न मय्यावेशितधियां कामः कामाय कल्पते । भर्जिता क्कथिता धाना प्रायो बीजाय नेप्यते ॥२६॥

तुम्हीच पूर्वीं माझ्या ठायीं । मनोबुद्धि होऊनि पाहीं । मत्प्राप्तिकामनाप्रवाहीं । क्रिया सर्वही आचरलां ॥३१॥
जेव्हां मत्पर झाला काम । तेव्हांच खंडले पुनर्जन्म । भोगाल मत्संगआराम । कैवल्यधाम न नसोनी ॥३२॥
विषयकामें लोकांतरें । जन्म मृत्यु न परिहरे । मत्प्राप्तीच्या कामभरें । नुरे दुसरें भवभान ॥३३॥
ज्ञानानळें कर्मबीज । दग्ध करूनि भजले मज । त्यांसी जन्ममृत्यूचें काज । नाहीं सहज मत्कामें ॥३४॥
ज्ञानसंपन जे अभेद । मत्प्रेमभजनें परमानंद । भोगिती त्यांचा जन्मकंद । समूळीं विशद उन्मळला ॥२३५॥
ज्ञानानळें ज्या भर्जित । सप्रेमभजनानंदें क्कथित । सकामक्रिया त्या अंकुररहित । झाल्या निश्चित मत्कामें ॥३६॥
साळीयवादि धान्यजाति । भाजल्या उकडिल्या पूर्वस्थिति । आहारीं व्यवहारीं प्रतीति । परी नुगवती पेरिल्या ॥३७॥
अल्पक्षुधाहरणीं पटु । व्यापितां वृद्धि न शके घटूं । तैसा मत्कामें शेवटु । फाटे पटु संसृतीचा ॥३८॥
तैसा तुम्हीं मद्रतिकाम । लक्षूनि केले व्रतादि नियम । तोही तुमचा मनोधर्म । स्वेच्छासंगम पावाल ॥३९॥

याताबला व्रजं सिद्धा मयेमा रंस्यथ क्षपाः । यदुद्दिश्य व्रतमिदं चेरुरार्यार्चनं सतीः ॥२७॥

अबळा सिद्धा तुम्ही येथ । सिद्धि पावले मनोरथ । म्हणोनि व्रजाप्रति आनंदभरित । जा वो समस्त मद्वाक्यें ॥२४०॥
जया मनोरथाचिये सिद्धि । आर्यापूजन यथाविधि । आचरलां ते फळोपलब्धि । झाली त्रिशुद्धि ये काळीं ॥४१॥
जरी तूं मनोरथाचा वेत्ता । तरी कां व्रजा धाडिसी आतां । ऐसें म्हणाल तरी वृत्तांता । ऐका तत्त्वता अबला हो ॥४२॥
पुढें येणार ज्या या रजनी । तैं स्वइच्छा कुंजवनीं । मजशीं रमा हें गुह्य कानीं । ऐकोनि मनीं असों द्या ॥४३॥
मत्प्राप्तीचीं कृतसाधनें । फलोन्मुखें होती जेणें । तेणें मद्ध्यानें मत्स्मरणें । मनें वदनें रंगों द्या ॥४४॥
बोधितां संकेत उत्तरें । चित्तें मीनलीं परस्परें । गोपीमानसें कृष्णाकारें । बाह्यव्यापारें न चलती ॥२४५॥

श्रीशुक उवाच :- इत्यादिष्टा भगवता लब्धकामाः कुमारिकाः ।
ध्यायंत्यस्तत्पदांभोजं कृच्छ्रान्निर्विविशुर्व्रजम् ॥२८॥

शुक म्हणे गा मात्सीवत्सा । जाणोनि गोपींची अभीच्छा । संकेतवचनीं त्यांतें प्रोत्सा- । हूनी सदना पाठवी ॥४६॥
इत्यादि वचनें श्रीभगवानें । आज्ञापितां गोपीमनें । खेद मोर उभयपवनें । दोलायमान भासती ॥४७॥
सिद्धि पावले मनोरथ । तेणें कुमारी आनंदभरित । पुन्हा वियोग आज्ञाजनित । होती दुःखित तदुद्योगें ॥४८॥
प्रेष्ठाज्ञांचें पालन । तेणें प्रेमाभिवर्धन । आज्ञा लंघितां भंगे मन । विकल्पजनन तद्योगें ॥४९॥
आज्ञा अनुल्लंघ्य जाणूनि मनीं । परमक्लेशें व्रजकामिनी । हरिपादाब्जें धरूनि ध्यानीं । कष्टें तेथूनि निघाल्या ॥२५०॥
समानशीला समानव्यसनीं । समान अभीष्टफलसाधनीं । परमक्लेशें आज्ञेंकरूनी । त्या व्रजभुवनीं प्रवेशल्या ॥५१॥
कृष्णीं वेधल्या मनोवृत्ति । गृहीं यथापूर्व वर्तती । परंतु अस्ताव्यस्तस्मृति । इंद्रियगतिवैकल्यें ॥५२॥
ध्यानें मानसें कृष्णाकार । वदनीं कृष्णनामोच्चार । श्रवणीं कृष्णगुणादर । नेत्र तत्पर हरिरूपीं ॥५३॥
ऐशा गोपी पूर्णकामा । चित्तें मीनल्या मेघश्यामा । त्यांतें अश्वासूनि परमात्मा । यज्ञधामा चालिला ॥५४॥
कन्यकांच्या भक्तियोगें । अनुकंपिल्या कृपापाङ्गें । भक्तिवर्जित जे वाउगे । त्रयीमार्गी याज्ञिक ॥२५५॥
त्यांच्या पत्न्या तपस्विनी । त्यांवरी अनुग्रह इच्छूनि मनीं । याज्ञिकांच्या स्मयापहरणीं । चक्रपाणि प्रवर्तला ॥५६॥
ते येथूनि पुढेंकथा । शुक निवेदी सौभद्रसुता । श्रवणवदनें तेंचि श्रोतां । दयार्णवीं प्राशिजे ॥५७॥
( इति कात्यायनीव्रतम् । ) यज्ञपत्न्यांचें शुद्धपुण्य । तेणें ओळला करुणाघन । विप्रकार्मठ्यगर्वापहरण । मनीं धरूनि चालिला ॥५८॥

अथ गोपैः परिवृतो भगवान् देवकीसुतः । वृंदावनाद्गतो दूरं चारयन् गाः सहाग्रजः ॥२९॥

गोपकुमरी आश्वासून । संगवडियांशीं परिवारून । षड्गुणैश्वर्यसंपन्न । देवकीनंदन चालिला ॥५९॥
वृंदावनापासूनि दुरी । बलभद्रेंशीं श्रीमुरासि । गाई चारावया कांतारीं । गेला गजरीं स्वानंदें ॥२६०॥
विप्रभार्यांसि अनुग्रह । करावया देवकीतनय । यज्ञमंडपा समीप जाय । जातां काय बोलतसे ॥६१॥
श्रेष्ठजन्म ब्राह्मणयोनि । कर्मठ याज्ञिक सदाचरणी । अवघें वृथा निर्दयपणीं । धन्य यांहूनि हे द्रुम ॥६२॥
येणें अभिप्रायेंकरून । द्रुमां प्रशंसी भगवान् । संवगडियांतें संबोधून । म्हणे धन्य तरुवर हे ॥६३॥

निदाघार्कातपे तिग्मे छायाभिः स्वाभिरात्मनः । आतपत्रायितान्वीक्ष्य द्रुमानाह व्रजौकश ॥३०॥

उष्णकाळींचा तीव्र तरणि । तावित असतां कडतरकिरणीं । छत्राकार छाया करूनि आपणांतें रक्षिती ॥६४॥
ऐशिया देखोनि द्रुमांतें । व्रजौकसां संवगडियांतें । संबोधूनि सांगे त्यांतें । द्रुमगुणांतें भगवान् ॥२६५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 01, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP