अध्याय ३ रा - श्लोक ४ ते ७

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


ववौ वायुः सुखस्पर्शः पुण्यगन्धवहः शुचिः । अग्नयश्च द्विजातीनां शान्तास्तत्र समिन्धत ॥४॥

वायु सर्वशरीरवासी । जो चाळक शरीरासी । सम विषम होतां त्यासी । महारोगासि उपजवी ॥८७॥
वायु त्वगिंद्रियाचा अभिमान । त्याचेनि त्वचेसि स्पर्शज्ञान । तो वायु होतां न्यूनपूर्ण । मग सुखस्पर्श ॥८८॥
वातपित्तें तनु तापे । वातवातें तनु कांपे । वातशैत्याच्या प्रकोपें । सर्वांग खुपे तिडकांहीं ॥८९॥
जाणोनि हरीचा जन्मकाल । सुखस्पर्श वाहे अनिळ । अरोग होऊनि ब्रह्मांडगोळ । सुखकल्लोळ भोगितसे ॥९०॥
हें अंतर्वायूचें लक्षण । बाह्यवायु त्रिविध जाण । एथें होऊनि सावधान । विचक्षण परिसोत ॥९१॥
ताप वारूनि सुखशीळ । म्हणोनि म्हणिजे सुशीतळ । तैसाचि पवित्र यज्ञानिळ । पुष्पानिळ सुगंध ॥९२॥
गंगातरंगसंभूत । पवन प्राणियां स्पर्शत । पाप अकल्प निर्धूत । अपार सुकृत तत्स्पर्शें ॥९३॥
तुळसीवनें पंकजवनें । देवागारें यज्ञसदनें । वैष्णवभुवनें हरिकीर्तनें । त्या त्या पवनें स्पर्शिजे ॥९४॥
विप्रधेनूंचिया वसति । तीर्थें क्षेत्रें शुभवृत्ति । इत्यादिकांची मारुतगति । पुण्योत्पत्तिकारक ॥९५॥
जाणोनि हरीचा जन्मकाळ । शुचि सुगंध सुशीतळ । पुष्पवर्धक मंदानिळ । सुखसुकाळ प्रवाहे ॥९६॥
अग्नि सर्वांचिये शरीरीं । दीपनशोषणपचनाचारीं । यथानुकूळ निर्विकारी । सुखाची करी अभिवृद्धि ॥९७॥
तें द्विजा तीचें अग्नित्रय । सुप्रसन्न तेजोमय । स्वर्णप्रभा कल्याणविजय । लोकत्रय उजळिती ॥९८॥
सम्यक् म्हणजे बरव्या परी । सुप्रसन्न अभ्यंतरीं । व्यक्तिसमष्टीमाझारीं । आनंदकारी प्रकटला ॥९९॥

मनांच्यासन्प्रसन्नानि साधूनामसुरद्रुहाम् । जायमानेऽजने त्स्मिन्नेदुर्दुन्दुभयो दिवि ॥५॥

जैं आसन्न प्रसूतिसमय । तेव्हां विश्व आनंदमय । तेचि समयींचा हा अन्वय । सर्व श्लोकीं वर्णिला ॥१००॥
उपजणार जेव्हां हरि । तेव्हां समस्तही सुरवरीं । दुंदुभीच्या घोषगजरीं । परमोत्साह मांडिला ॥१॥
सनकादिक ब्रह्मनिष्ठ । कपिलादिक सिद्ध श्रेष्ठ । यांच्या आत्मस्थिति स्पष्ट । तोष उत्कृष्ट पातल्या ॥२॥
साधूंचीं सुप्रसन्न मनें । सांडिलीं त्रिगुणाच्या अभिमानें । वर्षोनि स्वानंदसुधाघनें । तीन्ही भुवनें निवविलीं ॥३॥
वर्जूनि कंसादिकांचा मेळ । उरला अवघा ब्रह्मांडगोळ । संतुष्टमनें आनंद बहळ । भोगी केवळ ते समयीं ॥४॥

जगुः किन्नरगन्धर्वास्तुष्टुवुः सिद्धचारणाः । विद्याधर्यश्च ननृतुरप्सरोभिः समं तदा ॥६॥

परमानंदेंशीं निर्जर । दुंदुभिघोषें करिती गजर । गाती गंधर्व किन्नर । हर्षनिर्भर होऊनि ॥१०५॥
सिद्ध चारण करिती स्तुति । विद्याधर नृत्य करिती । हावभाव लास्यरीति । नर्तविती चपलांगें ॥६॥
अप्सरा नर्तकी नर्तक । विद्याधरादि तौर्यत्रिक । शांतिपाठ मंत्रघोक । महर्षींचा ते काळीं ॥७॥

मुमुचुर्मुनयो देवाः सुमनांसि मुदान्विताः । मन्दं मन्दं जलधरा जगर्जुरनुसागरम् ॥७॥

मंत्राक्षतांच्या वर्षोनि मुष्टी । मुनींच्या सप्रेम कृपादृष्टि । सुरवर करिती सुमनवृष्टि । सुखसंतुष्टि ते काळीं ॥८॥
मेघमल्लरागमाळा । सिंधुगर्जना मृदंगताला । द्यावापृथिवी नर्तनशीला । दिग्मंडलासमवेत ॥९॥
शेजे संप्राप्त प्राणनाथ । विरहिणी तोषें रोमांचित । तैही तृणादि वृक्षीं धरा समस्त । लसलसीत कोंभैली ॥११०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP