हे स्तोतकृष्ण हे अंशो श्रीदामन् सुबलार्जुन । विशालर्षभ तेजस्विन् देवप्रस्थ वरुथप ॥३१॥

कृष्णावेगळा गोपाळ आन । स्तोककृष्ण नामेंकरून । त्यासि संबोधी भगवान् । हे स्तोककृष्ण म्हणोनी ॥६६॥
बलरामाहूनि वेगळा । त्या सुबळनामका गोपाळा । संबोधूनि तये वेळां । घनसांवळा बोलतसे ॥६७॥
अर्जुन आणि विशाळनामा । देवप्रस्थ अंशु सुवर्मा । ऋषभ तेजस्वी श्रीदामा । वरूथपादि वयस्य ॥६८॥
एवमादि गोपाळांसी । संबोधूनियां ऋषीकेशी । म्हणे पहा हो तरुवरांसी । करुणा कैशी जाकळी ॥६९॥

पश्यतैतान् महाभागान् परार्थैकान्तजीवितान् । वातवर्षातपहिमान् संहतो वारयन्ति नः ॥३२॥

पहा रे गडी हो या वृक्षांतें । दयावंतां सभाग्यांतें । परोपकारार्थ स्वजीवितें । अवंचकत्वें वाहती ॥२७०॥
चंडवायु झडझडाट । जलवृष्टीचा कडकडाट । चंडकिरणांचा उद्भट । ग्रीष्मादिकीं निदाघ ॥७१॥
तैसेंचि शीतकाळींचें हिम । प्राणिपीडक जें दुर्गम । इत्यादि आन सोसिती श्रम । देती विश्राम आम्हांतें ॥७२॥

अहो एषां वर जन्म सर्वप्राण्युपजीवनम् । सुजनस्येव येषां वै विमुखा यान्ति नार्थिनः ॥३३॥

परमाश्चर्य हें म्हणोनी । पहा हो हे स्थावरयोनि । जीवविताती सर्व प्राणी । सर्वार्पणीं सर्वदा ॥७३॥
शाखा पत्रें पुष्पें फळें । अग्र अंकुर त्वचा मूळें । इच्छेसारिखीं एके काळें । अप्रूनि मोकळे निर्मम ॥७४॥
जयांपासूनि विमुख अर्थी । कोण्हे काळीं ही न वचती । जन्मूनि धन्य ते परमार्थी । जे स्वार्थें परार्थीं उपकृत ॥२७५॥
सज्जना परी ते हे द्रुम । अर्थिकांचे पुरविती काम । यालागीं धन्य त्यांचेंचि जन्म । पुरुषोत्तम म्हणतसे ॥७६॥
सधनें वसनें धान्यें धनें । वृत्तिक्षेत्रतनुसंतानें । अर्थस्वार्थें पशुगोधनें । दयाळुपणें उपकरिती ॥७७॥
जीवें प्राणें अवंचक । जयांपासूनि याचक । विमुख गेले हा कलंक । न शिवोनी शशांक लाजविती ॥७८॥
तयांशीं तुल्य हे द्रुमवर । कैसे सर्वस्वें उदार । तेंचि स्वमुखें मुरलीधर । सविस्तर वर्णितसे ॥७९॥

पत्रपुष्पफलच्छायामूलवल्कलदारुभिः । गंधनिर्यासभस्मास्थितोक्मैः कामान्वितन्वते ॥३४॥

देखोनि पत्रांचे अर्थी जन । त्यांसि करिती पत्रार्पण । पुष्पेप्सूंचें आर्तिहरण । पुष्पें वोपूनि करिताती ॥२८०॥
फळांची अपेक्षा असे ज्यांसी । इच्छिलीं फळें देती त्यांसी । वातातपशीतार्तांसी । स्वच्छायेशीं सुख देती ॥८१॥
त्वचामूलें भस्मार्पणें । करूनि उपचारिती रुग्णें । मधुमक्षिकाभ्रमरघ्राणें । गंधार्पणें तोषविती ॥८२॥
निर्यास म्हणिजे डीक चीक । त्यांचे अर्थी जे याचक । त्यांसि न होऊनियां विमुख । देती सुख तदर्पणें ॥८३॥
तोक्म म्हणिजे पल्लवांकुर । केवळ शुष्ककाष्ठें ते दारु । वल्कलें त्वचांमाजील पदर । जे सादर तदर्पणें ॥८४॥
अस्थि म्हणिजे अंठोळिया । त्याही अर्चिती अर्थियां । जीवें प्राणें वेंचूनियां । जे आलिया निवीवती ॥२८५॥
ज्यांचे जैसे मनोरथ । ते पुरविती विसरूनि स्वार्थ । ऐसा जयांचा परमार्थ । धन्य परार्थ जे झाले ॥८६॥

एतावजन्मसाफल्यं देहिनामिह देहिषु । प्राणैरर्थैर्धिया वाचा श्रेय एवाचरेत्सदा ॥३५॥

अनेक देहवंतांच्या ठायीं । येथ जन्मले जे मनुष्यदेहीं । त्यांचें जन्मसाफल्य पाहीं । गुणीं इहीं हरि म्हणे ॥८७॥
मनुष्यदेहीं वृक्षापरी । अवंचक जे परोपकारी । त्यांचीच जन्मसाफल्यथोरी । वर्णी श्रीहरि निजवदनें ॥८८॥
बुद्धिपूर्वक अर्थें प्राणें । येथ कायावाचामनें । श्रेय संग्रहिती परोपकरणें । सुकृताचरणें सर्वदा ॥८९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP