पच्यंतां विविधाः पाकाः सूपांताः पायसादयः । संयावापूपशष्कुल्यः सर्वदोहश्च गृह्यताम् ॥२६॥

गोवर्धनासमीपवर्ती । शुद्ध समान करूनि क्षिति । तेथ बल्लवीं समस्तीं । सर्व संपत्ति आणाव्या ॥९२॥
दोहोनि गोधनें चतुर्विध । अवघें संग्रहिजे दुग्ध । पायस पचविध जे परम शुद्ध । जें भूविबुधप्रियतम ॥९३॥
शुद्ध गोधूम भरडून । अपआज्यशर्करा मेळवून । संयावनामक परमान्न । कीजे निर्माण यज्ञार्थ ॥९४॥
व्रीहि शाली नीवारयाति । आणूनि प्रियंगु ओदनार्थीं । शामाककोद्रवादि पंक्ति । तंडुल निगुतीं रांधावे ॥१९५॥
अपूप मंडक वटक पुरिया । सगर्भ भक्ष्यें विडुरिया । बहुविध शष्कुल्या फेणिया । क्षीर घारिया सकुमारा ॥९६॥
लाडु मोदक गुलवरिया । चणकपूरणाच्या तेलवरिया । संयावसगर्भ सांजवरिया । आणि कुरवडिया खुसखुशित ॥९७॥
मरीचवटक कूष्मांडवटक । शाका शलाटुव्यंजनें अनेक । संधितें सांड्या पर्पटक । रस अनेक निर्मावे ॥९८॥
लेह्यपेयचोष्यखाद्यें । भक्ष्यें भोज्यें नानाविधें । पायसें निर्मावीं केवळ दुग्धें । परम शुद्धें यज्ञार्थ ॥९९॥
मुद्गांटकादि सोलीव दाळी । नैश चूर्णाक्त सूपें पिवळीं । क्कथिका रुचिकर भोजनकाळीं । वेळोवेळीं साक्षेप ॥२००॥
साय नवनीत सद्यस्तप्त । थिजलें विघरलें मध्यस्थ । गव्याज्य मधु संग्रह बहुत । तो तो अगत्य करावा ॥१॥
भर्जित रामठ शुंठीमिरें । कोथिंबिरी लवणमिश्रें । वाघारणी देऊनि तक्रें । अतिरुचिकरें अशीं द्या ॥२॥
पच्यंतां विविधाः पाकाः । येथील विस्तार हा आसिका । जो जो विस्तारील जितुका । अर्थ तितुका ये ठायीं ॥३॥
अग्निप्रतिष्ठेवांचून । सहसा शोभा न पवे यज्ञ । गोवळांमनीं भक्ति उत्पन्न । व्यावया लागून हरि प्रेरी ॥४॥

हूयंतामग्नयः सम्यग् ब्राह्मणैर्ब्रह्मवादिभिः । अन्नं बहुविधं तेभ्यो देयं वो धेनुदक्षिणाः ॥२७॥

वेदवेत्तें सुब्राह्मण । जे कां मूर्तिमंत यज्ञ । ते साक्षेपें बोलावून । अग्निस्थापन करवावें ॥२०५॥
स्वस्तिवाचनपूर्वक । अभ्यर्चूनि नान्दीमुख । समारंभें कीजे मख । मंत्रघोक विध्युक्त ॥६॥
तुम्हीं वैश्यवर्गीं समस्तीं । ब्राह्मण पूजूनि पूर्णभक्ति । पूर्वोक्त अन्नें तयांप्रति । परमप्रीति अर्पावीं ॥७॥
सालंकृता सदक्षिणा । धेनु अर्पाव्या ब्राह्मणां । फलतांबूलस्त्रक्चंदना । देऊनि नाना उपचार ॥८॥
अथवा धेनुचि दक्षिणेवारी । अर्पूनियां विप्रांकरीं । ब्राह्मण तोषती अंतरीं । ते ते प्रकारीं पूजावे ॥९॥
ऐसे तोषवूनि ब्राह्मण । सुप्रसन्न चित्तेंकरून । ते जैं देती आशीर्वचन । तेव्हां कल्याण सर्वांसी ॥२१०॥
ब्राह्मणपूजनानंतर । अभ्यर्चिजे भूतमात्र । जेणें निवे सर्वांतर । परम सुखकर तें कर्म ॥११॥
समान करितां उच्चावच । वर्णाश्रमाचा विसंच । होऊं नेदिजे इतुकाच । तंतु साच रक्षावा ॥१२॥

अन्येभ्यश्चाऽऽश्वचांडालपतितेभ्यो यथाऽर्हतः । यवसं तु गवां दत्वा गिरये दीयतां बलिः ॥२८॥

जैशी जयाची योग्यता । तदनुसार त्या अर्चितां । परमतोष उपजे चित्ता । यथार्हता म्हणोनियां ॥१३॥
ब्राह्मणांहूनि जे सामान्य । पिपीलिकादि जंतु सान । वायसादि पक्षिगण । शृगाळ श्वान इत्यादि ॥१४॥
व्रात्य पतित चांडाळ । त्यां कारणेंही अन्न जळ । देऊनि करावा सांभाळ । जाणोनि शीळ यथोचित ॥२१५॥
आर्द्र शुष्क उत्तम तृण । अर्पूनि कीजे गोतर्पण । त्यांसी अयोग्य मंगळ स्नान । दीजे भोजन प्रिय ज्यां जें ॥१६॥
मग त्या गोवर्धनाद्रितळीं । विविधोपचारीं दीजे बळी । अन्नगोरसीं पुष्पीं फळीं । गिरिवर सकळीं पूजावा ॥१७॥
मग व्रजवासी समस्त । शिष्टप्रसादें भक्तवंत । शुचिष्मंत सालंकृत । चंदनलिप्त सुवासस ॥१८॥

स्वलंकृता भुक्तवंतः स्वनुलिप्ताः सुवाससः । प्रदक्षिणं च कुरुत गोविप्रानलपर्वतान् ॥२९॥

सकळ सुहृद स्वजनज्ञाति । बैसोनियां एकपंक्तीं । भोजन कीजे यावत्तृप्ति । अन्नीं प्रीति ज्यां जैशी ॥१९॥
ऐसीं सारूनि भोजनें । लेऊनि रुक्मरत्नाभरणें । परिधान करूनि दिव्य वसनें । माथां सुमनें वोवावीं ॥२२०॥
गाई ब्राह्मण हुताशन । आणि स्वर्चित गोवर्धन । यांसि करावें अभिवंदन । प्रदक्षिणापूर्वक ॥२१॥
ऐसें समस्त बल्लवांसी । रहस्य सांगे हृषीकेशी । डोलवूनि निजमौळासी । नंदादिकांसी अनुमोदी ॥२२॥
गाई ब्राह्मण हुताशन । धन्य पर्वत गोवर्धन । याचा महिमा वर्णी कोण । स्वमुखें कृष्ण म्हणतसे ॥२३॥
इत्यादि अर्चन यज्ञविधि । असाध्य साधिती सर्व सिद्धि । ऐशी माझी अलोट बुद्धि । गोपवृद्धीं विचारिजे ॥२४॥

एतन्मम मतं तात क्रियतां यदि रोचते । अर्थ गोब्राह्मणाद्रीणां मह्यं च दयितो मखः ॥३०॥

ऐसें माझें मत हें ताता । जरी रुचेल तुम्हां समस्तां । तरी अनुष्ठिजे आतां । विलंब सर्वथा न करावा ॥२२५॥
विप्र धेनु हुताशन । पर्वतरूपी गोवर्धन । यासी परम प्रिय हा यज्ञ । मजही कारणें प्रियतम ॥२६॥
विप्र धेनु पावक अद्रि । यांचा महिमा नेणिजे क्षुद्रीं । यांसी प्रिय हा बल्लवेंद्रीं । अत्यादरीं मख कीजे ॥२७॥
मजकारणें ही परम प्रिय । ऐसें म्हणतां यादवराय । नंदादि पशुपांचा समुदाय । ऐकोनि विस्मय पावला ॥२८॥
शुक म्हणे गा धरित्रीपाळा । भारतकुळवल्लीच्या फळा । कृष्णें बोधूनि गोपां सकळां । ज्ञातृत्वकळा मोहिल्या ॥२९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP