽदृढैः कर्ममयैः ऋतुभिर्नाम नौनिभैः । विद्यामान्वीक्षिकीं हित्वा तितीर्षंति भवार्णवम् ॥४॥

यांचा श्रीपाद हरितां मज । कोण वारील प्रतापपूज्य । अजाश्रयें हेळितां गज । न वटे लाज यां कैसी ॥३७॥
जैसे मीमांसक मूर्ख । अध्यात्मविद्येसि होऊनि विमुख । भवनिस्तरणा श्रयिती मख । दृढनौकेसारिखें ॥३८॥
तैसेंचि बल्लवगणीं येथ । फलप्रदानीं जे असमर्थ । गोद्विजाद्रिमख प्रशस्त । कल्याणार्थ पैं केले ॥३९॥
जैशी कागदाची नाव । नामावरूनि धरितां भाव । सांडूनि सुदृढ तरणोपाव । मूर्ख अपाव पावती ॥४०॥
तैसें अवमानूनि मातें । करूनि नाममात्र मखातें । भुलोनि कृष्ण मनुष्यातें । गौळी अनयांतें आचरले ॥४१॥
कृष्ण मनुष्य मानूनि शक्र । निंदाप्रवाहें वदवी वक्त्र । परी ते सरस्वती तेथ अवक्र । प्रकटी स्तोत्र कृष्णाचें ॥४२॥

वाचालं बालिशं स्तब्धमज्ञं पंडितमानिनम् । कृष्णं मर्त्यमुपाश्रित्य गोपा मे चक्रुरप्रियम् ॥५॥

निंदात्मक प्रथम भाव । तो हा शक्रअभिप्राव । त्याचि वाक्यें गिरा स्तव । करी लाघव तें ऐका ॥४३॥
कृष्णा मनुष्या आश्रयूनी । श्रीमदोद्धतगोपगणीं । केली मजशीं अप्रिय करणी । आतां कोठूनि वांचती ॥४४॥
कृष्ण वाचाळ बहुभाषणी । कृष्ण बालिश अपूज्यपणीं । कृष्ण अनम्र स्तब्धगुणीं । म्हणवी ज्ञानी अज्ञत्वें ॥४५॥
इत्यादि निंदा हेलनोक्ति । इंद्र बोलिला ज्या दुरुक्ति । त्या वाक्यांत सरस्वती । वदली स्तुति ते ऐका ॥४६॥
वेदशास्त्रांचा वक्ता कृष्ण । कोण वाचाळ त्यावांचून । वक्तृत्वाचें जन्मस्थान । आदिकारण ऋतसत्य ॥४७॥
जैसें बालक निरभिमान । न मगे पूजादि सन्मान । सर्वगतत्वें श्रीकृष्ण पूर्ण । पूजाबिमानवर्जित ॥४८॥
जे जे जेथ होय पूजा । अर्पे सर्व गा गरुडध्वजा । नव्हे कीं एकदेशी बिडौजा । जो क्षोभे व्रजा अपमानें ॥४९॥
कृष्ण जगज्जनकाचा जनक । त्यावीण श्रेष्ठ नाहीं पृथक् । कोणा लववील तो मस्तक । राहे निष्टंक स्तब्धत्वें ॥५०॥
ज्याहूनि पृथक् ज्ञाता नाहीं । म्हणोनि श्रीकृष्ण अज्ञ पाहीं । अभेदज्ञानें विदुषां देहीं । वर्ते पाहीं आत्मत्वें ॥५१॥
अभेद ज्ञानियांच्या मूर्ति । कृष्णाचि म्हणवी पूर्णस्थिति । भक्तवात्सल्यें मनुष्यव्यक्ति । घे श्रीपति परब्रह्म ॥५२॥
ऐसिया श्रीकृष्णातें नेणौन । शक्र निंदी प्रक्षोभोन । क्षोभें आज्ञापी मेघगण । तें निरूपण अवधारा ॥५३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP