तस्मै नमो व्रजजनैः सह चक्रेऽऽत्मनाऽऽत्मने । अहो पश्यत शैलोऽसौ रूपी नोऽनुग्रहं व्यधात् ॥३६॥

मग तो यशोदानंदन । सहित अवघे व्रजींचे जन । आपणचि झाला गोवर्धन । मग त्या कारणें वंदीतसे ॥६७॥
देव होऊनि देवाम यजिजे । आगभगर्भीं रहस्य हें जें । अनुष्ठूनियां गरुडध्वजें । तें येथ सहजें दाविलें ॥६८॥
व्रजजनेंशीं कृष्ण आपण । आपणाकारणें करी नमन । अहो पहा हें आश्चर्य कोण । म्हणे स्मयमान होउनी ॥६९॥
प्रत्यक्ष गोवर्धनाचळ । रूप धरूनियां विशाळ । प्रकट झाला दीनदयाळ । वरद स्नेहाळ आम्हांसी ॥२७०॥
आम्हांकारणें अनुग्रह । करावया धरिला देह । येर्‍हवीं भूतमात्रीं स्नेह । निःसंदेह पैं याचा ॥७१॥

एषोऽवजानतो मर्त्यान् कामरूपी वनौकसः । हंति ह्यस्मै नमस्यामः शर्मणे आत्मनो गवाम् ॥३७॥

तरी हा गोवर्धनगिरि । इच्छेसारिखीं रूपें धरी । आपणा न जाणती त्यां मारी । वनसंचारी विहरतां ॥७२॥
याचा महिमा जें नेणती । गोधनेंसहित तेयां प्रति । व्याघ्रसर्पादि धरूनि व्यक्ति । क्षोभकवृत्ति संहारी ॥७३॥
आम्हीं पूजिला सप्रेमभावें । प्रकट झाला परमदैवें । आतां नमस्कारूं या आघवे । कल्याण व्हावें जरी तुम्हां ॥७४॥
आमुच्या धनधान्यगोधना । कुटुंबेंशीं बल्लवगणा । क्षेमकल्याणवर्धना । याच्या चरणां नमीतसों ॥२७५॥
मग तो गोवर्धनभगवान । कृपादृष्टि अवलोकून । पावता झाला तिरोधान । देखोनि व्रजजन विस्मित ॥७६॥

इत्यद्रिगोद्विजमखं वासुदेवप्रचोदिताः । यथा विधाय ते गोपाः सहकृष्णा व्रजं गताः ॥३८॥

निवारूनियां महेंद्रयाग । जैसा कृष्णें बोधिला मार्ग । गोद्विजाद्रिअध्वर चांग । तैसा सांग संपविला ॥७७॥
इतुकें कृत्य संपादून । कृष्णेंसहित बल्लवगण । निज गोधनें पुरस्कारून । व्रजभुवन पातले ॥७८॥
परस्परें करिती गोष्टी । केवढें आश्चर्य देखिलें दृष्टी । गोवर्धनाची कृपादृष्टि । सुखसंतुष्टि पावलों ॥७९॥
प्रतिवत्सरीं इंद्रमख । गोपवृद्ध नंदप्रमुख । करितां न लभों ऐसें सुख । कृष्णें कौतुक दाविलें ॥२८०॥
एक म्हणती हा श्रीपति । गोपाळक बाळमति । यासि कोठूनि मखव्युत्पत्ति । कैसी युक्ति हे कथिली ॥८१॥
एक म्हणती हा सर्वज्ञ । कालरूपी त्रिकालज्ञ । भूत भविष्य वर्तमान । जाणे संपूर्ण कालात्मा ॥८२॥
ऐसे गोपाळ नोपयुवति । कृष्णमहिमा वाखाणिती । परस्परें विस्मय करिती । शुक हें कथी नृपातें ॥८३॥
दत्तात्रेयकृपावरद । श्रीमज्जनार्दनप्रसाद । एकनाथें चिदानंद । निजस्वानंद पावविला ॥८४॥
तया स्वानंदाची मूर्ति । गोविंदसद्गुरु चक्रवर्ती । पदजलप्रसादभागीरथी । भाग्यें आपैती दयार्णवा ॥२८५॥
तें हें श्रीमद्भागवत । अठरा सहस्र ज्याचें गणित । परमहंस जेथें रमत । स्कंध त्यांत दशम हा ॥८६॥
त्यांतील अध्याय चोव्विसावा । मख वारूनि श्रीकृष्णें मघवा । क्षोभविला तो वृत्तांत आघवा । मनुष्यदेवा शुक वदला ॥८७॥
पुढले अध्यायीं निरूपण । व्रजनाशार्थ संक्रंदन । वर्षतां कृष्ण गोवर्धन । धरूनि रक्षण करील ॥८८॥
तया कथेच्या श्रवणाप्रति । सादर असावें सभाग्यश्रोतीं । अभाग्यांची न चुके गुंती । ममताभ्रांति भवभानें ॥८९॥
तथापि श्रोते सभाग्य जनीं । निजवैभवें विभागूनी । बैसावें त्या कथाश्रवणीं । स्वसुख देऊनि निववावें ॥२९०॥
कृष्णकथामृताचा स्वाद । चाखतां पावती परमानंद । मग त्या भवभणगत्वें शब्द । कोण अनुवाद करूं शके ॥९१॥
निंदास्तुतीसि देऊनि पाठी । वृथा न करूनि चावटी । कृष्णकीर्तनश्रवणासाठीं । लागे पाठीं अपवर्ग ॥९२॥
सर्वांचरणीं ठेवूनि माथा । प्रार्थीं दयार्णव परमार्था । सांडूनि भवभयाची व्यथा । हे सत्कथा सेवावी ॥९३॥
( रायें अमृतें धरोनि भाव । ग्रंथलेखन केलें सर्व । श्रीकृपेनें समुद्रभव । लंघूनि विभव भोगितसे ॥९४॥
तीर्थरूपें ग्रंथलेखन । केलें त्यात आध्य न्यून । होती ते स्वामी कृपेनें । राय अमृतें लिहिलेंसे ॥२९५॥
आतां करोनि कृपादृष्टि । सर्वदा रक्षावे भवसंकटीं । संतती संपत्ती आक्ष पुष्टी । देऊनि तुष्टी ताराए ॥९६॥
इतुके मागतों वरदान । मज द्यावेजी कृपाघन । वर्षोनि मजला जीवनें । अमृतपणें पोसावे ॥९७॥
ग्रंथरूपें श्रीहरि वसति । करावी मम मंदिरीं । वंशपरंपरा टाकूनि दुरी । क्षणभरही न वजावे ॥९८॥
आजि धन्य धन्य हें शरीर । आजि धन्य धन्य तिथीवार । कीं मज हस्त ग्रंथ आवग्र । लेखन समग्र केलेंसे ॥९९॥ )
( या ओव्या मुंगीप्रतींत अधिक आहेत, त्या लेखकानें घातल्या असाव्यात. )
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायाम दयार्णवानुचरविरचितायामिंद्रविषादो नाम चतुर्विंशतितमोऽध्यायः ॥२४॥
श्रीकृष्णर्पाणमस्तु ॥ श्लोक ॥३८॥ टीका ओव्या ॥२९३॥ एवं संख्या ॥३३१॥ शुभं भवतु ॥ ( चोविसावा अध्यय मिळून ओवीसंख्या १२५४६ )

चोविसावा अध्याय समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP